(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 30/03/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्यानी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दि.30.03.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार तो वाहक म्हणून कार्यरत असतांना त्याचा अपघात झाला. तक्रारकर्त्याने मोटर वाहन अपघात प्राधिकरण, नागपूर येथे सि.पी. क्र.953/1997 दाखल केले, त्याने मा. न्यायाधिशांनी आदेश पारित करुन त्यातील रक्कम रु.2,02,646/- बँकेत एक वर्षाकरीता मुदत ठेव म्हणून ठेवण्याचा आदेश आदेश दिला व त्याप्रमाणे रु.2,02,646/- चा अकाऊंट पेयी धनादेश क्र.96850 दि.28.07.2008 रोजी गैरअर्जदार बँकेच्या नावे देण्यांत आला. तक्रारकर्ता हा गैरअर्जदार बँकेचा खातेदार असुन त्याचा बँक खाते क्र.07070100007362 असा आहे.
3. सदर ठेवीची मुदत संपल्यावर तक्रारकर्त्याने डिसेंबर-2009 रोजी सदर्हू रक्कम व्याजासहीत देण्याबाबत बँकेला विनंती केली असता सदर मुदत ठेवींची पावती मिळत नसल्याचे कारणास्तव गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास वारंवार परत पाठविले. शेवटी एप्रिल-2011 मधे मुदत ठेवीची देय रक्कम देण्याची विनंती केली असता गैरअर्जदारांनी सदरचा धनादेश अजुन पर्यंत वटवला गेला नाही. या कारणास्तव रक्कम देण्यांस असमर्थता दर्शविली. तक्रारकर्त्याने सदरचा धनादेश परत देण्यासंबंधी मागणी केली, त्यायोगे कोर्टाकडे तो धनादेश परत करुन दुसरा देण्याबाबत विनंती करता येईल. परंतु वारंवार मागणी करुनही गैरअर्जदारांनी सदरचा धनादेश तक्रारकर्त्यास परत केला नाही, ही गैरअर्जदारांची कृति त्यांचे सेवेतील कमतरता असल्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
3. तक्रारकर्त्यानी प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात दस्तावेज क्र.1 ते 5 च्या छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत.
4. गैरअर्जदारांना प्रस्तुत प्रकरणात नोटीस बजावला असता ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपल्या कथनात तक्रारकर्त्याने कधीही सदरचा धनादेश गैरअर्जदारांना दिलेला नाही, त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ‘ग्राहक’, नाही. म्हणून सदरची तक्रार चालविण्याचा या मंचास अधिकार नाही.
5. गैरअर्जदारांच्या मते तक्रारकर्त्यास सदरचा धनादेश दिल्यासंदर्भातील दस्तावेजांची मागणी करुनही तक्रारकर्त्याने सदरचे दस्तावेज किंवा धनादेश गैरअर्जदारांना दिल्याची पोचपावती तसेच मुदत ठेवीचा नंबर सादर केला नाही. तसेच गैरअर्जदारांनी आपल्या रेकॉर्डवरुन सुध्दा सदर मुदत ठेवीची पावती किंवा धनादेश मिळाल्याचे दस्तावेज सापडले नाही. तक्रारकर्त्याची सदरची तक्रार ही खोटी व बनावट असुन गैरअर्जदारांना त्रास देण्यांचे उद्देशाने दाखल आहे, त्यामुळे ती दंडासह खारीज करावी अशी मंचास विनंती केलेली आहे.
6. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.15.03.2012 रोजी आली असता मंचाने तक्रारकर्त्याचा युक्तिवाद ऐकला, गैरअर्जदार गैरहजर. तसेच तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
- // नि ष्क र्ष // -
7. सदर प्रकरणातील एकंदर वस्तुस्थिती व दाखल दस्तावेज पाहता तक्रारकर्त्याचे कथनानुसार रु.2,02,646/- चा अकाऊंट पेयी धनादेश क्र.96850 दि.28.07.2008 रोजी गैरअर्जदार बँकेत जमा केल्याचे म्हटले आहे. परंतु तो धनादेश जमा केल्याचा कुठलाही सुस्पष्ट पुरावा तक्रारकर्ता सादर करु न शकल्यामुळे यामधे गैरअर्जदार बँकेची सेवेत कमतरता आहे असे म्हणता येणार नाही. पान क्र.29 वर दाखल दस्तावेजावरुन सदरचा धनादेश अजुनही वटविल्या गेला नाही, असे दिसुन येते, त्यामुळे तक्रारकर्त्याने तशी पुर्व सुचना संबंधीत कोषागार (ट्रेझरी) ला देऊन त्यांना डुप्लीकेट धनादेश/ पे-ऑर्डर देण्याबाबतची विनंती करावी.
8. वरील सर्व बाबी लक्षात घेता व प्रकरणातील एकंदरीत वस्तुस्थिती पाहता गैरअर्जदार बँकेच्या सेवेत कमतरता आहे हे तक्रारकर्त्याचे म्हणणे सुस्पष्ट पुराव्या अभावी या मंचास मान्य करता येणार नाही. सबब सदरची तक्रार निकाली काढण्यांत येते.
सबब हे मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार निकाली काढण्यांत येते.
2. उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा.