नि.22
मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्या - सौ वर्षा शिंदे
मा.सदस्य – सौ मनिषा कुलकर्णी – रजेवर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 19/2013
तक्रार नोंद तारीख : 05/03/2013
तक्रार दाखल तारीख : 19/03/2013
निकाल तारीख : 13/09/2013
----------------------------------------------
श्री परप्पा मुरारी महेशवाडगी
रा.गंगानगर, महात्मा फुले हौसिंग,
जयंत बेघर आण्णाभाऊ साठे नगर,
आष्टा, ता.वाळवा जि.सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे शाखाधिकारी
शाखा आष्टा ता.वाळवा जि. सांगली
2. बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे रिजनल मॅनेजर
कावळा नाका, ताराराणी चौक, कोल्हापूर
जि.कोल्हापूर (वगळले) ........ सामनेवाला
तक्रारदार तर्फे : अॅड श्री एस.एस.कठारे
जाबदारक्र.1 तर्फे : अॅड श्री शरदचंद्र वग्यानी
जाबदारक्र.2 : वगळले
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. सदस्या : श्रीमती वर्षा शिंदे
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराचे सेव्हिंग्ज खातेवरील रक्कम सामनेवाला बँकेने अदा न करुन सेवात्रुटी केलेने दाखल केली आहे. प्रस्तुत तक्रार स्वीकृत केली. तक्रारदाराने सामनेवाला बँकेचे रिजनल मॅनेजर यांना आवश्यक पक्षकार म्हणून सामील करणेत यावे याबाबत ग्राहक संरक्षण कायदा कलम 12(2)(ब) अन्वये अर्ज दिला होता. दि.19/3/13 चे आदेशान्वये विद्यमान मंचाने सदर अर्ज नामंजूर केला. सदर आदेशान्वये सामनेवाला क्र.2 यांना प्रस्तुत प्रकरणातून वगळणेत आले. त्याप्रमाणे नि.1 वर दुरुस्ती करणेत आली. सामनेवाला क्र.1 बॅंकेस नोटीस आदेश झाला. नोटीस लागू. सामनेवाला क्र.1 वकीलांमार्फत हजर. दि.26/6/13 रोजी मंचाचे नि.13 चे आदेशान्वये खर्च रक्कम रु.100/- करणेच्या अटीवर एकतर्फा आदेश रद्द केला. नि.15 वर सामनेवाला बँकेचे लेखी म्हणणे दाखल. उभय पक्षांचा लेखी युक्तिवाद अनुक्रमे नि.20 व 21 वर दाखल. आज रोजी तक्रारदार हजर त्यांचा तोंडी युक्तिवाद ऐकला. सामनेवाला बँकेचे प्रतिनिधी गैरहजर. प्रकरण निकालावर घेतले.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी -
सामनेवाला क्र.1 राष्ट्रीयकृत बँक असून बँकेची शाखा आष्टा ता.वाळवा येथे आहे. सदर बँकेचे शाखेने तक्रारदाराचे बचत खाते क्र.20237137584 असे आहे. त्यामुळे तक्रारदार बँकेचे ग्राहक आहेत. सदर खातेवर आजअखेर रु.14,21,142 अधिक नियमाप्रमाणे व्याज जमा होते व आहे. तक्रारदार सामनेवाले बँकेने बचत खातेवरील रक्कम काढणेस गेले असता बँकेने तक्रारदाराचे खातेवरील रक्कम देणेस टाळाटाळ करुन नकार दिला. तक्रारदार वयोवृध्द ज्येष्ठ नागरिक आहे. वयोवृध्द काळात पैशाची गरज दूर व्हावी याकरिता अतिशय कष्ट करुन, पै पै जमा करुन सदर बचत खातेवर ठेव ठेवली होती. तक्रारदाराचे वय झालेने औषधोपचारासाठी व दैनंदिन गरजा भागवणेसाठी सदर रकमेची त्यांना अत्यंत निकडीची गरज आहे. तक्रारदाराने स्वतःजवळची सर्व रक्कम सदर बँकेवर विश्वास ठेवून बचत खातेवर ठेवली हाती. तक्रारदाराचे अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नसलेने त्यांना स्वतःची नड भागवणेकरिता दुसरीकडून कर्जाऊ पैसे घ्यावे लागत आहेत. तक्रारदाराने विनंती करुनही त्याची स्वतःची हक्काची रक्कम सामनेवाला बँकेने दिली नाहीच. तक्रारदाराची घरगुती कारणासाठी सदरच्या रकमेची रक्कम आवश्यकता होती व आहे. त्यामुळे सदर रक्कम मिळावी म्हणून प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. सबब विनंती की, तक्रारदाराचे बचत खात्यावरील ठेवीची रक्कम रु.14,21,142/- अधिक रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 11 टक्केप्रमाणे व्याज मिळावे, मानसिक व आर्थिक नुकसानीपोटी रु.1 लाख मिळावेत.
3. आपल्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ तक्रारदाराने नि.2 ला आपले शपथपत्र दाखल केले असून नि.4 फेरिस्तसोबत नि.4/1, 4/2 व 4/3 अन्वये तीन कागदपत्रे हजर केली आहे. नि.11 वर सरतपासाचे शपथपत्र दाखल आहे.
4. सामनेवाला बँकेने नि.15 ला लेखी म्हणणे दाखल केले आहे. सदर लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराचे तक्रार नाकारली आहे. सामनेवाला बँक पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदाराच्या बचत खात्याचा नंबर 20237137584 असलेचे कथन धादांत खोटे व असत्य आहे. वस्तुस्थती अशी आहे की, तक्रारदार व त्यांच्या पत्नी सौ सखुबाई पराप्पा महेशवडगी यांनी दि.14/2/2006 रोजी सामनेवाला बँकेत दोघांचे नावे संयुक्त असे बचत खाते सुरु केले आहे. त्यांचा खाते क्र. 2019362 असा होता. सदरचे खाते सुरु करण्यासाठी सामनेवाला बँकेच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. सदरचे खाते अद्यापी सुरु आहे. दरम्यान संगणक प्रणालीमध्ये बदल झाल्यामुळे दि.21/10/10 पासून सदर खात्याचा पूर्वीचा क्र.2019362 बदलून नवीन नं.20237137584 असा झाला आहे व त्याचवेळी सौ सखुबाई पराप्पा महेशवडगी यांचे नाव सदर संयुक्त खात्यामध्ये कमी झाले आहे. केवळ संगणक प्रणालीच्या बदलामुळे सदर खात्यास केवळ अर्जदार यांचेच नाव दाखविण्यात येत आहे. परंतु सदरचे खाते संयुक्त असेच आहे. सदरचे खातेवरील पत्नीचे नाव कमी करुन मिळणेसाठी तक्रारदार यांनी दि.19/10/11 रोजी लेखी अर्ज दिला. त्यावर सामनेवाला बँकेचे संबंधीत अधिका-यांनी सदर खाते संयुक्त असलेने त्यांच्या पत्नीचे नाव कमी करणेसाठी त्यांच्या पत्नीची संमती आवश्यक आहे असा शेरा लिहिला. दरम्यान सामनेवाला बँकेच्या संबंधीत क्लर्कना सदर अर्जदार यांचे नावे संगणकावर दर्शविण्यात येत असलेले खाते अर्जदार यांचे एकाच नावाने असलेचे निदर्शनास आलेमुळे सदर संबंधीत क्लर्कने नजरचुकीने अर्जदार यांचे नावे नवीन पासबुक तयार करुन दिले. त्यानंतर त्वरित सामनेवाला यांचे संबंधीत क्लर्कच्या निदर्शनास आले की, संगणकावर दाखविण्यात येत असलेले सदरचे खाते हे अर्जदार व त्यांचे पत्नीचे संयुक्त नावे आहे. त्यावेळी संबंधीत क्लर्कने सदर पासबुकमध्ये दुरुस्ती करणेसाठी सदर पासबुकची अर्जदार यांचेकडे मागणी केली असता अर्जदारनी पासबुक देणेस नकार दिला. अशा रितीने अर्जदार यांना संबंधीत क्लर्कच्या नजरचुकीने त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या संयुक्त बचत खातेचे पासबुक अर्जदार यांचे नावे दिले गेले याचा गैरफायदा घेणेचे दृष्टीने अर्जदारने सदर संयुक्त खात्यावरील रक्कम काढून घेणेचा प्रयत्न चालविला. त्यावेळी सामनेवाला बँकेने अर्जदारना त्यांचे पत्नीचे संमतीशिवाय सदर खात्यावरील रक्कम देता येणार नाही याची कल्पना दिली. त्यानंतर दि.4/11/11 रोजी अर्जदार यांच्या पत्नी सौ सखुबाई पराप्पा महेशवडगी यांनी त्यांचे सदरचे संयुक्त खातेवरील जमा असलेली रक्कम तक्रारदार यांना न्यायालयाच्या आदेशाशिवाय देण्यात येवू नये असा अर्ज दिल्याने समनेवाला बँकेने तक्रारदारांना रक्कम दिलेली नाही. तक्रारदार व त्यांचे पत्नी या दोघांनी सदर रकमेची मागणी केल्यास त्यांना रक्कम देण्यास बँक बांधील आहे. तसेच सदरचे खातेशिवाय तक्रारदार व त्याचे पत्नीचे नावे अन्य कुठलेही खाते नाही. नियमाप्रमाणे सदर खात्यावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज जमा होत आहे. त्यामुळे तक्रारदाराचे कोणतेही नुकसान झालेले नाही. त्यामुळे तक्रारअर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी मागणी सामनेवाला यांनी केली आहे.
5. सामनेवाला यांनी आपले म्हणणेचे पुष्ठयर्थ नि.16 ला शपथपत्र व नि.18 चे फेरिस्तअन्वये एकूण 10 कागदपत्रे दाखल केली आहेत.
6. तक्रारदाराची तक्रार, सामनेवालेचे म्हणणे व पुराव्यादाखल कागदपत्रे यांचा विचार करता सदर प्रकरणात खालील मुद्दे आमच्या निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. सामनेवाला बँकेने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? होय.
2. तक्रारदारास मागणी केलेप्रमाणे रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश शेवटी दिलेप्रमाणे.
:- कारणे -:
मुद्दा क्र.1 ते 3
7. तक्रारदार सामनेवाला बँकेचा बचत ठेवीदार ग्राहक आहे हे सामनेवालांनी मान्य केले आहे. त्याबाबत वाद नाही. तक्रारदाराने नि.4/1 अन्वये दाखल केलेले बचत खाते क्र. 20237137584 या पासबुकाच्या साक्षांकित प्रतीवरुन सदर नमूद खाते नंबर दिसून येतो. तसेच तक्रारदाराचा फोटोही आहे. त्यावर बँकेचे गोल सील शिक्का व सही आहे. सदर खातेवर दि.20/10/11 रोजी रु.11,75,000/- जमा वर्गची नोंद असून सदर अखेर शिल्लक रु.14,21,142/- दिसून येते.
8. सदर खाते नंबरचे तक्रारदाराचे कथन धादांत खोटे असल्याचे प्रतिपादन सामनेवाला बँकेने लेखी म्हणणेतील कलम 4 मध्ये केले आहे. त्याचवेळी कलम 6 मध्ये सामनेवाला बँकेने सदर तक्रारदार व त्याचे पत्नीचे नावे सुरु असलेल्या बचत खातेचा नंबर 2019362 हा बदलून 20237137584 असा झाला हे मान्य केले आहे. नि.18/4 वर दि.14/2/06 ते 21/2/10 चा SBGEN 2019362 चा खातेउतारा दाखल केला आहे. सदर खातेसमोर महेशवाडगी परप्पा यांचे नाव नमूद आहे. पुन्हा खालील बाजूस महेशवाडगी पराप्पा व महेशवाडगी सखुबाई पराप्पा यांच्या नावाची नोंद दिसते. तसेच नि.18/5 अन्वये खाते क्र. 20237137584 चा खातेउतारा दाखल केला आहे. दि.21/2/10 ते 9/2/13 अखेर नोंदी रु.14,93,500/- शिल्लक दिसते. तक्रारदाराचे कथनानुसार त्याचे स्वतःचे वैयक्तिक बचत खाते आहे तर सामनेवाला बँकेचे कथनानुसार सदर नवीन खातेसुध्दा संयुक्त बचत खाते आहे. या अनुषंगाने पुराव्याचा विचार करता तक्रारदाराचे नावचे असलेचे नवीन वैयक्तिक बचत खाते पासबुक क्लार्कच्या नजरचुकीने दिलेचे सामनेवाला बँकेने मान्य केले आहे.
9. नि.18/1 वर सामनेवाला याने तक्रारदार व सखुबाई पराप्पा महेशवाडगी यांचे नावे खाते उघडणेबाबतचा दोघांचे अंगठयानशिीचा बचत खाते उघडण्याबाबतच्या अर्जाची साक्षांकीत प्रत दाखल केली आहे. यावर दोघांचे फोटो आहेत. खाते उघडताना परिचयकर्ता म्हणून सुनिल बापू कवठेकर यांनी सहया केलेल्या आहेत. सदर खाते दि.14/2/2006 रोजी उघडल्याचे दिसून येते. प्रस्तुत अर्जाचे बारकाईने अवलोकन केले असता सदर संयुक्त खात्यासंदर्भात सदर खाते चालविण्याबाबत स्पष्टपणे नामनिर्देश नाही तसेच सदर खात्यावरील शिल्लक रक्कम कोणाला द्यावयाची याबाबतही नामनिर्देश केल्याचे दिसून येत नाही. वस्तुतः संयुक्त खाते उघडताना सदर खातेवरील व्यवहार हे संयुक्त खातेदारांच्या दोहोंच्या संमतीने चालविले जात असतील तसे स्पष्ट लिखित स्वरुपात संमतीपत्रे घेतली जातात. तसेच संयुक्त खातेदार म्हणून जितक्या व्यक्ती आहेत, त्यांच्यापैकी सर्वजणांना व्यवहार करायचे असतील तर त्या पध्दतीने लिखित स्वरुपातील स्पष्ट निर्देश घेतले जातात. तसेच संयुक्त खात्यावर एकाच्या सहीने व्यवहार करायचे असतील तसेही स्पष्ट लिखित निर्देश घेतले जातात. ही बँकांची संयुक्त खातेवरील व्यवहार कोणी करावयाचे स्पष्टता असणारी माहिती नमूद केलेली नाही. तसेच बँक खाते चालविण्याबाबत संयुक्त खातेदारांनी सदर दोघांना दोघांच्यावतीने एकटयाला, लिखित स्वरुपात अधिकार दिल्याबाबतचा फॉर्म जो संयुक्त खातेदाराच्या सहीनिशी असतो, तो बँकींग व्यवहाराच्या प्रचलित तरतुदीनुसार घेतला जातो, सदर खातेवरील व्यवहाराबाबत स्पष्ट निर्देश दिलेबाबतचा कोणताही फॉर्म प्रस्तुत प्रकरणी दाखल केला नाही अथवा सदर खाते उघडण्याच्या अर्जावर त्याची स्पष्टपणे नोंद केलेली नाही. अथवा सदर खाते नेमके कोणी चालवायचे आहे याबाबतचा स्पष्ट पुरावा सामनेवाला बँकेने दिलेला नाही. वादाकरिता सदर अर्जावरुन सदर खाते संयुक्त खाते आहे असे गृहित धरले व त्या अनुषंगाने पुराव्याचा विचार करावयाचा झाल्यास खाते उघडावयाच्या अर्जावरच संदिग्धता दिसून येते. तसेच सदर संयुक्त खातेदारांच्या नंतर सदर रक्कम कोणास मिळावी याबाबतची काही स्पष्टता नाही. सदर संयुक्त खातेदारांच्या पश्चात सदर रकमांचा कायदेशीर वारस अथवा सदर रकमा कोणास द्याव्यात (नॉमिनेशन) बाबत स्पष्टता दिसून येत नाही अथवा त्याअनुषंगाने कोणताही पुरावा दाखल केलेला नाही.
10. नि.18/3 वरील टॅक्स फॉर्म, 18/1 वरील खाते उघडण्याचा फॉर्म 18/6 वरील अर्ज, नि.18/8 वरील व 18/10 वरील पोच इ. प्रती सदर मंचाच्या प्रबंधकांनी प्रमाणीत करुन साक्षांकित केलेल्या आहेत. तसेच नि.18/2 वर तक्रारदाराच्या नावची जी शिधापत्रिका दाखल केली आहे, सदर शिधापत्रिकेची सत्यप्रत ही मा.मंचाच्या प्रबंधकाकडून प्रमाणीत करण्यात आलेली नाही. तसेच तक्रारदाराने नि.20 वर दाखल केलेल्या लेखी युक्तिवादातील कलम 2 मध्ये सामनेवाला बँकेने सदर कामात हजर केलेल्या शिधापत्रिकेमध्ये खाडाखोड केलेली आहे असा आक्षेप घेतलेला आहे. त्या अनुषंगाने सामनेवाला बँक अथवा त्यांचे प्रतिनिधींनी सदर आक्षेप खोडून काढणेसंदर्भात कोणताही पुरावा दाखल केलेला नाही अथवा नमूद मूळ शिधापत्रिकेची प्रत दाखल करणेबाबत तक्रारदारास भाग पाडलेले नाही. नमूद दाखल शिधापत्रिकेच्या मागील पानाचे अवलोकन केले असता, सदरील मजकूर हा वाचण्यासाठी सुस्पष्ट दिसून येत नाही. तसेच पहिल्या व दुस-या पानावर देखील खाडाखोड आढळून येते. तसेच खाली नमूद केलेली मुलांची नावे स्पष्टपणे दिसून येतात मात्र तक्रारदाराच्या पत्नीचे नाव वाचण्याइतपत स्पष्टपणे दिसून येत नाही अथवा ते सखुबाई आहे असेसुध्दा वाटत नाही. तसेच तक्रारदाराचे नावही स्पष्टपणे दिसून येत नाही. मात्र नि.18/6 वर दि.19/10/11 रोजी सामनेवाला बँकेस दिलेल्या अर्जामध्ये तक्रारदाराचा बचत खाते क्र.210237137584 वरील सखुबाई पराप्पा महेशवडगी हिचे नाव कमी करणेबाबत तक्रारदाराने दिलेला अर्ज दाखल केलेला आहे व त्याखाली पराप्पा मुरारी म्हैसवडगी असे हस्ताक्षरात नमूद आहे. मात्र सदरच्या अर्जावर विविध हस्ताक्षरांची नोंद दिसून येते. वादाकरिता सदरचा अर्ज गृहित जरी धरला तरी तक्रारदार कथन करतो त्याप्रमाणे त्याच्या नमूद अकाऊंटवर सामनेवाला बँक कथन करते त्याप्रमाणे सखुबाईचे नाव कमी करण्यासाठी अर्ज दिलेला आहे. त्यावर Second depositor’s approval required. Pl. do as asked by the customer प्रस्तुत तक्रारअर्जामध्ये तक्रारदार याने कुठेही नमूद सखुबाई ही त्याची पत्नी असल्याचे नमूद केलेले नाही. तसेच शिधापत्रिकेतील खाडाखोडीवरुनही सखुबाईचे नाव स्पष्टपणे त्या शिधापत्रिकेवर दिसून येत नाही. तसेच नमूद फॉर्मवर तक्रारदाराच्या सोबत तक्रारदार व नमूद सखुबाईचा जो फोटो लावलेला आहे, ते फोटो एकत्रित नसून वेगवेगळे फोटो लावलेले आहेत. तसेच सदर फोटो सामनेवाला बँकेने अटेस्टेड केलेले दिसून येत नाहीत. वादाकरिता जरी सखुबाई तक्रारदाराची पत्नी आहे असे गृहित धरले तरी अथवा ती त्याची पत्नी आहे अथवा नाही या वादात न जाता ती संयुक्त खातेदार आहे असे गृहित धरले तरी सदर खात्यावर दि.14/2/06 पासून ते 20/10/11 पर्यंत व्यवहार केलेले आहेत. सदर व्यवहारांचे अवलोकन करता सदर व्यवहार हे तक्रारदार पराप्पा मुरारी महेशवाडगी यांनीच केला असल्याचा निष्कर्ष काढणे चुकीचे होणार नाही. कारण सदर खाते पहिल्यापासूनच सदर तक्रारदारानेच चालविलेले आहे. सदर जॉइंट खाते either or survivor असते तर तथाकथित सखुबाई सुध्दा सदर खात्यावरुन रकमा काढू शकली असती. याचाच अर्थ खाते चालविणेचे अधिकार नमूद तक्रारदारास होते व सदरची बाब सामनेवाला बॅंकेने या मंचापासून लपवून ठेवलेली आहे. वादाकरिता असे अधिकार स्पष्टपणे दिले नसतील तर सदर खाते नमूद दोन्ही संयुक्त खातेदारांनी चालविले का अथवा केवळ तक्रारदाराने अथवा केवळ सखुबाईने चालविले याबाबतची कोणतीही स्पष्टता सामनेवाला बँक करीत नाही त्याबाबत मौन बाळगलेले आहे. मात्र सदर खाते ब-याच कालावधीपासून चालविले गेले असल्यामुळे तसेच कुटुंबकर्ता या नात्याने सुध्दा नमूद तक्रारदाराने हे खाते चालवले आहे, ही वस्तुस्थिती निर्विवाद दिसून येते. सामनेवाला बँकेने त्याबाबत आपले लेखी म्हणण्यामध्ये कोणताही आक्षेप घेतलेला नाही अथवा स्पष्टता केलेली नाही. यावरुनच नमूद खातेवरील व्यवहार हा तक्रारदारच करीत होता या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
11. नमूद सामनेवाला बँकेच्या क्लार्कच्या चुकीने का होईना तक्रारदारास स्वतंत्र पासबुक दिले गेलेले आहे, जे सामनेवाला बँकेने मान्य केलेले आहे. सदर स्वतंत्र पासबुक देताना निश्चितच जुने पासबुक जमा करुन घेतले असेल. अथवा सदर पासबुक हरविले असेल तर त्याबाबत लेखी नमूद संयुक्त खातेदारांकडून लिहून घेतले असेल व त्याप्रमाणे योग्य आकार आकारुन नवीन पासबुक दिले असेल असा अर्थ काढणे चुकीचे होणार नाही. सामनेवाला बॅंकेनेच स्वतः चूका करुन तक्रारदारास संभ्रमात पाडलेले आहे व सदर खाते आपले स्वतःचे स्वतंत्र असलेच्या भ्रमात तक्रारदाराने दि. 20/10/11 रोजी जमा वर्ग रक्कम रु.11,75,000/- त्याचे सदर खाते क्र. 20237137584 वर भरुन घेतलेले आहेत आणि सदर तारखेअखेर सदर खात्यावर रु.14,21,142/- ची शिल्लक आहे, त्या रकमेची मागणी तक्रारदाराने तक्रारअर्जात केलेली आहे.
12. याचा विचार करता जरी सदर खाते संयुक्त आहे असे गृहित धरले तरी उत्पन्नाच्या स्त्रोताचा विचार करता सदर 18/1 वरील नमूद माहितीप्रमाणे नमूद तक्रारदार हा शेती करतो तर नमूद सखूबाई घरकाम करीत असलेची नोंद आहे यावरुन नमूद सखुबाईचे स्वतंत्र असे उत्पन्नाचे स्त्रोत दिसून येत नाही. नि.18/7 वर गाव कामगार तलाठी आष्टा यांना नमूद सखुबाईने खरेदीखत नोंद न करणेबाबत अर्ज दिलेला दिसून येतो. सदर अर्जानुसार आष्टा हद्दीतील स.नं.1355/37 शिराळकर कॉलनीमधील श्री जितेंद्र कृष्णराव खोत यांनी तक्रारदाराकडून नमूद सखुबाईच्या संमतीशिवाय खरेदी खत करुन घेतले असून ती त्याची कायदेशीर पत्नी आहे त्यामुळे सदर खताची नोंद करण्यात येवू नये असा मजकूर नमूद केल्याची दिसून येते. सदरचा अर्ज दि.3/11/11 रोजी नमूद तलाठी आष्टा यांनी स्वीकारलेचा दिसून येतो पण तदनंतर सदर अर्जाच्या सुनावणीसंदर्भात काय कार्यवाही झाली याबाबतची स्पष्टता नाही. तसेच नि.8/8 वरील नमूद बँकेस नमूद सखुबाईने तक्रारदारास पैसे न देणेबाबतचा अर्ज दिलेला दिसून येतो. सदरचा अर्ज दि.4/11/11 रोजी सामनेवाला बँकेने स्वीकारलेला दिसून येतो. सदर अर्जानुसार सखुबाईचे पती नमूद तक्रारदार यांनी आष्टा हद्दीतील घरमिळकत व खुली जागा बेकायदेशीर विक्री करुन आपल्या बँकेत पैसे जमा केलेले आहेत व त्या सदर व्यवहारासंदर्भात गावकामगार तलाठीकडे तक्रार दाखल केली आहे त्याची प्रत सोबत जोडली आहे तसेच सदर व्यवहाराबाबत रितसर कोर्टात दाद मागत आहे तरी न्यायालयाचे आदेशाशिवाय तक्रारदारास पैसे देण्यात येवू नयेत असे नमूद केलेले दिसून येते. सदर अर्ज 4/11/2011 रोजी नमूद बँकेत होता. प्रस्तुत तक्रार आज निकालावर येईपर्यंत जवळजवळ दोन वर्षे होत आलेली आहेत. सदर दोन वर्षामध्ये नमूद सखुबाईने कोणत्या न्यायालयात दावा दाखल केला सदर न्यायालयाने काही अंतरिम आदेश केले आहेत का ? नमूद सखुबाई म्हणते त्याप्रमाणे नमूद जागामिळकत ही तक्रारदाराचे स्वकष्टार्जित आहे का वडीलोपार्जित आहे याबाबत सक्षम न्यायालयामध्ये दावा दाखल आहे का ? नमूद गावकामगार तलाठी आष्टा यांचेकडे दाखल झालेल्या तक्रारअर्जाबाबत तसेच नमूद जागा मिळकतीच्या विक्री व्यवहारास नमूद तलाठी अथवा सक्षम ऑथॉरिटीने स्थगितीचे काही आदेश पारीत केले आहेत का ? किमान सदर तक्रारीवर उभय पक्षांना नोटीसा देवून त्यांचे म्हणणे मागवून त्याबाबत तक्रारीची काही निर्गत केले आहे का ? याअनुषंगाने सदर दोन वर्षाचे कालावधीमध्ये नमूद सखुबाईच्या तथाकथित आरोपाचे नेमके काय झाले अथवा खरोखरच नमूद सखुबाईने सक्षम ऑथॉरिटी अथवा सक्षम न्यायालयात अशा प्रकारचे दावे प्रलंबित आहेत का याबाबत नमूद सामनेवाला बँकेने कागदोपत्री कोणतीही माहिती घेतलेली दिसून येत नाही अथवा प्रस्तुत तक्रार दि.1/3/13 रोजी दाखल केलेली आहे व दि.19/3/13 रोजी स्वीकृत केलेली आहे. तदनंतर प्रस्तुत तक्रार निकालावर घेण्यासाठी दि.13/9/13 इतका कालावधी उलटला आहे. जवळजवळ सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये सामनेवाला बँकेने तसेच दि.4/11/11 रोजी दिलेला तक्रारअर्ज उलटून जवळजवळ दोन वर्षाचा कालावधी मिळूनही सामनेवला बॅकेने प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने वारंवार तोंडी विनंत्या करुनही याबाबत कोणतीही माहिती घेवून तक्रार निकालात काढणेचा प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. केवळ सखुबाईची संमती घ्यावी एवढया शे-यावरच सामनेवाला बँक थांबलेली दिसून येते. मध्यंतरीच्या काळामध्ये अथवा तक्रार दाखल झाल्यावरसुध्दा नमूद सखुबाईला त्यांचेवतीने साक्षीदार म्हणून बोलावण्याची संधी होती ती खरोखरच त्याची पत्नी आहे अथवा नाही, संयुक्त खातेवर खाते चालविण्यासंदर्भात दिलेल्या अधिकाराचे मूळ पुरावे दाखल करणे वर नमूद ऊहापोह केलेल्या संदर्भातील तक्रारी व दाव्यासंदर्भात योग्य पुराव्यानिशी स्पष्टीकरण देणे क्रमप्राप्त असतानाही त्याबाबत सामनेवाला बँकेने कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. केवळ रिप्लाय नोटीस दिली म्हणजे तक्रारीची निर्गत केली असे सामनेवाला यांना म्हणता येणार नाही सामनेवाला बँकेला त्याच्या ग्राहकाच्या मूळ तक्रारीशी जावून त्याचे निराकरण करण्याचे अधिकार असतानाही अडेलतटटूपणाचे धोरण स्वीकारल्याचे दिसून येते. वादाकरिता संयुक्त खातेवरील एखाद्या खातेदाराचे नाव कमी करण्यासाठी त्याची संमती आवश्यक आहे असे गृहित धरले तरी त्या अनुषंगिक कोणताही पुरावा सामनेवाला बँकेने दाखल केलेला नाही. याउलट अशी संमती दिली नाही, असे गृहित धरले तरी सदर संयुक्त खाते पुर्णतः तक्रारदारानेच चालविलेले आहे. सदर खात्यावर येणा-या रकमा या तक्रारदाराच्याच उत्पन्न स्त्रोतातून आलेल्या आहेत अशी वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येते. त्यामुळे वरील विस्तृत विवेचनानुसार केवळ सदर तक्रारदारास सदर खातेवर जरी ते संयुक्त खाते असले तरी पहिलेपासून रकमा व्यवहार करुन दिलेले आहेत, त्यामुळे आता सदर व्यवहार करताना केवळ नमूद सयुक्त खातेमधील दुसरा खातेदार नाव कमी करणेसाठी संमती देत नाही म्हणून अथवा वर नमूद केलेल्या कारणास्तव तक्रारदारास पैसे देवू नयेत असा केवळ एक तक्रारअर्ज दाखल केला म्हणून सदर खात्यावरील व्यवहार सामनेवाला बँकेस थांबविता येणार नाहीत अथवा तक्रारदारास सदर व्यवहार करण्यास अटकाव करता येणार नाही. कारण सदर खाते तक्रारदाराने एकटयाने प्रथमपासूनच single operating पध्दतीने चालविलेले आहे व ते सामनेवाला बँकेने चालू दिलेले आहे. त्यामुळे सामनेवाला बँकेस सदर कृतीच्या मागे जाता येणार नाही.
13. संयुक्त खात्यावरील खातेदाराचे नाव कमी करणे व संयुक्त खात्यावरील व्यवहार कोणी करणे या दोन वेगवेगळया बाबी आहेत. जी नमूद सामनेवाला बँक सरमिसळ करु पाहते. सामनेवाला बँकेच्या कथनास वस्तुस्थितीजन्य व स्पष्ट असा पुरावा दिसून येत नाही. केवळ वर नमूद केल्याप्रमाणे अशा तक्रारअर्जांचा निपटारा न करता, त्याचा आधार घेवून तक्रारदाराच्या सदर खातेवर व्यवहार करणेचा अटकाव करणे ही सामनेवाला यांच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
14. सामनेवाला बँक आपल्या क्लार्कची चूक तक्रारदारावर थोपवू पहात आहे. सामनेवालांच्या कथनास स्पष्ट पुष्टी देणारा पुरावा त्यांचेजवळ असतानाही तो दाखल न करणे अथवा नमूद तक्रारीचे योग्यरित्या निराकरण करण्यासाठी आवश्यक तो पुरावा देण्याची संधी असतानाही असा पुरावा न देणे त्यांच्यामध्ये संदिग्धता ठेवणे व अशा वर नमूद केल्याप्रमणे अर्जांचा आधार घेवून ग्राहकाला बॅाक खात्यावरील व्यवहार करणेपासून अथवा त्याच्या हक्काच्या रकमा मिळणेपासून वंचित ठेवणे ही सामनेवाला यांच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
15. तक्रारदाराचे वय जवळजवळ 70 वर्षाचे आहे तक्रारदार हा वयोवृध्द ज्येष्ठ नागरिक असून तो अशिक्षित आहे. अगदी वादाकरता तक्रारदारास त्याची मुले असतील तर त्यांनी सदर व्यवहाराबाबत कुठेही आक्षेप घेतलेला दिसून येत नाही. यावरुनच तक्रारदाराने नमूद खातेवर जागा मिळकत विक्री करुन भरणा केलेली रक्कम ही स्वकष्टार्जित मालकी वहिवाटीची असल्यामुळेच सदर व्यवहार पूर्ण होवून त्याचे खरेदीखत झाले आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. सबब सामनेवाला बॅंकेने नमूद तक्रारदाराचे वय, त्याचे शेतीव्यतिरिक्त नसणारे कोणतेही उत्पन्नाचे साधन तसेच सदर जमा केलेल्या रकमा या पै पै कष्टाने जमा केलेल्या आहेत, या वस्तुस्थितीचा विचार न करता त्याच्या वयोवृध्द अवस्थेत त्याला सदर पैशाची निकडीची गरज असतानाही केवळ तथाकथित नमूद सखुबाईच्या एका तक्रारअर्जाच्या आधारे बेकायदेशीरपणे तक्रारदाराच्या रकमा अडवून ठेवलेल्या आहेत, त्यास मागणी करुनही अदा केलेल्या नाहीत त्याने लेखी नोटीस देवूनही त्याची दखल घेतलेली नाही, ही सामनेवाला यांची सेवात्रुटी आहे आणि या सेवात्रुटीमुळे तक्रारदारास त्याच्या वयोवृध्द अवस्थेत त्याला स्वतःच्या हक्काचे पैसे असतानाही सामनेवाला बँकेने त्यास रकमा मिळण्यापासून वंचित ठेवलेले आहे त्यामुळे दुस-याकडून उसनवार करुन आपल्या गरजा भागवाव्या लागल्या असतील ही शक्यता नाकारता येत नाही. जवळजवळ दोन वर्षपासून सदर खात्यावर तक्रारदारास रक्कम देण्यास अटकाव केलेला आहे यावरुन तक्रारदारास आर्थिक शारिरिक मानसिक त्रासा झालेला आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सामनेवाला बँकेने सदर रकमा देणेबाबत त्यास दाद न दिल्याने त्याला प्रस्तुतची तक्रार दाखल करावी लागलेली आहे. त्यामुळे तक्रारअर्जाचा खर्च मिळणेस तो पात्र आहे. तक्रारदाराने मागणी केलेप्रमाणे रु.14,21,142/- मिळणेस तो पात्र आहे. मात्र सदर रकमेवर वेळोवेळी सामनेवाला यांनी नियमाप्रमाणे व्याज दि.30/12/12 अखेर जमा केलेले आहे. त्यामुळे केवळ व्याज अदा न केलेल्या कालावधीतील नियमाप्रमाणे व्याज मिळण्यास तक्रारदार पात्र आहे. तदनंतर ते आजअखेर नमूद व्याजदराप्रमाणे तक्रारदाराचे खात्यावर व्याज जमा करावे. मात्र सदर आदेश झालेपासून 30 दिवसांचे आत सदर रक्कम अदा न केल्यास तदनंतर सदर रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे जादा व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहेत.
2. तक्रारदाराने मागणी केल्याप्रमाणे दि.20/10/11 पर्यंत शिल्लक असललेली बचत खाते क्र.
20237137584 वरील रक्कम रु.14,21,142/- तक्रारदारास त्वरीत अदा करावी.
3. तक्रारदार यांना सामनेवाला यांनी शारीरिक, आर्थिक, मानसिक ञासापोटी नुकसान
भरपाई रुपये 10,000/- अदा करावेत.
4. तक्रारदार यांना सामनेवाला यांनी तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5,000/- अदा करावेत.
5. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी या आदेशाच्या तारखेपासून 30 दिवसांत
करणेची आहे. न केल्यास सदर 30 दिवसानंतर पूर्ण रक्कम हातात देईपर्यंत सदर रकमेवर
द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे.
6. जाबदार नं.1 यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द
ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 13/09/2013
( सौ वर्षा शिंदे ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष