(पारीत व्दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.पिठासीन अध्यक्ष)
(पारीत दिनांक–11 जुन 2020)
01. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1 व क्रं-2 बॅंके विरुध्द दोषपूर्ण सेवे बाबत प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याची आजी नामे सौ.सायत्राबाई शास्त्री धरणे आणि तिचा नातू तक्रारकर्ता श्री भानुदास गोविंदा चौधरी यांनी संयुक्तपणे विरुध्दपक्ष क्रं 1 महाराष्ट्र बॅंकेच्या भंडारा येथील शाखेत दिनांक-25 मे, 1988 रोजी मासिक व्याज जमा योजना रसिद प्रमाणे एकूण रुपये-10,000/- एवढी रक्कम एकूण 60 महिन्या करीता गुंतवणूक केली होती आणि त्यावर प्रतीवर्ष 10 टक्के एवढा व्याजदर देय होता. गुंतवणूकीची परिपक्वता तिथी 25/05/93 अशी होती. सदर पावतीचा क्रमांक-MIDS/B No.-0152078 असा आहे. परिपक्वता तिथी नंतर तक्रारकर्ता हा त्याचे आजी सोबत विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकाकडे गेला असता त्यांनी पुन्हा पाच वर्षा करीता रक्कम गुंतवणूक करण्यास सांगितले व त्यावर 10 टक्के व्याज मिळेल असे सांगितले व तक्रारदारांचे सही व आंगठे सुध्दा घेतले व रक्कम पुर्नगुंतवणूक केल्याचे सांगितले. दर पाच वर्षानी पुर्नगुंतवणूक होत असल्याचे समजून तक्रारदारांनी रक्कम काढली नाही. दरम्यानचे काळात तक्रारकर्त्याची आजी सायत्राबाई ही सन 2006 मध्ये मरण पावली व तिचे मृत्यू नंतर तक्रारकर्ता हा तिचा वारसदार आहे.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, तो जून-2015 मध्ये विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेत गुंतवणूक केलेली रक्कम व्याजासह परत मिळविण्यासाठी गेला असता बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकाने एकूण रक्कम रुपये-11,709/- मिळतील असे सांगितले, त्यावेळी त्याला सन 1993 नंतर मुदतठेवीची पुर्नगुंतवणूक झाली नसल्याचे प्रथम लक्षात आले. गैरअर्जदार क्रं 1 बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकांनी यापेक्षा जास्त रक्कम मिळू शकत नसल्याचे सांगितले यावर त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अशाप्रकारे विरुध्दपक्ष बॅंकेनी खोटेपणाने फसवणूक केली व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याने त्याला आर्थिक तसेच शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
तक्रारकर्त्याचे म्हणण्या प्रमाणे त्याला परिपक्वता तिथीस व्याजासह 15000/- देय होते आणि त्यानंतरचे कालावधी पासून आज पर्यंत 10 टक्के व्याज दर मिळणे अपेक्षीत आहे व त्यानुसार तो डिसेंबर, 2015 पर्यंत एकूण रुपये-49,440/- एवढी रक्कम मिळण्यास तो पात्र आहे. म्हणून शेवटी त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंकां विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 बॅंके कडून डिसेंबर-2015 पर्यंत व्याजासह संपूर्ण रक्कम रुपये-49,440/- मिळावी आणि सदर रकमेवर अदायगी पावेतो वार्षिक 10 टक्के दराने व्याज मिळावे. विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 बॅंकांचे दोषपूर्ण सेवेमुळे त्याला झालेल्या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-20,000 आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- वि.प.क्रं 1 व क्रं 2 बॅंके कडून त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं 2) बॅंक ऑफ महाराष्ट्र तर्फे शाखा प्रबंधक भंडारा शाखा यांनी एकत्रीत लेखी उत्तर पान क्रं -36 ते 39 वर ग्राहक मंचात दाखल केले. त्यांनी उत्तरामध्ये तक्रारीमधील त्यांचे विरुध्दचा संपूर्ण विपरीत मजकूर नामंजूर केला. आपले विशेष कथनात तक्रार ही 22 ते 23 वर्षा नंतर दाखल केली असल्याने मुदतबाहय असल्याचा आक्षेप नोंदविला. त्यांनी सायत्रीबाई हिने बॅंकेत रुपये-10,000/- एकूण पाच वर्षा करीता मासिक व्याज योजने अंतर्गत दिनांक-25.05.1988 रोजी गुंतविले होते व त्यावर प्रतिवर्ष 10 टक्के व्याज दर देय होता. तसेच सदर योजने अंतर्गत सायत्राबाई व्यतिरिक्त श्री भाऊदास गोविंदराव चौधरी हा व्दितीय लाभकर्ता होता परंतु त्यावेळी श्री भाऊदास हा अज्ञान होता. सदर योजनेची परिवक्ता तिथी 25.05.1993 होती या सर्व बाबी मान्य केल्यात. सदर मासिक योजने प्रमाणे मिळणारे व्याज हे श्रीमती सायत्राबाईचे खाते क्रं-10787 मध्ये जून-1988 ते जून-1993 पर्यंत जमा करण्यात आले. या तारखेस व त्यानंतर जमाकर्ता कधीही बॅंकेत आले नाहीत व त्यांनी एम.आय.डी.एस.डिपॉझीटचे भुगतान किंवा नुतनीकरणासाठी संपर्क साधला नाही म्हणून ती जमा रक्कम बॅंकेत अनक्लेम्ड डिपॉझीट म्हणून पडून राहिली. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमा नुसार अनक्लेम्ड डिपॉझीटची रक्कम सेंट्रल ऑफीस पुणे येथील खात्यात वळती करावी लागते, त्याप्रमाणे सेंट्रल ऑफीस पुणे येथे सदर रक्कम दिनांक-28.06.2014 रोजी पाठवून दिली. त्यानंतर ऑगस्ट, 2015 मध्ये भाऊदास चौधरी हा सदर योजनेची पावती घेऊन बॅंकेत आला होता. भाऊदास हा जमाकर्ती सायत्राबाई धरणे हिचा नातू असून सायत्राबाई ही दिनांक-21.01.2006 रोजी मरण पावली. सेंट्रल ऑफीस पुणे येथे रक्कम पाठविलेली असल्याने तक्रारकर्त्याचे दाव्यासह दस्तऐवज दिनांक-19.10.2015 रोजी बॅंकेचे क्षेत्रीय कार्यालय नागपूर व त्यानंतर सेंट्रल ऑफीस पुणे येथे पाठविण्यात आले. बॅंकेच्या वरिष्ठ अधिका-यांचे निर्देशा नुसार तक्रारकर्ता श्री भाऊदास उर्फ भानुदास गोविंदा चौधरी याचे खाते क्रं-60224417047 मध्ये दिनांक-18.11.2015 रोजी मुद्दल रुपये-10,000/- व त्यावर व्याज रुपये-1709/- अशा रकमा जमा करण्यात आल्या व सदर दावा बंद करण्यात आला त्यामुळे तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष बॅंके कडून आता काहीही घेणे नाही. विरुध्दपक्ष बॅंकेची कोणतीही चुक नसताना जास्तीची रक्कम मिळण्यासाठी खोटी तक्रार केलेली असल्याने ती खर्चासह खारीज करण्यात यावी असा उजर वि.प.क्रं 1 व क्रं 2 बॅंके तर्फे घेण्यात आला.
04. तक्रारकर्त्याने पान क्रं 12 वरील दस्तऐवज यादी नुसार दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये प्रामुख्याने ठेवीची पावती, तक्रारकर्त्याचे बॅंकेचे पासबुक, सायत्राबाईचे मृत्यू प्रमाणपत्र, ग्राम पंचायतीचे वारसान प्रमाणपत्र, दोन्ही विरुध्दपक्षांना दिनांक-11.01.2016 रोजीची पाठविलेली कायदेशीर नोटीस आणि दिनांक-15.01.2016 रोजी नोटीस मिळाल्या बाबत वि.प.च्या पोच अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. तसेच तक्रारकर्त्याने पान क्रं 69 ते 72 वर स्वतःचे शपथपत्र दाखल केले आणि पान क्रं 73 ते 76 वर लेखी युक्तीवाद दाखल केला.
05. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं 2 बॅंके तर्फे एकत्रीत लेखी उत्तर पान क्रं -36 ते 39 वर ग्राहक मंचात दाखल केले. तसेच पान क्रं 42 वरील दस्तऐवज यादी नुसार मासिक व्याज जमा रसीद तसेच दिनांक-19.10.2015, 23.10.2015, 18.11.2015 असा बॅंकेचा अंतर्गत पत्रव्यवहार आणि मासिक व्याज जमा योजनेचे दिनांक-25 मे, 1988 पर्यंतचे लेजर अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. वि.प. तर्फे पान क्रं.64 व 65 वर शपथेवरील पुरावा दाखल केला. तसेच पान क्रं 77 व 78 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. पान क्रं 88 व 89 वर रिझर्व्ह बॅंकेचे गुगलवरील निर्देश ज्यामध्ये बॅंकेच्या व्यवहार दिनांका पासून 10 वर्ष पर्यंत रेकॉर्ड ठेवण्या बाबत नमुद आहे.
06. तक्रारकर्त्याची तक्रार, पुरावा, लेखी युक्तीवाद व दाखल दस्तऐवज तसेच वि.प.बॅंकेचे लेखी उत्तर, पुरावा, लेखी युक्तीवाद व दाखल दस्तऐवज इत्यादीचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले त्याच बरोबर उभय पक्षाचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद एैकला असता ग्राहक न्यायमंचा समोर खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
01 | त.क. हा विरुध्दपक्ष बॅंकेचा ग्राहक होतो काय? | -होय- |
02 | विरुध्दपक्ष बॅंकेनी दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब तक्रारकर्त्याने पुराव्यानिशी सिध्द केली काय? | -होय- |
03 | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
::निष्कर्ष::
मुद्दा क्रं 1 ते 3 बाबत-
07. प्रस्तुत तक्रारीतील दाखल दस्तऐवज आणि उभय पक्षांचे कथन यावरुन तक्रारकर्त्याची आजी नामे सौ.सायत्राबाई शास्त्री धरणे आणि तिचा नातू तक्रारकर्ता श्री भानुदास गोविंदा चौधरी यांनी संयुक्तपणे विरुध्दपक्ष क्रं 1 महाराष्ट्र बॅंकेच्या शाखेत दिनांक-25 मे, 1988 रोजी मासिक व्याज जमा योजना रसिद प्रमाणे एकूण रुपये-10,000/- एवढी रक्कम एकूण 60 महिन्या करीता गुंतवणूक केली होती आणि त्यावर प्रतीवर्ष 10 टक्के एवढा व्याजदर देय होता. गुंतवणूकीची परिपक्वता तिथी 25/05/93 अशी होती. सदर पावतीचा क्रमांक-MIDS/B No.-0152078 असा आहे. यावरुन तक्रारकर्ता हा वि.प.बॅंकेचा ग्राहक होतो आणि त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
08. विरुध्दपक्ष बॅंकेच्या उत्तरा प्रमाणे योजनेची परिवक्ता तिथी 25.05.1993 होती. सदर मासिक योजने प्रमाणे मिळणारे व्याज हे श्रीमती सायत्राबाईचे खाते क्रं-10787 मध्ये जून-1988 ते जून-1993 पर्यंत जमा करण्यात आले. या तारखेस व त्यानंतर जमाकर्ता कधीही बॅंकेत आले नाहीत व त्यांनी एम.आय.डी.एस.डिपॉझीटचे भुगतान किंवा नुतनीकरणासाठी संपर्क साधला नाही म्हणून ती जमा रक्कम बॅंकेत अनक्लेम्ड डिपॉझीट म्हणून पडून राहिली. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमा नुसार अनक्लेम्ड डिपॉझीटची रक्कम सेंट्रल ऑफीस पुणे येथील खात्यात वळती करावी लागते, त्याप्रमाणे सेंट्रल ऑफीस पुणे येथे सदर रक्कम दिनांक-28.06.2014 रोजी पाठवून दिली. त्यानंतर ऑगस्ट, 2015 मध्ये भाऊदास चौधरी हा सदर योजनेची पावती घेऊन बॅंकेत आला होता. भाऊदास हा जमाकर्ती सायत्राबाई धरणे हिचा नातू असून सायत्राबाई ही दिनांक-21.01.2006 रोजी मरण पावली. सेंट्रल ऑफीस पुणे येथे रक्कम पाठविलेली असल्याने तक्रारकर्त्याचे दाव्यासह दस्तऐवज दिनांक-19.10.2015 रोजी बॅंकेचे क्षेत्रीय कार्यालय नागपूर व त्यानंतर सेंट्रल ऑफीस पुणे येथे पाठविण्यात आले. बॅंकेच्या वरिष्ठ अधिका-यांचे निर्देशा नुसार तक्रारकर्ता श्री भाऊदास उर्फ भानुदास गोविंदा चौधरी याचे खाते क्रं-60224417047 मध्ये दिनांक-18.11.2015 रोजी मुद्दल रुपये-10,000/- व त्यावर व्याज रुपये-1709/- अशा रकमा जमा करण्यात आल्या व सदर दावा बंद करण्यात आला त्यामुळे तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष बॅंके कडून आता काहीही घेणे नाही.
09. तक्रारकर्त्याने पान क्रं 14 व 15 वर त्याचे वि.प.क्रं 1 बॅंकेच्या खात्यात असलेल्या खाते उता-याची प्रत दाखल केली त्यानुसार तक्रारकर्त्याचे खाते क्रं-60224417047 दिनांक-18.11.2015 रोजी मुद्दल रुपये-10,000/- व त्यावर व्याज रुपये-1709/-अशा रकमा जमा करण्यात आल्याचे दिसून येते. विरुध्दपक्ष बॅंकेच्या उत्तरा नुसार ऑगस्ट, 2015 मध्ये भाऊदास चौधरी हा सदर योजनेची पावती घेऊन बॅंकेत आला होता ही बाब मान्य केलेली आहे. विरुध्दपक्ष बॅंकेनी दिनांक-19.10.2015, 23.10.2015, 18.11.2015 असा बॅंकेचा वरिष्ठ अधिकारी यांचे अंतर्गत झालेल्या पत्रव्यवहार दाखल केलेला आहे याचाच अर्थ असा होतो की, ऑगस्ट, 2015 पूर्वी विरुध्दपक्ष बॅंकेनी कोणताही लेखी पत्रव्यवहार तक्रारकर्त्याशी केलेला नाही. विरुध्दपक्ष बॅंकेच्या उत्तरा प्रमाणे सदर मासिक योजने प्रमाणे मिळणारे व्याज हे श्रीमती सायत्राबाईचे खाते क्रं-10787 मध्ये जून-1988 ते जून-1993 पर्यंत जमा करण्यात आले. सदर पावती प्रमाणे परिवक्वता तिथी ही 25/05/1993 अशी आहे याचाच अर्थ परिपक्वता तिथी पर्यंतच व्याज वि.प.बॅंके तर्फे अदा केलेले आहे. विरुध्दपक्ष बॅंकेनी पान क्रं 64 व 65 वर दाखल केलेल्या शपथेवरील पुराव्या मध्ये सायत्राबाईच्या खाते क्रं 10787 मध्ये जून 1988 ते 1993 पर्यंत नियमित व्याज जमा केल्याचे नमुद केले परंतु या संबधात लेखी पुरावा दाखल केलेला नाही. ग्राहक मंचा तर्फे वि.प.बॅंकेनी शपथेवर पुरावा दाखल केलेला असल्याने जून-1993 पर्यंतचे व्याज सायत्राबाईचे खात्यात जमा केल्याचे ग्राहय धरण्यात येते. जुलै-1993 ते दिनांक-18.11.2015 पर्यंत काहीही व्याज दिलेले नाही. तक्रारकर्त्याचे खात्यामध्ये दिनाक-18.11.2015 रोजी मुददल रुपये-10000/- आणि नाममात्र व्याज रुपये-1709/- असे मिळून एकूण रुपये-11709/- जमा केलेत. दरम्यानचे कालावधीत म्हणजे जून-1993 ते दिनांक-18.11.2015 पर्यंत विरुध्दपक्ष बॅंकेनी कोणतीही कार्यवाही तसेच तक्रारकर्त्याशी कोणताही लेखी पत्रव्यवहार केल्या बाबत कोणताही लेखी दस्तऐवजी पुरावा दाखल केलेला नाही. वस्तुतः रिझर्व्ह बॅंकेच्या नियमा प्रमाणे एखादी मुदतठेव तशीच पडून असेल तर ती बॅंकेनी स्वतःहून पुर्नगुंतवणूक करणे आवश्यक आहे परंतु तसे काहीही बॅंकेनी केल्या बाबत कोणताही पुरावा आमचे समोर आलेला नाही. विरुध्दपक्ष बॅंकेनी रेकॉर्ड जतन कालावधी बाबत निर्देशाची प्रत दाखल केली परंतु त्याचा उपयोग या प्रकरणात विरुध्दपक्ष बॅंकेला होणार नाही याचे कारण असे आहे की, ग्राहकाचा गुंतवणूकी संबधातील पैशाचा बॅंकेशी झालेला व्यवहार आहे. विरुध्दपक्ष बॅंकेनी सन 2015 मध्ये जेंव्हा तक्रारकर्ता बॅंकेत आला त्यावेळी त्याचे प्रकरणा बाबत बॅंकेच्या वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केलेला आहे आणि ही त्यांची संबधित ग्राहकास दिलेली दोषपूर्ण सेवा आहे. विरुध्दपक्ष बॅंकेनी स्वतःहून दरम्यानचे काळात कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याने प्रस्तुत तक्रारीस सतत कारण घडत असल्याने मुदतीची बाधा या प्रकरणात येत नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी तक्रारकर्त्याचे खात्यात मुददल रुपये-10,000/- आणि नाममात्र व्याज रुपये-1709/- अशी रक्कम दिनांक-18.11.2015 रोजी जमा केलेल्या आहेत. विरुध्दपक्ष बॅंकेच्या लेखी उत्तरा प्रमाणे आणि शपथेवरील कथना प्रमाणे बॅंकेनी श्रीमती सायत्राबाईचे खाते क्रं 10787 मध्ये मूळ मुद्दल रक्कम रुपये-10,000/- वर जून-1993 पर्यंत व्याज जमा केले असल्याचे नमुद केले आहे, वि.प.बॅंकेनी या बाबत लेखी पुरावा सादर केलेला नाही पण शपथेवरील कथन असल्याने जून-1993 पर्यंतचे व्याज श्रीमती सायत्राबाईचे बॅंक खात्यात जमा केल्याचे ग्राहक मंचाव्दारे ग्राहय धरण्यात येते. परंतु जुलै-1993 ते दिनांक-18.11.2015 पर्यंत व्याजाची रक्कम जमा झालेली नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी दिनांक-18.11.2015 रोजी तक्रारकर्त्याचे बॅंकेतील खात्यात मूळ मुददलाची रक्कम जमा केलेली आहे त्यामुळे तक्रारकर्त्याला मूळ मुद्दल रुपये-10,000/- वर जुलै-1993 ते त्याचे बॅंक खात्यात प्रत्यक्ष मुद्दल रक्कम रुपये-10,000/- जमा केल्याचा दिनांक-18.11.2015 पावेतो वार्षिक-9 टक्के दरा प्रमाणे व्याज मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल तथापि विरुध्दपक्ष बॅंकेनी दिनांक-18.11.2015 रोजी तक्रारकर्त्याचे वि.प.बॅंकेच्या खात्यात नाममात्र व्याजाची जमा केलेली रक्कम रुपये-1709/- ची बॅंकेनी वजावट करावी आणि उर्वरीत व्याजाची हिशोबा प्रमाणे येणारी रक्कम तक्रारकर्त्याला अदा करावी असे आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल. विरुध्दपक्ष बॅंकेनी दिलेल्या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल रुपये-2500/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-2500/-अशा रकमा त्याला मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे ग्राहक मंचाचे मत आहे. त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्रं 3 अनुसार खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
:: अंतिम आदेश ::
01) तक्रारकर्त्याची विरुध्दपक्ष क्रं-1) बॅंक ऑफ महाराष्ट्र, शाखा मेनरोड भंडारा तर्फे शाखा व्यवस्थापक आणि विरुध्दपक्ष क्रं-2) बॅंक ऑफ महाराष्ट्र तर्फे उपमहाव्यवस्थापक,नागपूर परिक्षेत्र नागपूर यांचे विरुध्दची तक्रार वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
02) विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंकेला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास मूळ मुद्दल रक्कम रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) वर जुलै-1993 पासून ते तक्रारकर्त्याचे बॅंक खात्यात प्रत्यक्ष मुद्दल रक्कम रुपये-10,000/- जमा केल्याचा दिनांक-18.11.2015 पावेतो वार्षिक-9 टक्के दरा प्रमाणे हिशोबा नुसार येणारी व्याजाची रक्कम अदा करावी तथापि विरुध्दपक्ष बॅंकेनी तक्रारकर्त्याचे खात्यात दिनांक-18.11.2015 रोजी नाममात्र व्याजाची जमा केलेली रक्कम रुपये-1709/- (अक्षरी रुपये एक हजार सातशे नऊ फक्त) बॅंकेनी त्यामधून वजावट करावी आणि त्यानंतर हिशोबा प्रमाणे येणारी उर्वरीत व्याजाची रक्कम तक्रारकर्त्याला अदा करावी.
03) विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंकेनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल रुपये-2500/- (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-2500/-(अक्षरी रुपये दोन हजार पाचशे फक्त) अशा रकमा तक्रारकर्त्यास अदा कराव्यात.
04) सदर अंतिम आदेशाचे अनुपान विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंकेनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या सदर निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंकेनी दिलेल्या विहित मुदतीत आदेशाचे अनुपालन न केल्यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-2 मध्ये नमुद केल्या प्रमाणे हिशोबा नुसार येणारी व्याजाची रक्कम आणि सदर येणा-या रकमेवर निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांची मुदत सोडून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-6 टक्के दरा प्रमाणे व्याज असे मिळून येणारी रक्कम तक्रारकर्त्यास देण्यास विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंक वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या जबाबदार राहिल.
05) उभय पक्षांना निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन दयावी.
06) तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.