तक्रारदार स्वत:
जाबदेणारांतर्फे अॅड. रवि राजे
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
श्रीमती, अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 30/जुन/2012
1. तक्रारदारांचे जाबदेणार बँके मध्ये पेन्शन खाते क्र. 20003212196 आहे. दिनांक 30/6/2010 रोजी तक्रारदार त्यांच्या जवळील ए टी एम सेन्टर मध्ये पेन्शन काढण्यासाठी गेल्या असता पैसे आले नाही. म्हणून बँकेमध्ये जाऊन चौकशी केली. बँकेनी पेन्शन मिळणार नाही कारण तक्रारदारांकडे रुपये 24,726/- येणे आहेत असे त्यांना सांगितले. बँकेच्या कर्मचा-यांनी तक्रारदारांना व्यवस्थित वागणूक दिली नाही. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार दिनांक 10/5/2010 रोजी त्यांच्या खात्यामध्ये रुपये 24,726/- जमा झाले ते कोणते होते, कशासाठी जमा झाले होते याची त्यांना माहिती नाही. दिनांक 19/5/2010 व 20/5/2010 रोजी ती रक्कम कुणीतरी काढून घेतलेली आहे. दोन दिवसांच्या व्यवहारांची तक्रारदारांना व त्यांच्या कुटूंबियांना माहिती नाही. म्हणून तक्रारदारांनी दिनांक 30/6/2010 रोजी बँकेला अर्ज दिला, त्यामध्ये दिनांक 16/5/2010 ते 20/5/2010 रोजीचे व्यवहार त्यांचे नाहीत असेही त्यात नमूद केले. तक्रारदारांनी दिनांक 16/5/2010, 17 मे व 18/5/2010 चे व्यवहार त्यांच्या व्यक्तीने केल्याचे मान्य केले आहे. परंतु दिनांक 19 मे व 20 मे 2010 चे व्यवहार तक्रारदार अमान्य करतात. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार जाबदेणार बँकेनी तक्रारदारांना त्या व्यवहारांची माहिती दिली नाही. दिनांक 19/5/2010 रोजी रुपये 3,900/- काढणे व दिनांक 20/5/2010 रोजी रुपये 20,000/- काढणे हे व्यवहार तक्रारदार अमान्य करतात. तक्रारदारांचे दोन महिन्यांचे पेन्शन अडकलेले आहे. बँक रुपये 24,726/- भरण्यास सांगत आहे. जाबदेणार यांनी ए टी एम सेन्टर मधून काढलेल्या पैशाची चौकशी करावी, त्या दिवशीच्या व्यवहारांचे फोटो मिळावेत अशी मागणी करतात. पेन्शन अभावी तक्रारदारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून बँकेत झालेल्या व्यवहाराची चौकशी व्हावी, गैरवर्तनाबद्यल बँकेवर योग्य ती कारवाई व्हावी व पेन्शन वेळेवर मिळावे अशी मागणी करतात. मानसिक त्रासापोटी रुपये 24,726/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार तक्रारदारांनी केलेले आरोप अमान्य करतात. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी योग्य तो पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदार दिनांक 19/5/2010 व 20/5/2010 रोजीचे व्यवहार त्यांना माहित नाही, दुस-याच कुणीतरी ही रक्कम काढलेली असावी असे म्हणतात. त्यासाठी दिनांक 30/6/2010 रोजी जाबदेणारांकडे चौकशीसाठी अर्ज दिला. जाबदेणार यांनी दिनांक 27/7/2010 रोजी त्यास उत्तर दिले. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार ए टी एम सिस्टीमचा गैरफायदा घेत आहेत. जाबदेणार यांनी दिनांक 16/5/2010 ते 20/5/2010 या कालावधीतील व्यवहारांच्या यादी नुसार तक्रारदारांच्या पेन्शन खात्यातील या कालावधीतील सर्व व्यवहार सुमारे 14.30 वा. झालेले आहेत. दिनांक 16/5/2010 ते 18/5/2010 या कालावधीतील व्यवहार तक्रारदार मान्य करतात. जाबदेणार यांनी दिनांक 27/7/2010 रोजीच्या पत्रान्वये तक्रारदारांना दिनांक 19/5/2010 व 20/5/2010 रोजीचे फोटो कॅमेरा सर्पोटीव्ह प्रॉब्लेमुळे उपलब्ध नसल्याचे कळविल्यानंतर तक्रारदारांनी ए टी एम मशिन दिनांक 19/5/2010 व 20/5/2010 रोजी ऑपरेट केले नसल्याचा स्टॅन्ड घेतलेला आहे. परंतु ए टी एम मशिनच्या दिनांक 19 व 20/5/2010 च्या रिपोर्ट वरुन कार्ड नं 4214090243036436 मध्ये टाकल्यानंतर खाते क्र. 20003212196 कार्ड धारकाच्या सुचनेनुसार खात्यावर रक्कम डेबिट झाली. ज्या व्यक्तीकडे ए टी एम कार्ड ज्याच्या जवळ आहे व कोड क्रमांक ज्यांना माहित आहे अशीच व्यक्ती ए टी एम वापरु शकते. तक्रारदार हे मान्य करतात की त्यांचा मुलगा ए टी एम कार्ड वापरत होता. परंतु दिनांक 19/5/2010 व 20/5/2010 रोजीचे व्यवहार मात्र तक्रारदार अमान्य करतात. तक्रारदार अथवा त्यांच्या कुटूंबियांनीच रक्कम काढलेली असल्यामुळे तक्रार खर्चासह नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणारयांनी कागदपत्रांची यादी, फोटो, दिनांक 18/5/2010 व 19/5/2010 रोजीचे फोटो, स्टेटमेंट ऑफ अकाऊंट, तक्रारदारांचे दिनांक 1/7/2010 चे पत्र, दिनांक 16/5/2010 ते 20/5/2010 या कालवधीतील व्यवहार दाखल केले आहेत. जाबदेणार यांनी शपथपत्र दाखल केले.
3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदार आधी रुपये 24,726/- ही रक्कम त्यांच्या खात्यात कशी आली हे माहित नसल्याचे तक्रारीत म्हणतात. परंतु जाबदेणार यांनी दाखल केलेल्या स्टेटमेंटचे अवलोकन केले असता ही रक्कम डी ए अरिअर्स म्हणून जमा झालेली दिसून येते. तक्रारदारांचे दिनांक 18/5/2010 ते 20/5/2010 या कालावधीतील स्टेटमेंट पाहता प्रत्येक वेळी रक्कम काढतांना खात्यात किती रक्क्म आहे हे पाहूनच रक्कम काढल्याचे दिसून येते. उदा. तक्रारदारांचे पेन्शन रुपये 5039/- जमा झाल्यानंतर रुपये 3000/- काढल्याचे, शिल्लक रुपये 2343/- शिल्लक असतांना रुपये 1100/- काढल्याचे, रुपये 1243/- शिल्लक असतांना रुपये 750/- काढण्यात आले होते. यावरुन रक्कम काढणारी व्यक्ती खात्यात शिल्लक असलेली रक्कम पाहूनच रक्कम काढत होती ही बाब स्पष्ट होते. तक्रारदारांच्या पेन्शन खात्यामध्ये दिनांक 10/5/2010 रोजी डी ए अरिअर्स रुपये 24,726/- जमा झाले. त्यामुळे खात्यात शिल्लक असलेली रक्कम रुपये 25,555/- झाली. त्यानंतर दिनांक 16/5/2010 रोजी रपुये 600/-, दिनांक 17/5/2010 रोजी रुपये 500/-, दिनांक 18/5/2010 रोजी रुपये 400/- काढण्यात आल्यानंतर शिल्लक रुपये 24,055/- दिसून आली. म्हणून दिनांक 19/5/2010 रोजी रुपये 3900/- काढण्यात आले शिल्लक रुपये 20,155/- होते. म्हणून परत दिनांक 20/5/2010 रोजी रुपये 10,000/- दोन वेळेस काढण्यात आले. यावरुन तक्रारदार, त्यांचा मुलगा किंवा इतर कुणी व्यक्ती की ज्यांच्याजवळ तक्रारदारांचे ए टी एम कार्ड होते व ज्यांना तक्रारदारांच्या कार्डचा कोड नंबर माहित होता त्यांनीच शिल्लक रक्कम पाहून रक्क्म काढली होती असे मंचाचे मत आहे. तक्रारदार दिनांक 16/5/2010, 17 मे व 18/5/2010 चे व्यवहार मान्य करतात. परंतु दिनांक 19/5/2010 व 20/5/2010 रोजीचे फोटो जाबदेणार यांच्याकडे नसल्यामुळे या दिवसांचे व्यवहार तक्रारदार अमान्य करतात. जाबदेणार यांच्याकडे जरी फोटो स्वरुपात पुरावा नसला तरीही तक्रारदारांच्या खात्यामधून रक्कम काढण्याची पध्दत पाहून तक्रारदारांनी, त्यांच्या मुलानी किंवा तक्रारदारांचे ए टी एम ज्यांच्याजवळ होते व ज्यांना तक्रारदारांना कोड नंबर माहित होता, त्यांनीच ही रक्कम काढली आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी त्यांच्या स्वत:च्या, मुलाच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तीने रक्कम काढली यासंदर्भातील पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. पुराव्या अभावी तक्रारदारांची तक्रार मंच नामंजुर करीत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
[2] खर्चाबद्यल आदेश नाही.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.