न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचा मुलगा मयत कै. महादेव बळवंत काकडे यांचे बँक ऑफ इंडिया, शाखा रुकडी, जिल्हा कोल्हापूर येथे पेन्शन/सेव्हिंग्ज अकाऊंट होते व आहे. तक्रारदार हे सदर मयत कै. महादेव बळवंत काकडे यांचे सरळ व कायदेशीर वारस आहेत. वि.प. यांनी तक्रारदार यांचा मयत मुलगा कै.महादेव बळवंत काकडे याला आमच्या बँकेत अकाऊंट उघडल्यानंतर सदर अकाऊंटरवर रक्कम रु.2 लाखचा जीवन विमा प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत व रक्कम रु. 2 लाखाचा अपघात विमा प्रधानमंत्री सुरक्षा योजनेअंतर्गत बँकेमार्फत विमा उतरला जाईल याची खात्री तक्रारदार यांच्या मुलाला दिलेमुळे सदर विम्याची ऑफर तक्रारदार यांच्या मुलाला योग्य वाटलेने तक्रारदार यांच्या मुलाने वि.प. बँकेत ता.18/01/2028 रोजी पेन्शन अकाऊंट उघडले. त्याचा अकाऊंट नं. 093612110000444 असा असून सदर खातेवर वि.प. यांनी ता.17/5/2018 रोजी रक्कम रु.12/- चा हप्ता अपघात विमा प्रधानमंत्री सुरक्षा विमायोजना अंतर्गत तसेच दि. 17/5/2018 रोजी रक्कम रु.330/- चा हप्ता प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत तक्रारदार यांच्या मुलाच्या खातेवरुन वर्ग करुन घेतला. तदनंतर दि.23/5/2019 रोजी रक्कम रु.12/- चा हप्ता हा अपघात विमा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत कापून घेतला होता. परंतु रु.330/- चा प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजने अतर्गत विमा हप्ता वर्ग करुन घेतला नाही. त्याबाबत वि.प. यांनी तक्रारदार यांच्या मयत मुलाला कोणतीही माहिती अगर पत्रव्यवहार केला नाही. तदनंतर ता.29/6/2019 रोजी तक्रारदार यांच्या मुलाचा मृत्यू झाला. परंतु वि.प. बँकेने तक्रारदारांचा सदरचा विमा हप्ता रक्कम रु.330/- खातेवरुन कापून घेतला नसल्यामुळे सदर पॉलिसीचे नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे क्लेमची रक्कम तक्रारदारांना देता येत नाही असे वि.प. यांनी तक्रारदारास सांगितले. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदारांनी वि.प. यांचेकडून तक्रारदार यांना मिळणारी कायदेशीर विम्याची रक्कम रु. 2,00,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,00,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.25,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत तक्रारदार यांचे आधारकार्ड, तक्रारदार यांचे मुलाचे पासबुक व मृत्यू प्रमाणपत्र इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प. यांनी याकामी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्हणणे दाखल केले आहे. वि.प. यांनी, तक्रारदार यांच्या मुलाने ता.17/7/28 रोजी रक्कम रु.12/- चा हप्ता अपघातविमा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनाअंतर्गत तसेच रक्कम रु.330/- चा हप्ता प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनाअंतर्गत विमा पॉलिसी उतरविलेल्या होत्या ही बाब मान्य केलेली आहे. सदर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत तसेच प्रधानमंत्री जीवनज्योती विमा पॉलिसीचे हप्ते वेळोवेळी वि.प. कडे भरण्याची जबाबदारी तक्रारदार यांची होती तसेच विमा पॉलिसीचे हप्ते जमा झाले याची खात्री करणेची जबाबदारी पॉलिसीधारकाची होती. त्यामुळे प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेची विमा पॉलिसी संपुष्टात आलेनंतर पॉलिसी नूतनीकरण करणेची जबाबदारी ही तक्रारदार यांच्या मुलाची होती. तक्रारदार यांनी वि.प. बँकेला विमा पॉलिसी हप्ता जमा करणेसाठी कोणतीही सूचना दिलेली नव्हती. तक्रारदार यांच्या मुलाने सदर रक्कम रु.330/- चा विमा हप्ता वेळोवेळी जमा करुन घेणेबाबत कोणतेही अधिकार वि.प. बँक यांना दिलेला नव्हता. तक्रारदार यांनी विमा कंपनी यांना वि.प. म्हणून सामील केलेले नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात यावी असे वि.प. यांनी म्हणणे दाखल केलेले आहे.
4. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प.यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे विमा रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
5. तक्रारदार यांचा मुलगा मयत कै. महादेव बळवंत काकडे यांचे बँक ऑफ इंडिया, शाखा रुकडी, जिल्हा कोल्हापूर येथे पेन्शन/सेव्हिंग्ज अकाऊंट होते व आहे. तक्रारदार हे सदर मयत कै. महादेव बळवंत काकडे यांचे सरळ व कायदेशीर वारस आहेत. सदरचे वि.प. बँकेकडे असणारे तक्रारदार यांचा मुलगा मयत कै. महादेव बळवंत काकडे यांचे पासबुक तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केले आहे. सदरचे पासबुक वि.प. यांनी नाकारलेले नाही. सबब, तक्रारदार यांचा मयत मुलगा कै.महादेव बळवंत काकडे हा वि.प. यांचा ग्राहक आहे. त्याकारणाने तक्रारदार हे मयत कै. महादेव बळवंत काकडे यांचे वारस असलेने (Beneficiary) तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
6. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. वि.प. यांनी तक्रारदार यांचा मयत मुलगा कै.महादेव बळवंत काकडे याला आमच्या बँकेत अकाऊंट उघडल्यानंतर सदर अकाऊंटरवर रक्कम रु.2 लाखचा जीवन विमा प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत व रक्कम रु. 2 लाखाचा अपघात विमा प्रधानमंत्री सुरक्षा योजनेअंतर्गत बँकेमार्फत विमा उतरला जाईल याची खात्री तक्रारदार यांच्या मुलाला दिलेमुळे सदर विम्याची ऑफर तक्रारदार यांच्या मुलाला योग्य वाटलेने तक्रारदार यांच्या मुलाने वि.प. बँकेत ता.18/01/2028 रोजी पेन्शन अकाऊंट उघडले. त्याचा अकाऊंट नं. 093612110000444 असा असून सदर खातेवर वि.प. यांनी ता.17/5/2018 रोजी रक्कम रु.12/- चा हप्ता अपघात विमा प्रधानमंत्री सुरक्षा विमायोजना अंतर्गत तसेच दि. 17/5/2018 रोजी रक्कम रु.330/- चा हप्ता प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत तक्रारदार यांच्या मुलाच्या खातेवरुन वर्ग करुन घेतला. तदनंतर दि.23/5/2019 रोजी रक्कम रु.12/- चा हप्ता हा अपघात विमा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत कापून घेतला होता. परंतु रु.330/- चा प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजने अतर्गत विमा हप्ता वर्ग करुन घेतला नाही. त्याबाबत तक्रारदार यांच्या मयत मुलाला कोणतीही माहिती अगर पत्रव्यवहार केला नाही. तदनंतर ता.29/6/2019 रोजी तक्रारदार यांच्या मुलाचा मृत्यू झाला. सबब, वि.प. बँकेने तक्रारदारांचा सदरचा विमा हप्ता रक्कम रु.330/- खातेवरुन कापून घेतला नसल्यामुळे सदर पॉलिसीचे नूतनीकरण झालेले नाही. सबब, वि.प. बँकेने सदरचा विमा हप्ता तक्रारदार यांच्या मयत मुलाच्या खातेवरुन वर्ग न करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? अथवा सदरची वि.प. बँक यांची कृती ही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने वि.प. यांनी दाखल केलेल्या म्हणण्याचे अवलोकन करता वि.प. यांनी त्यांचे म्हणणेमध्ये तक्रारदार यांच्या मुलाने ता.17/7/18 रोजी रक्कम रु.12/- चा हप्ता अपघातविमा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनाअंतर्गत तसेच रक्कम रु.330/- चा हप्ता प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनाअंतर्गत विमा पॉलिसी उतरविलेल्या होत्या ही बाब मान्य केलेली आहे. सदर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत तसेच प्रधानमंत्री जीवनज्योती विमा पॉलिसीचे हप्ते वेळोवेळी वि.प.कडे भरण्याची जबाबदारी तक्रारदार यांची होती तसेच विमा पॉलिसीचे हप्ते जमा झाले याची खात्री करणेची जबाबदारी पॉलिसीधारकाची होती. त्यामुळे प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेची विमा पॉलिसी संपुष्टात आलेनंतर पॉलिसी नूतनीकरण करणेची जबाबदारी ही तक्रारदार यांच्या मुलाची होती. तक्रारदार यांनी वि.प. बँकेला विमा पॉलिसी हप्ता जमा करणेसाठी कोणतीही सूचना दिलेली नव्हती. तक्रारदार यांच्या मुलाने सदर रक्कम रु.330/- चा विमा हप्ता वेळोवेळी जमा करुन घेणेबाबत कोणतेही अधिकार वि.प. बँक यांना दिलेला नव्हता. तक्रारदार यांनी विमा कंपनी यांना वि.प. म्हणून सामील केलेले नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात यावी असे वि.प. यांनी म्हणणे दाखल केलले आहे. सबब, त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी तक्रारीसोबत तक्रारदार यांच्या मुलाचे मृत्यू प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. तसेच तक्रारदार यांच्या मुलाचे अकाऊंट नं. 093612110000444 चे पासबुकाची प्रत दाखल केलेली आहे. सदर पासबुकाचे अवलोकन करता ता 17/5/2018 रोजी तक्रारदार यांच्या मयत मुलाच्या खातेवरुन
BKID 093612110000444170518 12/-
BOIJJ185302734170518 330/-
25/5/18 Renewal BKID093612110000444250518 12/-
असे नमूद आहे. सबब, सदरच्या खातेउता-यावरील नोंदीवरुन ता. 17/5/18 रोजी विमा पॉलिसी अतर्गत रक्कम रु.12/- चा हप्ता रक्कम रु.330/- चा हप्ता हा तक्रारदार यांच्या मुलाच्या खातेवरुन withdrawal झालेली होती ही बाब सिध्द होते. सदरची बाब वि.प. यांनी देखील त्यांचे म्हणणेमध्ये नाकारलेली नाही.
ता. 23/5/2019 Renewal BKID093612110000444230519 12/-
7. सबब, ता. 23/5/2019 रोजी वि.प. बँकेने तक्रारदारांच्या मयत मुलाच्या खातेउता-यावरुन सदरच्या पॉलिसीच्या रिनिवल पोटी रक्कम रु.12/- चा विमा हप्ता वर्ग केलेचा दिसून येतो. सदर दि.23/5/2019 रोजी खातेउता-यावर शिल्लक शेष (Balance) रु.1,633/- इतकी रक्कम जमा असलेचे दिसून येते. सदरची बाब वि.प. यांनी देखील नाकारलेली नाही. तथापि वि.प. यांनी केवळ तक्रारदार यांनी वि.प. बँकेला विमा पॉलिसी जमा करणेसाठी कोणतीही सूचना दिलेली नव्हती अथवा तक्रारदार यांच्या मुलाने रक्कम रु.330/- चा विमा हप्ता वेळोवेळी जमा करुन घेणेबबात कोणतेही अधिकार वि.प. बँकेला दिलेले नव्हते, या कारणास्तव सदरची रक्कम विमा कंपनी यांना वर्ग केलेली नाही. अशी सबब सांगून तक्रारदार यांची तक्रार नाकारलेली आहे. तथापि सदरचे कथनाचे अनुषंगाने कोणताही कागदोपत्री पुरावा वि.प. यांनी दाखल केलेला नाही. परंतु दाखल कागदपत्रांवरुन वि.प. यांनी तक्रारदार यांचे मयत मुलाचे सदर पॉलिसी अंतर्गत विमाहप्ता रक्कम रु.12/- तसेच विमा हप्ता रु.330/- सन 2018 मध्ये वर्ग केलेले आहेत ही बाब दिसून येते. तसेच सदरचे पॉलिसी व तिचे हप्ते वि.प. यांनी नाकारलेले नाहीत. त्याकारणाने वि.प. यांनी सदरचा हप्ता रक्कम रु.12/- तसेच रु.330/- हा सन 2019 मध्येही वर्ग करण्याची जबाबदारी वि.प. यांचेवरच होती या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. केवळ तक्रारदार यांच्या मयत मुलाने वि.प. बँकेला पॉलिसी हप्ता वर्ग करणेसाठी कोणतीही सूचना दिली नव्हती त्या कारणाने सदरचा विमा हप्ता वर्ग करण्याचा अधिकार बँकेला नव्हता ही वि.प. यांची कथने बिनबुडाची आहेत. तसेच सदर तारीख 23/5/2019 रोजी तक्रारदार यांच्या मयत मुलाच्या खातेवर रक्कम रु.1,663/- इतकी रक्कम शिल्लक असलेने वि.प. बँकेला सदरच्या रकमेतून रक्कम रु. 330/- चा विमा हप्ता वर्ग करणेस कोणतीही अडचण नव्हती. तथापि केवळ तांत्रिक मुद्याचा आधार घेवून वि.प. यांनी सदरची रक्कम वि.प. यांच्याच चुकीमुळे विमा कंपनीला वर्ग करता आलेली नाही ही बाब स्पष्टपणे दिसून येते. वि.प. यांनी सदरकामी संधी असूनदेखील कोणताही पुरावा दाखल केलेला नसलेने त्यांचेविरुध्द पुरावा नाही (No evidence) चा आदेश पारीत केलेला आहे. सबब, वरील सर्व कागदपत्रांचा विचार करता वि.प. बँकेने तक्रारदारांच्या मयत मुलाच्या खाते उता-यावरुन सदरचा विमा हप्ता रक्कम रु.330/- withdrawal न केल्यामुळे सदर पॉलिसीचे नूतनीकरण झालेले नाही. सबब, वि.प. विमा कंपनी यांची सदरची कृती ही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. त्या कारणाने वि.प. बँकेने तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
8. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. बँकेने तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब, तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून रक्कम रु.330/- चा विमा हप्ता withdrawal केला नसलेमुळे सदर पॉलिसीचे नूतनीकरण झाले नसलेमुळे सदर पॉलिसी अंतर्गत मिळणारी कायदेशीर विम्याची रक्कम रु.2 लाखची मागणी आयोगात केलेली आहे. सदरच्या विमा पॉलिसीअंतर्गत रक्कम रु. 330/- चा विमा हप्ता वि.प. यांनी नाकारलेला नाही. तसेच सदरचा विमाहप्ता तक्रारदार यांच्या खातेवरुन withdrawal केलेला नसल्यामुळे तक्रारदार यांना सदरचा कायदेशीर क्लेम वि.प. यांच्या केवळ तांत्रिक (Technical) चुकीमुळे मिळालेला नाही ही बाब स्पष्ट होते. त्याकारणाने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून कायदेशीर विमा क्लेमची रक्कम रु.2 लाख मिळण्यास पात्र आहेत तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4
9. वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5 - सबब आदेश.
- आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. बँकेने तक्रारदार यांना रक्कम रु.2,00,000/- अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 5/10/2020 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- वि.प.बँकेने यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींअन्वये वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|