(मंचाचा निर्णयः- श्रीमती स्मिता नि. चांदेकर – सदस्या यांचे आदेशान्वये)
आदेश
(आदेश पारीत दिनांक – 20/07/2018)
1) तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय पुढीलप्रमाणे आहे.
2) तक्रारकर्ता हा विशाखा इंडस्ट़्रीज येथे टेंटर या पदावर काम करीत असून, तक्रारकर्त्याचे विरुध्द पक्ष बँकेत बचत खाते काढले आहे. त्याचा खाता क्रमांक 920710100015347 असा आहे. तक्रारकर्त्याला विरुध्द पक्षाने एटीएम कार्ड दिलेले आहे.
3) तक्रारकर्त्याला दिनांक 11/08/2016 रोजी प्रथम रुपये 5,000/- दुस-यांदा रुपये 2,500/- व तिस-यांदा रुपये 1,500/- असे तीन वेळा एकूण रुपये 9,000/- एटीएमद्वारे काढल्याचा मॅसेज तक्रारकर्त्याच्या मोबाईल कमांक 9673177107 वर आला. परंतु तक्रारकर्त्याने सदरहु तिन्ही रकमा एटीएमद्वारे काढलेल्या नसल्याने तक्रारदाराला संशय आला व त्याने त्याच दिवशी म्हणजे दिनांक 11/08/2016 रोजी पोलीस स्टेशन, वरठी येथे रुपये 9,000/- चोरीला गेल्याची तक्रार केली तसेच विरुध्द पक्षाकडे एटीएम बंद करण्याचा अर्ज दिला.
तसेच तक्रारकर्त्याने दिनांक 12/08/2016 रोजी विरुध्द पक्ष बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक यानां देखील रुपये 9,000/- कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काढल्याची सुचना दिली व चोरीला गेलेल्या रकमेचा शोध घेण्याकरीता अर्ज दिला. तक्रारकर्त्याने एटीएम कार्ड बंद करण्याबाबत विचारणा केली असता ते विरुध्द पक्षाने बंद केल्याचे सांगीतले. तक्रारकर्त्याने पुढे असे नमूद करतो की, दिनांक 18/08/2016 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला त्याच नावाचे सदर बँकेच्या खात्याचे एटीएम कार्ड बंद करण्याबाबत पत्र दिले व एटीएम कार्ड सुध्दा विरुध्द पक्षाला परत केले. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे बचत खात्याचे संपूर्ण व्यवहार पुर्णपणे बंद केले. तक्रारकर्त्याला अडचण भासू लागल्यामुळे तक्रारकर्ताने दिनांक 19/09/2016 रोजी बचत खाता क्रमांक 920710100015347 पुर्वरत सुरु करण्याविषयी अर्ज दिला होता, परंतु एटीएम सुरु करण्याबाबत नाही.
4) तक्रारकर्ता पुढे नमूद करतो की, दिनांक 06/02/2017 रोजी तो घरी असतांना त्यांचे मोबाईल क्रमांक 9673177107 या नंबरवर असलेले मॅसेज चेक करीत असतांना * BOI Star Sandesh* Rs. 1000 has been debited to your account Xx5347 from POS-MPESA on 5-2-2017 balance 66849.30 received 04-27-43 sender VM-BOI IND असे लिहीलेला मॅसेज दिसला व त्यानंतर त्याचे खालचा मॅसेज त्याच प्रकारचा म्हणजेच * BOI Star Sandesh* Rs. 4990 has been debited to your account Xx5347 from POS-MMPL on 5-2-2017 balance 61859.30 received 04-33-15 sender VM-BOI IND असा दिसला त्यावरुन तक्रारकर्त्याला त्याचे सदरहू खात्यातुन पुन्हा रुपये चोरीला गेल्याचे कळले. त्यावेळी सुध्दा तक्रारकर्त्याने कोणतीही ऑनलाईन खरेदी केलेली नव्हती किंवा एटीएम चा वापर करण्याबाबतचा अर्ज केला नव्हता. उलटपक्षी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला एटीएम कार्ड बंद करण्याबाबत अनेकदा लेखी अर्ज दिले होते व एटीएम कार्ड विरुध्द पक्षाकडे परत केले होते. परंतु तक्रारकर्त्याच्या बचत खात्यामधून पुन्हा रक्कम चोरीला गेल्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 06/02/2017 रोजी त्याचे बँक खाते पुर्ण बंद करण्याचा अर्ज विरुध्द पक्षाला दिला. तसेच तक्रारकर्त्याने रुपये 5,990/- पुन्हा चोरीला गेल्याची तक्रार विरुध्द पक्षाला दिली असता असता रकर्त्याने ोरीला गेल्याने त्यावर विरुध्द पक्षाने उडवा-उडविचे उत्तरे दिली. तुम्हीच खाते सुरु करण्याकरीता अर्ज दिला म्हणून सुरु केले असे सांगीतले. परंतु तक्रारकर्ता दिनांक 19/09/2016 रोजी विरुध्द पक्षाला फक्त बचत खाते सुरु ठेवण्याकरीता अर्ज दिला होता, परंतु एटीएम कार्ड विरुध्द पक्षाला परत केल्याने तो सुरु ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता तरीही विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे एटीएम कार्ड सुरु केले ही विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटी असून तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरीक आणि मानसिक त्रास झालेला आहे, म्हणून तक्रारकर्त्याने पुढील प्रमाणे रकमेची मागणी केलेली आहे.
तक्राकर्त्याची चोरीला गेलेली रक्कम रुपये 5,990/- तसेच त्याला झालेल्या शारीरीक आणि मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च इत्यादी सर्व मिळून एकत्रित रक्कम रुपये 30,990/- ची मागणी विरुध्दपक्षा विरुध्द केलेली आहे.
5) तक्रारकर्त्याने तक्रारीच्या पृष्ठर्थ दस्ताऐवजांच्या यादीनुसार एकूण 08 दस्ताऐवज दाखल केलेले आहेत. ( पान क्रमांक 12 ते 26 )
सदरची तक्रार मंचात दाखल केल्यानंतर मंचाने दिनांक 07/04/2017 ला विरुध्द पक्षाला नोटीस पाठविले.
विरुध्द पक्षाला दिनांक 24/04/2017 रोजी नोटीस मिळूनही ते प्रकरणांत हजर झाले नाही व लेखी उत्तरही दाखल न केल्यामुळे दिनांक 05/07/2017 रोजी विरुध्द पक्ष गैरहजर राहील्याने त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
6) तक्रारर्त्याच्या तक्रारीचे व दाखल केले दस्तांऐवजांचे व शपथपत्राचे अवलोकन केले असता मंचाचा निष्कर्ष खालीप्रमाणे-
निष्कर्ष
7) तक्रारकर्त्याचे विरुध्द पक्ष बँक ऑफ इंडिया शाखा वरठी येथे खाते क्रमांक 920710100015347 बचत खाते होते, त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक होतो. तक्रारकर्त्याने अभिलेखावर दिनांक 13/08/2015 ते 10/02/2017 पर्यंतच्या पासबुकमधील नोंदीची छयाकिंत प्रत पान क्रमांक 32 व 33 वर दाखल केली आहे. सदर पासबुक मधील नोंदीवरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्याच्या खात्यातुन दिनांक 11/08/2016 रोजी तीन वेळा एटीएमद्वारे रुपये 5,000/- रुपये 2,500/- व रुपये 1,500/- असे एकूण 9,000/- रुपये काढण्यात आले. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार सदरची रक्कम ही त्याने काढली नाही, त्यामुळे सदर रक्कम चोरीला गेल्याबाबतची तक्रार पोलीस स्टेशन, वरठी भंडारा रोड येथे दिली होती. सदर तक्रारीची छायाकिंत प्रत. तक्रारकर्त्याने अभिलेखवर दाखल केली आहे. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार त्याने विरुध्द पक्ष बँकेकडे सदरची रक्कम रुपये 9,000/- चोरीला गेल्याबाबत दिनांक 12/08/2016 रोजी केलेल्या तक्रारीची छायाकिंत प्रत देखील अभिलेखावर दाखल केली आहे. अभिलेखावरील पृष्ठ क्रमांक 16 वर दाखल अर्जाद्वारे तक्रारकर्त्याने त्याचे एटीएम कार्ड बंद करण्याबाबत बँकेला कळविल्याचे दिसून येते. विरुध्द पक्ष बँकेला केवळ एटीएम कार्ड बंद करणेबाबत कळविले असता वि.प. बँकेने तक्रारकर्त्याचे खाते क्रमांक 920710100015347 चे व्वयहार बंद केले, त्यामुळे तक्रारकर्त्याने पुर्वरत सुरु करण्यासाठी विरुध्द पक्षाला दिनांक 19/09/2016 रोजी अर्ज दिला. सदर अर्जाची छायांकिंत प्रत तक्रारकर्त्याने अभिलेखावर पृष्ठ क्रमांक 17 नुसार दाखल केलेली आहे. सदर कागपत्रावरुन हे सिध्द होते की, तक्रारकर्त्याने त्याचे एटीएम कार्ड बंद करण्याकरीता अर्ज केला असता विरुध्द पक्षाने त्याचे बँकेतील बचत खाते बंद केले. सदरचे कृत्य हे विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
8) तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याने दिलेल्या दिनांक 18/08/2016 रोजी त्याचे बँक खात्याचे एटीएम कार्ड बंद करण्याकरीता अर्ज दिला होता व एटीएम कार्ड सुध्दा विरुध्द पक्ष बँकेत परत केले होते. तरी देखील तक्रारकर्त्याच्या खात्यातुन दिनांक 06/02/2017 रोजी रुपये 1,000/- व रुपये 4,990/- एटीएमद्वारे काढल्याबाबत तक्रारकर्त्याच्या मोबाईलवर मॅसेज आला. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या पासबुकच्या प्रतीचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्याच्या खात्यातुन दिनांक 06/02/2017 रुपये 1,000/- व रुपये 4,990/- असे एकूण रुपये 5,990/- एटीएमद्वारे काढल्याचे दिसून येते.
तक्रारकर्त्याकडे एटीएम कार्ड नसतांना सुध्दा त्याचे खात्यातुन एटीएमद्वारे वारंवार रक्कम निघाल्यामुळे तक्रारकर्त्याने वि. प. बँकेला अर्ज देऊन त्याचे बचत खाते बंद करणेबाबत कळविले तसेच सदर घटनेची तक्रार ठाणेदार, पोलीस स्टेशन, वरठी यांना दिली असून त्यावरुन एफआयआर दाखल झाल्याचे अभिलेखावरील कागदत्रांवरुन सिध्द होते.
वरीलप्रमाणे विवेचणावरुन हे सिध्द होते की, तक्रारकर्त्याने त्याचे एटीएम कार्ड बंद करण्याची विनंती विरुध्द पक्ष बँकेला केली होती. परंतु विरुध्द पक्ष बँकेने त्याचे एटीएम कार्ड बंद केले नाही. त्यामुळेच तक्रारकर्त्याकडे एटीएम कार्ड नसतांना देखील तक्रारकर्त्याच्या खात्यातुन एटीएमद्वारे रक्कम काढण्यात आलेली आहे, व तक्रारकर्त्याला आर्थिक नुकसान झाले आहे. सदर आर्थिक नुकसान हे विरुध्द पक्ष बँकेच्या सेवेतील त्रृटीमुळे झाले असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे तक्रारकर्ता त्याच्या तक्रारीतील मागणीप्रमाणे रुपये 5,990/- विरुध्द पक्षाकडून मिळण्यास पात्र आहे तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 4,000/- व तक्रार खर्च रुपये 3,000/- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला द्यावे.
मंचाद्वारे पाठविलेला नोटीस प्राप्त होऊनही विरुध्द पक्ष मंचात हजर झाले नाही व तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील म्हणणे खोडून काढले नाही. त्यामुळे विरुध्द पक्षाला तक्रारकर्त्याची तक्रार मान्य आहे असा निष्कर्ष निघतो. वरील विवेचणावरुन विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटी सिध्द होत असल्यामुळे
तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. करीता खालीप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
-
- विरुध्द पक्ष बँकेने तक्रारकर्त्याची खात्यातुन निघालेली रक्कम रुपये 5,990/- दिनांक 06/02/2017 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे 6 टक्के व्याज दाराने तक्रारकर्त्यास द्यावे.
-
- विरुध्द पक्ष बँकेने तक्रारकर्त्याला शारीरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 4,000/- व तक्रार खर्च रुपये 3,000/- द्यावे.
- विरध्द पक्षाने वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसाच्या आंत करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
- मंचाने तक्रारकर्त्यास फाईल “ब” व “क” परत करावी.