निकालपत्र (पारीत दिनांक :21/03/2014) द्वारा मा. अध्यक्ष.(प्रभारी)श्री. मिलींद बी.पवार (हिरुगडे), 1. अर्जदार यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये गैरअर्जदार यांच्या विरुध्द दाखल केली असून, तीद्वारे पुढील प्रमाणे मागण्या केलेल्या आहेत. 1. गैरअर्जदार यांनी धनादेशाची रक्कम रु.44,070/- व त्यावर दिनांक 29/9/2010 पासुन द.सा.द.शे 15 टक्के दराने व्याज द्यावे. 2. मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रु.20,000/- गैरअर्जदार यांनी द्यावे. अर्जदाराच्या तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे आहे. 2. अर्जदाराने सदर तक्रार अर्जामध्ये नमुद केले आहे की, त्याचे बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा आर्वी येथे चालु खाते असुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांना दिलेला दिनांक 17/9/2010 रोजीचा रु.44,070/- चा धनादेश गैरअर्जदार बॅंकेत वटविण्यासाठी दिनांक 29/9/2010 रोजी दिला. परंतु त्याचा धनादेश बॅंकेत जमा न झाल्यामुळे त्याने गैरअर्जदार बॅंकेत वारंवार लेखी तथा तोंडी चौकशी केली, त्यानंतर दिनांक 27/1/2011 रोजी गैरअर्जदार बॅंकेने त्यांचा धनादेश हा दळणवळाणामध्ये गळाळ झाल्याचे कळविले तसेच सदर पत्रामध्ये गैरअर्जदार बॅंकेने अर्जदाराला कळविले की त्यांनी एम.पी.एस.सी. मुंबई ला अर्जदार यांना दुसरा धनादेश देण्याची विनंती केली आहे परंतु त्यांनी अर्जदाराला दुसरा धनादेश दिला नाही किंवा त्यांनाही त्याबाबत कळविले नाही. अर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, त्यांनी वारंवार गैरअर्जदार यांच्याकड विचारणा केली असता त्यांना बरोबर उत्तर देण्यात आली नाही त्यामुळे त्यांनी दिनांक 29/9/2011 रोजी गैरअर्जदार बॅंकेला नोटीस पाठविला. परंतु नोटीस प्राप्त होवुनही गैरअर्जदार बॅंकेने कुठल्याही प्रकारचे उत्तर देण्याची तसदी दाखविली नाही. बॅंकत जमा केलेला धनादेशाची रक्कम गैरअर्जदार बॅंकेने न देता बॅंकेतुन धनादेश गहाळ होणे ही बाब गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रृटी असुन त्यांनी अनुचित व्यापार प्रणालीचा अवलंब करणारी आहे. त्यामुळे अर्जदार यांनी गैरअर्जदारांविरुध्द प्रस्तुत तक्रार मंचामध्ये दाखल केली आहे व वरीलप्रमाणे मागणी केली आहे. 3. अर्जदार यांनी त्यांच्या तक्रारीसोबत एकूण 7 कागदपत्रांची छायांकीत प्रत दाखल केलेली आहे. 4. गैरअर्जदार यांनी आपला लेखी जवाब दाखल केलेला असुन त्यांनी तक्रारीतील विपरित विधाने/ आरोप अमान्य करुन पुढे असे नमुद केले की, त्यांनी अर्जदारांच्या पत्रांना वेळोवेळी उत्तर दिलेले असुन दिनांक 2/9/2011 रोजी अर्जदाराला पत्र पाठवुन त्यांचा धनादेश हा दळणवळणामध्ये गहाळ झाल्याचीही सुचना दिली होती. गैरअर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, त्यांनी महाराष्ट्र लोक सेवा आयोग मुंबई यांना पत्र पाठवुन डुप्लिकेट धनादेश अर्जदाराचे नावे देण्याबाबत कळविले होते, परंतु त्यांनी डुप्लिकेट धनादेश अर्जदाराच्या नावे पाठविलेला नसल्यामुळे धनादेशाची रक्कम अर्जदाराच्या खात्यामध्ये जमा करता आलेली नाही. तसेच अर्जदार यांनी महाराष्ट्र लोक सेवा आयोग मुंबई यांना सदर तक्रारीमध्ये पक्ष करावयास पाहीजे होते ते सुध्दा अर्जदाराने न केल्यामुळे तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. गैरअर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, अर्जदाराचा धनादेश प्राप्त झाल्यानंतर दिनांक 6/10/2010 रोजी तो बँक ऑफ महाराष्ट्र मुंबईला वसुलीकरीता कुरीअर द्वारे पाठविलेला होता व तो बँक ऑफ महाराष्ट्र मुंबईला मिळाल्याची पावतीसुध्दा कुरीअरने दिलेली आहे, परंतु सदर धनादेश हा बँक ऑफ महाराष्ट्र मुंबई यांच्याकडुन हरविलेला असल्यामुळे धनादेशाची रक्कम अर्जदार यांच्या खात्यामध्ये जमा करता आलेली नाही. त्यामुळे गैरअर्जदाराने कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा किंवा बेजबाबदारणा केलेला नाही. गैरअर्जदार यांनी नमुद केले आहे की, त्यांनी त्याच्याकडून जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न केलेले आहे तसेच त्यांच्याकडुन सेवेमध्ये कोणतीही टाळाटाळ किंवा दिरंगाई करण्यात आलेली नसल्यामुळे, अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी उत्तराद्वारे मा.मंचास केलेली आहे. 5. गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी जवाबापुष्ठयर्थ निशाणी क्र.13 कडे 8 कागदपत्रे हजर केलेली आहेत. 6. अर्जदाराची तक्रर, त्यांचे वकीलांचा युक्तीवाद व प्रतिज्ञापत्र व त्यासोबतची कागदपत्रे यावरुन सदर प्रकरण निकाली करणे करीता ठेवण्यात आले. 7. अर्जदार यांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद व उभयतांच्या वकीलांच्या तोंडी युक्तिवाद व कागदपत्रे यावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. // कारणे व निष्कर्ष// 8. अर्जदार यांचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडुन रु.44,070/- चा धनादेश क्र.509334 चा दिनांक 17/09/2010 रोजीचा मिळाला होता व तो त्यांनी गैरअर्जदार/बॅंकेत दिनांक 29/9/2010 रोजी वटविण्यासाठी जमा केला होता याबाबत उभयंतामध्ये वाद नाही. 9. अर्जदार यांनी त्यांना मिळालेला धनादेश गैरअर्जदार/बॅंकेत वटविण्यासाठी दिला असता सदर धनादेशची रक्कम गैरअर्जदार यांचे कडुन अर्जदार यांच्या खात्यामध्ये 4 महिने होवुनसुध्दा जमा झाली नाही. म्हणुन अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना याबाबत विचारणा केली हे नि.क्र. 4/1, 4/3 वरुन दिसुन येते. त्यानंतर गैरअर्जदार बॅंकेने अर्जदार यांना सदर धनादेशाची रक्कम लवकर जमा झाली नाही म्हणुन दिलीगीरी व्यक्त केली हे नि.क्र.4/4 वरील पत्रावरुन दिसुन येते. तसेच त्यानंतर गैरअर्जदार यांनी रिजर्व बॅंक तसेच बॅंक ऑफ महाराष्ट्र मुबई यांच्याशी वारंवार संपर्क साधला हे नि.क्र.4/2, 13/1, 13/14, 13/5 व नि.क्र.13/8 वरील पत्रव्यवहारावरुन दिसुन येते. एवढे करुनही अर्जदार यांना आपली धनादेशाची रक्कम मिळाली नाही. त्यानंतर अर्जदार यांनी महाराष्ट्र लोक सेवा आयोगाला डुब्लीकेट धनादेश आणावा असा सल्ला गैरअर्जदार यांनी अर्जदाराला दिला होता कारण सदर धनादेश गहाळ झाला होता ही बाब गैरअर्जदार यांनी स्वतः अर्जदार यांना दिनांक 15/3/2011 रोजी पत्राने कळवुन मान्य केले होते हे नि.क्र.13/7 वरील पत्रावरुन दिसुन येते. 10. गैरअर्जदार यांनी आपल्या कडुन धनादेश गहाळ झाल्यानंतर सर्व जबाबदारी न स्विकारता त्याचा दोष अर्जदार व लोकसेवा आयोगावर टाकला आहे हे गैरअर्जदार यांच्या लेखी जवाब पाहता दिसुन येते. झालेली चुक मान्य करुन त्यावर उपाय शोधण्याएवजी गैरअर्जदार यांनी सर्व दोष अर्जदार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिला. गैरअर्जदार यांचेच एका शाखेकडुन चुक होवुन धनादेश गहाळ झाला ही बाब सेवेतील गंभिर त्रुटी आहे. अशी वस्तुस्थिती असतांना गैरअर्जदार यांनी त्यावर योग्य तोडगा न काढता पत्रव्यवहार करुन फक्त कागदी घोडे नाचविली आहेत व आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलेला आहे. 11. अश्यारीतीने गैरअर्जदार बॅंकेच्या गलथन कारभारामुळे अर्जदार यांना सदर रक्कम मिळाली नाही. त्यामुळे सदर धनादेशची रक्कम व त्यावरील व्याज मिळण्यास अर्जदार पात्र आहे अशी वि.मंचाचे मत झाले आहे. याबाबत मा.राज्य आयोग केरळ यांनी I(2014) CPJ 228 (Ker), Punjab National Bank (Old Nedungadi Bank) …V/s…Somasundaram P.R.& Anr. “ Consumer Protection Act,1986—Sections 2(1)(g), 14(1)(d), 15—Banking and Financial Institutions Services—Cheque--Sent for Collection—Cheque missing—Deficiency in service—District Forum directed bank to return cheque with necessary endorsement—Hence appeal—Register maintained by OP1 shows that they have sent cheque through professional couriers and same was delivered to bank—No evidence adduced by bank to show that no such item was received by them—Deficiency proved—Complainant entitled to compensation @ Rs.1,60,000/- being cheque amount.” 12. या निवाडयात धनादेश गहाळ झाल्यास धनादेशाची संपुर्ण रक्कम बॅंकेकडुन मिळण्यास अर्जदार हे पात्र् आहेत असे नमुद केले आहे. सदर निवाडयाचा आधार घेता गैरअर्जदार बॅंकेकडुन अर्जदार यांच्या धनादेशाची रक्कम रु.44,070/- व त्यावर धनादेश जमा केले पासुन म्हणजेच दिनांक 29/9/2010 पासुन द.सा.द.शे. 8 टक्के दराने व्याज मिळण्यास अर्जदार पात्र आहे असे वि.मंचास वाटते. अर्जदाराला मिळालेल्या धनादेशाची रक्कम त्याला वेळेत मिळाली नाही, सदर रक्कम वेळेत त्यांच्या खात्यात जमा झाली असती तर नक्की ते अर्जदार यांना उपयोगी पडले असते. परंतु गैरअर्जदार बॅंकेने फक्त पत्रव्यवहार करुन कागदी घोडे नाचविले व अखेर पर्यंत अर्जदार यांना त्यांच्या धनादेशाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे अर्जदार यांना वारंवार गैरअर्जदार बॅंकेकडे हेलपाटे मारावे लागले, पत्रव्यवहार करावा लागला, वकील करुन नोटीस पाठवावी लागली, तरीही त्याला गैरअर्जदार यांनी दाद दिली नाही म्हणुन अर्जदार यांना वि.मंचात तक्रार दाखल करावी लागली. त्यामुळे अर्जदाराला खुप मोठा शारिरीक, मानसीक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. म्हणुन गैरअर्जदार यांनी अर्जदाराला दिलेल्या दुषित व त्रुटीपुर्ण सेवेमुळे अर्जदार यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.3000/- व तक्रार अर्जाचा खर्चरु.2000/- मंजुर करावे असे वि.मंचास न्यायोचित वाटते. 13. वरील सर्व कारणे व निष्कर्षावरुन गैरअर्जदार हे अर्जदाराला नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराला न्यूनता व दोषपूर्ण सेवा दिल्यामुळे खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे. // आ दे श // 1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2) गैरअर्जदार बॅंकेनी यांनी अर्जदार यांना त्यांच्या धनादेशाची रक्कम रु.44,070/- व त्यावर धनादेश जमा केले पासुन म्हणजेच दिनांक 29/9/2010 पासुन द.सा.द.शे. 8 टक्के दराने व्याज द्यावे. 3) गैरअर्जदार बॅंकेनी अर्जदाराला झालेल्या मानसिक, शारिरीक त्रासाबद्दल रुपये 3,000/(अक्षरी रुपये तीन हजार फक्त) आणि तक्रारीचे खर्चापोटी रुपये 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) द्यावे. 4) वरील आदेशाची पूर्तता गैरअर्जदार यांनी आदेश प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत करावी अन्यथा उपरोक्त कलम 2 मधील रकमेवर दिनांक 29/9/2010 द.सा.द.शे.8 टक्के ऐवजी 12 टक्के दराने व्याज द्यावे लागेल याची नोंद घ्यावी. 5) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधीतांनी परत घेवुन जाव्यात. 6) निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधीत पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यात. |