नि.23 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 115/2010 नोंदणी तारीख – 15/4/2010 निकाल तारीख – 13/10/2010 निकाल कालावधी – 178 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्रीमती रत्नमाला सदाशिव जाधव रा.पांडे, ता.वाई जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री पी.बी.डाकवे) विरुध्द 1. शाखाधिकारी/व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा-वाई ता.वाई जि.सातारा 2. श्रीमती कृष्णाबाई सदाशिव जाधव रा.रविवार पेठ, वाई ता.वाई जि. सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री एम.जी.कुलकर्णी) (अभियोक्ता श्री व्ही.बी.जाधव) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार हे जाबदार क्र.1 बँकेचे खातेदार आहेत. अर्जदार यांचे पेन्शन खात्यावर कोषागार अधिकारी सातारा यांचेकडून पेन्शनची रक्कम दरमहा जमा होते व ती रक्कम अर्जदार काढून घेते. परंतु दि.2/2/2010 व दि.8/2/2010 रोजी बँकेकडे पेन्शनच्या रकमेची मागणी अर्जदार यांनी केली असता जाबदार यांनी रक्कम देण्यास नकार दिला. पेन्शनची रक्कम अडविण्याचा जाबदार यांना काहीही अधिकार नाही. अर्जदारास पेन्शन देण्यात येवू नये अशी नोटीस एड व्ही.बी.जाधव यांचेमार्फत जाबदार यांना आल्याने त्यांनी पेन्शनची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. श्री जाधव यांनी जाबदार यांचा चुकीची माहिती दिली आहे. सातारा येथील मे.दिवाणी न्यायाधीश यांनी किरकोळ दिवाणी अर्ज क्र. 99/2005 मध्ये जो आदेश दिला तो आदेश पेन्शनच्या रकमेशी संबंधीत नाही. कोषागार अधिकारी यांनी कळवूनदेखील जाबदार यांनी पेन्शनची रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे. पेन्शनबाबत कोणताही वाद न्यायालयात प्रलंबित नाही. सबब अर्जदार यांना पेन्शन अदा करण्याचा आदेश व्हावा, तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 9 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. नोव्हेंबर 2008 पर्यंत जाबदारचे शाखेतून अर्जदार पेन्शनची रक्कम काढून घेत होती हे म्हणणे खरे आहे परंतु दरम्यानचे काळात मयताच्या वारस तीन मुलींनी मे.सि.ज.सि.डी.सातारा यांचे कोर्टात वारस दाखला मिळावा म्हणून किरकोळ अर्ज दाखल केला होता. सदरचे अर्जात श्रीमती कृष्णाबाई सदाशिव जाधव ही मयत यांची कायदेशीर पहिली पत्नी असल्याचा पुरावा दिलेला आहे. सदरचे किरकोळ अर्जामध्ये अर्जदार ही मयत सदाशिव जाधव यांची कायदेशीर पत्नी असल्याचे सिध्द करु शकली नसल्याने तिला वारसाचा दाखला दिलेला नाही. सदर अर्जाचे निकालानंतर श्रीमती कृष्णाबाई सदाशिव जाधव यांनी जाबदार यांना निकालाची प्रत पाठवून पेन्शनची रक्कम अर्जदार यांना देवू नये अशी नोटीस दिली आहे. सदरचा निकाल हा जाबदार बँकेवर बंधनकारक आहे. सबब जाबदार यांनी सेवा देण्यामध्ये कोणतीही त्रुटी केलेली नसल्याने तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. जाबदार क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.16 ला दाखल करुन अर्जदारचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. जाबदार क्र.2 यांचा विवाह श्री सदाशिव बाबूराव जाधव यांचेबरोबर सन 1967 साली रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. त्यानंतर 1970 पर्यंत श्री जाधव व जाबदार क्र.2 यांचे वैवाहिक संबंध होते. परंतु त्यानंतर मुंबई येथे श्री जाधव व अर्जदार हे एकत्र राहून लागले व त्यांनी जाबदार क्र.2 यांना घरातून हाकलून दिले. जाबदार क्र.2 यांनी श्री जाधव यांचेविरुध्द पोटगीचा अर्ज केला होता त्यामध्ये त्यांना पोटगीची रक्कम मंजूर झाली होती व ती त्यांना श्री जाधव यांचे हयातीपर्यंत मिळतही होती. श्री जाधव यांचे निधनानंतर जाबदार क्र.2 यांनी वारस दाखला मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. सदरचा नि र्णय जाबदार क्र.2 यांचेसारखा होवून मयताचे नावे जाबदार क्र.1 यांचेकडे जमा असलेल्या रकमामध्ये जाबदार क्र.2 यांचा हक्क आहे असे जाहीर केले. तसेच जाबदार क्र.2 यांनी केलेला पेन्शनचा अर्जही मंजूर होवून कोषागाराकडे आलेला आहे. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.2 यांनी कथन केले आहे. 4. अर्जदारतर्फे दाखल लेखी युक्तिवाद नि. 15 ला पाहिला. जाबदार क्र.1 तर्फे दाखल लेखी युक्तिवाद नि. 19 ला पाहिला तसेच जाबदार क्र.2 तर्फे दाखल लेखी युक्तिवाद नि.20 पाहिला. 5. अर्जदारतर्फे दाखल करण्यात आलेले शपथपत्र नि. 2 ला पाहिले. अर्जदारतर्फे दाखल केलेली नि. 5 सोबतची कागदपत्रे, नि.12 चे प्रत्युत्तर पाहिले. जाबदार क्र.1 तर्फे दाखल शपथपत्र नि. 10 ला पाहिले. तसेच जाबदार क्र.1 तर्फे दाखल नि. 11 सोबतची कागदपत्रे पाहिली. जाबदार क्र.2 तर्फे नि. 18 व 22 सोबतची कागदपत्रे पाहिली. 6. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय. ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही. क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 7. या प्रस्तुतचे अर्जप्रकरणात काही निर्विवाद गोष्टींची पाहणी करणे जरुरीचे आहे. अर्जदार या मयत सदाशिव बाजीराव जाधव यांच्या द्वितीय पत्नी आहेत. जाबदार क्र.2 या मयत सदाशिव बाजीराव जाधव यांच्या प्रथम पत्नी आहेत. मयत सदाशिव बाजीराव जाधव यांचे मृत्यूपश्चात अर्जदार यांना जाबदार क्र.1 यांचेकडून पेन्शन अदा केली जात होती. परंतु नोव्हेंबर 2008 नंतर जाबदार क्र.1 यांनी अर्जदार यांना पेन्शन अदा केलेली नाही. सातारा येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे कोर्टात मयत सदाशिव बाजीराव जाधव यांचे वारसाहक्काबद्दल दाखल करण्यात आलेल्या किरकोळ अर्ज क्र. 99/2005 चे निर्णयानुसार मयत सदाशिव बाजीराव जाधव यांच्या तीनही मुलींना व त्याचबरोबर जाबदार क्र.2 यांना वारसा प्रमाणपत्र देण्याचा आदेश झालेला आहे. परंतु अर्जदार यांची वारसा प्रमाणपत्र मिळण्याची मागणी नामंजूर करण्यात आलेली आहे. सदरचे निर्णयानुसार जाबदार क्र.1 यांनी अर्जदार यांना पेन्शन अदा करणे बंद केले आहे. जाबदार क्र.2 यांनी नि.22 सोबत दि.13/8/2010 रोजी जारी केलेली पेन्शन पेमेंट ऑर्डरची प्रत दाखल केली असून सदरच्या आदेशानुसार जाबदार क्र.2 यांना पेन्शन अदा करण्यात यावी असे आदेश करण्यात आलेला आहे. 8. वर नमूद निर्विवाद गोष्टींची पाहणी केली असता असे दिसून येते की जाबदार क्र.2 या मयत सदाशिव बाजीराव जाधव यांच्या पहिल्या पत्नी आहेत. सबब कायद्यानुसार मयत सदाशिव बाजीराव जाधव यांच्या त्या कायेदशीर वारस ठरतात. सातारा येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे कोर्टात मयत सदाशिव बाजीराव जाधव यांचे वारसाहक्काबद्दल दाखल करण्यात आलेल्या किरकोळ अर्ज क्र. 99/2005 चे निर्णयानुसार अर्जदार यांची वारसा प्रमाणपत्र मिळण्याची मागणी नामंजूर करण्यात आलेली आहे व जाबदार क्र.2 यांना वारसा प्रमाणपत्र देणेचा आदेश झालेला आहे. सदरचे निर्णयाचा विचार करता अर्जदार या मयत सदाशिव जाधव यांचे कायेदशीर वारस नसल्यामुळे त्यांचा पेन्शनवर काहीही हक्क राहिलेला नाही. दि.3/8/2010 रोजीचे पेन्शन पेमेंट ऑर्डरची प्रत पाहता जाबदार क्र.1 यांना पेन्शन अदा करणेबाबत आदेश सक्षम अधिका-यांनी दिलेला आहे हेही स्पष्ट दिसून येते. वरील सर्व कारणांचा विचार करता अर्जदार यांचा पेन्शनवर कोणताही हक्क राहिलेला नाही, सबब अर्जदार यांना पेन्शन अदा न करण्याची जाबदार क्र.1 यांची कृती ही योग्य, संयुक्तिक व कायदेशीर आहे असे या मंचाचे मत आहे. 9. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 13/10/2010 (श्री सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |