(निकालपत्र पारित व्दारा.सौ.अनिता ओस्तवाल.सदस्या.)
गैरअर्जदाराने सेवात्रुटी केल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराची तक्रार अशी की, अर्जदार हा गैरअर्जदार बँकेचा खाते धारक आहे. दिनांक 21/04/2014 रोजी गैरअर्जदार बँके मध्ये असलेल्या त्याच्या खात्या मध्ये एच.डी.एफ.सी.बँक मुंबई चा रक्कम रु. 7500/- चा धनादेश क्रमांक 113870 वटण्यासाठी दाखल केला होता, तदनंतर सदरच्या धनादेशा संदर्भात मे 2014, जून 2014 व जुलै 2014 मध्ये अर्जदाराने गैरअर्जदाराकडे विचारणा केली असता, त्याला कोणताही प्रतिसाद गैरअर्जदाराकडून मिळाला नाही, वास्तविक पाहता अर्जदार हा किडणीच्या विकाराने ग्रस्त होता, त्याला सदर रक्कमेची आवयकता होती, परंतु दिनांक 21/04/2014 ते दिनांक 07/08/2014 पर्यंत गैरअर्जदाराने सदरचा धनादेश पूढे वटविण्यासाठी पाठविलाच नाही. शेवटी दिनांक 07/08/2014 रोजी सदर धनादेशाची मुदत संपली ( Out of Date ) असा मेमो अर्जदारास दिला. व त्यामुळे अर्जदारास त्याचे हक्काच्या रक्कमेचा उपभोग, विनयोग घेता आला नाही, म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने सदर धनादेश वरील रक्कम रु. 7500/- दिनांक 21/04/2014 पासून 12 टक्के व्याजासहीत द्यावी, तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 90,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 2500/- द्यावेत. अशा मागण्या अर्जदाराने मंचासमोर केल्या आहेत.
अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.क्रमांक 2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि. 4 वर मंचासमोर दाखल केले.
मंचाची नोटीस गैरअर्जदारास तामील झाल्यानंतर त्यांनी लेखी निवेदन नि. 12 वर देऊन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे.
गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराचे खाते गैरअर्जदाराचे बँकेत ईम्रान उस्मान शेख या नावाने होते, खाते क्रमांक 2025892020162 असा असून सदरील खाते पुस्तिका अर्जदारास दिनांक 07/09/2012 रोजी देण्यात आली होती, त्यामुळे अर्जदारास सदरील बॅंकेच्या खात्या मध्ये जे नांव आहे, याची कल्पना वर्ष 2012 मध्ये झाली होती, दिनांक 21/04/2014 रोजी धनादेश क्रमांक 113870 दिनांक 22/03/2014 रोजीचा वटण्यासाठी गैरअर्जदार बॅंकेत सादर केला असता, धनादेशावर अर्जदाराचे नाव इम्रान उस्मान सय्यद असे होते, व बॅंकेत इम्रान उस्मान सय्यद नावाने खाते नसल्यामुळे धनादेशावरील नांव बँकेतील खात्यावरील नावात तफावत येत असल्यामुळे अर्जदारास बँकेने त्याच दिवशी नावातील फरका बाबत कळविले होते व अर्जदारास सदरचा धनादेश परत करण्यात आला होता, तदनंतर दिनांक 07/08/2014 रोजी अर्जदार पुन्हा बँकेत आला व पासबुक वरील नांव शेख ऐवजी सय्यद असे दुरुस्त करुन घेतले व धनादेश वटविण्यासाठी बँकेत सादर केला असता, बँकेने सदरील धनादेश पाहून मुदत संपली असे कारण दाखवून त्याच दिवशी अर्जदारास रिटर्न मेमो दिला, पूढे गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराने गैरअर्जदार बँकेकडून कर्ज मिळण्यासाठी बँकेला दिनांक 30/08/2014 रोजी लेखी विनंती केली होती, व कर्ज मिळाल्यास सदरील तक्रार मागे घेतो असे लेखी अर्जाव्दारे गैरअर्जदारास सुचीत केले होते, परंतु गैरअर्जदाराने सद्या कर्ज देता येणार नसल्याचे अर्जदारास कळविले होते, त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदारा विरुध्द खोटी तक्रार मंचात दाखल केलेली आहे, पूढे अर्जदारास मदत करण्याच्या उद्देशाने सदरील धनादेशाची तारीख वाढवून पाहिजे असल्यास गैरअर्जदार बँक सर्वतोपरी अर्जदारास साहय करेल असे ही अर्जदारास सांगण्यात आले होते, परंतु अर्जदाराने या संदर्भात काहीही केले नाही, त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिली, असे म्हणता येणार नाही, सबब अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे.
गैरअर्जदाराने लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि. 13 वर व पुराव्यातील कागदपत्र मंचासमोर दाखल केले.
दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याचे अर्जदाराने ठोसरित्या
शाबीत केले आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराने दिनांक 21/04/2014 रोजी गैरअर्जदार बँके मध्ये असलेल्या त्याच्या खात्या मध्ये एच.डी.एफ.सी. बँक मुंबईचा रक्कम रु. 7500/- चा धनादेश वटविण्यासाठी बँकेत सादर केला होता, परंतु दिनांक 21/04/2014 ते दिनांक 07/08/2014 पर्यंत गैरअर्जदाराने सदरचा चेक वटविण्यासाठी पूढे पाठविला नाही, व दिनांक 07/08/2014 ला सदर चेकची व्हॅलिडीटी संपली, असा रिटर्न मेमो दिल्याने अर्जदारास सदर रक्कमेचा विनीयोग घेता आला नाही, अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.
यावर गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने दिनांक 22/03/2014 रोजीचा धनादेश वटविण्यासाठी दिनांक 21/04/2014 रोजी बँकेत सादर केला व बँकेत इम्रान उस्मान सय्यद नावाने खाते नसल्यामुळे व धनादेशावरील नाव व बँके मध्ये असलेल्या खात्यावरील नावां मध्ये फरक असल्यामुळे गैरअर्जदाराने त्याच दिवशी अर्जदारास धनादेश परत केला, तदनंतर पुन्हा दिनांक 07/08/2014 रोजी अर्जदाराने पासबुक वरील नाव शेख ऐवजी सय्यद असे दुरुस्त करुन घेतले व धनादेश वटविण्यासाठी बॅंकेत सादर केला असता, बँकेने सदर धनादेशाची मुदत संपल्याचे निदर्शनास आल्याने त्याच दिवशी अर्जदारास रिटर्न मेमो दिला.
निर्णयासाठी महत्वाचा व एकमेव मुद्दा असा की, अर्जदार हा स्वच्छ हाताने मंचासमोर न्याय मागण्यासाठी आलेला आहे काय ? याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल. कारण अर्जदाराचे कथन असे की, दिनांक 21/04/2014 ते दिनांक 07/08/2014 पर्यंत सदरचा धनादेश गैरअर्जदार बँकेकडे पडून होता, परंतु गैरअर्जदाराने मंचासमोर दिनांक 21/04/2014 रोजीची अर्जदाराने धनादेश जमा करण्यासाठी भरलेल्या बँक व्हाऊचरची झेरॉक्स प्रत मंचासमोर दाखल केली आहे, त्या व्हाऊचरच्या पाठी मागील बाजू वर चेक मिळाल्याचे दिनांक 21/04/2014 रोजीच अर्जदाराने लिहून दिल्याचं निदर्शनास येते, म्हणजे गैरअर्जदाराने जो बचाव घेतला आहे, त्यात तथ्य असल्याचे जाणवते, दिनांक 21/04/2014 रोजीच अर्जदारास सदरचा धनादेश परत करण्यात आला होता, परंतु ही बाब अर्जदाराने मंचा पासून दडवून ठेवली. पूढे अर्जदाराने त्याच्या खाते पुस्तक ( नविन ) ची झेरॉक्स प्रत मंचासमोर दाखल केली आहे. त्या खाते पुस्तकचे अवलोकन केले असता, त्यावर इम्रान उस्मान शेख नाव असल्याचे स्पष्ट होते व तदनंतर शेख च्या ऐवजी सय्यद अशी दुरुस्ती करण्यात आल्याचे ही दिसून येते. ती दुरुस्ती कोणत्या तारखेस करण्यात आली हे स्पष्ट झालेले नाही, तरी पण दिनांक 21/04/2014 पूर्वीच नावा मध्ये दुरुस्ती करण्यात आली होती व त्याच नावाने पूढे Transaction पण करण्यात आले होते, हे शाबीत करणारा कुठलाही पुरावा अर्जदाराने मंचासमोर दाखल केलेला नाही. त्यामुळे दिनांक 07/08/2014 रोजी खाते पुस्तिका वरील नावा मध्ये दुरुस्ती करुन त्याच दिवशी अर्जदाराने सदरचा धनादेश वटण्यासाठी गैरअर्जदार बँकेत दाखल केल्याचा बचाव गैरअर्जदाराने घेतलेला आहे, तो ग्राहय धरण्याजोगा असल्याचे मंचाचे मत आहे. वास्तविक पाहता अर्जदाराने चेक परत न घेता खाते पुस्तकावरील नावा मध्ये त्वरित दुरुस्ती करुन घेणे गरजेचे होते, परंतु अर्जदाराच्या निष्काळजीपणामुळेच सदरचा धनादेशावरील रक्कमेचा विनीयोग अर्जदारास करता आला नाही, असे मंचाचे ठाम मत असल्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देऊन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
2 दोन्ही पक्षांनी आपापला खर्च स्वतःच सोसावा.
3 दोन्ही पक्षांना निकालपत्राच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. प्रदीप.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.