नि.१८
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र.१८५२/०९
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : २५/५/२००९
तक्रार दाखल तारीख : १/६/२००९
निकाल तारीख : २७/०९/२०११
-------------------------------------------
१. श्री शामसुंदर बेगराज झंवर
व.व. – ५५, धंदा – व्यापार
रा.सरस्वती नगर, सांगली ..... तक्रारदारú
विरुध्द
१. मॅनेजर, बॅंक ऑफ बरोडा,
शाखा हायस्कूल रोड, सांगली .....जाबदार
तक्रारदारú तर्फे: +ìb÷.जे.एस. कुलकर्णी
जाबदारतर्फे :+ìb÷.पी.व्ही.नरवाडकर, श्री एस.एम.चौगुले
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज हा त्याच्या खात्यावरील रकमेबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांचे जाबदार या बॅंकेमध्ये विठ्ठल ट्रेडींग कंपनी या नावाने चालू खाते आहे. सदर खात्यावरील उतारा तक्रारदार यांनी दि.३१/३/२००९ रोजी घेतला असता दि.१/१०/२००६ पासून दि.३१/३/२००९ या कालावधीमध्ये बॅंकेने तक्रारदाराचे खात्यावरुन काही रक्कम कपात केल्याचे दिसून आले. त्याबाबत जाबदार यांचेकडे चौकशी केली असता जाबदार यांनी सदर खात्यामध्ये कमीत कमी शिल्लक ही रु.१०,०००/- न ठेवल्यामुळे तक्रारदाराच्या खात्यातून दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. तक्रारदाराच्या खात्यावर खाते खोलताना कमीत कमी रक्कम ही रु.५,०००/- ठेवणेची अट होती. सदरची कमीत कमी शिल्लक ठेवणेची अट जाबदार यांनी बदलून रु.१०,०००/- केली त्याबाबत तक्रारदार यांना कोणतीच माहिती नव्हती. जाबदार यांनी दिलेल्या या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांनी सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ३ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार यांनी याकामी हजर होवून नि.११ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांचे त्यांच्या बॅंकेमध्ये खाते असलयाचे मान्य केले आहे. सदर खात्यावर दि.१/७/२००६ पर्यंत रु.६,९६९/- इतकी थकबाकी होती ही गोष्ट जाबदार यांनी मान्य केली आहे. परंतु बॅंकेच्या नियमाप्रमाणे दि.१/१०/२००६ पासून कमीत कमी रु.१०,०००/- इतकी रककम शिल्लक ठेवणे गरजेचे होते व त्याबाबतची सूचना बॅंकेच्या नोटीस बोर्डवर लावणेत आली होती. तक्रारदार यांनी खात्यावर कमीत कमी रु.१०,०००/- शिललक ठेवली नाही त्यामुळे तकारदार यांचे खात्यावरुन वेळोवेळी रक्कम कपात करण्यात आली आहे, ती नियमाप्रमाणे योग्य आहे. तक्रारदार यांनी सदरचे खाते व्यापारी कारणासाठी काढले आहे त्यामुळे तो ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार ग्राहक होत नाही. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मुदतबाहय झाला आहे. या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१२ ला प्रतिज्ञापत्र व नि.१३ च्या यादीने तीन कागद दाखल केले आहेत.
४. तक्रारदार यांनी नि.१४ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार यांनी नि.१७ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये विधिज्ञ तोंडी युक्तिवादासाठी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे प्रस्तुत प्रकरण निकालासाठी ठेवणेत आले. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल करण्यात आलेली कागदपत्रे, दोन्ही बाजूंनी दाखल करण्यात आलेला लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले असता खालील मुद्दे मंचाचे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
१. तक्रारदार ग्राहक म्हणून सदरहू तक्रारअर्ज
दाखल करु शकतात का ? होय.
२. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा
दिली आहे का ? होय.
३. तक्रारदार मागणीप्रमाणे अनुतोष मिळणेस पात्र आहे का ? होय.
४. तक्रारअर्ज मुदतबाहय झाला आहे का ? नाही.
५. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
विवेचन
५. मुद्दा क्र.१ –
तक्रारदार यांनी सदरचे खाते व्यापारी कारणासाठी काढले असल्यामुळे तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार ग्राहक होत नाही असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. तक्रारदार यांचे खाते मे.विठ्ठल ट्रेडींग कंपनी या नावचे आहे ही मान्य वस्तुस्थिती आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील ग्राहक या व्याख्येनुसार व्यापारी कारणासाठी एखादी सेवा घेतली असेल तर तो ग्राहक होत नाही. परंतु व्यापारी कारणासाठी सेवा घेताना जर एखादी व्यक्ती स्वत:च्या स्वयंरोजगारातून असा व्यापार करत असेल तर सदरचा व्यापारासाठी घेण्यात आलेली सेवा ही ग्राहक या संज्ञेत येते. जाबदार यांनी केवळ सदरची सेवा व्यापारी कारणासाठी घेतली आहे त्यामुळे तो तक्रारदार ग्राहक होत नाही असे नमूद केले आहे. जाबदार यांनी नि.१३/१ वर तक्रारदार यांचा खाते उघडण्याचा अर्ज दाखल केला आहे. सदर खाते हे विठ्ठल ट्रेडींग कंपनी या नावचे आहे व त्याच्या पुढे कंसामध्ये एच.यु.एफ. असे नमूद आहे. याचाच अर्थ सदरचा व्यापार हा हिंदू अविभक्त कुटुंबासाठी आहे. तक्रारदार यांनी सदर फॉर्ममध्ये त्याचा व्यापार हा जनरल मर्चंट व कमिशन एजंट असा असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे तक्रारदार यांचा व्यापार हा प्रथमदर्शनी स्वयंरोजगारातून नफा कमविणेचा असलेचे दिसून येते. परंतु सदरचा व्यापार हा तक्रारदाराच्या स्वयंरोजगारातून करण्यात येत नसून मोठया प्रमाणावर आहे व त्यासाठी सदरची सेवा घेतली आहे हे जाबदार यांनी पुराव्यानिशी शाबीत करणे गरजेचे आहे. जाबदार यांनी सदरची बाब शाबीत केली नसल्याने जाबदार यांचे कथनामध्ये कोणतेही तथ्य नाही असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार हा ग्राहक या संज्ञेतील व्याख्येप्रमाणे ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
६. मुद्दा क्र.२
तक्रारदार यांचे खात्यावर दि.१/७/२००६ पर्यंत रक्कम रु.६,९६९/- इतकी शिल्लक होती व सदरच्या शिलकीतून जाबदार यांनी रु.१०,०००/- ही कमीत कमी शिल्लक ठेवली नाही म्हणून दंडात्मक रक्कम कपात केली आहे. जाबदार यांनी त्याबाबत बॅंकेच्या नियमाप्रमाणे व धोरणाप्रमाणे सदरची कृती केली आहे असे नमूद केले आहे. बॅंकेचे नियम व धोरण हे दि. १/१०/२००६ रोजी बदलले आहेत. वस्तुत: तक्रारदार यांचा फॉर्म भरुन घेताना त्यावर कमीत कमी शिल्लक रक्कम रु.५,०००/- ठेवण्याची अट असल्याचे दिसून येते. सदरची अटी बॅंकेने त्यंच्या धोरणात्मक निर्णयानुसार बदलली आहे परंतुया बदलाबाबत तक्रारदार यांना काहीही कळविलेले नाही. सदरची बदललेली अट केवळ बॅंकेच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावून सर्वांना समजली असे मानणे चुकीचे होईल असे या मंचाचे मत आहे. तक्रारदाराच्या खात्यावरील रकमेवर परिणाम करणारी बाब तसेच तक्रारदार यांनी खाते उघडताना तक्रारदार व बॅंकेत कमीत कमी शिल्लक रक्कम ठेवणेबाबत झालेला एकप्रकारचा करार असताना सदर शिल्लक रकमेची अट एकतर्फा बदलून त्याप्रमाणे खात्यावरील रक्कम दंड म्हणून कमी करणे तसेच असा महत्वपूर्ण बदल करताना खातेदारास त्याची सूचना वैयक्तिक न देणे ही बाब समर्थनीय नाही. तक्रारदार यांना खात्यावर कमीत कमी शिल्लक रक्कम रु.५,०००/- ठेवणे बाबत नियम बदलला आहे ही बाब माहिती असती तर तक्रारदार यांनी खाते पुढे चालू ठेवायचे की नाही अथवा रक्कम रु.१०,०००/- शिल्लक ठेवणेबाबत खबरदारी घेतली असती. परंतु तक्रारदार यांना जाबदार बॅंकेने काहीही कळविले नाही व बॅंकेच्या नोटीस बोर्डवर याबाबत माहिती प्रसिध्द करुन तक्रारदार यांना समजले असे मानून केलेली कारवाई ही जाबदार बॅंकेच्या सदोष सेवेचे द्योतक आहे या निष्कर्षाप्रत सदरचा मंच येत आहे. जाबदार यांनी याकामी एक निवाडा दाखल केला आहे परंतु त्यातील वस्तुस्थिती व तक्रारअर्जातील वस्तुस्थिती भिन्न असल्यामुळे सदरचा निवाडा याकामी लागू होत नाही.
७. मुद्दा क्र.३
तक्रारदार यांचे खात्यावर दि.१/७/२००६ पर्यंत रक्कम रु.६,९६९/- इतकी रक्कम शिल्लक होती ही बाब उभयपक्षी मान्य आहे. सदरची दि.१/७/२००६ रोजी शिल्लक असणारी रक्कम मिळावी अशी तक्रारदार यांनी मागणी केली आहे. तक्रारदार यांचे खात्यावरील रक्कम अयोग्य पध्दतीने जाबदार यांनी कापून घेतली या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला असलेने तक्रारदार यांनी मागणी केलेप्रमाणे दि.१/७/२००६ रोजी खात्यावर असणारी रक्कम रु.६,९६९/- तक्रारदार यांना परत देणेबाबत आदेश करणे योग्य होईल असे या मंचाचे मत आहे. सदर रकमेवर तक्रारदार यांनी व्याजाची मागणी केली नाही. परंतु जाबदार यांना सदर रक्कम परत करणेसाठी वेळेचे बंधन घालणे आवश्यक आहे. जाबदार यांनी दिलेल्या वेळेत रक्कम अदा न केल्यास सदर रकमेवर तक्रारदार यांना तक्रारअर्जाचे तारखेपासून व्याज मंजूर करण्यात येत आहे.
८. तक्रारदार यांनी शारिरिक मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. जाबदार यांनी अवलंबिलेल्या अनुचित व्यापारी पध्दतीमुळे तक्रारदार यांना निश्चितच शारिरिक मानसिक त्रासास सामोरे जावे लागले आहे व या मंचामध्ये प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल करावा लागला आहे. त्यामुळे तक्रारदार यांची सदरची मागणी अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
९. मुद्दा क्र.४
तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मुदतबाहय झाला आहे असे जादार यांनी नमूद केले आहे. परंतु तक्रारदार यांनी त्यांचे खात्यावरील रक्कम बेकायदेशीररित्या कपात झाल्याचे पूर्ण खातेउतारा दि.३१/३/२००९ रोजी काढल्यानंतर प्रथमत: समजून आल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रार करण्यास प्रथमत: कारण दि.३१/३/२००९ रोजी घडले तत्पूर्वी तक्रारदार यांना सदरची बाब माहित होती. हे जाबदार यांनी पुराव्यानिशी सिध्द केले नाही. त्यामुळे तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मुदतबाहय झाला आहे या जाबदार यांचे कथनामध्ये कोणतेही तथ्य नाही असे या मंचाचे मत झाले आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
२. तक्रारदार यांना जाबदार यांनी रक्कम रु.६,९६९/- दि.११/११/२०११ पर्यंत अदा करावेत असा
जाबदार यांना आदेश करण्यात येतो.
३. तक्रारदार यांना जाबदार यांनी दि.११/११/२०११ पर्यंत रक्कम अदा न केल्यास जाबदार यांना
सदर रकमेवर तक्रारअर्ज दाखल तारखेपासून द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज अदा करावे
लागेल.
४. तक्रारदार यांना जाबदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार
अर्जाचा खर्च म्हणून रुपये २,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार माञ) अदा करावेत.
५. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार यांनी दिनांक १०/११/२०११ पर्यंत करणेची आहे.
६. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक
संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. २७/०९/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११