द्वारा - श्री.शि.भि.धुमाळ : मा.अध्यक्ष
1) ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणे -
तक्रारदार हे हातगाडीवर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात व आपल्या कुटूंबासह वडाला (पूर्व), मुंबई - 37 येथे राहतात. दि.10/01/1996 ला तक्रारदारांनी सामनेवाला बँक ऑफ बडोदा यांचे जॅकोब सर्कल ब्रँचमध्ये बचत खाते क्र.6641 उघडले. सदरचे बचत खात्यावर तक्रारदार हे बँक ऑफ बडोदाच्या वडाळा शाखेतून व्यवहार करीत होते. तक्रारदारांच्या बचत खात्याचा नवीन क्र.24480100003210 असा आहे. तक्रारदारांनी बँकेच्या खाते पुस्तकाची छायांकित प्रत नि.‘A’ ला दाखल केली आहे.
2) दि.09/02/2009 रोजी तक्रारदारांनी वडाळा शाखेतून वरील बचत खात्यामध्ये रु.10,000/- जमा केले. दि.24/02/09 रोजी पुन्हा रक्कम रु.35,000/- तक्रारदारांनी बँक ऑफ बडोदाच्या वडाळा शाखेतून जॅकोब सर्कल शाखेतील त्यांच्या वरील बचत खात्यामध्ये जमा केले. दि.24/02/09 रोजी तक्रारदारांनी त्यांच्या खाते पुस्तकातील नोंदी अद्यावत केल्या तेंव्हा त्यांना मानसिक धक्का बसला कारण त्यांच्या खात्यातून दि.17/02/09 रोजी रक्कम रु.35,000/- कुणीतरी काढून नेली होती. तक्रारदारांना डूल्पीकेट खातेपुस्तिका देण्याचा खर्च म्हणून सामनेवाला यांनी त्यांच्या खात्यातून रु.57/- वजाती दाखविले होते. दि.24/02/09 रोजी तक्रारदारांच्या वरील बचत खात्यात फक्त रु.1,296/- शिल्लक दाखविण्यात आली होती. खातेपुस्तिकेतील वरील नोंदी पाहिल्यानंतर तक्रारदार ताबडतोब सामनेवाला क्र.2 – जॅकोब सर्कल शाखेत गेले व विचारणा केली, त्यावेळी कुणीतरी अज्ञात इसमाने तक्रारदारांच्या खात्यातून रक्कम रु.35,000/- काढून घेतल्याचे आढळून आले. तथापि, तक्रारदारांनी सुटा धनादेश सामनेवाला यांना देवून त्या आधारे रु.35,000/- काढले असा खोटा धनादेश तक्रारदारांना दाखविण्यात आला. तक्रारदारांना सदर धनादेशावरील सही त्यांची नसल्याचे दिसून आले व ही बाब त्यांनी सामनेवाला यांचे संबंधीत अधिका-यांना सांगितली. खोटया धनादेशाच्या आधारे तक्रारदारांच्या खात्यातील रक्कम रु.35,000/- काढून दिले ही सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता आहे असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. दि.26/02/08 रोजी तक्रारदारांनी याबाबत आग्रीपाडा पोलीस स्टेशनला फीर्याद दाखल केली. परंतु त्या पोलीस स्टेशनमधील अधिका-यांनी तक्रारदारांची फीर्याद नोंदवून घेण्याचे नाकारले. तक्रारदारांनी सामनेवाला बँकेकडे याबाबत अर्ज करावा असा सल्ला पोलिसांनी तक्रारदारांना दिला. मार्च,09 च्या पहिल्या आठवडयात तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 - जॅकोब सर्कल शाखेत जाऊन पोलीसांनी अफरातफरीची चौकशी संबंधीत बँकेने करावी असा सल्ला दिल्याचे सांगितले. परंतु सामनेवाला क्र.2 यांच्या अधिका-यांनी तक्रारदारांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तक्रारदारांनी पुन्हा पुन्हा सामनेवाला क्र.2 बँकेत हेलपाटे मारल्यानंतर दि.28/03/2009 रोजी सामनेवाला क्र.2 यांनी विथ्ड्रॉवल स्लिप व डूप्लीकेट खातेपुस्तिकेसाठी केलेला अर्ज तक्रारदारांना दाखविला. तक्रारदारांनी विथ्ड्रॉवल स्लिप व डूप्लीकेट खातेपुस्तिकेसाठी केलेल्या अर्जावरील सहया आपल्या नाहीत असे सामनेवाला यांना सांगितले. उघडया डोळयांनीसुध्दा सदरच्या सहया तक्रारदारांच्या नाहीत असे दिसून येते. सामनेवाला क्र.2 यांनी त्यांच्या सेवेतील कमतरता मान्य करुन तक्रारदारांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई दिली जाईल असा प्रस्ताव दिला परंतु संपूर्ण रक्कम रु.35,000/- दिली जाणार नाही असे सांगितले. तक्रारदार यांचे म्हणण्याप्रमाणे सामनेवाला क्र.2 यांच्या अधिका-यांचा/कर्मचा-यांचा वरील अफरातफरीमध्ये हात असावा नाहीतर सामनेवाला यांनी तक्रारदारांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले नसते. सामनेवाला यांच्या अधिका-यांनी कोणतीही चौकशी न करता बनावट सहयांच्या अधारे तक्रारदारांच्या खात्यातील पैसे काढून घेतले असा तक्रारदारांचा आरोप आहे.
3) तक्रारदार अशिक्षित असून त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठया कष्टाने सामनेवाला बँकेत पैसे जमा केले. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांच्या तक्रारीकडे गंभीरपणे लक्ष दिले नाही म्हणून तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि.31/03/09 रोजी वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली व त्यांच्या खात्यातून परस्पर काढण्यात आलेली रक्कम रु.35,000/- त्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी केली. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांच्या नोटीसीला उत्तर दिले व एप्रिल, 09 मध्ये वर्षअखेरीचे दिवस असल्यामुळे तक्रारदारांच्या तक्रारीबाबत नंतर विचार करु असे सांगितले. सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या मागणीस प्रतिसाद न दिल्यामुळे तक्रारदारांना सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दाखल करावा लागला. सामनेवाला यांनी तक्रारदारांची फसवणूक करुन आर्थिक नुकसान केले व त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास सहन करावा लागला. सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या बचत खात्यात पुन्हा रक्कम रु.35,000/- जमा करावी व वरील रकमेवर दि.17/02/09 पासून रक्कम जमा करेपर्यंत द.सा.द.शे. 21 टक्के दराने व्याज द्यावे असा सामनेवाला यांना आदेश करावा अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांना झालेल्या नुकसानीपोटी नुकसानभरपाई म्हणून सामनेवाला यांनी रक्कम रु.3 लाख व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2 लाख तसेच या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.25,000/- तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून मागितले आहेत.
4) तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत नि.‘A’ to ‘D’कागदपत्रांच्या छायांकित प्रती दाखल केल्या असून तक्रारअर्जाच्या पुष्टयर्थ स्वतःचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
5) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी एकत्रितरित्या कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्य केली. तक्रारदारांचा तक्रारअर्ज खोटा व चुकीचा असून सामनेवाला यांना त्रास देण्यासाठी व सामनेवाला यांचेकडून पैसे उकळण्यासाठी सदरचा तक्रारअर्ज दाखल केलेला असल्यामुळे तो खर्चासहित रद्द करणेत यावा. तक्रारदारांनी तक्रारअर्जात केलेले आरोप गंभीर स्वरुपाचे असून त्याबाबत पुरावा देणे आवश्यक आहे. सबब ग्राहक मंचास सदरचा अर्ज चालविण्याचा अधिकार नाही.
6) सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे दि.17/02/2009 रोजी तक्रारदार स्वतः सामनेवाला क्र.2 - जॅकोब सर्कल बँकेच्या शाखेमध्ये आले होते व त्यांनी धनादेशावर सही करुन त्यांच्या खात्यातील रक्कम काढून घेतली आहे. सामनेवाला यांनी तक्रारअर्जात केलेले सर्व आरोप नाकारले असून तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीप्रमाणे 'ग्राहक' नाहीत असे म्हटले आहे.
7) तक्रारदारांचे सामनेवाला क्र.2-बँक शाखेत बचत खाते आहे ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे. त्या खात्यावर जससशी रक्कम जमा झाली त्यांच्या नोंदी खाते पुस्तिकेमध्ये करण्यात आल्या आहेत. दि.17/02/09 रोजी तक्रारदार सामनेवाला क्र.2 बॅकेत आले त्यावेळी त्यांचे खाते पुस्तक गहाळ झाल्यामुळे डूप्लीकेट खातेपुस्तक त्यांना मिळावे असा लेखी अर्ज तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 यांचे अधिका-यांकडे दिला. संबंधीत अधिका-यांनी तक्रारदारांची अर्जावरील सही व त्यांच्याकडे असणा-या रेकॉर्डमधील सही यांची पडताळणी केली, तसेच तक्रारदारांच्या रॅकॉर्डमध्ये असणारा फोटो सुध्दा पाहिला. अर्जावरील सहीचे नमुन्याच्या सहीशी पडताळणी केल्यानंतर संबंधीत अधिका-यांनी तक्रारदारांना डूप्लीकेट खातेपुस्तक दिले. सामनेवाला बँकेमध्ये त्यांचे ग्राहकांना विथ्ड्रॉवल स्लिपवर रु.25,000/- पर्यंत रक्कम काढून दिली जाते. रु.25,000/-पेक्षा जास्त रक्कम काढावयाची असेल तर धनादेश द्यावा लागतो. ग्राहकाकडे धनादेश पुस्तिका नसल्यास सुटा धनादेश अशा ग्राहकांना उपलब्ध करुन दिला जातो व असा सुटा धनादेश दिल्यासंबंधीची नोंद रजिस्टरमध्ये केली जाते. तक्रारदारांना दि.17/02/2009 रोजी त्यांच्या खात्यातून एकूण रक्कम रु.35,000/- काढावयाची होती म्हणून त्यांना सुटा धनादेश क्र.789530 देण्यात आला. सदर धनादेशावर मजकूर लिहून व सही करुन सदरचा धनादेश तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 यांचे रोखपालाकडे दिला. रोखपालाने तक्रारदारांच्या धनादेशावरील सहीची व नमून्याच्या सहयांची पडताळणी केल्यानंतर सदरची सही नमून्याच्या सहया बरोबर असल्याचे आढळून आल्यानंतर तक्रारदारास रोख रक्कम रु.35,000/- देण्यात आली. सामनेवाला यांनी योग्य ती दक्षता घेतली असल्यामुळे सामनेवाला यांचे सेवेत कमतरता आहे असे म्हणता येणार नाही. सामनेवाला यांनी कैफीयतसोबत विथ्ड्रॉवल स्लिप (दि.20/04/09 व 22/04/09) व दि.24/02/09 च्या अर्जावरील सहींच्या छायांकित प्रती नि.’A’, ‘A1‘ आणि ‘B’ ला दाखल केल्या आहेत. वरील सहया तक्रारदारांच्याच आहेत याबद्दल वाद नाही. तक्रारदारांनी केलेले आरोप खोटे आहेत हे दाखविण्यासाठी तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे डूप्लीकेट खातेपुस्तिका मिळण्यासाठी केलेला अर्ज व वादातील सुटा धनादेशावरील तक्रारदारांच्या सहया दाखल करतील असे म्हटले आहे. तक्रारदारांच्या बचत खात्यातून कुणीतरी अज्ञात इसमाने रक्कम रु.35,000/- काढून घेतली हा तक्रारदारांचा आरोप सामनेवाला यांनी नाकारला आहे. सामनेवाला यांनी याबाबत योग्य ती दक्षता घेतली नाही हा आरोपही सामनेवाला यांनी नाकारला आहे. सामनेवाला यांच्या सेवेत कसलीही कमतरता नाही. तक्रारदार हे आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये फीर्याद देण्यास गेले होते याबाबत सामनेवाला यांना काहीही माहिती नाही. सामनेवाला यांनी तक्रारअर्ज परिच्छेद क्र.8 मधील मजकूर स्पष्टपणे नाकारला आहे. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदारांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते हाही तक्रारदारांचा आरोप सामनेवाला यांनी नाकारला आहे. सामनेवाला यांनी तक्रारअर्ज परिच्छेद क्र.9 मधील मजकूर सुध्दा नाकारला आहे. तक्रारदारांनी दि.31/03/09 रोजी पाठविलेच्या नोटीसमधील मजकूर पूर्णपणे चुकीचा आहे असे म्हटले आहे.
8) सामनेवाला यांनी वर्षअखेरच्या हिशोबाचे काम पूर्ण झाल्यानंतर तक्रारदारांच्या आरोपासंबंधी चौकशी केली असता तक्रारअर्ज खोटा असल्याचे निदर्शनास आले. सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता असून त्यांनी तक्रारदारांचे नुकसान केले हा तक्रारदारांनी केलेला आरोप सामनेवाला यांना मान्य नाही.
9)तक्रारदार हा गरीब इसम असल्यामुळे व त्याची आर्थिक परिस्थिती विचारात घेता केवळ माणूसकी म्हणून सामनेवाला यांनी तक्रारदारांचे बचत खात्यात रक्कम रु.35,000/- तात्पुरते जमा केलेआहेत. सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता नसल्यामुळे तक्रारअर्ज खर्चासहित रद्द करण्यात यावा अशी सामनेवाला यांनी विनंती केली आहे.
10) तक्रारदारांनी दि.08/04/09 रोजी त्यांच्या तक्रारअर्जासोबत एकूण 4 कागदपत्रे म्हणजेच त्यांचे बचत खातेचे मूळ खाते पुस्तक, सामनेवाला यांनी रु.35,000/- जमा केल्याबद्दल दिलेली पोहोच, सामनेवाला यांना वकीलांचेमार्फत पाठविलेली नोटीस व त्यास सामनेवाला यांनी दिलेला जबाब दाखल केला आहे. तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदारांनी तसेच सामनेवाला यांनी आपापला लेखी युक्तिवाद दाखल केला. दि.31/06/2011 रोजी सामनेवाला यांनी लेखी युक्तिवाद दाखल केलेला असल्यामुळे तोंडी युक्तिवाद करावयाचा नाही अशी पुरशिस दिली. तक्रारदारांचे वकील श्री.एल्.आर.कॅस्टेलिनो यांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यात आला व सदर प्रकरण निकालासाठी ठेवण्यात आले.
11) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात -
मुद्दा क्र.1 - तक्रारदार हे सामनेवाला यांचे सेवेत कमतरता आहे हे सिध्दकरतात काय ?
उत्तर - होय.
मुद्दा क्र.2 - तक्रारदार यांना सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.35,000/- वसुल करुन मागता येईल काय ?तसेच सामनेवाला यांचेकडून
नुकसानभरपाई व या अर्जाचा खर्च मागता येईल काय ?
उत्तर - अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा -
मुद्दा क्र.1 - तक्रारदार हे हातगाडीवर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 - बँक ऑफ बडोदा यांचे जॅकोब सर्कल ब्रँचमध्ये दि.10/01/1996 रोजी बचत खाते क्र.6641 उघडले ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे. तक्रारदारांनी वेळोवेळी सदर खात्यात रक्कमा जमा केल्या. तक्रारदार वरील बचत खात्यावर व्यवहार सामनेवाला यांच्या वडाळा शाखेतून करत होते, तसेच तक्रारदार यांचा नवीन खाते क्र.24480100003210 असा आहे ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे.
तक्रारदार यांच्या म्हणण्याप्रमाणे वरील खात्यामध्ये त्यांचे बचत खात्यातील नोंद अद्यावत करण्यासाठी गेले असताना त्यांच्या खात्यावर फक्त रु.1,296/- शिल्लक असल्याचे दाखविण्यात आले. दि.17/09/2009 रोजी त्यांच्या खात्यातून रक्कम रु.35,000/- कुणीतरी काढून घेतल्याची नोंद करण्यात आली, तसेच डूप्लीकडे खाते पुस्तकासाठी तक्रारदारांच्या खात्यातून खातेपुस्तक देण्याचा खर्च म्हणून सामनेवाला यांनी रु.57/- वजाती दाखविले ही बाब सुध्दा सामनेवाला यांना मान्य आहे. तक्रारदारांनी दि.17/02/09 रोजी स्वतःच्या खात्यातून रक्कम रु.35,000/- काढलेले नाहीत. सामनेवाला यांच्या निष्काळजीपणामुळे व सेवेतील कमतरतेमुळे कुणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या खात्यातून सुटा धनादेशाचा वापर करुन रक्कम रु.35,000/- काढून नेले. सामनेवाला यांच्या अधिकारी/कर्मचा-यांच्या संगनमताशिवाय बनावट धनादेशाद्वारे त्रयस्त व्यक्तीस एवढी मोठी रक्कम काढणे शक्य झाले नसते असे तक्रारदारांच्या वकीलांनी सांगितले. तक्रारदारांनी डूप्लीकेट खातेपुस्तिकेसाठी अर्ज केलेला नसताना सुध्दा कुणीतरी बनावट अर्ज करुन बँकेला सादर केला व या अर्जास बँकेने कसलीही खातरजमा न करता संमत्ती दिली असा आरोप तक्रारदारांनी केला.
सामनेवाला यांनी वर नमूद केलेले आरोप तक्रारदारांनी नाकारले आहेत. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे दि.17/02/2009 रोजी तक्रारदार स्वतः सामनेवाला क्र.1 यांच्या जॅकोब सर्कल शाखेत आले व डूप्लीकेट खातेपुस्तिकेसाठी अर्ज करुन त्यांनी सुटा धनादेशाद्वारे रु.35,000/- काढून नेले. सामनेवाला यांच्या कैफीयतमध्ये सदर दि.17/02/09 रोजीच्या सुटया धनादेशावर तक्रारदारांची सही आहे, तसेच डूप्लीकेट खातेपुस्तिकेसाठी दिलेल्या अर्जावर सुध्दा तक्रारदारांचीच सही असल्याचे म्हटले आहे. सामनेवाला यांच्या अधिका-यांनी योग्य ती दक्षता घेवून तक्रारदारांची त्यांच्याकडे असलेल्या रेकॉर्डवरील सहया व नमून्याच्या सहया पाहिल्यानंतर धनादेशावरील सही ही तक्रारदारांचीच असल्याचे दिसून आल्याने सदर धनादेशाची रक्कम, तसेच डूप्लीकेट खाते पुस्तकही देण्यात आले. या कामी सामनेवाला यांनी त्यांच्या कैफीयतसोबत तक्रारदारांच्या बचत खात्याचा उतारा दाखल केला असून सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या ज्या सहयांबद्दल वाद नाही अशा सहयांचे कागदपत्र दाखल केले आहेत. वास्तविक तक्रारदारांनी केलेले आरोप विचारात घेता सामनेवाला यांनी तक्रारदारांना जो तथाकथित दि.17/02/09 रोजी रु.35,000/- काढण्यासाठी सुटा धनादेश दिला तो मूळ धनादेश सामनेवाला बँकेकने या मंचासमोर हजर करणे आवश्यक होते, तसेच तक्रारदारांनी दि.17/02/09 रोजी ज्या धनादेशाने रु.35,000/- काढून घेतले त्यावरील सही, तसेच डूप्लीकेट खातेपुस्तिकेसाठी केलेल्या अर्जावरील सही हया तक्रारदारांच्याच आहेत काय ?याची खात्री करण्यासाठी धनादेश, व दिलेला अर्ज तसेच तक्रारदारांच्या रेकॉर्डवरील नमून्याच्या सहया हस्ताक्षर तज्ञांकडे पाठविणे आवश्यक होते परंतु सामनेवाला यांनी याबाबत हस्ताक्षर तज्ञांचा अभिप्राय सुध्दा घेतला नाही इतकेच नव्हे तर तक्रारदारांचा वादातीत दि.17/02/09 चा धनादेश व डूप्लीकेट खातेपुस्तिकेसाठी केलेला अर्ज त्यांनी या मंचासमोर सुध्दा दाखल केलेला नाही अथवा त्याच्या छायांकित प्रती सुध्दा दाखल केलेल्या नाहीत. यावरुन सामनेवाला हे या मंचापासून महत्वाची बाब लपवून ठेवत आहेत असे दिसून येते. सामनेवाला यांनी आपल्या कैफीयतमध्ये तक्रारदारांना डूप्लीकेट खातेपुस्तिका देण्यापूर्वी तसेच सादर केलेल्या धनादेशाची रक्कम रु.35,000/- देण्यापूर्वी सामनेवाला बँकेतील संबंधीत रोखपालाने दि.17/02/09 रोजी सदरचा रु.35,000/- चा धनादेश सादर केल्यानंतर त्यावरील सही तक्रारदारांच्या नमुन्याच्या सहयांशी जळतात काय याची पडताळणी केली व मगच तक्रारदारांना पैसे दिले. तसेच तक्रारदारांनी डूप्लीकेट खातेपुस्तिकेसाठी दिलेल्या अर्जावरील सही सामनेवाला क्र.2 यांच्या संबंधीत अधिका-याने तक्रारदारांच्या सामनेवाला क्र.2 बँकेकडे असणा-या सहयांची पडताळणी केली. इतकेच नव्हे तर तक्रारदारांचा फोटो सुध्दा पाहिला व नंतर डूप्लीकेट खातेपुस्तिका देण्यात आले. सामनेवाला यांनी आपल्या वरील म्हणण्याच्या पुष्टयर्थ कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सामनेवाला यांनी दि.17/02/09 रोजी सामनेवाला बँकेत काम करणा-या संबंधीत रोखपाल किंवा ज्या अधिका-याने अर्जावरील सहीची पडताळणी केली त्याचे नांव सुध्दा सांगितले नाही. वास्तविक अधिकारी किंवा कर्मचारी यांचे प्रतिज्ञापत्र सामनेवाला यांनी या कामी दाखल करणे आवश्यक होते. असा पुरावा सामनेवाला यांनी दाखल केलेला नाही. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांना डूप्लीकेट बचत खातेपुस्तिका देताना किंवा रक्कम रु.35,000/- चा धनादेश वटवताना सादर करणे शक्य असताना सुध्दा योग्य ती काळजी घेतली होती असा दर्शविणारा प्रथमदर्शनी पुरावा सुध्दा दाखल केलेला नाही.
सामनेवाला यांनी कैफीयतमधील परिच्छेद क्र.1-27 मधील तक्रारदारांचे सर्व आरोप नाकारले असले तरी कैफीयतमधील परिच्छेद क्र.28 मध्ये तक्रारदारांची गरीबीची परिस्थिती लक्षात घेवून केवळ माणूसकी म्हणून तक्रारदारांच्या बचत खात्यात दि.24/07/09 रोजी रु.35,000/- जमा केले असे म्हटले आहे. सामनेवाला यांनी जी रक्कम रु.35,000/- तक्रारदारांच्या बनावट सहीच्या धनादेशाद्वारे कुणा अज्ञात इसमाने काढून नेली ती रक्कम सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या खात्यात दि.24/07/09 रोजी जमा केली आहे.
या कामी तक्रारदारांनी दाखल केलेले पुरावे व वर नमूद केल्याप्रमाणे सामनेवाला यांनी तात्पुरती का होईना जमा केलेली रक्कम विचारात घेता तक्रारदारांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे असे दिसून येते. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या बचत खात्यातून रु.35,000/- कुणीतरी अज्ञात इसमाने काढले असतील तर सामनेवाला यांनी वरील धनादेशावरील सही व डूप्लीकेट खातेपुस्तिका मिळण्यासाठी तक्रारदारांनी केलेल्या अर्जावरील सही हया बनावट सहया आहेत किंवा नाही याबाबत निश्चिती करणेसाठी हस्ताक्षर तज्ञांचा अभिप्राय मागविणे आवश्यक होते या उलट सामनेवाला यांनीच सदरची रक्कम रु.35,000/- तात्पुरती का होईना तक्रारदारांच्या खात्यात जमा केली आहे. सामनेवाला यांनी वरील प्रमाणे रक्कम रु.35,000/-तात्पुरती तक्रारदारांच्या खात्यात कोणत्या बँकेच्या नियमाप्रमाणे जमा केली याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. सामनेवाला या राष्ट्रीयकृत बँकेला केवळ माणूसकीखातर खातेधारकाच्या नांवे त्यांना तक्रार केली म्हणून रक्कम रु.35,000/- जमा करता येणार नाही. सामनेवाला यांनी जे बचावाचे मुद्दे उपस्थित केले त्यात तथ्य वाटत नाही. वरील सर्व वस्तुस्थिती विचारात घेता सामनेवाला यांचे अधिकारी/कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे दि.17/02/2009 रोजी कुणतीरी अज्ञात इसमाने रक्कम रु.35,000/- तक्रारदारांच्या बचत खात्यातून काढून नेली हे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र.2 - सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या खात्यात पुन्हा रक्कम रु.35,000/- जमा करावेत व त्यावर 21 टक्के दराने दि.17/02/2009 पासून व्याज द्यावे अशी तक्रारदारांनी या मंचास विनंती केली आहे. वर नमूद केल्याप्रमाणे दि.17/02/09 रोजी तक्रारदारांच्या खात्यातून सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरतेमुळे कुणीतरी अज्ञात इसमाने रु.35,000/- काढून नेले त्यामुळे तक्रारदारांचे अार्थिक नुकसान झाले. आपल्या अधिकारी/कर्मचा-यांच्या हलगर्जीपणामुळे सदर रक्कम अज्ञात इसमाने तक्रारदारांच्या खात्यातून काढून नेली याची जाणीव झाल्यामुळेच सदरची रक्कम ही सामनेवाला यांनी दि.17/02/09 रोजी तक्रारदारांच्या खात्यात जमा केली आहे. सामनेवाला यांची बँक ऑफ बडोदा हा भारत सरकारचा अंगीकृत व्यवसाय असून त्यांच्या अधिका-यांकडून केवळ माणूसकी म्हणून अशी रक्क्म रु.35,000/- तक्रारदारांच्या खात्यात तात्पुरती म्हणून जमा करण्याची अपेक्षा करता येत नाही. केवळ सामनेवाला यांच्या अधिकारी/कर्मचारी यांना केलेल्या चुकीची जाणीव झाल्यामुळे त्यांनी सदर रक्कम तक्रारदारांच्या खात्यात जमा केल्याचे दिसते. सामनेवाला यांनी दि.24/07/2009 रोजी तक्रारदारांच्या खाती जमा केलेली रक्कम रु.35,000/- पुन्हा तक्रारदारांच्या खात्यातून वजाती करुन नये असा सामनेवाला यांना आदेश करणे योग्य होईल. अशा परिस्थितीत तक्रारदारांना सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.35,000/- पुन्हा वसुल करुन मागता येणार नाही.
तक्रारदारांनी वरील रकमेवर 21 टक्के दराने व्याजाची मागणी केलेली आहे. तक्रारदारांची वरील रक्कम त्यांच्या बचत खात्यात शिल्लक होती. बचत खात्यातील रक्कम विचारात घेता सामनेवाला यांनी तक्रारदारांना दि.17/02/2009 पासून दि.24/07/2009 पर्यंत रक्कम रु.35,000/- यावर द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज द्यावे असा आदेश करणे योग्य होईल.
तक्रारदारांनी त्यांना सामनेवाला यांचेकडून मनस्तापापोटी व आर्थिक नुकसानभरपाई म्हणून रु.3 लाख व रु.2 लाख असे एकूण 5 लाख मागितले आहेत. तक्रारदारांनी नुकसानभरपाई म्हणून मागितलेली रक्कम अवास्तव जादा आहे. तक्रारदारांची परिस्थिती गरीबीची असून त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे जमा केले होते व सदरची रक्कम त्यांच्या परस्पर कुणीतरी अज्ञात इसमाने सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरतेमुळे काढून नेली त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास सहन करावा लागला, तसेच आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागले असेल. याबाबींचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.10,000/- द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल.
तक्रारदारांनी या अर्जाच्या खर्चापोटी सामनेवाला यांचेकडून रु.25,000/- ची मागणी केली आहे. या अर्जाचे स्वरुप पाहता सामनेवाला यांनी तक्रारदारांना खर्चापोटी रक्कम रु.5,000/- द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर त्याप्रमाणे देण्यात येते.
वर नमूद कारणास्तव तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात करुन खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे -
अं ति म आ दे श
1. तक्रार क्रमांक 163/2009 अंशतः मंजूर करणेत येतो.
2. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या अगर संयुक्तरित्या तक्रारदारांचे सामनेवाला क्र.2 बँकेत असणा-या बचत खाते क्र.24480100003210 यामध्ये दि.24/07/2009 रोजी तात्पुरती म्हणून जमा केलेली रक्कम रु.35,000/- तक्रारदारांच्या बचत खात्यातून तक्रारदारांच्या संमतीशिवाय वजाती करु नये.
3. सामनेवाला यांनी दि.24/07/2009 रोजी तक्रारदारांचे बचत खाते क्र.24480100003210 मध्ये रक्कम रु.35,000/- जमा केलेले असल्यामुळे सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.35,000/- वसुल करुन द्यावेत ही तक्रारदारांची मागणी अमान्य करण्यात येते.
4. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या अगर संयुक्तरित्या तक्रारदारांना रक्कम रु.35,000/-(रु.पस्तीस हजार मात्र) यावर दि.17/02/2009 पासून दि.24/07/2009 पर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे.
5. सामनेवाला क्र.1व 2 यांनी वैयक्तिकरित्या अगर संयुक्तरित्या तक्रारदारांना नुकसानभरपाई दाखल रक्कम रु.10,000/-(रु.दहा हजार
मात्र)व या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/-(रु.पाच हजार मात्र) द्यावेत.
6. सामनेवाला यांनी वरील आदेशाची अंमलबजावणी प्रस्तुत आदेशाची प्रत त्यांना मिळाल्यापासून 30 दिवसांचे आत करावी.
7. सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षकारांना देणेत यावी.