::: आ दे श :::
( पारीत दिनांक :24.06.2016 )
आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार
सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली असून थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
तक्रारकर्त्याचे विरुध्दपक्ष क्र. 2 बँकेमध्ये बचत खाते क्र. 60039398645 आहे. तक्रारकर्त्यास त्याच्या व्यवसायासंबंधी अर्जुन पवार या व्यक्तीकडून रु. 44,000/- घ्यावयाचे होते, म्हणून अर्जुन पवार यांनी जिल्हा को-ऑप बँक नांदेड शाखा नांदेडचा दि. 20/6/2013 चा रु. 44,000/- चा चेक क्र. 297184 तक्रारकर्त्याला दिला. तक्रारकर्त्याने सदर चेक विरुध्दपक्ष क्र. 2 च्या बँकेमध्ये वटविण्यासाठी लावला. दोन ते तिन दिवस वाट पाहील्यावर धनादेशाची रक्कम जमा न झाल्यामुळे तक्रारकर्त्याने विचारपुस केली असता, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर 8-10 दिवसानंतर वरीष्ठांकडे तक्रार केली असता, माहीत पडले की, विरुध्दपक्ष क्र. 2 ने वटवणुकीसाठी पाठविलेला धनादेश विरुध्दपक्ष क्र.1 ने हरविला. त्यामुळे तक्रारकर्त्यास त्याची रक्कम मिळू शकली नाही. तसेच अर्जुन पवार यांचे विरुध्द कोणतीही कायदेशिर कारवाई करता आली नाही. अशा प्रकारे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी निष्काळजीपणा व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे. तक्रारकर्त्याने दि. 27/3/2014 ला विरुध्दपक्ष क्र. 1 ला नोटीस पाठविली, परंतु त्याची कोणतीही दखल विरुध्दपक्षाने घेतली नाही. तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्तरित्या धनादेशाची रक्कम रु. 44,000/- तक्रारकर्त्याला व्याजासह द्यावी. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईचे रु. 10,000/- व प्रकरणाच्या खर्चाचे रु. 5000/- विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्याला द्यावे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 07 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष क्र. 1 चे विरुध्द सदर प्रकरण एकतर्फी चालवण्याचे आदेश दि. 11/2/2016 ला मंचाने पारीत केले. त्यानंतर दि. 23/3/2016 रोजी विरुध्दपक्षाने जबाब दाखल केला, परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 विरुध्दचा एकतर्फीचा आदेश बाजुला न सारल्याने ( Set aside ) विरुध्दपक्ष क्र. 1 चा जबाब विचारात घेतला नाही.
विरुध्दपक्ष क्र. 2 यांचा लेखीजवाब :-
तक्रारकर्त्याने दि. 22/3/2016 रोजी पुरसीस दाखल करुन विरुध्दपक्ष क्र. 2 यांना प्रकरणातून कमी करण्यात यावे, असे नमुद केले.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतिज्ञालेखावर पुरावा व लेखी युक्तीवाद दाखल केला,
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने जिल्हा केा-ऑप. बँक शाखा नांदेड तर्फे शाखा व्यवस्थापक यांना विरुध्दपक्ष क्र. 2 केले होते. परंतु दि. 22/3/2016 रोजी पुरसीस दाखल करुन त्यांचे नाव प्रकरणातून कमी केले.
त्याच प्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 1 यांचे विरुध्द सदर प्रकरण विनाजबाब चालवण्याचे आदेश दि. 11/2/2016 ला मंचाने पारीत केले होते. त्यानंतर दि. 23/3/2016 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 ने जबाब दाखल करण्याची परवानगी मागीतली. त्यावर मंचाने तक्रारकर्त्याचे निवेदन मागीतले. परंतु तक्रारकर्त्याने त्यावर निवेदन न देता त्याच दिवशी प्रतिज्ञालेखाद्वारे पुरावा / प्रतिउत्तर दाखल केले व दि. 7/4/2016 रोजी लेखी युक्तीवाद दाखल केला. जबाब दाखल केल्यापासून विरुध्दपक्ष गैरहजर असल्याने विरुध्दपक्षाचा जबाब दाखल करुन घेतला गेला नाही. त्यानंतर आज रोजी विरुध्दपक्षाच्या वकीलांनी युक्तीवाद केला. सदर युक्तीवादातील केवळ कायदेशिर मुद्दे ( Law Point ) विचारात घेऊन प्रकरणात अंतीम आदेश पारीत करण्यात आला.
- तक्रारकर्त्याच्या तक्रारीनुसार तक्रारकर्त्याला अर्जुन सदरच्या पवार यांनी जिल्हा को-ऑप. बँक नांदेड शाखा नांदेडचा दि. 20/6/2013 चा रु. 44,000/- चा चेक क्र. 297184 दिला व सदर चेक विरुध्दपक्ष क्र. 2 कडे वटविण्यासाठी लावला. सदरहू चेकची रक्कम जमा न झाल्याने तक्रारकर्त्याने विचारपुस केली असता विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तरे मिळाली. 8/10 दिवसानंतर वरीष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केल्यावर तक्रारकर्त्याला असे कळले की, विरुध्दपक्ष क्र. 2 ने वटवणीसाठी पाठवलेला धनादेश विरुध्दपक्ष क्र. 1 ने कोठेतरी हरवून किंवा पाठवून दिला आहे व सदर धनादेश विरुध्दपक्ष क्र. 2 ला कुरीअरद्वारे पाठविला, परंतु पावती मागीतली असता, तक्रारकर्त्याला परत न केल्याने विरुध्दपक्ष क्र. 2 ने सुध्दा कोणताही पत्रव्यवहार किंवा कार्यवाही केली नाही. मुळ धनादेश व मेमो न मिळाल्याने तक्रारकर्त्याला अर्जुन पवार यांच्या विरुध्द कोणतीही कायदेशिर कारवाई करता आली नाही व त्यांचेकडून रु. 44,000/- सुध्दा मिळाले नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे 20/25 वेळा चकरा मारल्या व विरुध्दपक्ष क्र. 1 ला रजिस्टर पोस्टाद्वारे नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली, परंतु विरुध्दपक्ष यांनी कोणतीही दखल घेतली नाही. म्हणून सदर तक्रार मंचात दाखल केली.
- यावर विरुध्दपक्षाने युक्तीवादात असे म्हटले की, केवळ चेक हरवल्याने अर्जुन सदरलाल यांचे विरुध्द कायदेशिर कारवाई करण्याचे सर्व मार्ग बंद झाले, असे नाही व विरुध्दपक्ष क्र. 2 ला केाणत्याही सबळ कारणाशिवाय वगळले आहे.
- उभय पक्षांचे म्हणणे ऐकल्यावर मंचाने तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तांचे अवलोकन केले असता, दस्त क्र. 1 ( पृष्ठ क्र. 10) वर विरुध्दपक्ष क्र. 1 ने चेकची संपुर्ण माहीती देऊन सदर चेक अनादरीत झाल्याचे व कुरीअरद्वारे पाठवलेला चेक अद्यापपावेतो प्राप्त झालेला नाही, म्हणून ग्राहकाच्या विशेष विनंतीवरुन हे प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचे नमुद केले आहे. सदर प्रमाणपत्र दि. 13/12/2013 रोजी देण्यात आले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या तक्रारीवर विरुध्दपक्ष क्र. 1 ने काहीच कारवाई केली नाही, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. या उलट तक्रारकर्त्याने सदर प्रमाणपत्राचा उपयोग करुन कोणती कारवाई केली, या बद्दल तक्रारकर्त्याने कुठलाच खुलासा केला नाही. श्री अर्जुन सदरलाल यांनी दुसरा चेक दिला अथवा नाही, त्यांचे विरुध्द तक्रारकर्त्याने कारवाई केली का ? तक्रारकर्त्याने श्री अर्जुन सदरलाल यांचेकडून संपुर्ण रक्कम वसुल केली कां ? हे सर्व प्रश्न पुराव्याअभावी मंचासमोर अनुत्तरीत आहेत. केवळ तक्रारकर्त्याच्या तोंडी निवेदनावर विश्वास ठेवून, कोणत्याही सबळ पुराव्याअभावी तक्रारकर्त्याला श्री अर्जुन सदरलाल पवार यांचेकडून त्याची रक्कम प्राप्त झाली नाही, ही बाब मंचाला ग्राह्य धरता येणार नाही. तसेच तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्र. 1 विरुध्द करीत असलेल्या कारवाई मधील कालावधी जास्त असल्याचे मंचाच्या निदर्शनास आले आहे. दि. 13/12/2013 रोजी सदर प्रमाणपत्र मिळाल्यावर तक्रारकर्त्याने लगेच कोणतीही कारवाई केली नाही. तीन महिन्यानंतर म्हणजे दि. 27/3/2014 ला विरुध्दपक्ष क्र. 1 ला नोटीस पाठविली ( दस्त क्र. 3, पृष्ठ क्र. 12 ) व त्यानंतर जवळपास दीड वर्षांनी म्हणजे दि. 10/11/2015 ला मंचात तक्रार दाखल केली. त्याचप्रमाणे मंचासमोर दाखल करतांना तक्रारीत विरुध्दपक्ष क्र. 2 सुध्दा विरुध्दपक्ष क्र. 1 इतकाच जबाबदार असल्याने विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे निष्काळजीपणा केल्याचे नमुद करुन दोन्ही विरुध्दपक्षाकडून नुकसान भरपाईची मागणी केली, परंतु अचानक दि. 22/3/2016 रोजी पुरसीस दाखल करुन विरुध्दपक्ष क्र. 2 हे केवळ Formal Party असल्याचे नमुद करुन त्यांचे नाव सदर तक्रारीतुन कमी करण्यात आले. वास्तविक पाहता, विरुध्दपक्ष क्र. 2 यांनीच तक्रारकर्त्याने लावलेला चेक श्री अर्जुन सदरलाल यांच्या खात्यात अपुरा निधी असल्याने नाकारल्याचे दिसून येते. त्यामुळे गहाळ झालेल्या अनादरित चेक मेमोची दुसरी प्रत तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्र. 2 कडून प्राप्त करु शकला असता. परंतु तक्रारकर्त्याने कुठल्याही सबळ कारणाशिवाय विरुध्दपक्ष क्र. 2 ला तक्रारीतून वगळले असल्याचे मंचाला निदर्शनास आले आहे.
- वरील सर्व संदीग्ध परिस्थितीवरुन तक्रारकर्त्याची विरुध्दपक्ष क्र. 1 कडून रु. 44,000/- व्याजासह मिळण्याची मागणी मंचाला मान्य करता येणार नाही. परंतु अनादरीत चेक, मेमोसह गहाळ करण्याचे बेजबाबदार वर्तन विरुध्दपक्ष क्र. 1 कडून घडले असल्याने तक्रारकर्त्याला सदर प्रकरण मंचात दाखल करावे लागले. म्हणून तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 1 कडून शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईपोटी रु. 3000/- व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 2000/- मिळण्यास पात्र असल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.
सबब अंतीम आदेश खालील प्रमाणे…
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे
- प्रकरणातील संदीग्ध परिस्थितीवरुन तक्रारकर्त्याची, विरुध्दपक्ष क्र. 1 कडून रु. 44,000/- व्याजासह मिळण्याची मागणी नामंजुर करण्यात येत आहे.
- विरुध्दपक्ष क्र. 1 कडून तक्रारकर्त्याचा अनादरीत चेक, मेमोसह गहाळ झाल्याने, शारीरिक आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईपोटी विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारकर्त्याला रु. 3000/- ( रुपये तिन हजार ) व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 2000/- ( रुपये दोन हजार ) द्यावे
- उपरोक्त आदेशाची पुर्तता, निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाच्या आंत विरुध्दपक्षांनी करावी.
- सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.