तक्रारदार : वकील श्री. जयदीप पाटकर यांचे सोबत हजर.
सामनेवाले : वकील श्री. अंनत शिंदे यांचेसोबत हजर
*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- मा. श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
एकत्रित न्यायनिर्णय
1. प्रस्तुत पाचही तक्रारींमध्ये सामनेवाले बँक ऑफ बडोदा, सांताक्रूझ शाखा हे समान आहेत. प्रस्तुत तक्रारीत तक्रारदार हे जरी वेगवेगळे असले तरी देखील सर्व तक्रारींमधील सामनेवाले यांचेसोबत झालेल्या व्यवहाराचे स्वरुप देखील सारखेच आहे. तसेच तक्रारीतील मुद्दे देखील समान आहेत. त्यावरुन प्रस्तुतच्या सर्व तक्रारी या एकाच न्यायनिर्णयाद्वारे निकाली काढण्यात येत आहेत. तथापि प्रकरणातील प्राथमिक मुद्दा समजून घेणे कामी तक्रार क्रमांक 575/2010 यामधील तक्रारदार व सामनेवाले यांचे कथन याचा संर्दभ दिलेला आहे.
2. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या सांताक्रूझ शाखेमध्ये “अक्षय पेंशन योजना” अंतर्गत भाग घेण्याचे ठरविले व त्याकामी रुपये 600/- दरमहा 72 महिने रक्कम जमा केली, व या व्यतिरिक्त रुपये 800/- प्रतिमहा याप्रमाणे 78 महिने अशी रक्कम जमा केली. वरील रकमेची मुदत संपल्यानंतर रुपये 65,327/- मुदत ठेव क्रमांक 3077 व रुपये 800/- प्रतिमहा या खात्यातील एकत्रित रक्कम रुपये 97,846/- मुदत ठेव क्रमांक 4930 असे सामनेवाले यांच्याकडे “अक्षय पेंशन योजनेत” मुदतठेवीमध्ये ठेवले. वरील दोन्ही ठेवींवर सामनेवाले यांनी 13 टक्के व्याज देण्याचे कबूल केले, व मुदत ठेवीची कुठलीही मुदत अथवा निश्चित दिनांक देण्यात आलेला नव्हता. तक्रारदाराच्या कथनाप्रमाणे वरील दोन्ही ठेवींच्या संदर्भात सामनेवाले यांनी तक्रारदारांना असे आश्वासन दिले होते की, तक्रारदारांनी ठेवीची रक्क्म मुदतीत उचलून घेतली नाही तर “अक्षय पेंशन योजनेतंर्गत” वरील दोन्ही वेगवेळया ठेवींवर तक्रारदारांनी 13 टक्के दराने त्रैमासिक व्याज देण्यात येईल, ज्यास तक्रारदारांनी पेंशन असे संबोधले तक्रारदारांना त्याप्रमाणे सामनेवाले यांचेकडून त्रैमासिक पेंशनचा हप्ता रुपये 3,180 व रुपये 2123/- असे दोन्ही ठेवीं अंतर्गत प्राप्त होत होते.
3. तक्रारदारांचे तक्रारीतील कथनाप्रमाणे तक्रारदार सामनेवाले यांचेकडून पासबूकमधील नोंदी अद्यावत करणेकामी जानेवारी 2007 मध्ये पासबूक घेवून गेले असतांना त्यांना असे दिसून आले की, सामनेवाले यांनी सप्टेंबर 2006 पासून खाते क्रमांक 3077 अंतर्गत फक्त रुपये 1131/- व खाते क्रमांक 4930 अंतर्गत रुपये 1,936/- जमा केले आहेत. व याप्रकारे सामनेवाले यांनी रुपये 992/- व रुपये 1,244/- असे अनुक्रमे खाते क्रमांक 3077 व 4930 या खांत्यामध्ये कमी जमा केले.
4. तक्रारदारांनी दिनांक 26/9/2006 रोजी “अक्षय पेंशन योजना” संदर्भात पत्र लिहीले व त्यामध्ये सामनेवाले यांनी ठेवीमधील व्यवहारामध्ये कमी रक्कम जमा केली आहे अशी तक्रार केली. परंतु सामनेवाले यांनी त्या पत्रास प्रतिसाद दिला नाही, व सामनेवाले यांनी, खात्यामध्ये कमीच रक्कम जमा केली. याप्रकारे सामनेवाले यांनी सप्टेंबर 2006 ते जून 2008 च्या दरम्यान पेन्शन ठेवींच्या दोन्ही खात्यांमध्ये कमी रक्कम जमा केली. त्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाले यांच्याविरुध्द प्रस्तुतची तक्रार दिनांक 24/9/2008 रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच ठाणे यांचेसमक्ष दाखल केली.
5. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच ठाणे यांनी सर्व तक्रारींमध्ये सुनावणी घेऊन सर्व तक्रारी दिनांक 30/06/2009 रोजीच्या न्यायनिर्णयाद्वारे मंजूर केल्या व तक्रारदारांनी प्रत्येक तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे दाद दिली. ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या न्यायनिर्णयाविरुध्द सामनेवाले हयांनी मा. राज्य आयोग यांचेकडे वेगवेगळे अपिल दाखल केले. मा. राज्य आयोगाने दिनांक 7/6/2010 रोजीच्या आदेशान्वये सर्व अपिले मंजूर केली, व सर्व तक्रारी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच मुंबई उपनगर म्हणजेच प्रस्तुतचे मंच याचेकडे वर्ग करण्यात यावे असा आदेश दिला. त्यानंतर प्रस्तुतच्या तक्रारींमध्ये या मंचाने सुनावणी घेतली.
6. प्रत्येक तक्रारींमध्ये सामनेवाले बँकेने आपली कैफीयत दाखल केली आहे, व त्यामध्ये प्रत्येक तक्रारदाराने “अक्षय पेंशन योजने अंतर्गत” ठेव ठेवली ही बाब मान्य केली. तथापि सामनेवाले यांच्या कथनाप्रमाणे ठेवीच्या पावतीवर नमूद करण्यात आलेले 13 टक्के व्याज दर हा कायम राहणार नव्हता. सामनेवाले यांनी पुढे असे कथन केले की, रिझर्व्ह बँकेच्या अटीप्रमाणे वेळोवेळी व्याज दरात बदल होत गेले, व व्याजाच्या दरामध्ये कपात झाल्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या ठेवींवर देय असणारे व्याज कमी दराने दिले. सामनेवाले बँक यांची कृती ही रिझर्व्ह बँकेच्या आदेशांवर आधारीत बँकेच्या वरिष्ठांनी निर्गमित केलेल्या वेगवेगळया आदेशाप्रमाणे करण्यात आली. याप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदारांना फक्त तक्रारीतील ठेवींवर कमी दराने व्याज देण्यात आले या आरोपास नकार दिला, व कमी झालेले परंतु प्रचलित दराने ठेवींवर व्याज देय करण्यात आले, असे कथन करुन आपल्या निर्णयाचे समर्थन केले.
7. सर्व तक्रारींमध्ये तक्रारदारांनी आपल्या पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे हजर केले, तर सामनेवाले यांनी आपल्या पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे हजर केले, तसेच दोन्ही बाजूंनी लेखी युक्तीवाद हजर केला.
8. प्रस्तुत मंचाने तक्रारदारांच्या तक्रारी, पुराव्याचे शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारींच्या न्यायनिर्णयाकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले यांनी प्रत्येक तक्रारीतील तक्रारदारांना “अक्षय पेंशन योजने” अंतर्गत त्यांच्या ठेवींवर कमी दराने व्याज देय करुन तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यास कसूर केली, ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय |
2 | तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून मुदतठेवींवरील व्याजाच्या फरकाची रक्कम पुढील व्याजासह वसूल करण्यास पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतीम आदेश? | तक्रारी अंशतः मंजूर करण्यात येतात. |
कारण मिमांसा
9. सामनेवाले यांनी आपल्या पुराव्याच्या शपथपत्रासोबत कागदपत्रांच्या प्रती हजर केलेल्या आहेत, तर त्याच कागदपत्रांच्या प्रती तक्रारदारांनी देखील दाखल केलेल्या आहेत. याप्रकारे तक्रारीत दाखल झालेले कागदपत्रे ही सारखीच आहेत परंतु या कागदपत्रांतील मजकुरावरुन निघणा-या निष्कर्षाबद्दल मात्र तिव्र मतभेद आहेत. सामनेवाले यांनी तक्रार क्रमांक 575/2010 यामधील पुराव्याच्या शपथपत्राच्यासोबत अनुक्रमे दोन्ही ठेव पावती क्रमांक 3077 व 4930 यांच्या प्रती दाखल केल्या आहेत. त्यामध्ये उजव्या बाजूस देय तारखेच्या रकान्यामध्ये “अक्षय पेंशन योजना” (APY) असे नमूद आहे. प्रस्तुतची ठेव ही मुदत ठेवीच्या पावतीच्या मजकुरावर लिहीण्यात आलेली आहे. पावती क्रमांक 3077 एकूण रक्कम रुपये 65,327/- व पावती क्रमांक 4930 यामध्ये एकूण रक्कम रुपये 97,846/- असे नमूद आहे. दोन्हीही पावतींमध्ये व्याजाचा दर 13 टक्के नमूद आहे. दोन्ही पावत्यांमध्ये कुठलीही मुदत ठेव रक्कम देय करण्याकामी नमूद करण्यात आलेली नव्हती, व मुदतीच्या रकान्यामध्ये “अक्षय पेंशन योजना” असे नमूद करण्यात आलेले होते, ही बाब असे दर्शविते की, दोन्ही ठेवी विशिष्ट मुदतीत नव्हत्या तर “अक्षय पेंशन योजने” अंतर्गत ठेवीच्या रकमेवर सामनेवाले यांनी 13 टक्के दराने व्याज द्यावयाचे होते. शपथपत्रासोबत “अक्षय पेंशन योजनेच्या” फॉर्मची प्रत दाखल केलेली आहे. त्याचे वाचन केले असता असे दिसून येते की, विशिष्ट रक्कम काही महिने सामनेवाले यांचेकडे गुंतविल्यानंतर जमा करणा-या ठेवीदारास त्या ठेवीची मुदत संपल्यानंतर रक्कम परत करणे, अथवा ती “अक्षय पेंशन योजने” अंतर्गत गुंतविणे असा पर्याय होता. तक्रारदाराने तक्रार क्रमांक 575 मध्ये रुपये 600/- हे 72 महिने व रुपये 800/- हे 78 महिने असे सामनेवाले यांचेकडे जमा केले होते. एकूण रक्कम परत न स्विकारता वर नमूद केलेल्या ठेव पावतीप्रमाणे “अक्षय पेंशन योजने” अंतर्गत सामनेवाले यांचेकडे ती गुंतविली त्यात 13 टक्के व्याज देय आहे. याच प्रकारच्या गुंतवणूकीखाली अन्य तक्रारींमधील तक्रारदारांनी विशिष्ट रक्कम विशिष्ट महिन्यांकरीता जमा केली, व जमा झालेली रक्कम “अक्षय पेंशन योजने” मध्ये गुंतविली.
10. अक्षय पेन्शन योजनेची माहिती व नियम सामनेवाले यांनी आपले यादीसोबत निशाणी बी येथे दाखल केले आहेत, व त्यामध्ये 5.108 या कलमाखाली व “अक्षय पेंशन योजना” या मथळयाखाली सदर योजनेची माहिती दिलेली आहे. त्यामध्ये असे नमूद आहे की, शंभराच्या पटीमध्ये कमीतकमी पाच वर्ष ठेवीदाराने प्रतीमहा विशीष्ट रक्कम जमा करावी लागेल व मुदत संपल्यानंतर संपूर्ण रक्कम ठेवीदार व्याजासह परत घेऊ शकतो अथवा मासीक/त्रैमासीक पेन्शन मिळणेकामी “अक्षय पेंशन योजने” मध्ये गुंतवू शकतो. कलम 5.108 चे IV मध्ये असे नमूद आहे की, मुदत ठेवीवर व आर्वत ठेवीवर नेहमीच्या दराने व्याज दिले जाईल. कलम 5.108 चे कलम ई असे नमूद करतो की, सुरूवातीची विशिष्ट रक्कम जमा केल्याची मूदत संपल्यानंतर मुद्दल व त्यावरील व्याज मुदत ठेवीमध्ये गुंतविण्यात येईल व त्यावेळेचे मुदत ठेवीवरचे उच्च दराने त्या मुदत ठेवीवर व्याज देय होईल कलम 5.108 चे कलम फ व ग अतिशय महत्वाचे असून ते इंग्रजीमध्ये पुढील प्रमाणे आहे.
5.108 F : - Monthly / Quarterly Interest on the Deposit should be paid to the Depositor as pension
5. 108 G:- The Existing Accounting Procure for Fixed Deposits Under MIP / QIP is applicable here also
“अक्षय पेंशन योजनेच्या” वरील तरतुदींचे काळजीपूर्वक वाचन केले असतांना एक बाब स्पष्ट होते की, ठेवीदाराने मासिक दराने गुंतविलेली रक्कम व्याजासह मुदत ठेवीमध्ये ठेवीदाराने गुंतविल्यास “अक्षय पेंशन योजने” अंतर्गत विशिष्ट दराने व्याज देय होईल. ते सदरील देय व्याज मासिक अथवा त्रैमासिक राहील व त्यास मासिक/त्रैमासिक पेन्शन असे संबोधले जाईल. वर नमूद केल्याप्रमाणे मुदत ठेवीचे सर्व नियम ठेवीदाराने पेन्शन योजनेमध्ये गुंतविलेल्या रक्कमेस देखील लागू होतात. सर्व साधारणपणे “अक्षय पेंशन योजने” व्यतिरीक्त मुदत ठेवीमध्ये गुंतवणुकदाराने रक्कम गुंतविली असेल तर रिझर्व्ह बँकेच्या बदललेल्या रक्कमेचा परिणाम मुदत ठेवीच्या व्याज दरावर होत नाही. अक्षय “अक्षय पेंशन योजनेच्या” मुदत ठेवीत देखील सर्व साधारण मुदत ठेवीचे नियम देखील लागू असल्याने सदरील प्रकरणातील ठेवीदारांची “अक्षय पेंशन योजनेच्या” ठेवीवर देखील मुदत ठेवीच्या पावतीमध्ये नमूद केलेल्या दराने म्हणजे 13% दराने व्याज पेन्शन म्हणून तक्रारदाराना अदा करणे आवश्यक होते असा निष्कर्ष साहजिकपणे काढावा लागतो.
11. वरील निष्कर्षाच्या एका अन्य बाबतीतील पुष्टी मिळते. सामनेवाले यांनी आपल्या कागदपत्रांच्या यादीसोबत पृष्ठ क्रमांक 35 येथे तक्रारदाराची 3077 व 4930 या दोन्ही मुदत ठेवीच्या पावतीच्या छायांकित प्रती हजर केलेल्या आहेत. याचे काळजीपूर्वक निरिक्षण केल्याने असे दिसून येते की, दोन्ही पावत्यांमध्ये due date या रकान्यामध्ये APY असे नमूद आहे, व कुठलीही विशिष्ट मुदत अथवा दिनांक नमूद नाही. यावरुन सदरील दोन्ही मुदत ठेवी “अक्षय पेंशन योजने” अंतर्गत संपूर्ण जमा रक्कमेवर 13 टक्के निश्चित व्याज देय होण्याकामी उभयपक्षकारांमध्ये ठरले होते असा निष्कर्ष काढावा लागतो. ही मुदत ठेव जरी “अक्षय पेंशन योजने” अंतर्गत नसती तरी due date च्या रकान्यामध्ये विशिष्ट मुदत अथवा विशिष्ट दिनांक नमूद करण्यात आली असती. त्या रकान्यामध्ये विशिष्ठ दिनांक अथवा विशिष्ट मुदत नाही यावरुन असा निष्कर्ष काढावा लागतो की, तक्रारदारांनी या ठेव पावतीमध्ये गुंतविलेली रक्कम काढून घेईपर्यंत ठेवीदारास 13 टक्के दराने त्रैमासिक पेंशन देण्याचे कबूल केले होते असा निष्कर्ष काढला जातो.
12. तक्रारदाराने आपल्या लेखी युक्तीवादासोबत पृष्ठ क्रमांक 75 येथे सामनेवाले यांना दिनांक 23/12/97 रोजी दिलेल्या पत्राची प्रत हजर केलेली आहे. सामनेवालेंचे ते पत्र तक्रारदाराच्या पत्र क्रमांक 797 च्या उत्तराबद्दल होते असे दिसते. सामनेवाले यांनी दिनांक 23/12/97 च्या पत्रामध्ये असे नमूद केले होते की, सामनेवाले यांनी म्हणजे सांताक्रूझ शाखेने प्रकरण त्यांच्या वरिष्ठांकडे मार्गदर्शनाकामी पाठविले होते व त्यामध्ये “अक्षय पेंशन योजनेत” ठेव ठेवत असतांना 13 टक्के दर नमूद असल्याने कबूल केल्याप्रमाणे (as agreed) 13 टक्के दराने पेंशन देय होईल. वर नमूद केलेल्या दिनांक 23/12/97 च्या पत्रामधील मजकूर स्पष्ट असून त्यामध्ये सामनेवाले यांच्या सांताक्रूझ शाखेने तक्रारदारांना 13 टक्के दराने पेंशन मुदत ठेवीच्या रकमेवर देय होईल असे स्पष्टपणे कथन केले होते. सामनेवाले यांनी आपल्या पुराव्याच्या शपथपत्रासोबत दिनांक 23/12/97 रोजीचे पत्र दाखल केलेले नाही, तसेच त्याचा संदर्भ देखील दिलेला नाही. तक्रादाराने मात्र आपल्या पुराव्याच्या शपथपत्रातील परिच्छेद क्रमांक 6 मध्ये दिनांक 23/12/97 च्या पत्राचा उल्लेख केला, व तक्रारीसोबत या पत्राची प्रत दाखल केली. सामनेवाले यांनी कैफीयतीच्या परिच्छेद 5 मध्ये तक्रारीतील परिच्छेद क्रमांक 6 व 7 यास नकार दिला होता. दिनांक 23/12/97 च्या पत्रात सामनेवाले यांच्या सांताक्रूझ शाखेच्या व्यवस्थापकांनी केलेली विधाने कुठली परिस्थितीत दिली होती व ते कुठल्या कारणांनी सामनेवाले यांचेवर बंधनकारक नाही, याचा खुलासा केलेला नाही. मुळातच सामनेवाले यांनी संपूर्ण कैफीयतीमध्ये सांताक्रूझ शाखेने तक्रारदारांना दिनांक 23/12/97 रोजी दिलेल्या पत्राचा उल्लेख नाही, तसा उल्लेख नसल्याने सामनेवाले यांचे पत्र तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केले आहे ते पृष्ठ क्रमांक 39 वर असून सदर दिनांक 23/12/97 रोजीचे पत्र मान्य आहे असा निष्कर्ष काढावा लागतो. सामनेवाले यांचे लेखी युक्तीवादात देखील दिनांक 23/12/97 च्या पत्राबद्दल खुलासा आढळून येत नाही, ही बाब वरील निष्कर्ष व तक्रारदाराच्या कथनास पुष्टी देते.
13. सामनेवाले बँकेने त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाचे दिनांक 31/7/2006 च्या पत्रावर भर दिला, व त्याची प्रत कागदपत्रांच्या यादीसोबत दाखल केली. त्यामध्ये दिनांक 2/8/2006 पासून मुदत ठेवीवर ज्या दराने व्याज देण्यात यावे तो दर नमूद आहे. 5 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त मुदतीवर 7 ½ टक्के दराने व्याज देय होईल असे देखील नमूद आहे. परंतु सामनेवाले बँकेच्या मुख्य कार्यालयाने सदरील परिपत्रक काढल्याने सामनेवाले यांच्या सांताक्रूझ बँकेने देखील त्या परिपत्रकानुसार तक्रारदाराच्या मुदतठेवीवर बदललेल्या म्हणजेच कमी दराने व्याज आकारले असे सामनेवाले यांचे कथन आहे. सामनेवाले यांनी कागदपत्रांच्या यादीसोबत दिनांक 13/5/99 च्या पत्राची प्रत हजर केलेली आहे. त्यामध्ये सामनेवाले बँकेने काही योजना रद्द केल्याचे नमूद केलेले आहे, त्यामध्ये “अक्षय पेंशन योजनेचा” देखील उल्लेख आहे. तथापि सदरील पत्रातील शेवटचा परिच्छेद महत्वाचा असून “अक्षय पेंशन योजने” मधील सध्याची खाती चालू ठेवावीत असे देखील नमूद आहे. यावरुन दिनांक 13/5/99 चे परिपत्रक भविष्यात उघडण्यात येणा-या खात्यांना लागू होतो, असे दिसून येते. तक्रार क्रमांक 575/2010 यामध्ये मुदत ठेव क्रमांक 3077 ही दिनांक 8/8/98 रोजीची म्हणजे सामनेवाले बँकेच्या दिनांक 13/5/99 रोजीच्या परिपत्रकापूर्वी देण्यात आलेली होती तर पावती क्रमांक 4930 ही दिनांक 7/6/2002 रोजी म्हणजेच दिनांक 13/5/99 नंतरची जरी असली तरी देखील त्यावर APY असा स्पष्ट उल्लेख आहे. याच प्रकारच्या नोंदी इतर प्रकरणातील सर्व मुदत ठेवीच्या पावत्यांवर दिसून येतात. त्यावरुन दिनांक 13/5/99 रोजीचे परिपत्रक सामनेवाले यांच्या मुख्य कार्यालयाच्या भविष्यकालीन योजनांना लागू होतो. परंतु सामनेवाले बँकेने जरी “अक्षय पेंशन योजना” मुदत ठेव स्विकारली असली तरी तशा ठेवीस बदललेल्या व्याजाचे परिपत्रक लागू होणार नव्हते, ही बाब सामनेवाले यांच्या दिनांक 13/5/99 च्या परिपत्रकावरुनच दिसून येते. सर्व साधारणपणे व योजनांतर्गत मुदत ठेवीच्या प्रकरणात देखील रिझर्व्ह बँकेचा बदललेला व्याजाचा परिणाम होत नाही. विशिष्ट बँकेने विशिष्ट रक्कम ठेवीदारांकडून मुदत ठेवी अंतर्गत स्विकारली असेल तर त्या ठेव पावतीवर जो व्याजाचा दर नमूद करण्यात आलेला आहे त्या दराने व्याज देण्याची जबाबदारी मुदत ठेवीची मुदत संपेपर्यंत सदरील बँकेची असते, मुळातच मुदत ठेव हा ठेवीदार व बँक यांच्या दरम्यानचा करार असतो, व त्या करारातील शर्ती व अटीं प्रमाणे व्याजाचा दर व ठेवीची मुदत निश्चित करण्यात आलेली असते. यामध्ये रिझर्व्ह बँकेने व्याजाच्या दरात कपात केली आहे असे कारण सांगून कुठलीही बँक अथवा व्याजाच्या/पेंशनच्या दरामध्ये फरक करु शकत नाही. सर्वसाधारण मुदत ठेवींना लागू असलेला हा नियम “अक्षय पेंशन योजनेच्या” मुदत ठेवीस देखील लागू होतो. कारण सामनेवाले यांनी ती ठेव मुदत ठेवीच्या स्वरुपात स्विकारलेली आहे. व मुदत ठेवीच्या पावतीवर व्याजाचा दर 13 टक्के नमूद केलेला आहे. यासर्व बाबी सामनेवाले यांच्या कैफीयतीमध्ये व लेखी युक्तीवादातील कथनास छेद देतात.
14. सामनेवाले यांनी जादा शपथपत्र दाखल केले व त्यासोबत मुळ मुदत ठेवीची पावती हजर केली. जादा शपथपत्रामध्ये सामनेवाले यांच्या व्यवस्थापकांनी कथन केले आहे की, “अक्षय पेंशन योजने” अंतर्गत ती मुदत ठेव पावती तयार करण्यात आलेली होती जी सामनेवाले यांनी रद्द केली. मुळातच हजर केलेल्या मुदत ठेव पावतीवर “अक्षय पेंशन योजना” असे नमूद नाही. त्यातही त्या पावतीमध्ये नमूद केलेल्या ग्राहकास काही दिवसांपूर्वी जुन्या दराने व्याज देण्यात आलेले होते असा पुरावा देखील नाही. एकूणच रद्द केलेल्या मुदत ठेवीच्या पावतीवरुन प्रस्तुत प्रकरणातील मुदत ठेवीच्या संदर्भात काही एक निष्कर्ष काढता येत नाही.
15. सामनेवाले यांच्या वकीलांनी असा युक्तीवाद केला की, व्याजाचा दर कमी करण्याची कार्यवाही सामनेवाले यांच्या शाखेने वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे केली व त्यातही वरिष्ठांचा आदेश हा रिझर्व्ह बँकेचे दर बदलल्याच्या धोरणाप्रमाणे निर्गमित करण्यात आले. सामनेवाले यांच्या वकीलांनी पुढे असा युक्तीवाद केला की, व्याजाचा दर कमी झाला तर मुदत ठेवीवर देखील व्याज कमी दराने देण्यात येते व त्याचा स्वरुपाची कार्यवाही तक्रारदाराच्या मुदत ठेवीच्या दरात करण्यात आली. बदललेल्या व्याजाच्या दराच्या संदर्भात सामनेवाले यांच्या वकीलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या AIR 2003 Bombay 318 Mulraj Jayantilal Sheth V/s Governer, R.B.I. Bombay & Anr. या निर्णयाचा संदर्भ दिलेला आहे. त्या मा. उच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे व्याज दराबद्दलचे धोरण हे घटना विरोध नसतात असा निष्कर्ष नोंदविलेला आहे. त्याचप्रमाणे न्यायालयास हस्तक्षेप करता येत नाही असाही अभिप्राय नोंदविलेला आहे.
सामनेवाले यांच्या वकीलांनी त्यानंतर II (1995) CPJ 52 (NC) National Consumer Dispute Redressal Commission, New Delhi यांनी Naveep Co-operative Bank Ltd. V/s Acharya Maharaj Shee Tejendra Prasadji Devendra Prasadji Pande & Anr. या दिलेल्या निर्णयात देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे विशिष्ट प्रकरणात आदेश देऊन त्यातील ठेवी गोठविल्या होत्या. मा. राष्ट्रीय न्यायालयाने त्या आदेशाच्या संदर्भात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
त्यानंतर सामनेवाले यांच्या वकीलांनी II (2011) CPJ 539 Maharashtra State Consumer Disputes Redressal Commission, Mumbai यांनी दिलेल्या Kolhapur District Central Co-Operative Bank Ltd. & anr. V/s Parikshit Vijaysingh Khanwilkar या आदेशाचा संदर्भ दिलेला आहे. या आदेशामध्ये तक्रारदारांनी सामनेवाले बँकेकडे रुपये 10,450/- मुदत ठेवीमध्ये 10 वर्षांकरीता जमा केले होते, व मुदतीनंतर देय रक्कम रुपये 50,000/- सामनेवाले बँकेने 16 टक्के दराने व्याज कबूल केले होते, परंतु रिझर्व्ह बँकेच्या आदेशाप्रमाणे व्याजाचा दर कमी झाल्याने बँकेने काही कालावधीकरीता 8 टक्के दराने व्याज देय केले. सामनेवाले यांची ही कृती योग्य आहे असा निष्कर्ष मा. राज्य आयोगाने नोंदविला. त्यामध्ये मुदत ठेवीच्या पावतीवर व्याजाचा दर रिझर्व्ह बॅकेच्या दराशी स्वलग्न राहील असे नमूद करण्यात आलेले होते. सबब 16 टक्के व्याज दर निश्चित नव्हता, त्याही प्रकरणातील ठेव ही 10 वर्षांकरीता मुदत ठेव होती. सदरच्या प्रकरणात “अक्षय पेंशन योजने” अंतर्गतच्या ठेव पावतीमध्ये मुदत नमूद नाही, तसेच पावतीवर व्याजाचा दर 13 टक्के नमूद असून तो रिझर्व्ह बँकेशी स्वलग्न राहील अथवा नियंत्रित राहील असे देखील नमूद नाही. सबब मा. राज्य आयोगाचा सदरील न्याय निर्णय सामनेवाले यांच्या कथनास पुष्टी देत नाही.
त्यानंतर सामनेवाले यांनी मा. सर्वोच्च न्यायालयाचा AIR 2001 Supreme Court 3095 Central Bank of India V/s Ravindra and others या निर्णयाचा संदर्भ दिलेला आहे. या आदेशामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिवाणी प्रक्रिया संहितेचे कलम 34 ची चर्चा केलेली असून मुदत व व्याज या शब्द प्रयोगाच्या संदर्भात आपला अभिप्राय नोंदविलेला आहे. त्या प्रकरणातील विषय अगदीच वेगळा असल्याने सर्वोच्च न्यायालयाचा अभिप्राय प्रस्तुत प्रकरणास लागू होत नाही.
15. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये तक्रादारानी दाखल केलेल्या तक्रारीतील मुदत ठेव हा तक्रारदार व सामनेवाले यांच्यात झालेल्या कराराचा भाग असल्याने व मुदत ठेवींमध्ये व्याजाचा दर हा रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाप्रमाणे कमी जास्त होईल असे नमूद केले नसल्याने, तसेच एकूण रक्कमेवर व्याजाच्या स्वरुपात त्रैमासिक पेंशन देय करण्याच्या योजना असल्याने व त्या योजने अंतर्गत तक्रारदारांनी पैस गुंतविले असल्याने, व ही बाब सामनेवाले यांनी त्यांच्या दिनांक 23/12/97 रोजीच्या पत्रामध्ये मान्य केली असल्याने सामनेवाले हे तक्रारदारांना 13 टक्के दराने व्याज देय करण्यास जबाबदार होते, व सामनेवाले यांनी वर्ष 2006 पासून स्वतःहून कमी दराने व्याज देय केल्याने सामनेवाले यांनी सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली असा निष्कर्ष काढावा लागतो.
16. तक्रार क्रमांक 575/2010 यामध्ये परिच्छेद 12 मध्ये तक्रारदारांनी मुदत ठेव पावती क्रमांक 4930 यामध्ये रुपये 9,952/- व मुदत ठेव पावती क्रमांक 3077 यामध्ये रुपये 7,936 असे एकंदर रुपये 17,888 असे कमी देय केलेले आहेत ती रक्कम दिनांक 30/6/2008 पर्यंतची आहे. त्या रकमेवर तक्रारदारांनी 21 टक्के व्याज मागितलेले आहे. त्या मुदत ठेव पावतीमध्ये नमूद केलेला 13 टक्के व्याजाचा दर योग्य राहील असे मंचाचे मत आहे.
17. तक्रार क्रमांक 638/2010 यामध्ये मुदत ठेव पावती क्रमांक 0650 रुपये 54,439/- व मुदत ठेव पावती क्रमांक 3076 रक्कम रुपये 1,08,878/- असे गुंतविले होते. तक्रारदाराच्या तक्रारीतील प्रार्थनेच्या कलमात नमूद केल्याप्रमाणे सामनेवाले यांनी दिनांक 30/6/2006 ते 30/06/2008 पर्यंत रुपये 6,528/- कमी जमा केले. त्या रकमेवर तक्रारदारांनी 21 टक्के व्याजाची मागणी केली आहे. परंतु वर नमूद केल्याप्रमाणे दिनांक 30/6/2006 पासून देय रक्कमेवर 13 टक्के व्याज योग्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत आहे.
18. तक्रार क्रमांक 639/2010 यामध्ये मुदत ठेव पावती क्रमांक 4931 रक्कम रुपये 95,631/- असे गुंतविले होते. तक्रारदाराच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे सामनेवाले यांनी दिनांक 30/6/2006 पासून त्या रक्कमेवर कमी दराने व्याज दिले व एकूण रुपये 13,632/- कमी व्याज जमा केले. या रक्कमेवर तक्रारदारांनी 21 टक्के व्याजाची मागणी केली आहे. परंतु दिनांक 30/06/2008 पासून व्याजाचा दर 13 टक्के योग्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत आहे.
19. तक्रार क्रमांक 640/2010 यामध्ये तक्रारदारांनी “अक्षय पेंशन योजने” अंतर्गत मुदत ठेव पावती क्रमांक 4929 रुपये 1,22,327/- सामनेवाले यांचेकडे दिनांक 1/1/2002 रोजी जमा केले. व्याजाचा दर 13 टक्के पावतीमध्ये नमूद आहे. तक्रारदाराच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे सामनेवाले यांनी दिनांक 30/6/2006 पासून त्या रक्कमेवर कमी दराने व्याज जमा केले व फरकाची रक्कम रुपये 12,232/- अशी आहे. त्यावर दिनांक 30/6/2008 पासून व्याजाचा दर 13 टक्के योग्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत आहे.
20. तक्रार क्रमांक 641/2010 यामधील तक्रारदारांनी “अक्षय पेंशन योजने” अंतर्गत मुदत ठेव पावती क्रमांक 4615 रुपये 84,059/- सामनेवाले यांचेकडे जमा केले. पावतीमध्ये व्याजाचा दर 13 टक्के नमूद आहे. तक्रारदाराच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे सामनेवाले यांनी दिनांक 30/6/2006 पासून दिनांक 30/06/2008 पर्यंत त्या रक्कमेवर कमी दराने व्याज जमा केले व फरकाची रक्कम रुपये 6,048/- अशी आहे. त्यावर देखील व्याजाचा दर 13 टक्के योग्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत आहे.
21. वरील सर्व तक्रारींमध्ये प्रत्येक तक्रारदारांनी नुकसानभरपाई रुपये 50,000/- ची मागणी केलेली आहे. परंतु तक्रारदारांना फरकाची रक्कम 13 टक्के व्याज दराने प्राप्त होणार असल्याने वेगळी नुकसानभरपाई अदा करण्याचा निर्देश देणे योग्य व न्याय्य असणार नाही, असे प्रस्तुत मंचाचे मत आहे. त्यातही पुढील व्याज म्हणजेच दिनांक 30/6/2008 नंतरचे व्याज देखील प्रत्येक खात्यामध्ये 13 टक्के दराने आकारावे असा निर्देश सामनेवाले यांना दिला जात असल्याने वेगळा नुकसानभरपाईचा आदेश करण्याची आवश्यकता नाही. तथापि प्रत्येक तक्रारींमध्ये तक्रारदारांनी तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 10,000/- ची मागणी केलेली आहे, जी योग्य आहे असे प्रस्तुत मंचाचे मत आहे.
22. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षानुरुप पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 575/2010 अंशतः मंजूर करण्यात येते.
(अ) सामनेवाले यांनी तक्रारदारांना त्रैमासिक “अक्षय पेंशन योजने”
अंतर्गत त्रैमासिक व्याज/पेंशन कमी दराने अदा करुन सेवा सुविधा
पुरविण्यात कसूर केली असे जाहिर करण्यात येते.
(ब) सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कमी व्याज/पेंशन अदा केल्याबद्दल
फरकाचे रुपये 17,888/- ही रक्कम दिनांक 30/6/2008 पासून 13
टक्के व्याज दराने अदा करावी.
(क) सामनेवाले यांनी तक्रारदार यांना “अक्षय पेंशन योजने” अंतर्गत मुदत
ठेव पावती क्रमांक 4930 व 3077 या दोन्ही मुदतठेवीच्या पावतीमधील
रक्कमेवर दिनांक 30/6/2008 पासून 13 टक्के दराने व्याज द्यावे
असाही सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो.
2. तक्रार क्रमांक 638/2010 अंशतः मंजूर करण्यात येते.
(अ) सामनेवाले यांनी तक्रारदारांना त्यांची “अक्षय पेंशन योजने”
अंतर्गत असलेली मुदत ठेव पावती क्रमांक 0650 व 3076 यामध्ये
दिनांक 30/6/2008 पासून कमी दराने व्याज/त्रैमासिक पेंशन अदा करुन
सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली असे जाहिर करण्यात येते.
(ब) सामनेवाले यांनी त्याबद्दल तक्रारदार यांना रुपये 6528/- ही रक्कम
फरकाच्या मागील व्याजाबद्दल दिनांक 30/6/2008 पासून 13 टक्के
व्याज दराने अदा करावी, असाही सामनेवाले यांना आदेश देण्यात
येतो.
(क) सामनेवाले यांनी तक्रारदार यांना वरील दोन्ही मुदत ठेवीच्या
पावतीमधील रक्कमेवर 13 टक्के दराने दिनांक 30/6/2008 पासून
पुढील व्याज द्यावे असाही सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो.
3. तक्रार क्रमांक 639/2010 अंशतः मंजूर करण्यात येते.
(अ) सामनेवाले यांनी तक्रारदार यांना “अक्षय पेंशन योजने” अंतर्गत
त्रैमासिक व्याज/पेंशन कमी दराने अदा करण्यात कसूर करुन सेवा
सुविधा पुरविण्यात कसूर केली असे जाहिर करण्यात येते.
(ब) सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कमी व्याज/पेंशन अदा केल्याबद्दल
फरकाची रक्कम रुपये 16,632/- ही रक्कम दिनांक 30/6/2008
पासून 13 टक्के व्याज दराने अदा करावी असा सामनेवाले यांना
निर्देश देण्यात येतो.
(क) त्याचप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना “अक्षय पेंशन योजने”
अंतर्गत मुदत ठेव पावती क्रमांक 4931 या मुदतठेवीच्या पावतीमधील
रक्कमेवर दिनांक 30/6/2008 पासून 13 टक्के दराने पुढील
व्याजाची आकारणी करण्यात यावी असा निर्देश सामनेवाले यांना
देण्यात येतो.
4. तक्रार क्रमांक 640/2010 अंशतः मंजूर करण्यात येते.
(अ) सामनेवाले यांनी तक्रारदार यांना “अक्षय पेंशन योजने” अंतर्गत
व्याजाची/त्रैमासिक पेंशनची रक्कम कमी दराने अदा करुन सेवा
सुविधा पुरविण्यात कसूर केली असे जाहिर करण्यात येते.
(ब) सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कमी व्याज/पेंशन अदा केल्याबद्दल
फरकाची रक्कम रुपये 12,232/- ही रक्कम दिनांक 30/6/2008
पासून 13 टक्के व्याज दराने अदा करावी असा सामनेवाले यांना
निर्देश देण्यात येतो.
(क) सामनेवाले यांनी तक्रारदार यांची “अक्षय पेंशन योजने”
अंतर्गत मुदत ठेव पावती क्रमांक 4929 या मुदतठेवीच्या पावतीमधील
रक्कमेवर दिनांक 30/6/2008 पासून पुढील व्याजाची 13 टक्के दराने
आकारणी करण्यात यावी असा निर्देश सामनेवाले यांना देण्यात
येतो.
5. तक्रार क्रमांक 641/2010 अंशतः मंजूर करण्यात येते.
(अ) सामनेवाले यांनी तक्रारदार यांना “अक्षय पेंशन योजने” अंतर्गत
कमी दराने त्रैमासिक व्याज/पेंशन अदा करण्यात कसूर करुन सेवा
सुविधा पुरविण्यात कसूर केली असे जाहिर करण्यात येते.
(ब) सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कमी व्याज/पेंशन अदा केल्याबद्दल
फरकाची रक्कम रुपये 6,048/- ही रक्कम दिनांक 30/6/2008
पासून 13 टक्के व्याज दराने अदा करावी असा सामनेवाले यांना
आदेश देण्यात येतो.
(क) सामनेवाले यांनी तक्रारदार यांना “अक्षय पेंशन योजने” अंतर्गत
मुदत ठेव पावती क्रमांक 4615 या मुदतठेवीच्या पावतीमधील
रक्कमेवर दिनांक 30/6/2008 पासून 13 टक्के दराने पुढील
व्याजाची आकारणी करण्यात यावी असा निर्देश सामनेवाले यांना
देण्यात येतो.
6. सामनेवाले यांनी प्रत्येक तक्रारीमध्ये तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चाबद्दल
रुपये 10,000/- एकत्रीतपणे आदा करावेत असाही आदेश सामनेवाले
यांना देण्यात येतो.
7. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 16/07/2013
( एस. आर. सानप ) (ज.ल.देशपांडे)
सदस्य अध्यक्ष
एम.एम.टी./-