(पारीत व्दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा. सदस्य)
(पारीत दिनांक–18 डिसेंबर, 2019)
- उभय तक्रारदार हे नात्याने सख्खे भाऊ असून त्यांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके मध्ये जमीन अधिग्रहणा बद्दल शासनातर्फे जमा असलेली रक्कम मिळण्यासाठी आणि ईतर आनुषंगीक मागण्यांसाठी विरुध्दपक्ष क्रं 1 ते 5 यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. उभय तक्रारदारांचे तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारी नुसार, तक्रारदारांचे वडील नामे श्री खोपडू नागपूरे यांचे मालकीची मौजा सुरेवाडा, गट क्रं 244 ही शेती होती. श्री खोपडू नागपूरे यांना त्तक्रारकर्ता क्रं 1 श्री विष्णू खोपडूजी नागपूरे, तक्रारकर्ता क्रं-2 श्री वाल्मीक खोपडूजी नागपूरे आणि श्री प्रभू खोपडूजी नागपूरे अशी तीन मुले होती. श्री प्रभू खोपडूजी नागपूरे यांचा मृत्यू झालेला असून त्यांची पत्नी नामे कमलाबाई नागपूरे हिचा सुध्दा मृत्यू झालेला आहे. मृतक श्री प्रभू खोपडूजी नागपूरे यांची मुले विरुध्दपक्ष क्रं 2) ते 5) अनुक्रमे श्री मधुकर प्रभूजी नागपूरे, श्री सुधाकर प्रभूजी नागपूरे, सुषमा प्रभूजी नागपूरे आणि शुभांगी प्रभूजी नागपूरे ही आहेत.
उभय तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, श्री खोपडू नागपूरे यांचे मृत्यू नंतर त्यांचे वारसदार म्हणून त्यांची तिन्ही मुले म्हणजे उभय तक्रारदार आणि प्रभूजी नागपूरे (सध्या मृतक) यांची नावे शेतजमीनीचे अभिलेखावर घेण्यात आलीत. श्री प्रभूजी नागपूरे यांचे मृत्यू नंतर त्यांचे कायदेशीर वारसदार म्हणून त्यांची पत्नी नामे कमलाबाई प्रभूजी नागपूरे आणि विरुध्दपक्ष क्रं 2 ते 4 यांची नावे 7/12 चे उता-यावर नोंदविण्यात आलीत.
उभय तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, मौजा सुरेवाडा, गट क्रं 244 मधील एकूण जमीन 2.26 हेक्टर आर पैकी 0.24 हेक्टर आर एवढी शेतजमीन गोसेखुर्द प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासना तर्फे अधिग्रहीत (Land Acquired for the project of Gosekhurd) करण्यात आली होती, त्या बाबत महाराष्ट्र शासनाचे वतीने नोटीस उभय तक्रारदार व त्यांचे मृतक भाऊ नामे प्रभूजी नागपूरे यांचे कायदेशीर वारसदारांचे नावे मिळाला होता, त्यावरुन उभय तक्रारदार व मृतक भाऊ नामे प्रभूजी नागपूरे यांची पत्नी नामे कमलाबाई नागपूर यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ इंडीया, शाखा भंडारा येथे संयुक्त खाते उघडले असून त्याचा खाते क्रं-922610110006014 असा असून त्यामध्ये जमीन अधिग्रहणाचे मोबदल्याची रक्कम (Award of Land Acquisition) जमा करण्यात आली. उभय तक्रारदारांनी पुढे असेही नमुद केले की, त्यांचे वडील नामे खोपडू नागपूरे यांना एकूण 03 मुले असून ज्यामध्ये उभय तक्रारदार आणि मृतक श्री प्रभू नागपूरे यांचा समावेश आहे, त्यामुळे उभय तक्रारदार यांचा प्रत्येकी 1/3 आणि मृतक श्री प्रभू नागपूरे यांचे कायदेशीर वारसदार श्रीमती कमलाबाई प्रभूजी नागपूरे यांचा 1/3 असा हिस्सा होता. परंतु पुढे श्रीमती कमलाबाई प्रभूजी नागपूरे यांचा सुध्दा मृत्यू झाला. कमलाबाई प्रभूजी नागपूरे यांचा मृत्यू झाल्या नंतर तक्रारकर्ता क्रं 1 श्री विष्णू खोपडूजी नागपूरे यांना पैशाची आवश्यकता असल्याने ते विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके मध्ये त्यांचे हिश्श्याची जमा असलेली रक्कम काढण्यासाठी गेले असता त्यांना बॅंके तर्फे असे सांगण्यात आले की, सदरचे खाते हे संयुक्त खाते असल्यामुळे सर्व खातेदार आल्याशिवाय रकमेची उचल करता येणार नाही. मृतक कमलाबाई नागपूरे यांचे मृत्यू नंतर त्यांचे कायदेशीर वारसदार म्हणजे विरुध्दपक्ष क्रं 2 ते 4 यांना पैशाची उचल करण्यासाठी तक्रारदारांनी विनंती केली परंतु त्यांनी बॅंके मध्ये येण्यास नकार दिला, परिणामी उभय तक्रारदारांची आर्थिक कोंडी झाल्यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून तक्रारकर्ता क्रं 1) श्री विष्णू नागपूरे यांनी त्यांचे वकीलांचे मार्फतीने सर्व विरुध्दपक्षांना कायदेशीर नोटीस पाठवून त्याव्दारे त्यांचे हिश्श्याची 1/3 एवढी रक्कम विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके कडून त्यांना मिळावी आणि यासाठी विरुध्दपक्ष क्रं 2 ते 4 यांनी त्यांना सहकार्य करावे असे कळविले परंतु नोटीस मिळूनही विरुध्दपक्षांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही वा नोटीसला उत्तर सुध्दा दिले नाही. त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं 2 ते 4 यांनी त्यांचे वकील श्री सक्सेना यांचे मार्फतीने तक्रारकर्ता क्रं 1 श्री विष्णू नागपूरे यांना नोटीस पाठवून त्याव्दारे रक्कम उचल करण्यास त्यांचा कोणताही आक्षेप नसून सर्वांनी एकत्र येऊन बॅंके मधून रक्कम उचल करण्याचे आश्वस्त केले. तक्रारकर्ता क्रं 2 हे सुध्दा त्यांचे हिश्श्याची रक्कम काढण्यास तयार झाले परंतु पुढे विरुध्दपक्ष क्रं 2 ते 4 यांनी कोणतेही सहकार्य केले नाही. जमीन अधिग्रहणाचे मोबदल्याची एकूण रकक्म रुपये-2,38,254/- विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके मध्ये जमा असून त्यानुसार तक्रारकर्ता क्रं 1 हे त्यांचे 1/3 हिश्श्या प्रमाणे रुपये-79,418/- व्याजासह घेणे लागतात आणि तक्रारकर्ता क्रं 2 सुध्दा त्यांचे 1/3 हिश्श्या प्रमाणे तेवढीच रक्कम रुपये-79,418/- व्याजासह घेणे लागतात परंतु उभय तक्रारदारांना जमीन अधिग्रहण मोबदल्या संबधी त्यांचे हिश्श्याची रक्कम विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके कडून मागणी करुनही मिळालेली नसल्याने त्यांनी शेवटी प्रस्तुत ग्राहक तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षां विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
- विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेला आदेशित करण्यात यावे की, त्यांनी उभय तक्रारदारांचे हिश्श्या प्रमाणे येत असलेली व बॅंके मध्ये जमा असलेली जमीन अधिग्रहणाचे मोबदल्याची रक्कम उभय तक्रारदारांना देण्यात यावी.
- विरुध्दपक्ष क्रं 2 ते 4 यांनी उभय तक्रादारांना त्यांचे हिश्श्याची विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके मध्ये जमा असलेली जमीन अधिग्रहणाचे मोबदल्याची रक्कम मिळण्यास आवश्यक ती मदत करावी असे आदेशित व्हावे.
- उभय तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासा बाबत रुपये-10,000/- व आर्थिक त्रासा बाबत रुपये-10,000/- तसेच प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- विरुध्दपक्षांनी देण्याचे आदेशित व्हावे.
- या शिवाय योग्य ती दाद उभय तक्रारदारांचे बाजूने देण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1) बॅंक ऑफ इंडीया शाखा भंडारा तर्फे वरिष्ठ शाखा प्रबंधक यांनी लेखी उत्तर पान क्रं 53 व 54 वर दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरात प्राथमिक आक्षेपाचे परिच्छेदात असे नमुद केले की, त्यांचे बॅंकेच्या शाखे मध्ये उभय तक्रारदार आणि श्रीमती कमलाबाई नागपूरे यांचे नावाने संयुक्त खाते उघडलेले असून त्याचा खाते क्रं-922610110006014 असा असून त्यामध्ये एकूण रक्कम रुपये-2,38,254/- जमा करण्यात आली होती परंतु श्रीमती कमलाबाई नागपूरे हया मरण पावल्यामुळे व बॅंकेच्या मार्गदर्शक सुचनां प्रमाणे रकमेची उचल करताना मृतक श्रीमती कमलाबाई हयांचे वारसान व ईतर खातेदार हजर असणे आवश्यक आहे तसेच बॅंके मध्ये वारसान प्रमाणपत्र दाखल करणे आवश्यक आहे, त्यामुळे प्रस्तुत तक्रार ही ग्राहक मंचाचे अधिकारक्षेत्रात येत नसून ती चालविण्याचा ग्राहक मंचाला अधिकार नसल्याने तक्रार खारीज करण्यात यावी असा प्राथमिक आक्षेप नोंदविला. परिच्छेदनिहाय उत्तरात तक्रारकर्ता हे बॅंकेत रकमेची उचल करण्यासाठी आले होते परंतु बॅंकेच्या मागदर्शक सुचनां प्रमाणे रकमेची उचल करताना मृतक कमलाबाई यांचे वारसदार हजर असणे आवश्यक असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते ही बाब मान्य केली. तक्रारदारांनी मागणी केलेली नुकसान भरपाईची रक्कम अमान्य असून प्राथमिक आक्षेपा नुसार तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 व क्रं 3 यांनी आपले संयुक्तिक लेखी उत्तर पान क्रं 40 ते 42 वर दाखल केले. त्यांनी आपले लेखी उत्तरात मान्य केले की, मौजा सुरवाडा येथील गट क्रं 244 ही शेतजमीन उभय तक्रारदार व विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक वगळता अन्य विरुध्दपक्ष यांचे मालकीची होती. तसेच महाराष्ट्र शासनाचे वतीने शेतजमीन अधिग्रहण मोबदल्याची मिळालेली रक्कम विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके मध्ये जमा करण्यात आल्याची बाब सुध्दा मान्य केली. परंतु जमीन अधिग्रहणाचे मोबदल्याचे रकमेत उभय तक्रारदारांचे प्रत्येकी 1/3 प्रमाणे हिस्से असल्याची बाब नामंजूर केली. उभय तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्रं 2 ते 4 यांना विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेत येऊन रक्कम उचल करण्या करीता विनंती केल्याची बाब नामंजूर केली. तसेच उभय तक्रारदारांचा प्रत्येकी रुपये-79,418/- प्रमाणे हिस्सा येतो ही बाब सुध्दा नामंजूर केली. विरुध्दपक्ष क्रं 2 व 3 यांचे आजोबा नामे श्री खोपडूजी नागपूरे हे सुरेवाडा येथे राहत होते व त्यांना तीन मुले नामे सर्वश्री प्रभू, विष्णु आणि वाल्मीक व तीन मुली होत्या. श्री प्रभू नागपूरे हे सर्वात मोठे असून ते कुटूंबामध्ये कर्ता पुरुष होते. विरुध्दपक्ष क्रं 2 व 3 यांचे वडील श्री प्रभू नागपूरे हे जीवंत असताना असे ठरले होते की, सुरेवाडा येथ्ज्ञील शेतीमध्ये अर्धा हिस्सा श्री प्रभू नागपूरे म्हणजे वि.प.क्रं 2 व 3 यांचे वडीलांचा आणि उर्वरीत अर्ध्या हिश्श्यचात ईतर भाऊ म्हणजेच उभय तक्रारदार व बहीणी राहतील व यास सर्वांची सहमती होती. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेत जमा असलेली मोबदल्याची रक्कम बरोबरीचा हिस्सा उभय तक्रारदारांनी मागितला, जेंव्हा की, जमीन अधिग्रहणा व्यतिरिक्त उरलेली शेती सुध्दा उभय तक्रारदारांचे ताब्यात आहे व तेच उत्पन्न घेत आहेत. उभय तक्रारदार आणि विरुध्दपक्ष क्रं 2 ते 5 यांचे मधील वाद हा संपूर्णतः दिवाणी स्वरुपाचा असून तो कोणत्याही परिस्थितीत ग्राहक वाद होऊ शकत नाही त्यामुळे प्रस्तुत तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 2 व 3 यांनी केली.
05. विरुध्दपक्ष क्रं 4 व 5 यांनी पान क्रं 72 वर लेखी पुरसिस दाखल करुन त्याव्दारे असे कळविले की, विरुध्दपक्ष क्रं 2 व 3 यांनी प्रस्तुत तक्रारी मध्ये दाखल केलेले लेखी उत्तर हेच त्यांचे लेखी उत्तर समजण्यात यावे.
06. उभय तक्रारदारांनी पान क्रं 12 वरील दस्तऐवज यादी नुसार तक्रारदारांचे वि.प.क्रं 1 बॅंके मध्ये असलेल्या खात्याची प्रत, भूसंपादन कायदया खालील मिळालेली नोटीस, तक्रारकर्ता क्रं 1 यांनी विरुध्दपक्षांना पाठविलेल्या कायदेशीर नोटीसची प्रत, रजि.पोस्टाच्या पावत्या, पोच तसेच विरुध्दपक्ष क्रं 2 ते 5 यांनी त्यांचे वकीलांचे मार्फतीने तक्रारकर्ता यांना दिलेले नोटीसचे उत्तर अशा दस्तऐवजांचे प्रतिंचा समावेश आहे. तक्रारकर्ता क्रं 1 यांनी त्यांचा प्रतिज्ञालेख पान क्रं 79 ते 82 वर दाखल केला तसेच तक्रारदारांनी लेखी युक्तीवाद पान क्रं 88 ते 92 वर दाखल केला.
07. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी लेखी उत्तरा सोबत संयुक्त बॅंकेच्या खात्याची प्रत, तिन्ही खातेधारकांचे आधारकॉर्डची प्रत, तसेच बॅंकेच्या ईतर दस्तऐवजांच्या प्रती दाखल केल्यात. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके तर्फे प्रतिज्ञालेख पान क्रं 83 व 84 वर दाखल केला. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅकेनी पान क्रं 93 वर पुरसिस दाखल करुन त्यांचे प्रतिज्ञालेखालाच लेखी युक्तीवाद समजण्यात यावा असे कळविले.
08. विरुध्दपक्ष क्रं 2 ते 5 तर्फे विरुध्दपक्ष क्रं 3 सुधाकर प्रभूजी नागपूरे यांनी प्रतिज्ञालेख पान क्रं 85 व 86 वर दाखल केला. तसेच पान क्रं 94 वर पुरसिस दाखल करुन त्यांचे प्रतिज्ञालेखालाच लेखी युक्तीवाद समजण्यात यावा असे कळविले.
09. प्रस्तुत तक्रारी मध्ये उभय तक्रारदारांचे वकील श्री सतिश ठवकर यांचा तर विरुध्दपक्ष क्रं 2 ते 5 तर्फे वकील श्रीमती एस.पी.अवचट यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला.
10. तक्रारदारांची तक्रार, विरुध्दपक्षांची लेखी उत्तरे तसेच उभय पक्षां तर्फे दाखल केलेले दस्तऐवज, पुराव्याची शपथपत्रे, उभय पक्षांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन ग्राहक मंचा समोर न्यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
01 | उभय तक्रारदार आणि मृतक कमलाबाई प्रभूजी नागपूरे हे विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेचे ग्राहक होतात काय? | -होय- |
02 | वि.प.क्रं 1 बॅंकेनी बॅंकेच्या संयुक्त खात्यामध्ये जमा असलेली जमीन अधिग्रहण मोबदल्याचे रकमेतून उभय तक्रारदारांच्या हिश्श्या प्रमाणे देय असलेली रक्कम न देऊन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | -नाही- |
03 | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
:: कारणे व मिमांसा ::
मुद्दा क्रं 1 ते 3 बाबत-
11. मृतक श्री खोपडूजी नागपूरे यांचे मालकमीची मौजा सुरेवाडा येथील गट क्रं 244, आराजी 2.26 हेक्टर आर एवढी शेतजमीन होती व श्री खोपडू नागपूरे यांना त्तक्रारकर्ता क्रं 1 श्री विष्णू खोपडूजी नागपूरे, तक्रारकर्ता क्रं-2 श्री वाल्मीक खोपडूजी नागपूरे आणि श्री प्रभू खोपडूजी नागपूरे अशी तीन मुले होती. श्री प्रभू खोपडूजी नागपूरे यांचा मृत्यू झालेला असून त्यांची पत्नी नामे कमलाबाई नागपूरे हिचा सुध्दा मृत्यू झालेला आहे. मृतक श्री प्रभू खोपडूजी नागपूरे यांची मुले विरुध्दपक्ष क्रं 2) ते 5) अनुक्रमे श्री मधुकर प्रभूजी नागपूरे, श्री सुधाकर प्रभूजी नागपूरे, सुषमा प्रभूजी नागपूरे आणि शुभांगी प्रभूजी नागपूरे ही आहेत. श्री खोपडू नागपूरे यांचे मृत्यू नंतर त्यांचे वारसदार म्हणून त्यांची तिन्ही मुले म्हणजे उभय तक्रारदार आणि प्रभूजी नागपूरे (सध्या मृतक) यांची नावे शेतजमीनीचे अभिलेखावर घेण्यात आलीत. श्री प्रभूजी नागपूरे यांचे मृत्यू नंतर त्यांचे कायदेशीर वारसदार म्हणून त्यांची पत्नी नामे कमलाबाई प्रभूजी नागपूरे आणि विरुध्दपक्ष क्रं 2 ते 4 यांची नावे 7/12 चे उता-यावर नोंदविण्यात आलीत. मौजा सुरेवाडा, गट क्रं 244 मधील एकूण जमीन 2.26 हेक्टर आर पैकी 0.24 हेक्टर आर एवढी शेतजमीन गोसेखुर्द प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासना तर्फे अधिग्रहीत (Land Acquired for the project of Gosekhurd) करण्यात आली होती, त्यावरुन उभय तक्रारदार व मृतक भाऊ नामे प्रभूजी नागपूरे यांची पत्नी नामे कमलाबाई नागपूर यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ इंडीया, शाखा भंडारा येथे संयुक्त खाते उघडले असून त्याचा खाते क्रं-922610110006014 असा असून त्यामध्ये जमीन अधिग्रहणाचे मोबदल्याची रक्कम (Award of Land Acquisition) जमा करण्यात आली होती ही बाब सर्व पक्षांना मान्य आहे, त्यामध्ये कोणताही विवाद नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके तर्फे पान क्रं 56 वर संयुक्त खाते उता-याची प्रत दाखल केलेली असून त्यामध्ये प्रथम आवेदक श्रीमती कमलाबाई प्रभूजी नागपूरे, व्दितीय आवेदक श्री विष्णुजी खोपडूजी नागपूरे आणि तृतीय आवेदक श्री वाल्मीक खोपडूजी नागपूरे अशी नावे नमुद आहेत. सदर बॅंकेच्या संयुक्त खात्यामध्ये जमीन अधिग्रहणाचे मोबदल्याची एकूण रक्कम रुपये-2,38,254/- जमा करण्यात आली होती या बाबत सुध्दा सर्व पक्षांमध्ये विवाद नाही. अशाप्रकारे जमीन अधिग्रहणाची रक्कम विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेच्या संयुक्त खात्यात जमा केल्यामुळे उभय तक्रारदार आणि मृतक कमलाबाई प्रभूजी नागपूरे हे विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेचे ग्राहक होतात त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
12. उभय तक्रारदारांचे तक्रारी नुसार मृतक खोपडूजी नागपूरे यांना तीन मुले होती, त्यापैकी उभय तक्रारदार असून एक भाऊ श्री प्रभूजी नागपूरे आहे परंतु श्री प्रभूजी नागपूरे याचा सुध्दा मृत्यू झालेला असल्याने त्याची पत्नी श्रीमती कमलाबाई नागपूरे आणि उभय तक्रारदार यांचे नावे जमीन अधिग्रहणाचे मोबदल्याची रक्कम मिळण्यासाठी विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेत संयुक्त खाते उघडण्यात आले होते आणि त्यामध्ये जमीन अधिग्रहण मोबदल्याची रक्कम जमा करण्यात आली होती. परंतु पुढे त्यांचा भाऊ मृतक प्रभूजी नागपूरे यांची पत्नी नामे कमलाबाई प्रभूजी नागपूरे यांचा सुध्दा मृत्यू झालेला आहे. श्रीमती कमलाबाई प्रभूजी नागपूरे यांचे मृत्यू नंतर दोन्ही तक्रारदारांनी त्यांचे प्रत्येकी 1/3 हिश्श्याची म्हणजे प्रत्येकी जमा असलेली रक्कम 79,418/- आणि त्यावर रक्कम जमा केल्याचे दिनांका पासून व्याजाची मागणी विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके मध्ये केली होती परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी सर्व वारसदार उपस्थित नसल्याने रक्कम देण्यास नकार दिला. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेच्या लेखी उत्तरा प्रमाणे संयुक्त खात्यातील एक खातेदार श्रीमती कमलाबाई प्रभूजी नागपूरे यांचा सुध्दा मृत्यू झालेला असल्याने त्यांचे वारसदार बॅंकेत उपस्थित राहणे आवश्यक आहे तसेच सर्वांनी विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके मध्ये वारसान प्रमाणपत्र दाखल करणे आवश्यक आहे. उभय तक्रारदारांची तक्रार आणि विरुध्दपक्ष क्रं 2 ते 5 यांचे लेखी उत्तर पाहता जमीन मोबदल्याचे रकमेच्या हिश्श्यां बाबत उभय तक्रारदार आणि विरुध्दपक्ष क्रं 2 ते 5 यांचे मध्ये विवाद आहे. अशापरिस्थितीत विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी मृतक श्रीमती कमलाबाई प्रभूजी नागपूरे यांचे वारसदार यांना बॅंकेत उपस्थित ठेवण्याची तसेच वारसान प्रमाणपत्राची केलेली मागणी गैरकायदेशीर आहे असे म्हणता येणार नाही, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी उभय तक्रारदारांना जमीन अधिग्रहण मोबदल्याची जमा असलेली रक्कम न देऊन कोणतीही दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब दिसून येत नाही, करीता आम्ही मुद्दा क्रं 2 चे उत्तर नकारार्थी नोंदवित आहोत आणि मुद्दा क्रं 2 चे उत्तर नकारार्थी नोंदविल्याने प्रस्तुत तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे ग्राहक मंचाचे मत आहे. तक्रारदारांना जमीन अधिग्रहणाचे मोबदल्याची रक्कम उचल करावयाची असल्यास त्यांनी सक्षम न्यायालयातून वारसान प्रमाणपत्र प्राप्त करुन त्याप्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेत मागणी करावी आणि त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी न्यायालयाचे वारसान प्रमाणपत्रा नुसार जमीन अधिग्रहणाची मोबदल्याची रक्कम आणि त्यावरील जमा व्याजाची रक्कम संबधितांना अदा करावी असे ग्राहक मंचाचे मत आहे.
13. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
:: अंतिम आदेश ::
- उभय तक्रारदारांची विरुध्दपक्ष क्रं 1 ते 5 यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. उभय तक्रारदार आणि विरुध्दपक्ष क्रं 2 ते 5 यांनी सक्षम न्यायालयातून वारसान प्रमाणपत्र मिळवून व ते विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेत दाखल करुन वारसान प्रमाणपत्रा नुसार आप-आपल्या हिश्श्याची जमीन मोबदल्याची रक्कम व्याजासह विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेतून प्राप्त करावी. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी सुध्दा त्यांना वारसान प्रमाणपत्र प्राप्त होताच त्यानुसार त्वरीत अशी रक्कम उभय तक्रारदार आणि विरुध्दपक्ष क्रं 2 ते 5 यांचे मध्ये विभागून दयावी.
- खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
- निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- उभय तक्रारदारानां “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.