(पारीत व्दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.पिठासीन अध्यक्ष )
(पारीत दिनांक–11 जुन 2020)
01. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1 बॅंक व क्रं-2 विमा कंपनी विरुध्द उर्वरीत विम्याची रक्कम मिळण्या बाबत प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असन त्याचे सदर ठिकाणी कृषी केंद्र दिनांक-13.01.2013 पासून आहे. सदर व्यवसायासाठी त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेत कॅश क्रेडीट लिमिट खाते उघडले असून सदर खाते तक्रारकर्त्याचे खर्चाने रुपये-7,00,000/- पर्यंत विमा संरक्षीत केलेले आहे. तसेच त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेतून रुपये-5,00,000/- कॅश क्रेडीट कर्ज सुध्दा घेतलेले आहे.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, उपरोक्त नमुद विम्या व्यतिरिक्त त्याने सदर कृषी केंद्राचा वैयक्तिकरित्या दिनांक-04.04.2016 रोजी रक्कम रुपये-13,00,000/- विमा विरुध्दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडे उतरविलेला असून त्याचा विमा पॉलिसी क्रं-281303/48/16/9800000007 असा असून त्याने विम्याचा हप्ता सुध्दा भरलेला आहे. त्याने पुढे असे नमुद केले की, दिनांक-18.04.2016 चे मध्यरात्री त्याचे कृषी केंद्रास अपघातामुळे आग लागून दुकान जळाले व त्याचे दुकानातील रुपये-10,78,700/- एवढया किमतीचे कृषी साहित्य जळून नष्ठ झाले. त्याने सदर आगीचे घटने बाबत पोलीस स्टेशन लाखनी तसेच विद्दुत वितरण कंपनीचे कार्यालय त्याच बरोबर तहसिलदार यांना माहिती दिली. तसेच त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांना सुध्दा सदर घटनेची माहिती दिली आणि सर्व कागदपत्रांसह अर्ज करुन विम्याची रक्कम मिळण्यासाठी दावा दाखल केला परंतु विरुध्दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनीने तक्रारकर्त्याच्या काही दस्तऐवजांवर सहया घेऊन त्याला फक्त रुपये-3,85,000/- एवढी विम्याची रक्कम दिली आणि उर्वरीत विमा रक्कम काही दिवसा नंतर मिळेल असे सांगितले परंतु उर्वरीत विम्याची रक्कम आज पर्यंत विरुध्दपक्ष क्र 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनी कडून त्याला मिळालेली नाही.
तक्रारकर्त्याने पुढे असेही नमुद केले की, त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ इंडीयाच्या शाखेमध्ये त्याचे कॅश क्रेडीट खात्यावरील काढलेली संरक्षीत विमा रक्कम देऊन त्याचे कर्ज खात्यात त्या रकमेचा भरणा करण्या बाबत वेळोवेळी विनंती केली परंतु वि.प.क्रं 1 बॅंकेनी त्यास कोणताही प्रतिसाद न देता उलट त्याचे कडूनच कर्ज वसुली संबधात रकमेची मागणी केली. त्याचे कृषी केंद्राला आग लागल्याने त्याचा संपूर्ण व्यवसाय बंद पडला. वस्तुतः त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 कडून घेतलेल्या कर्जाची रक्कम विमा संरक्षीत केलेली होती तसेच विरुध्दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनी कडून त्याला विम्यापोटी एकूण रुपये-13,00,000/- मिळणे जरुरीचे होते. परंतु दोन्ही विरुध्दपक्षांनी त्याला विमा रकमेचा लाभ दिला नाही म्हणून त्याने दोन्ही विरुध्दपक्षांना अधिवक्ता यांचे मार्फतीने दिनांक-13.04.2017 रोजी नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठवून विम्याचे रकमेची मागणी केली. सदर नोटीस दोन्ही विरुध्दपक्षांना मिळाल्या नंतर त्यांनी नोटीसचे खोटे उत्तर पाठवून आप-आपली जबाबदारी झटकून विम्याची रक्कम देण्यास नकार दिला. म्हणून शेवटी त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
- विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ इंडीया शाखा पोहरा यांनी तक्रारकर्त्याने कॅश क्रेडीट खात्यावर उचललेल्या कर्जाचे रकमेचा भरणा त्याने सदर खात्यावर काढलेल्या विम्याच्या रकमेतून करुन उर्वरीत विमा रक्कम व्याजासह त्याला परत करण्याचे आदेशित व्हावे.
- विरुध्दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनी, भंडारा यांनी तक्रारकर्त्याचे दुकानाचे झालेल्या नुकसानी बाबतविमा रक्कम म्हणून रुपये-13,00,000/- मधून त्याला यापूर्वी दिलेली विमा रक्कम रुपये-3,85,000/- एवढया रकमेची वजावट करुन उर्वरीत विमा रक्कम रुपये-9,15,000/- व्याजासह विशीष्ठ मुदतीचे आत तक्रारकर्त्याला अदा करण्याचे वि.प.क्रं 2 विमा कंपनीला आदेशित व्हावे.
3) विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांचे दोषपूर्ण सेवेमुळे त्याला झालेल्या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5,00,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- वि.प.क्रं 1 व क्रं 2 यांचे कडून त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) बॅंक ऑफ इंडीया शाखा पोहरा तर्फे प्रबंधक यांनी लेखी उत्तर पान क्रं -39 ते 42 वर ग्राहक मंचात दाखल केले. त्यांनी उत्तरामध्ये तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनी भंडारा यांचे कडून व्यक्तीगतरित्या दिनांक-04.04.2016 रोजी रुपये-13,00,000/- एवढया रकमेचा विमा उतरविल्याची बाब तसेच पॉलिसी क्रमांक-281303/48/16/9800000007 बाब विशेषत्वाने नामंजूर केली आणि सदर विमा पॉलिसीचा हप्ता तक्रारकर्त्याने भरल्याची बाब सुध्दा नामंजूर केली. दिनांक-18.04.2016 रोजी मध्यरात्रीचे सुमारास तक्रारकर्त्याचे दुकानात अपघाती आग लागून दुकान जळाल्याची बाब मंजूर केली परंतु दुकानातील एकूण रुपये-10,78,700/- एवढया किमतीचे कृषी साहित्य जळून नष्ठ झाल्याची बाब योग्य त्या स्टॉक स्टेटमेंटचे पुराव्या अभावी नामंजूर केली. तक्रारकर्त्याने आगीचे नुकसानी बाबत सुचना दिल्याची बाब मान्य केली तसेच तक्रारकर्त्याला दुकानाचे नुकसानी बाबत विमा राशी रुपये-3,85,000/- मिळाल्याची बाब सुध्दा मान्य केली परंतु उर्वरीत विम्याची रक्कम काही दिवसांनी मिळेल असे सांगितल्याची बाब नामंजूर केली. तक्रारीं मधील अन्य विपरीत विधाने नामंजूर केलीत. तक्रारकर्त्याने कृषी केंद्र व काढलेले कर्ज विरुध्दपक्ष यांचेकडे विमा संरक्षीत केल्यामुळे त्याला विरुध्दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनी कडून रुपये-13,00,000/- मिळणे जरुरीचे होते हे विधान नामंजूर केले. तसेच तक्रारकर्त्याने घेतलेले कर्ज विरुध्दपक्ष क्रं 1) बॅंक ऑफ इंडीया कडून काढलेल्या विम्याच्या रकमेतून भरणा करणे जरुरीचे होते हे विधान विशेषत्वाने नामंजूर केले. तक्रारकर्त्याने वकीलांचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने कायदेशीर नोटीस विरुध्दपक्ष क्रं 1) बॅंक ऑफ इंडीया यांचेकडे पाठविली होती हे मान्य केले आणि त्या नोटीसला त्यांनी उत्तर सुध्दा दिल्याचे नमुद केले. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ इंडीया हे स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याची बाब नामंजूर केली. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत खोटे बनावट दस्तऐवज दाखल केलेत. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनी यांचेकडे भेट देऊन दिनांक-27.07.2016 रोजी त्याचा विमा दावा रुपये-3,85,000/- एवढया रकमेत Settlement निश्चीत केला आणि त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी समोर क्लेम डिसचॉर्ज व्हॉऊचरवर सही करुन “Full and Final Settlement” केलेले आहे.त्यामुळे तक्रारकर्त्या सोबत विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ इंडीयाचा कोणताही संबध येत नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ इंडीयाला या प्रकरणात विनाकारण गुंतविण्यात आलेले आहे. तक्रारकर्त्याने दिनांक-04.04.2016 रोजी विमा पॉलिसी काढली आणि त्याचे दुकानास दिनांक-18.04 ते 19.04.2016 चे दरम्यान मध्यरात्री आग लागली यावरुन विम्याचे पैसे मिळविण्यासाठी तक्रारकर्त्यानेच आग लावलेली आहे व त्याने विम्याची रक्कम रुपये-3,85,000/- स्विकारलेली असल्याने तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ इंडीयाव्दारे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनी शाखा भंडारा तर्फे सिनियर डिव्हीजनल मॅनेजर यांनी लेखी उत्तर पान क्रं-47 व 48 वर दाखल केले. त्यांनी तक्रारी मधील संपूर्ण विपरीत विधाने नामंजूर केलीत. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने तक्रारकर्त्याची दस्तऐवजावर सही घेतली आणि त्याला उर्वरीत विम्याची रक्कम देण्याचे आश्वासित केले होते हे विधान नामंजूर केले. आपले विशेष कथनात असे नमुद केले की, त्यांना तक्रारकर्त्या कडून दुकानाला लागलेल्या आगीची सुचना मिळाल्या नंतर विमा कंपनी तर्फे विमा सर्व्हेअर श्री संतोष कुळकर्णी नागपूर यांची नियुक्ती केली होती. विमा सर्व्हेअर यांनी प्रत्यक्ष घटनेच्या जागेवर भेट देऊन आगीचे नुकसानीची पाहणी करुन नुकसानीचे निर्धारण केले आणि दिनांक-28.07.2016 रोजी आवश्यक दस्तऐवजांसह सर्व्हे अहवाल विमा कंपनीकडे सादर केला. विमा सर्व्हेअर यांचे अहवाला नुसार विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने रुपये-3,85,000/- एवढया रकमेचे डिसचॉर्ज व्हाऊचर तयार केले. सदर डिसचॉर्ज व्हॉऊचरवर तक्रारकर्त्याने सही केलेली आहे. सदर विमा रक्कम ही “Full and Final Settlement” असून त्यास तक्रारकर्त्याने मान्यता देऊन डिसचॉर्ज व्हॉऊचरवर सही करुन रक्कम स्विकारलेली आहे. त्यामुळे आता तक्रारकर्त्याला जास्तीची विमा रक्कम मागण्याचा कोणताही अधिकार पोहचत नाही. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने विमा सर्व्हेअर यांनी केलेल्या नुकसानीचे निर्धारण करुन काढलेल्या नुकसानी प्रमाणे विमा रक्कम दिलेली आहे. तक्रारकर्त्याने अधिवक्ता यांचे मार्फतीने दिनांक-13.04.2017 रोजी पाठविलेल्या नोटीसला विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने दिनांक-19.04.2017 रोजी उत्तर पाठविलेले आहे आणि त्यामध्ये संपूर्ण वस्तुस्थिती कथन केलेली आहे. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनी तर्फे करण्यात आली.
05. तक्रारकर्त्याने पान क्रं 09 वरील दस्तऐवज यादी नुसार दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये प्रामुख्याने तक्रारकर्त्याचे आधारकार्ड, सर्व्हेअर यांचा सर्व्हे अहवाल, पोलीसांनी केलेला घटनास्थळ पंचनामा, कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी तर्फे केलेल्या नुकसानीचा पंचनामा, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी, विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ इंडीया, तहसिलदार लाखनी, विद्दुत विभाग यांचेकडे केलेल्या अर्जाच्या प्रती, विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीव्दारे निर्गमित विमा पॉलिसीची प्रत, दोन्ही विरुध्दपक्षांना पाठविलेली कायदेशीर नोटीसची प्रत, रजिस्टर पोस्टाच्या पावत्या, पोच, विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेचे नोटीसला दिलेले उत्तर आणि विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे नोटीसला दिलेले उत्तर अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. तसेच तक्रारकर्त्याने पान क्रं 55 ते 57 वर स्वतःचे शपथपत्र आणि पान क्रं 65 व 66 वर लेखी युक्तीवाद दाखल केला.
06. विरुध्दपक्ष क्रं-1) बॅंक ऑफ इंडीया तर्फे एकत्रीत लेखी उत्तर पान क्रं -39 ते 42 वर ग्राहक मंचात दाखल केले. तसेच पान क्रं 58 ते 60 वर पुराव्याचे शपथपत्र आणि पान क्रं 61 व 62 वर लेखी युक्तीवाद दाखल केला.
07. विरुध्दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनी भंडारा तर्फे पान क्रं 47 व 48 वर लेखी उत्तर आणि पान क्रं 68 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच पान क्रं 70 वर श्री संतोष कुळकर्णी सर्व्हेअर यांचे शपथपत्र व आधारकॉर्ड दाखल केले. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने पान क्रं 74 वरील दस्तऐवज यादी प्रमाणे सर्व्हेअर श्री संतोष कुळकर्णी यांचा सर्व्हे अहवाल तसेच क्लेम डिसचॉर्ज व्हॉऊचरची प्रत दाखल केली.
08. तक्रारकर्त्याची तक्रार, पुरावा, लेखी युक्तीवाद व दाखल दस्तऐवज तसेच वि.प. क्रं 1 बॅंकेचे लेखी उत्तर, पुरावा, लेखी युक्तीवाद तसेच विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे लेखी उत्तर, पुरावा व लेखी युक्तीवाद त्याच बरोबर दाखल दस्तऐवज इत्यादीचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले. उभय पक्षाचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद एैकला असता ग्राहक न्यायमंचा समोर खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
01 | त.क. हा दोन्ही विरुध्दपक्षांचा ग्राहक होतो काय? | -होय- |
02 | तक्रारकर्त्याला प्रत्यक्ष नुकसानी पेक्षा कमी विमा रक्कम देऊन विरुध्दपक्षांनी दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब तक्रारकर्त्याने पुराव्यानिशी सिध्द केली काय? | -नाही- |
03 | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
::निष्कर्ष::
मुद्दा क्रं 1 ते 3 बाबत-
09. प्रस्तुत तक्रारीतील दाखल दस्तऐवजाचे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्त्याचे तक्रारीप्रमाणे त्याचे सेलोटी, तालुका लाखांदुर, जिल्हा भंडारा येथे मे.रिध्दी सिध्दी ट्रेडर्स या नावाचे कृषी दिनांक-13.01.2013 पासून असून सदर व्यवसायासाठी त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ इंडीया शाखेत कॅश क्रेडीट लिमिट खाते उघडले असून सदर खाते रुपये-7,00,000/- पर्यंत विमा संरक्षीत केलेले आहे. तसेच त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेतून रुपये-5,00,000/- कॅश क्रेडीट कर्ज सुध्दा घेतलेले आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी लेखी उत्तरामध्ये या बाबी नाकारलेल्या नाहीत. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की, विरुध्दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनी भंडारा शाखा यांचेकडे त्याने सदर कृषी केंद्राचा विमा पॉलिसी क्रं-281303/48/16/98000000087 अन्वये दिनांक-04.04.2016 पासून ते दिनांक-03.04.2017 या कालावधी करीता केंद्रातील फर्टीलायझर, बियाणे आणि किटकनाशकांचा एकूण रुपये-13,00,000/- एवढया रकमेचा विमा काढला होता ही बाब विरुध्दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे पान क्रं 26 वरील दाखल विमा पॉलिसीचे प्रतीवरुन सिध्द होते. करीता तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक आणि विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचा ग्राहक होत असल्याने आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
10. तक्रारकर्त्याचे कृषी केंद्रास दिनांक-18.04.2016 चे मध्यरात्री अपघाती आग लागल्याने दुकान जळाले व त्याचे कृषी केंद्रातील साहित्य जळून नष्ठ झाले या बाबत विरुध्दपक्षांनी कोणताही विवाद निर्माण केलेला नाही व ही बाब मान्य केलेली आहे. तक्रारकर्त्याने सदर आगीचे घटने बाबत पोलीस स्टेशन लाखनी यांचेकडे तक्रार केली आणि त्याने पोलीसांनी केलेला घटनास्थळ पंचनामा पान क्रं 12 ते 15 वर दाखल केला. तक्रारकर्त्याने पान क्रं 16 ते 21 वर कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी पिंपळगाव यांनी नुकसानी बाबत केलेला पंचनामा दाखल केला त्यानुसार त्यांनी रुपये-10,78,700/- एवढया नुकसानीचे निर्धारण केले. या व्यतिरिक्त तक्रारकर्त्याने दोन्ही विरुध्दपक्ष आणि तहसिलदार यांचेकडे आगीची सुचना दिल्या बाबत केलेले अर्ज पान क्रं 22 ते 25 वर दाखल केलेत.
11. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ इंडीया शाखा पोहरा येथील शाखा व्यवस्थापकांनी तक्रारकर्त्याचे कायदेशीर नोटीसला त्याचे वकीलांचे नावे दिनांक-18.04.2017 रोजीचे दिलेले उत्तर पान क्रं 31 वर दाखल आहे, त्याप्रमाणे त्यांनी एकाच साहित्याचे नुकसानी बाबत दोन विमा दावे मान्य करता येत नाही असा मुख्य उजर घेतलेला आहे. तर विरुध्दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनी भंडारा शाखे तर्फे सिनीयर ब्रॅन्च मॅनेजर यांनी तक्रारकर्त्याचे नोटीसला दिनांक-19.04.2017 रोजी दिलेले उत्तर पान क्रं 32 वर दाखल आहे, त्यानुसार त्यांनी विमा सर्व्हेअर यांचे अहवालाप्रमाणे फुल अॅन्ड फायनल सेटलमेंट म्हणून रुपये-3,85,301/- एवढी रक्कम विम्या दाखल दिलेली आहे आणि सदर विम्याची रक्कम फुल अॅन्ड फायनल सेटलमेंट म्हणून तक्रारकर्त्याने मान्य केलेली असून डिसचॉर्ज व्हाऊचरवर सही केलेली असल्यामुळे आता कोणतीही विमा राशी देय होत नसल्याचे तक्रारकर्त्याचे अधिवक्ता यांना कळविलेले आहे.
12. विरुध्दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे सर्व्हेअर श्री संतोष कुळकर्णी यांचे शपथपत्र पान क्रं 70 वर दाखल आहे. पान क्रं 75 ते 79 वर सर्व्हेअर श्री संतोष कुळकर्णी यांचा दिनांक-28.07.2016 रोजीचा सर्व्हे अहवाल दाखल आहे. सदर सर्व्हे अहवाला प्रमाणे तक्रारकर्त्याचे कृषी केंद्रातील साहित्याचा एकूण रुपये-13,00,000/- चा विमा दिनांक-04.04.2016 ते दिनांक-03.04.2017 या कालावधीसाठी काढल्याचे नमुद केलेले आहे. तक्रारकर्त्याने एकूण रुपये-10,78,700/- चा विमा दावा केल्याचे नमुद आहे. सदर सर्व्हे अहवालामध्ये आगीच्या घटनेच्या पूर्वीच्या महिन्यात बॅंकेला सादर केलेल्या स्टॉक स्टेटमेंट प्रमाणे दिनांक-09.09.2015 रोजी रुपये-7,36,000/- रकमेचा स्टॉक असल्याचे नमुद असून दिनांक-31.03.2016 रोजी रुपये-7,38,350/- चा स्टॉक असल्याचे नमुद केलेले आहे. सदर सर्व्हे अहवालामध्ये पुढे असे नमुद केलेले आहे की, स्टॉक आणि नुकसानीची किम्मत जास्त फुगवून तक्रारकर्त्याने मागणी केलेली आहे. सदर सर्व्हे अहवालामध्ये सॉल्व्हेज वगळून रुपये-3,95,301/- एवढया किमतीचे नुकसानीचे निर्धारण नमुद केलेले असून एक्सेस म्हणून रुपये-10,000/- एवढी रक्कम वजावट करुन अंतिम नुकसानीचे निर्धारण रुपये-3,85,301/- केल्याचे नमुद आहे. ग्राहक मंचाचे मते सर्व्हेअर यांनी केलेले नुकसानीचे निर्धारण कमी असून विरुध्दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे बाजूने सर्व्हे अहवाल तयार केलेला आहे. परंतु ही बाब जरी खरी असली तरी विरुध्दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनीने पान क्रं 80 वर दाखल केलेल्या क्लेम डिसचॉर्ज व्हाऊचरची प्रत पाहता रुपये-3,85,301/- च्या व्हॉऊचरवर कोणताही विरोध न दर्शविता तक्रारकर्त्याने स्वाक्षरी केलेली आहे. तक्रारकर्त्याला जर सदर विमा दाव्याची रक्क्म मान्य नव्हती तर त्याने सदर विमा रक्कम विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी कडून स्विकारावयास नको होती आणि जरी विमा रक्कम स्विकारली तरी सदर व्हाऊचरची रक्कम “Under Protest” म्हणून स्विकारावयास हवी होती व तसे व्हाऊचरवर स्वतःचे अक्षरात लेखी नमुद करावयास हवे होते परंतु तसे काहीही तक्रारकर्त्याने केलेले दिसून येत नाही. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने सदर विमा रक्कम ही फुल अॅन्ड फायनल सेटलमेंट म्हणून तक्रारकर्त्याने स्विकारल्याचे लेखी उत्तरात नमुद केलेले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आता जास्तीची विमा रक्कम मिळण्यासाठीची केलेली तक्रारकर्त्याची मागणी मान्य करता येणार नाही. दुसरी बाब अशी आहे की, तक्रारकर्त्याने त्याचे कृषी केंद्राचे झालेल्या नुकसानी बाबत विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ इंडीया शाखा पोहरा यांचेकडे सुध्दा त्याचे विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेत असलेल्या कॅश क्रेडीट लिमिट खात्यावरील केलेल्या संरक्षीत विम्याचे रकमेची मागणी केलेली आहे परंतु येथे कायदेशीररित्या लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे की, तक्रारकर्त्याचे कृषी केंद्रातील आगीचे भक्ष्यस्थानी पडलेल्या कृषी साहित्या बाबत त्याने विमा दावा विरुध्दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनी भंडारा शाखे मध्ये केलेला आहे आणि त्या विम्या दाव्याची रक्कम सुध्दा उपरोक्त नमुद विवेचना प्रमाणे क्लेम डिसचॉर्ज व्हाऊचर नुसार स्विकारलेली आहे. अशास्थितीत कायदेशीर तरतुदींचा विचार करता एकाच कृषी केंद्रातील साहित्याचे नुकसानी बाबत दोन वेगवेगळया ठिकाणी म्हणजे विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ बडोदा आणि विरुध्दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडे विमा नुकसानीची रक्कम तक्रारकर्त्याला मागता येणार नाही असे ग्राहक मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून क्लेम डिसचॉर्ज व्हॉऊचरव्दारे विम्याची रक्कम कोणताही विरोध न दर्शविता स्विकारलेली असल्याने आता त्याला कोणतीच जास्तीची विमा रक्कम मंजूर करता येणार नसल्याने सदर तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे ग्राहक मंचाचे स्पष्ट मत आहे, त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 2 चे उत्तर नकारार्थी नोंदवित आहोत.
13. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे पारीत करीत आहोत-
:: अंतिम आदेश ::
01) तक्रारकर्त्याची विरुध्दपक्ष क्रं-1) व्यवस्थापक, बॅंक ऑफ इंडीया शाखा पोहरा,तहसिल लाखनी जिल्हा भंडारा आणि विरुध्दपक्ष क्रं-2) व्यवस्थापक, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड शाखा कार्यालय भंडारा यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
03) सर्व पक्षांना निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन दयावी.
04) तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.
(श्री नितीन माणिकराव घरडे) (श्रीमती वृषाली गौ.जागीरदार)
मा.पिठासीन अध्यक्ष. मा.सदस्या.
दिनांकः- 11/06 /2020.
ठिकाणः- भंडारा.
GM