निकाल
(घोषित दि. 12.07.2016 व्दारा श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदार हा बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा टेंभूर्णी यांचा खातेदार आहे. त्याला दि.28.09.2015 रोजी बॅंकेतून पैसे काढण्याची गरज होती त्यामुळे तो टेंभूर्णी येथे गेला. परंतू बॅंकेत गर्दी होती म्हणून तो जाफ्राबाद येथील भारतीय स्टेट बॅंकेच्या शाखेत गेला तेथे आधार लिंक व्यवस्था उपलब्ध होती. सदर आधार लिंक व्यवस्थेद्वारे श्री.ज्ञानेश्वर झोरे हे पैशाच्या व्यवहाराकरता ग्राहकांना सहाय्य करीत होते. तक्रारदार याने रक्कम रु.5,000/- काढण्याकरता कार्यवाही केली, मशीनमध्ये रक्कम रु.5,000/- काढल्याबाबत संदेश आला तसेच मोबाईल फोनवर सुध्दा रक्कम रु.5,000/- दिल्याबाबत संदेश आला परंतू आधार लिंक मशीन द्वारे तक्रारदार यास मागणी केलेली रक्कम रु.5,000/- मिळाली नाही. त्यामुळे तक्रारदार याने श्री.झोरे यांच्याजवळ चौकशी केली त्यावेळी त्याला सांगण्यात आले की, अशा प्रकारचे प्रॉब्लेम ब-याच वेळेला येत असतात, त्यावेळी श्री.झोरे यांनी महाराष्ट्र बॅंकेचे स्टेटमेंट आणण्याबाबत सल्ला दिला. त्यानंतर काही दिवसांनी तक्रारदार याने परत त्याच पैशाबाबत विचारणा केली असता त्याला सांगण्यात आले की, पैसे मिळून जातील. त्यानंतर वारंवार तक्रारदार याने चकरा मारल्या परंतू त्याला पैसे मिळाले नाहीत. शेवटी तक्रारदार याने बॅंक ऑफ महाराष्ट्र यांच्याशी संपर्क केला त्यावेळी त्याला सांगण्यात आले की, त्याचे पैसे त्याला मिळून जातील परंतू तरीही त्याचे पैसे त्याला मिळाले नाहीत. त्यामुळे तक्रारदार याने हा तक्रार अर्ज दाखल केला आहे.
तक्रारदार याने त्याचे रु.5,000/- त्याला परत देण्यात यावेत. त्याचप्रमाणे त्याला झालेल्या त्रासाबददल व कागदपत्राच्या खर्चाबददल रक्कम रु.5,000/- अधिक रु.2,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्र.1 यांनी दि.15.02.2016 रोजी त्यांचा लेखी जबाब, ब्रॅंच मॅनेजर यांच्या सहीने दाखल केला. त्यामध्ये तक्रारदार यांचे पैसे स्टेट बॅंक ऑफ इंडिया ने जमा केले आहेत त्यामुळे तक्रार रदद करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्र.2 यांच्या विरुध्दचे प्रकरण चालविण्याकरता तक्रारदार याने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र.2 यांच्या विरुध्दचे प्रकरण खारीज करण्यात आले.
तक्रारदार याने तक्रार अर्जासोबत अकाऊंट ट्रान्झेक्शनची नक्कल व पत्र व्यवहाराच्या नकला सादर केल्या आहेत. गैरअर्जदार यांनी या संदर्भात इ-मेलच्या द्वारे केलेल्या पत्रव्यवहाराची नक्कल दाखल केली आहे.
तक्रारदार व गैरअर्जदार हे ब-याच दिवसापासून वारंवार पुकारुनही प्रकरणाच्या सुनावणीस हजर राहीले नाहीत त्यामुळे आम्ही हे प्रकरण गुणवत्तेवर संपविण्याचा निर्णय घेतला आहे. तक्रारदार याने दि.28.09.2015 च्या यशस्वी न झालेल्या पैसे काढण्याच्या व्यवहाराकरता ग्राहक मंचासमोर दि.13.01.2016 रोजी हे प्रकरण दाखल केले. त्याच दिवशी गैरअर्जदार यांच्या विरुध्द नोटीस जारी करण्याचा आदेश पारीत करण्यात आला. त्यानंतर नोटीसची बजावणी गैरअर्जदार क्र.1 यांच्यावर झाली. दि.15.02.2016 रोजी गैरअर्जदार क्र.1 ग्राहक मंचासमोर हजर झाले त्यांनी शाखाधिकारी यांच्या सहीने लेखी जबाब सादर केला, त्या जबाबानुसार तक्रारदार यांचे अयशस्वी झालेल्या पैसे काढण्याच्या व्यवहारामधील रक्कम दि.05.02.2016 रोजी तक्रारदार यांच्या खात्यात जमा झालेली आहे असे कळविले आहे. अशा परिस्थितीत तक्रारदार यास कोणतीही तक्रार उरली नाही त्यामुळे तो ग्राहक मंचासमोर हजर राहात नाही. आमच्या मताने तक्रारदार यांच्या तक्रारीचा समाधानकारक निपटारा गैरअर्जदार क्र.1 यांनी केल्यामुळे आता या तक्रारीचे प्रयोजन राहात नाही. या कारणास्तव या तक्रारीमध्ये पुढील आदेश करण्यास कोणतेही कारण नाही. म्हणून आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करतो.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज निकाली काढण्यात येतो.
2) खर्चाबददल आदेश नाही.
श्री. सुहास एम.आळशी श्रीमती रेखा कापडिया श्री. के.एन.तुंगार
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना