(आदेश पारीत व्दारा - श्री शेखर प्र. मुळे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 26 ऑक्टोंबर, 2017)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये, ही तक्रार विरुध्दपक्ष बँक ऑफ बरोदा आणि तीचे शाखा प्रबंधक आणि मॅनेजींग डायरेक्टर, तसेच कॅनरा बँक आणि तीचे शाखा प्रबंधक आणि मॅनेजींग डायरेक्टर यांचेविरुध्द धनादेश वटविल्यासंबंधी निष्काळजीपणा आणि अनुचित व्यापार पध्दतीचा व्यापार केल्यासंबंधी दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारकर्त्याचे विरुध्दपक्ष क्रमांक 1 बँकेत 04650100008977 नंबरचे बचत खाते आहे. घटनेच्यावेळी विरुध्दपक्ष क्र.2 च्या बँकेचे शाखा प्रबंधक आणि विरुध्दपक्ष क्रमांक 3 मॅनेजींग डायरेक्टर होते. तक्रारकर्त्याला दिनांक 11.1.2012 चा धनादेश क्रमांक 928001 मिळाला होता, तो धनादेश रुपये 2,84,623/- चा होता आणि विरुध्दपक्ष क्र.4 या बँके मार्फत जारी करण्यात आला होता. विरुध्दपक्ष क्र.5 हे विरुध्दपक्ष क्र.4 बँकेचे शाखा प्रबंधक आणि विरुध्दपक्ष क्र.6 हे विरुध्दपक्ष क्र.4 चे मॅनेजींग डायरेक्टर होते. तक्रारकर्त्याला तो धनादेश उपजिल्हाधिकारी जमीन अधिग्रहण, नागपुर आणि प्रोजेक्ट डायरेक्टर, NHAI–PIU-AMRAVATI यांनी तक्रारकर्त्याची जमीन अधिग्रहण केल्यामुळे नुकसान भरपाई म्हणून दिले होते. तक्रारकर्त्याने त्या धनादेशाची एक झेरॉक्स प्रत काढली होती आणि नंतर तो धनादेश विरुध्दपक्ष क्र.1 बँकेत वटविण्यासाठी दिला होता, तो बराच अवधी लोटल्यानंतरही त्याच्या खात्यात धनादेशाची रक्कम जमा न झाल्यामुळे त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 कडे चौकशी केली. त्यावेळी, विरुध्दपक्ष क्र.2 ने विरुध्दपक्ष क्र.4 आणि 5 कडून त्याबद्दल माहिती घेतली असता सांगण्यात आले की, तो धनादेश क्रॉस न केल्यामुळे बेअरर चेक होता आणि तो ज्याने धनादेश सादर केला त्याला त्याची रक्कम काऊंटरवरच देण्यात आली होती. वास्तविक पाहता, तक्रारकर्त्याला मिळालेला धनादेश क्रॉस केलेला आणि Account payee धनादेश होता. तक्रारकर्त्याला नंतर असे सुध्दा माहीत पडले की, त्या धनादेशावर खोड-तोड करुन त्याची रक्कम ‘व्ही.डी. पाठक’ नावाच्या इसमाला देण्यात आली होती, ज्याला तक्रारकर्ता ओळखत नाही. तक्रारकर्त्याने तो धनादेश ‘पाठक’ या व्यक्तीला किंवा कोणत्याही व्यक्तीला वटविण्यासाठी दिला नव्हता. तक्रारकर्त्याने नंतर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविली, त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, ‘पाठक’ नावाच्या व्यक्तीचा शोध लागला नाही. तक्रारकर्त्याचा असा आरोप आहे की, तो धनादेश वटविण्यामध्ये विरुध्दपक्षांनी निष्काळजीपणा केला असून त्यांच्या चुकीमुळे आणि निष्काळजीपणामुळे त्याचे आर्थिक नुकसान झाले. म्हणून त्याने या तक्रारीव्दारे अशी विनंती केली आहे की, धनादेशाची रक्कम 18 % टक्के व्याजासह विरुध्दपक्षाने द्यावी असा आदेश देण्यात यावा. तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या त्रासाबद्दल रुपये 1,00,000/- नुकसान भरपाई आणि रुपये 30,000/- तक्रारीचा खर्च विरुध्दपक्षाने द्यावा.
3. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्षांना मंचा मार्फत नोटीस पाठविण्यात आल्या. त्यानुसार विरुध्दपक्ष क्र.1 यांनी तक्रारीला आपला लेखी जबाब सादर करुन त्यातील मजकुर नाकबूल केले. त्यांनी हे नाकबूल केले आहे की, तक्रारकर्त्याने सदर धनादेश त्यांचेकडे जमा केला होता. परंतु, ही बाब मान्य केली आहे की, तक्रारकर्त्याचे त्यांचेकडे बचत खाते असून विरुध्दपक्ष क्र.2 बँकेचे शाखा प्रबंधक होते. परंतु, आता विरुध्दपक्ष क्र.2 सेवानिवृत्त झालेले आहे, तसेच विरुध्दपक्ष क्र.3 सुध्दा सेवानिवृत्त झाले आहे. विरुध्दपक्ष क्र.1 ने ही बाब नाकबूल केली आहे की, सदर धनादेश A/C Payee (क्रॉस चेक) होता. त्यांनी हे नाकबूल केलेले नाही की, सदर धनादेशाची रक्कम तक्रारकर्त्याच्या खात्यात जमा न झाल्याने त्याने त्यांचेकडे त्याबद्दल चौकशी केली होती. तसेच, हे सुध्दा कबूल केले आहे की, त्यावेळी तक्रारकर्त्याला सांगण्यात आले होते की, तो धनादेश A/C Payee (क्रॉस चेक) नसल्याने त्याची रक्कम काऊंटरवरच देण्यात आली होती. अशाप्रकारे, त्यांचेकडून कुठलाही फसवणुकीचा किंवा पैशाचा अपहार झाला किंवा निष्काळजीपणा झाला, हा आरोप नाकबूल करुन तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
4. विरुध्दपक्ष क्र.2 ते 6 यांना तक्रारीची नोटीस मिळाली. परंतु, त्यांचे तर्फे कोणीही हजर न झाल्याने त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्यात आले.
5. तक्रारकर्त्याच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडून सुनावणीकरीता कोणीही हजर झाले नाही. केलेला युक्तीवाद व उभय पक्षांनी अभिलेखावर दाखल केलेले दस्ताऐवज इत्यादीवरुन खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
// निष्कर्ष //
6. तक्रारकर्त्याला त्याची जमीन अधिग्रहण केल्या संबंधी जमीन अधिग्रहण अधिका-यातर्फे नुकसान भरपाई रक्कम धनादेशाव्दारे देण्यात आली होती, ही बाब वादातीत नाही. जमीन अधिग्रहणाच्या रकमेच्या नुकसान भरपाईची रक्कम सरकार व्दारे नेहमी A/C Payee (क्रॉस चेक) व्दारे दिल्या जाते. विरुध्दपक्ष क्र.1 च्या या उत्तराशी आम्ही सहमत नाही की, सदर धनादेश हा बेअरर चेक होता आणि म्हणून तो काऊंटरवरच ताबडतोब वटविण्यात आला. जमीन अधिग्रहण संबंधी सरकारी कार्यालयाला स्पष्ट निर्देश आहे की ठरावीक रकमेच्या वरील नुकसान भरपाईची रक्कम ही फक्त A/C Payee (क्रॉस चेक) ने देण्यात यावी. वादातीत धनादेशाची रक्कम रुपये 2,00,000/- पेक्षा जास्त होती आणि म्हणून तो धनादेश A/C Payee (क्रॉस चेक) असला पाहीजे आणि त्या धनादेशाची प्रत तक्रारकर्त्याने दस्त क्र.1 म्हणून दाखल केली आहे.
7. तसेच, तक्रारकर्त्याने डिपॉझीट स्लीप दस्ताऐवज क्र.2 वर दाखल केली आहे. ज्यानुसार, वादातीत धनादेश विरुध्दपक्ष क्र.1 ला वटविण्यासाठी देण्यात आला होता. विरुध्दपक्ष क्र.1 ने असे म्हटले आहे की, तो धनादेश त्यांचेकडे कधीच जमा करण्यात आला नाही. परंतु, डिपॉझीट स्लीपवर विरुध्दपक्ष क्र.1 बँकेचा शिक्का आहे. त्याशिवाय, त्या स्लीपवर सदर धनादेशाचा क्रमांक, त्याची राक्कम आणि तक्रारकर्त्याच्या बचत खात्याचा नंबर सुध्दा लिहिलेला आहे. जो धनादेश तक्रारकर्त्याला जमीन अधिग्रहण कार्यालया मार्फत नुकसान भरपाईची रक्कम म्हणून देण्यात आला होता तो धनादेश या डिपॉझीट स्लीप व्दारे विरुध्दपक्ष क्र.1 कडे जमा केल्याचे दिसून येते. त्यामुळे तो धनादेश विरुध्दपक्ष क्र.1 कडेच जमा केला नाही या विरुध्दपक्ष क्र.1 च्या म्हणण्याला काही अर्थ दिसून येत नाही आणि हे उत्तर सर्वस्वी चुकीचे आणि निरर्थक आहे, असे दिसून येते.
8. आणखी एक आश्चर्याची बाब अशी की, सदर धनादेश विरुध्दपक्ष क्र.1 च्या धरमपेठ शाखेमध्ये जमा करण्यात आला होता, परंतु तो विरुध्दपक्ष क्र.4 या बँकेच्या सदर या शाखेमधून वटविल्या गेला. हे कसे शक्य झाले हे समजुन येत नाही. विरुध्दपक्ष क्र.2 ते 6 विशेषतः विरुध्दपक्ष क्र.4 कॅनरा बँक यांनी तक्रारीला उत्तर न दिल्यामुळे त्यांनी ही तक्रार जवळ-जवळ अप्रत्यक्षरित्या कबूल केली आहे, असे म्हणावे लागेल. एक A/C Payee (क्रॉस चेक) धनादेश तिस-या व्यक्तीच्या नावे काऊंटरवर कसा काय वटविल्या जातो, याचा खुलासा विरुध्दपक्षाकडून आला नाही. आम्हीं हे पूर्वीच नमूद केले आहे की, सदर धनादेश हा बेअरर चेक होता, हे विरुध्दपक्ष क्र.1 चे म्हणणे सर्वस्वी चुकीचे आणि तथ्यहीन दिसून येते.
9. अशाप्रकारे, एकंदर वस्तुस्थितीचा विचार करता ही तक्रार मंजुर करण्या लायक आहे. परंतु, सध्या परिस्थितीत ही तक्रार विरुध्दपक्ष बँकेच्या शाखा प्रबंधक आणि मॅनेजींग डायरेक्टर यांचेविरुध्द वैयक्तीक स्वरुपात मंजुर करण्यासाठी सबळ कारण नाही. केवळ विरुध्दपक्ष क्र.1 आणि 4 या दोन बँकस् सदरहू धनादेशाची रक्कम तक्रारकर्त्याला देणे लागते. सबब, तक्रारीत खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्र.1 आणि 4 विरुध्द अंशतः मंजुर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्र.1 बँक ऑफ बरोदा आणि विरुध्दपक्ष क्र.4 कॅनरा बँक यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी संयुक्तीकरित्या आणि वैयक्तीकरित्या सदरहू धनादेशाची रक्कम रुपये 2,84,623/- दिनांक 11.1.2012 पासून द.सा.द.शे. 12 % व्याजाने तक्रारकर्त्याला अदा करावी.
(3) तसेच, विरुध्दपक्ष क्र.1 बँक ऑफ बरोदा आणि विरुध्दपक्ष क्र.4 कॅनरा बँक यांनी संयुक्तीकरित्या आणि वैयक्तीकरित्या तक्रारकर्त्यास झालेल्या त्रासाबद्दल रुपये 10,000/- नुकसान भरपाई द्यावी आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5,000/- द्यावी.
(4) विरुध्दपक्ष क्र.1 बँक ऑफ बरोदा आणि विरुध्दपक्ष क्र.4 कॅनरा बँक यांनी आदेशाची पुर्तता निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.
(5) ही तक्रार विरुध्दपक्ष क्र.2, 3, 5 आणि 6 यांचेविरुध्द खारीज करण्यात येते.
(6) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 26/10/2017