::: न्यायनिर्णय :::
मंचाचे निर्णयान्वये, उमेश वि. जावळीकर मा. अध्यक्ष
1. सामनेवाले यांनी तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार वाहन विमा कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदारांनी सामनेवाले क्र.1 यांच्याकडून वित्तसहाय्य घेवून सामनेवाले क्र.2 यांचेकडून विमासहाय्य घेवून सामनेवाले क्र.3 यांचेकडून दुचाकी वाहन खरेदी करण्यासाठी दिनांक 20/9/2012 रोजी रक्कम रू.53,804/- चा धनाकर्ष सामनेवाले क्र.3 यांचे नांवे दिला तसेच सामनेवाले क्र.1 यांनी सामनेवाले क्र.2 यांचे नांवे रक्कम रू.1,437/- रकमचा धनाकर्ष एक वर्षाच्या विम्यासाठी दिला. सामनेवाले क्र.2 व 3 यांना रक्कम प्राप्त झाल्यानंतर सामनेवाले क्र.1 यांनी नमूद केलेल्या दुचाकी वाहनाच्या चेसीस क्रमांक व इंजीन क्रमांकानुसार सामनेवाले क्र.2 यांनी सदर वाहन विमाकृत केले. परंतु सामनेवाले क्र.3 यांनी विमाकृत केलेले वाहन तक्रारदारांस दिले नाही. त्याऐवजी अन्य वाहन सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदारांस दिले. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांनी वित्तसहाय्य केल्यामुळे योग्य कागदपत्रांची मागणी करूनही सामनेवाले क्र.3 यांनी अन्य वाहन तक्रारदारांस दिल्याने सामनेवाले क्र.1 यांच्याकडे योग्य कागदपत्रे देवू शकले नाहीत. त्यामुळे तक्रारदार वाहनाचा पुढील वर्षाचा विमादेखील काढू शकले नाहीत. सदर बाबीची पुर्तता करण्यासाठी तक्रारदारानी वकीलामार्फत दिनांक 3/12/2013 रोजी नोटीस पाठवूनही सामनेवाले क्र.3 यांनी प्रत्युत्तर न दिल्याने तक्रारदार यांनी प्रस्तूत तक्रारीमध्ये, सामनेवाले क्र.3 यांनी विक्री देयकामध्ये नमूद दुचाकी वाहन तक्रारदार यांस देण्यांत यावे अथवा तक्रारदारांस देण्यांत आलेल्या वाहनाची योग्य ती नोंद विक्री देयकात करून देण्यांत यावी, सामनेवाले क्र.1 यांनी सामनेवाले क्र.3 विक्री देयक दुरूस्त करून देत नाहीत तोपर्यंत व्याजाची रक्कम तक्रारदाराकडून वसूल करण्यांत येवू नये, सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदारांचे ताब्यात असलेल्या दुचाकी वाहनाचा विमा नुतनीकरण तात्काळ करावा व सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारांस मानसीक, शारीरीक त्रास व तक्रार खर्चाची रक्कम रू.30,000/- अदा करावे अशी विनंती प्रस्तूत तक्रारीत तक्रारदाराने केली आहे.
3. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारीतील मुद्यांचे खंडन करून सामनेवाले क्र.2 यांच्याकडून तक्रारदार यांच्या वाहनाचा विमा घेतला आहे असे नमूद केले. प्रस्तूत तक्रारीमधील वाद हा तक्रारदार व सामनेवाले क्र.3 यांच्यामधील असून त्याबाबत सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदारांस कोणतीही सेवासुविधा पुरविण्यांत कसूर केला नसून सामनेवाले क्र.2 यांना अनावश्यक पक्ष म्हणून तक्रारीत समाविष्ट करण्यांत आले आहे. सबब प्रस्तूत तक्रार खर्चासह सामनेवाले क्र.2 यांचेविरूध्द अमान्य करण्यांत यावी अशी विनंती सामनेवाले क्र.2 यांनी केली आहे.
4. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारीतील मुद्यांचे खंडन करून सामनेवाले क्र.1 यांचेकडे तक्रारदारांनी वाहन कर्ज मिळण्यासाठी केलेल्या अर्जाप्रमाणे सामनेवाले क्र.1 यांनी दिनांक 20/9/2012 रोजी तक्रारदारांस रक्कम रू.53,804/- वित्तसहाय्य दिले. सामनेवाले क्र.1 यांनी रक्कम रू.1,437/- चा धनाकर्ष विम्याकरीता सामनेवाले क्र.2 यांना दिला. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदारांस हिरो होंडा मोटरसायकल पॅशन प्रो डिस्क चेसीस क्र. MBLHA10AWCHH16477 व इंजीन क्र. HA10ENCHH18756 ची नोंदणी केली होती. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदारांस दिनांक 20/9/2012 रोजी वाहनाचा ताबा दिला त्यावेळी सामनेवाले क्र.1 यांचेकडून विमासंरक्षण करारामध्ये वाहनाचा चेसीस नंबर व इंजीन नंबर मध्ये नोंद करण्यामध्ये निश्काळजीपणा झाल्याची बाब तक्रारदार यांना कळवूनही तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 यांच्याकडून ती बाब दुरूस्त करून घेतली नाही. सामनेवाले क्र.3 यांच्याकडून तक्रारदारांनी वाहनाचा ताबा घेतेवेळी डिलीव्हरी बूकवर सही केली असून सदर क्रमांक अचूक नमूद केला आहे. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदारांस कोणतीही सेवासुविधा पुरविण्यांत कसूर केला नसून प्रस्तूतची तक्रार खर्चासह सामनेवाले क्र.3 यांचेविरूध्द अमान्य करण्यांत यावी, अशी विनंती सामनेवाले क्र. 3 यांनी केली आहे.
5. तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद, वि.प.क्र. 2 यांचे लेखी म्हणणे, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र पुरसीस, वि.प.क्र. 3 यांचे लेखी म्हणणे, कागदपत्रे, लेखी युक्तिवादाबाबतची पुरसीस व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे तयार करण्यांत येतात.
मुद्दे निष्कर्ष
(1) सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदारांस वाहन विक्री
करारनाम्यानुसार सेवासुविधा पुरविण्यांत कसूर केल्याची बाब
तक्रारदार सिध्द करतात काय ? होय
(2) सामनवाले क्र.2 तक्रारदारांस नुकसान भरपाई
देण्यांस जबाबदार आहेत काय ? होय
(3) आदेश ? तक्रार अंशतः मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 व 2
6. सामनेवाले क्र.2 व 3 यांनी तक्रारदार यांना सेवासूविधा पुरविण्याबाबत केलेल्या करारामध्ये व सामनेवाले क्र.1यांनी केलेल्या वित्तसहाय्य करारामधील कागदपत्रांचे अवलोकन केले असता सामनेवाले क्र.1 यांनी वित्तसहाय्य करण्यामध्ये कसूर केल्याबाबत कोणतीही तक्रार नाही. सामनेवाले क्र.1 यांचेविरूध्द केवळ सामनेवाले क्र.3 विक्रीदेयक दुरूस्त करून देत नाहीत तोपर्यंत व्याजाची रक्कम तक्रारदाराकडून वसूल करू नये तसेच नुकसानभरपाई रक्कम अदा करावी, अशी मर्यादीत विनंती नमूद आहे. परंतु साद विनंती न्यायोचित नसल्याने अमान्य करण्यात येते. कागदोपत्री पुराव्यावरून सामनेवाले क्र.3 यांनी दिनांक 2/11/2012 रोजी पावती क्रमांक 2799 द्वारे तक्रारदाराकडून रक्कम रू.53,804/- स्विकारून पॅशन प्रो डिस्क दुचाकी वाहन तक्रारदारांस विक्री केले आहे. वाहनाची नियमानुसार विमासंरक्षण प्राप्त करण्यासाठी दिनांक 3/10/2012 ते 2/10/2013 या कालावधीसाठी रक्कम रू.1,145/- स्विकारून सामनेवाले क्र.2 यांनी कलेल्या विमासंरक्षण करारामध्ये चेसीस क्र. MBLHA10AWCHH16140 व इंजीन क्र. HA10ENCHH18369 नमूद करण्यांत आलेला आहे. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदारांस दिनांक 23/10/2012 रोजी दिलेल्या पावतीमध्ये वाहनाचा चेसीस क्र. MBLHA10AWCHH16477 व इंजीन क्र. HA10ENCHH18756 नमूद करण्यांत आलेला आहे तसेच सामनेवाले क्र.3 यांनी मंचात दिनांक 6/5/2014 रोजी दाखल केलेल्या कागदपत्रामधील सामनेवाले क्र.3 यांच्या दिनांक 19/10/2012 रोजीच्या डिलीव्हरी रजिस्टरमधील नोंदीप्रमाणे तक्रारदाराच्या दुचाकी वाहनाचा चेसीस क्र. MBLHA10AWCHH16477 व इंजीन क्र. HA10ENCHH18756 नमूद आहे. त्याबाबतची नोंद आरटीओ यांच्याकडील तक्रारदार यांचे वाहन क्र.एमएच 34 एएन 2390 दिनांक 23/12/2013 रोजीच्या नोंदीवरून सिध्द होते. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदाराच्या वाहनाचा विमा दिनांक 2/10/2013 रोजी संपूष्टात आल्यानंतर नुतनीकरण न केल्याने तक्रारदारांना सदर वाहनाचा वापर करता न आल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरून सिध्द झाली आहे. सामनेवाले क्र.2 यांनी सामनेवाले क्र.3 यांच्या अधिकृत नोंदीप्रमाणे तक्रारदाराच्या वाहनाचा विमा करार करतेवेळी योग्य चेसीस नंबर व इंजीन नंबर नमूद न केल्याने व तक्रारदाराने सदरची बाब कळविल्यानंतरही अद्याप दुरूस्ती न केल्याने सामनेवाले क्र.2 यांनी विमाकरार सेवासुविधा पुरविण्याबाबत कसूर केल्याने तक्रारदारांस प्रस्तूत तक्रार दाखल करावी लागल्याने आर्थीक,शारीरीक व मानसीक त्रास झाल्याची बाब सिद्ध झाल्याने साम्नेवाल्रे क्र. २ तकरारदारास नुकसान भरपाई देण्यास पात्र आहेत, असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी सामनेवाले क्र.1 व 3 यांच्याविरूध्द केलेली मागणी न्यायोचीत नसल्याने अमान्य करण्यांत येते. सबब, मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 3
7. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
(1) ग्राहक तक्रार क्र. 15/2014 अंशतः मान्य करण्यात येते.
(2) सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदारांस वाहन विमा कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यांत कसूर केल्याची बाब जाहीर करण्यांत येते.
(3) सामनेवाले क्र.2 यांनी सामनेवाले क्र.3 यांचे मूळ देयकामध्ये नमूद नोंदीप्रमाणे तक्रारदाराच्या दुचाकी वाहन क्र. एमएच 34 ए एन 2390 या वाहनाचा चेसीस क्र. MBLHA10AWCHH16477 व इंजीन क्र. HA10ENCHH18756 विमा संरक्षण करारामध्ये नमूद करुन वाहनाचा वैध विमा करार तक्रारदारांकडून नियमानुसार विमा रक्कम स्विकारून या आदेश प्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत करून द्यावा.
(4) सामनेवाले क्र.2 यांनी, तक्रारदारांस, मानसीक, शारिरीक त्रास व तक्रारखर्चापोटी एकत्रित नुकसान भरपाई रक्कम रू. 25,000/- या आदेश प्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावी.
(5) या आदेश प्राप्ती दिनांकापासून सर्व प्रकारच्या विमा संरक्षण करारामध्ये वाहन विक्री देयकामधील नोंदीप्रमाणे वाहनाचे चेसीस क्र. व इंजीन क्र. अचूकपणे नमूद करण्याचे निर्देश ग्राहक संरक्षण अधिनियम कलम १४ (फ) अन्वये सामनेवाले क्र. 2 यांना देण्यात येतात.
(6) सामनेवाले क्र. 1 व 3 यांचेविरुद्ध् कोणतेही आदेश नाहीत.
(7) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमती. कल्पना जांगडे श्री. उमेश वि. जावळीकर श्रीमती. किर्ती गाडगीळ
(सदस्या) (अध्यक्ष) (सदस्या)