:: नि का ल प ञ :: (मंचाचे निर्णयान्वये, श्री अनिल एन. कांबळे ,मा.अध्यक्ष, प्रभारी) (पारीत दिनांक :07 मार्च, 2012) 1. अर्जदार/तक्रारकर्ता याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे. गैरअर्जदार यांनी एफ.डी.चे रकमेची मागणी करुनही दिली नाही, ही गैरअर्जदाराच्या सेवेतील न्युनता असल्यामुळे फीक्स डिपॉझिटची रक्कम मिळण्यासाठी दाखल केली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे-
2. तक्रारकर्ता वर्धा जिल्हयाचा कायम रहिवासी असून, गैरअर्जदाराच्या बँकेत खाते क्रमांक 970312100010635 असा खाता आहे. तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराच्या बँकेत डबल बेनिफीट डिपॉझिट योजने अंतर्गत दिनांक 10.08.1999 रोजी रुपये-1,00,000/- फीक्स डिपॉझिट म्हणून जमा केले. गैरअर्जदार बँकेनी लेजर फोलीओ क्रमांक 28/35, खाते क्रमांक- 3286, डी.बी.डी.क्रमांक-29/डी-4, बी.एफ.एस.क्रमांक-5509620 कालावधी 3 वर्ष या वर्णनाचे प्रमाणपत्र दिले. एफ.डी.ची मुदत 10.08.2002 ला संपणार होती व कालावधी संपल्या नंतर व्याजासह रुपये-1,34,489/- परत मिळणार होते. 3. गैरअर्जदाराच्या बँकेमधून दिनांक- 03.05.2001 ला रुपये-12,000/- फीक्स डिपॉझिटचे आधारावर कर्ज घेतले. दिनांक-03.09.2001 रोजी तक्रारकर्त्याच्या बिना परवानगीने फीक्स डिपॉझिटचे रकमेतून रुपये-10,966/- वजा करुन, कर्ज खाता क्रमांक-एल.एफ.7/23 मध्ये जमा करण्यात आले व त्या नंतर कर्ज खाते बंद करण्यात आले. तसेच उरलेली रक्कम रुपये-1,07,988/- तक्रारकर्त्याच्या बचत खाते क्रमांक-10635 मध्ये जमा करण्यात आली.गैरअर्जदाराच्या बँकेकडे वारंवार तोंडी विनंती केल्या नंतरही फीक्स डिपॉझिटची रक्कम परत केली नाही. 4. तक्रारकर्ता यांनी गैरअर्जदार बँकेला वकिला मार्फत दिनांक-23.03.2010 रोजी नोटीस पाठवून रकमेची मागणी केली. गैरअर्जदार बँकेला नोटीस प्राप्त होऊनही रक्कम परत केली नाही, उलट, दिनांक 08.04.2010 ला नोटीसाचे खोटे उत्तर देऊन रक्कम देण्यास टाळाटाळ केली. गैरअर्जदार बँकेनी दिनांक 08.04.2010 ला लेखी उत्तरात कळविले की, 10 वर्षा पर्यंतचे लेखी हिशोब खाते त्यांचेकडे ठेवले जाते, परंतु त्यापूर्वीचे खाते नष्ठ करण्यात येते. गैरअर्जदार बँकेने खोटे लेखी उत्तरान्वये असे कळते की, तक्रारकर्त्याचे फीक्स डिपॉझिटची रक्कम हिसकावण्याचे उद्देश्याने असे उत्तर दिले आहे व दोषपूर्ण सेवा दिली, तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. गैरअर्जदार बँकेच्या कृत्यामुळे, अर्जदाराला आर्थिक आणि मानसिक त्रास सुध्दा भोगावे लागले, ज्यासाठी गैरअर्जदार बँक पूर्णपणे जबाबदार आहे. गैरअर्जदार बँकेनी तक्रारकर्त्याला त्याचे फीक्स डिपॉझिटची रक्कम परत करण्यास टाळाटाळ करुन , आपले कर्तव्यात त्रृटी निर्माण केली आहे. 5. तक्रारकर्त्याची फीक्स डिपॉझिटची रक्कम मिळण्याचा दिनांक 10.08.2002 होता तरी सुध्दा गैरअर्जदाराने तक्रारदाराच्या बिनापरवानगीने फीक्स डिपॉझिटच्या रकमेची विल्हेवाट लावली/केली. गैरअर्जदाराने सदरच्या रकमेची विल्हेवाट लावताना कसल्याही प्रकारचा पत्रव्यवहार तक्रारदारा सोबत केला नाही. गैरअर्जदार बँकेकडे फीक्स डिपॉझिट रकमेची मागणी केली, तरी देण्यास टाळाटाळ केले. गैरअर्जदार बँकेला वकिलाद्वारे दिनांक 23.03.2010 रोजी नोटीस बजावली.गैरअर्जदार बँकेला नंतर माहीत पडले तरी फीक्स डिपॉझिटची रक्कम दिलेली नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याने फीक्स डिपॉझिटची रक्कम रुपये-1,34,489/- गैरअर्जदार बँकेनी परत करण्याचा आदेश पारीत करण्यात यावे. सदर फीक्स डिपॉझिटचे रकमेचा कालावधी संपल्या पासून 34 टक्के व्याजासह तक्रारदारास देण्याचा आदेश पारीत करण्यात यावा. तसेच तक्रारीचा खर्च रुपये-10,000/-, नोटीस खर्च रुपये-2000/- गैरअर्जदार बँकेनी तक्रारकर्त्यास देण्याचा आदेश पारीत करण्यात यावा, अशी प्रार्थना केली आहे. 6. अर्जदाराने तक्रारी सोबत विलंब माफीचा अर्ज दाखल केला. सदर विलंब माफीचा अर्ज मंचाने दिनांक 06 जानेवारी, 2012 रोजी निकाली निघालेला आहे. तक्रारकर्त्याने पान क्रमांक 11 च्या कागदपत्राचे यादी नुसार दस्तऐवज दाखल केले, ज्यामध्ये मुदतठेवीचे प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत, खाता क्रमांक-10635 च्या पास बुकाची झेरॉक्स प्रत, वकिला मार्फत पाठविलेल्या नोटीसाची प्रत व गैरअर्जदारानी दिलेल्या उत्तराची झेरॉक्सप्रत दाखल केली आहे. गैरअर्जदार हजर होऊन पान क्रमांक-147 वर आपले लेखी उत्तर दाखल केले.
7. गैरअर्जदार बँकेला अर्जदाराची मागणी मान्य नाही. गैरअर्जदारा विरुध्द केलेला तक्रार अर्ज योग्य व बरोबर नसून खर्चासह खारीज करण्यात यावा, अशी विनंती केली. हे म्हणणे खरे आहे की, तक्रारकर्ता हा दिलेल्या पत्त्यावर राहतो व तो बँकेचा ग्राहक असून, गैरअर्जदाराकडे बचतखाते आहे. हे म्हणणे खरे आहे की, तक्रारकर्त्याने रुपये-1,00,000/- फीक्स डिपॉझिटमध्ये जमा केले होते व ते तीन वर्षाचे मुदतीसाठी होते. त्यातील देय तिथी 10.08.2002 ही होती, त्या प्रमाणे त्याला प्रमाणपत्र देखील देण्यात आले. हे म्हणणे खरे आहे की, अर्जदाराने फीक्स डिपॉझिटवर गैरअर्जदाराकडून दिनांक-03.05.2001 ला रुपये-12,000/- कर्ज घेतले. हे म्हणणे गैरअर्जदारास नाकबुल असून, धांदात खोटे आहे की, दिनांक-03.09.2001 रोजी अर्जदाराच्या परवानगी शिवाय फीक्स डिपॉझिट मधून रुपये-10,966/- कर्ज खात्यात जमा करण्यात आले होते. हे म्हणणे खरे आहे की, गैरअर्जदाराने, अर्जदाराचे विनंती वरुन मुदतीपूर्व दिनांक 03.09.2001 रोजी फीक्स डिपॉझिट खाते बंद करुन त्यातून रुपये-10,966/- हे कर्ज खात्यामध्ये वळती केले व उरलेली रक्कम रुपये-1,07,988/- हे अर्जदाराचे बचतखाते क्रमांक-10635 मध्ये जमा करण्यात आले. अर्जदाराने फीक्स डिपॉझिटची रक्कम रुपये-1,34,489/- ची 34% व्याजासह मागणी केली असून , ती वाजवी नसून बेकायदेशीर आहे. 8. गैरअर्जदाराने लेखी उत्तरात पुढे असेही कथन केले आहे की, गैरअर्जदाराने फीक्स डिपॉझिट मुदतीचे आधीच अर्जदाराच्या विनंती वरुन बंद केले व त्यातील रक्कम, कर्ज खात्यात वळते केले व कर्ज खाते बंद केले, उरलेली रक्कम अर्जदाराचे बचतखाते क्रमांक-10635 मध्ये जमा करण्यात आले. अर्जदाराने सदर पासबुकाची प्रत पेश केली नाही. अर्जदाराला पेन्शन मिळत असते, ती पेन्शन बँकेचे खात्यामध्ये जमा होते. 9. अर्जदार व त्याच्या मुलानी 2003 मध्ये बँके कडून कॅश क्रेडीट व टर्म लोन घेतले आहे . गैरअर्जदाराकडून, अर्जदारास देण्यात आलेल्या सेवेमध्ये कोणतीही त्रृटी झालेली नाही. अर्जदारास फीक्स डिपॉझिटची रक्कम मिळाल्या वर देखील, मुद्याम, गैरअर्जदारास त्रास देण्याचे उद्येश्याने सदरची केस केलेली आहे. गैरअर्जदार बँकेनी दोषपूर्ण सेवा प्रदान केली, हे म्हणणे चुकीचे आहे. गैरअर्जदार बँकेकडून देण्यात आलेल्या सेवेमध्ये व कामामध्ये कोणतीही त्रृटी झालेली नाही. त्यामुळे गैरअर्जदाराचे विरुध्द अर्जदाराने केलेला तक्रारअर्ज योग्य व बरोबर नसून तो खर्चासह खारीज करण्यात यावा. 10. अर्जदाराने तक्रारीचे कथना पुष्ठार्थ पुरावा शपथपत्र पान क्रमांक 153 वर दाखल केला तसेच तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद पान क्रमांक 160 वर दाखल केला आहे. 11. अर्जदाराने दाखल केलेले दस्तऐवज तसेच गैरअर्जदार बँकेनी पान क्रमांक 117 चे यादी नुसार दाखल केलेले दस्तऐवज, अर्जदाराने सादर केलेल्या लेखी युक्तीवादा वरुन आणि गैरअर्जदार यांच्या वकिलांनी दिनांक 05.03.2012 रोजी केलेल्या तोंडी युक्तीवादा वरुन खालील मुद्ये उपस्थित होतात. अक्रं मुद्या उत्तर (1) तक्रारकर्ता फीक्स डिपॉझिटची रक्ककम : नाही रुपये-1,34,489/- फीक्स डिपॉझिट रकमेचा कालावधी संपल्या पासून 34% व्याज दराने मिळण्यास पात्र आहे काय? (2) गैरअर्जदार बँकेने, अर्जदारास सेवा देण्यात : नाही न्युनता करुन, अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केला आहे काय? (3) अर्जदाराची तक्रार मंजूर करण्यास पात्र आहे काय? : नाही (4) या तक्रारीचा अंतिम निकाल काय? अंतिम आदेशा नुसार. :: कारण मिमांसा :: मुद्या क्रं-1 ते 3 12. अर्जदाराने दिनांक-10.08.1999 ला रुपये-1,00,000/- 3 वर्ष मुदत ठेवीत 10% व्याज दराने, गैरअर्जदार बँकेत ठेवले होते. गैरअर्जदार बँकेनी फीक्स डिपॉझिटचे प्रमाणपत्र खाता क्रमांक-3286 प्रमाणे दिले. ठेवीची मुदत दिनांक-10.08.2002 रोजी संपणार होती. अर्जदारास/तक्रारकर्त्यास मुदत संपल्या नंतर रुपये-1,34,489/- एवढी रक्कम मिळणार होती. 13. अर्जदारा व गैरअर्जदार यांचेतील वादाचा मुद्या असा आहे की, फीक्स डिपॉझिटची रक्कम मागणी करुनही, गैरअर्जदार बँकेनी दिली नाही, त्यामुळे ती रक्कम 34% व्याज दराने देण्यात यावी, अशी विनंती अर्जदाराने केली आहे.
14. अर्जदाराने या तक्रारी सोबत विलंब माफीचा अर्ज क्रं-M.A.-7/2011 दाखल केला होता. सदर विलंब माफीचे अर्जावर मंचाने दिनांक-06.01.2012 रोजी आदेश पारीत करुन सदर विलंब माफीचा अर्ज मंजूर केलेला आहे. अर्जदार/तक्रारकर्त्याने दाखल केलेला विलंब माफीचा अर्ज मंजूर झालेला असल्यामुळे त्यावर आता जास्त भाष्य करणे न्यायसंगत होणार नाही. परंतु अर्जदाराने दिनांक-10.08.1999 रोजी गैरअर्जदार बँकेत फीक्स डिपॉझिटमध्ये रक्कम ठेवलेली होती व ती रक्कम 3 वर्ष मुदती करीता असल्यामुळे, मुदत संपण्याचा कालावधी हा दिनांक-10.08.2002 असा होतो. तेंव्हा पासून अर्जदार यांनी काहीच कार्यवाही दिनांक-23.03.2010 पर्यंत केली नाही. 15. अर्जदाराने आपले तक्रारीत असे कथन केले आहे की, " तक्रारदाराची फीक्स डिपॉझिटची रक्कम मिळण्याचा दिनांक-10.08.2002 होता, तरी सुध्दा गैरअर्जदाराने तक्रारदाराच्या बिना परवानगीने फीक्स डिपॉझिटची रकमेची विल्हेवाट लावली/केली". या तक्रारकर्त्याचे कथना वरुन एक बाब स्पष्ट होते की, फीक्स डिपॉझिटचे मूळ प्रमाणपत्र, गैरअर्जदार बँकेला न देता व कोणतीही सुचना गैरअर्जदार बँकेनी, अर्जदारास दिलेली नव्हती, तरी देखील फीक्स डिपॉझिट बंद करण्यात आले. वरील अर्जदाराचे कथना वरुन असे स्पष्ट होते की, फीक्स डिपॉझिटचे मूळ प्रमाणपत्र त्याचेचकडे उपलब्ध आहे, असा निष्कर्ष निघतो. गैरअर्जदार यांनी बिना मूळ मुदत ठेव प्रमाणपत्रा शिवाय मुदत ठेवीची रक्कम, अर्जदाराचे कर्ज खात्यात वळती करुन, उर्वरीत रक्कम त्याचे बचत खात्यात जमा केली आहे, तर, अर्जदाराने स्वतःहून मूळ फीक्स डिपॉझिटचे प्रमाणपत्राची प्रत रेकॉर्डवर दाखल करणे आवश्यक आहे. परंतु अर्जदाराने/तक्रारकर्त्याने मूळ फीक्स डिपॉझिटचे प्रमाणपत्राची प्रत रेकॉर्डवर दाखल केलेली नाही आणि मुदत ठेव संपल्याचे दिनांका नंतर जवळपास 09 वर्षानी ही तक्रार दाखल केली आहे, यावरुन अर्जदाराचा हेतू हा वाईट असल्याचा निष्कर्ष निघतो व अर्जदार हा स्वच्छ हातानो मंचा समोर तक्रार घेऊन आलेला नाही, असे उपलब्ध रेकॉर्डवरुन सिध्द होते. 16. गैरअर्जदार यांनी आपले लेखी उत्तरात असा मुद्या उपस्थित केलेला आहे की, अर्जदाराने मुदतीपूर्व फीक्स डिपॉझिट तोडून रकमेची मागणी केली. त्यानुसार त्याचे विनंतीवरुन दिनांक-03.09.2001 ला रुपये-1,18,954/- पैकी, रुपये-10,966/- मुदत ठेवीवर घेतलेल्या कर्जा पैकी वळते करुन, उर्वरीत रक्कम रुपये-1,07,988/- अर्जदाराच्या खाते क्रमांक-10635 मध्ये जमा करण्यात आले. अर्जदाराने खाते क्रमांक-10635 च्या खाते उता-याची झेरॉक्स प्रत तक्रारी सोबत पान क्रमांक 13 वर दाखल केलेली आहे. सदर उता-यामध्ये दिनांक 14.05.2007 पासूनच्या नोंदी दिलेल्या आहेत, यावरुन अर्जदाराचे म्हणणे सिध्द होत नाही. गैरअर्जदाराचे म्हणण्या नुसार दिनांक-03.09.2001 ला फीक्स डिपॉझिट बंद करुन, बचत खात्यात रक्कम जमा केले. त्यामुळे अर्जदाराने पुन्हा जवळपास 9 वर्षा नंतर फीक्स डिपॉझिटची रक्कम मागणे योग्य नाही, हे गैरअर्जदार यांचे म्हणणे ग्राहय धरण्यास पात्र आहे. 17. अर्जदाराने मुदती ठेवीवर रुपये-12,000/- कर्ज घेतले होते, हे तक्रारीतील परिच्छेद क्रमांक 2 मध्ये मान्य केले आहे. अशा स्थितीत अर्जदाराचे म्हणण्या नुसार, फीक्स डिपॉझिटची रक्कम, गैरअर्जदार बँकेनी दिली नाही, तर अर्जदाराने मुदत ठेवीवर घेतलेले रुपये-12,000/- एवढया रकमेचे कर्ज केंव्हा परत केले ? किंवा ती कर्जाची रक्कम आजही अर्जदारास देणे आहे, हे अर्जदाराने तक्रारीत कथन केले नाही. एकीकडे, अर्जदाराचे असे म्हणणे की, बिना परवानगीने गैरअर्जदार बँकेने फीक्स डिपॉझिट रकमेची विल्हेवाट लावली आणि दुसरीकडे गैरअर्जदार बँकेने मुदत ठेवीची रक्कम दिली नाही असे म्हणणे, या अर्जदाराचे कथनातच विसंगती दिसून येते, यावरुन अर्जदार स्वच्छ हाताने तक्रार आणलेली नाही व गैरअर्जदारा कडून रक्कम हडपण्याचे उद्देश्यानेच खोटी, बनावटी तक्रार दाखल केली आहे, असे दाखल दस्तऐवजा वरुन स्पष्ट होते. 18. अर्जदाराने तक्रारीत, गैरअर्जदाराकडे फीक्स डिपॉझिटची रक्कम मागणी केली, तरी देखील त्यांनी दिलेली नाही व सेवा देण्यात न्युनता करुन अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केला असे कथन केले आहे. परंतु अर्जदाराने मुदत ठेव संपण्याची तारीख-10.08.2002 नंतर वकिला मार्फत गैरअर्जदारास नोटीस पाठविल्याचा दिनांक-23.03.2010 पर्यंतचे कालावधीत गैरअर्जदार बँकेकडे मागणी केल्या बाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. अर्जदार, गैरअर्जदार बँकेत जाऊन तोंडी मागणी करीत होता, तरी फीक्स डिपॉझिट रककम गैरअर्जदार यांनी दिली नाही व टाळाटाळ केली, तेंव्हा अर्जदाराने गैरअर्जदार बँकेच्या वरिष्ठांकडे लेखी कुठलीही तक्रार केलेली नाही. तसेच 2002 पासून ते 2010 पर्यंत अर्जदार चुप राहिल्या नंतर फीक्स डिपॉझिट रकमेची मागणी गैरअर्जदारकडे केलेली आहे, यावरुन अर्जदाराने, गैरअर्जदाराकडे फीक्स डिपॉझिट रकमेची मागणी वारंवार केली, या अर्जदाराचे म्हणण्यात तथ्य नाही. 19. गैरअर्जदार यांनी, मुदत ठेवीची तारीख संपल्या नंतर त्याची रक्कम अर्जदारास दिली नाही या बाबतचा कुठलाही पुरावा तक्रारी सोबत अर्जदाराने दाखल केलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांनी सेवा देण्यात न्युनता दिली व अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केला, हे सिध्द होत नाही. त्यामुळे अर्जदाराची तक्रार मंजूर करण्यास पात्र नाही.
20. गैरअर्जदार यांनी लेखी उत्तरात असे म्हणणे सादर केले की, अर्जदारास फीक्स डिपॉझिट रक्कम मिळाल्यावरही मुद्याम, गैरअर्जदारास त्रास देण्या करीता तक्रार दाखल केली आहे, गैरअर्जदार यांचे हे म्हणणे उपलब्ध रेकॉर्ड वरुन ग्राहय धरण्यास पात्र आहे.
21. अर्जदाराने सन 2001 मधल्या पासबुकाची प्रत दाखल केलेली नाही. गैरअर्जदार यांनी फीक्स डिपॉझिटची रक्कम दिली नाही, अर्जदारास मुदत संपण्याचा दिनांक-10.08.2002 पासून 2 वर्षा पर्यंत मागणी करुनही रक्कम मिळालेली नाही, तरी तक्रार का दाखल केलेली नाही आणि आता वकिला मार्फत नोटीस पाठवून खोटी व बनावटी तक्रार, अस्वच्छ हाताने दाखल केलेली आहे, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने, अर्जदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम-26 प्रमाणे रुपये-1000/- खर्चासह खारीज होण्यास पात्र आहे. 22. एकंदरीत उपलब्ध रेकॉर्ड वरुन अर्जदार फीक्स डिपॉझिटची रक्कम रुपये-1,34,489/- मिळण्यास पात्र नाही. तसेच गैरअर्जदार यांनी कुठलीही सेवा देण्यात न्युनता केलेली नाही. अर्जदाराने पान क्रमांक 165 वर माहितीचे अधिकारातील अपिलाची प्रत दाखल केलेली आहे. तसेच पान क्रमांक 115 वर अर्ज दाखल करुन, गैरअर्जदार यांनी परिच्छेद क्रमांक 3 मधील नमुद केलेली कागदपत्रे दाखल करण्यास निर्देश द्यावेत, असा अर्ज दाखल केला. सदर अर्ज दिनांक 15.10.2011 रोजी दाखल केला, सदर अर्ज निकाली निघालेला नाही तरी एक बाब स्पष्ट होते की, अर्जदाराने 10 ते 11 वर्षापूर्वी फीक्स डिपॉझिट केलेल्या दस्तऐवजाची मागणी आता केलेली आहे, जी Preservation of record नुसार योग्य नाही. 23. गैरअर्जदार यांनी कोणत्या प्रकारचा रेकॉर्ड हा किती वर्षा पर्यंत टिकवून ठेवण्यात यावा व केंव्हा नष्ट करण्यात यावा या बाबतचे दिशा निर्देशाच्या परिपत्रकाची प्रत पान क्रमांक 125 वर दाखल केलेली आहे. सदर परिपत्रकान्वये बॅक शाखेचा(Branch) रेकॉर्ड हा 08 वर्षा पर्यंत ठेवण्याची तरतुद आहे. त्यामुळे अर्जदाराने 08 वर्षा नंतर कागदपत्राची मागणी केली, जी संयुक्तिक व न्यायोचित नाही. वास्तविक अर्जदाराने जमा केलेल्या डिपॉझिटची मुदत संपल्या नंतर लगेच 01-02 वर्षाचे आत मागणी करण्याची जबाबदारी ही अर्जदाराची होती, परंतु अर्जदाराने आपली ही जबाबदारी पार न पाडता, गैरअर्जदाराकडून खोटी मागणी केली आहे, असेच दाखल दस्तऐवजा वरुन सिध्द होत असल्याने तक्रार मंजूर करण्यास पात्र नाही, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने मुद्या क्रमांक 1 ते 3 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे. मुद्या क्रं-4 24. वरील मुद्या क्रमांक 1 ते 3 चे विवेचना वरुन, गैरअर्जदार यांनी सेवा देण्यात न्युनता केली नाही, या निर्णयाप्रत हे मंच आले असल्याने तक्रार खर्चासह खारीज करुन, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहेत- आदेश 1) अर्जदाराची तक्रार खारीज. 2) अर्जदार/तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम-26 नुसार, गैरअर्जदारास रुपये-500/- (अक्षरी रुपये पाचशे फक्त) आणि ग्राहक सहायता निधीत रुपये-500/-(अक्षरी रुपये पाचशे फक्त) आदेश दिनांका पासून 30 दिवसाचे आत द्यावे व आपला खर्च स्वतः सहन करावा. 3) उभय पक्षांना सदर आदेशाची प्रमाणित प्रत निःशुल्क देण्यात यावे. (अनिल एन.कांबळे) | (सौ.सुषमा प्र.जोशी ) | (मिलींद रामराव केदार) | अध्यक्ष.(प्रभारी) | सदस्या. | सदस्य. | जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, वर्धा |
| [HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi] Member[HONABLE MR. ANIL N. KAMBLE] PRESIDENT[HONABLE MR. Shri Milind R. Kedar] MEMBER | |