द्वारा - श्री.शि.भि.धुमाळ : मा.अध्यक्ष
1) ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणे -
तक्रारदारांचे क्र.1 ही सार्वजनिक न्यास असून बॉंम्बे पब्लिक ट्रस्ट,1960 कायदयानुसार तिची नोंदणी झाली असून तिचा नोंदणी क्रमांक पीटीआर नं.पी-9286 (बॉंम्बे) असा आहे. सामनेवाला क्र.1 संस्थेचे कार्यालय-603, माहेश्वरी भवन, जगन्नाथ शंकर शेठ मार्ग, मुंबई–02 येथे आहे. तक्रारदार क्र.2 हे तक्रारदार क्र.1 न्यासाचे विश्वस्त असून ते सचिव म्हणूनही काम करतात. तक्रारदार क्र.3 ते 8 हे तक्रारदार क्र.1 न्यासाचे इतर विश्वस्त आहेत. तक्रारदार क्र.1 न्यासाची स्थापना सन् 1982 चे सुमारास झाली असून गरजू लोकांना वैद्यकीय मदत पुरविणे हे संस्थेचे उध्दीष्ट आहे. त्यासाठी संस्थेने काही नियम तयार केले असून सदर नियमानुसार गरजू लोकांना मदत दिली जाते. तक्रारदार न्यास हा महेश्वरी प्रगती मंडळ या सार्वजनिक संस्था पीटीआर नं.एफ – 11526 (मुंबई) यांचेशी संलग्न आहे. तक्रारदार क्र.1 न्यासाचा सामनेवाला बँक ऑफ बडोदा यांच्या प्रिंसेस स्ट्रीट शाखेत बचत खाते क्र.04100/00006464 आहे. सामनेवाला बँकेने तक्रारदार क्र.1 यांना बँक पासबुक व चेकबुक दिलेले आहे.
2) तक्रारदार क्र.1 न्यासाच्या नियमावलीप्रमाणे कोणत्याही एका अर्जदारास वैद्यकीय मदत म्हणून जास्तीतजास्त रक्कम रु.25,000/- दिली जाते. दि.07/08/2008 रोजी श्रीमती अमिता लालजी पटेल यांचा वैद्यकीय मदतीचा अर्ज तक्रारदार क्र.1 यांचे कार्यालयात मिळाला. त्यांनी त्यांची मुलगी कु.लक्ष्मी पटेल हिच्या दोन्हीही किडणीमध्ये बिघाड झाला असल्याने त्याचे उपचारासाठी तक्रारदार न्यासाकडून वैद्यकीय मदतीची मागणी केली. किडणी ट्रान्सप्लांट करण्यासाठी रक्कम रु.3,20,000/- इतका खर्च येणार होता. श्रीमती अमिता पटेल यांच्या दि.07/08/08 च्या अर्जाची छायांकित प्रत तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत निशाणी ‘अ’ ला दाखल केली आहे.
3) श्रीमती अमिता पटेल यांचे वैद्यकीय मदतीसाठी केलेल्या अर्जाची शहानिशा केल्यानंतर तक्रारदार क्र.1 न्यासाच्या विश्वस्तांनी वैद्यकीय मदत म्हणून कु.लक्ष्मी पटेल यांना रक्कम रु.5,000/- मंजूर करण्याचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे दि.25/08/2008 रोजी रक्कम रु.5,000/-चा धनादेश क्र.501525 शुश्रुषा हार्ट केअर सेंटर अँण्ड स्पेसिअलीटी हॉस्पिटल, नवी मुंबई यांचे नांवे पाठविला. साधारणपणे नोव्हेंबर, 08 तक्रारदार संस्थेच्या लेखाधिकारी श्रीमती ऋता सामंत यांनी हिशोबाची पडताळणी करीत असता संस्थेच्या बँक पासबुकामध्ये रक्कम रु.50,000/- संस्थेच्या खात्यात सामनेवाला बँकेने वजाती केलेचे आढळून आले. वास्तविक तक्रारदारांनी शुश्रुषा हार्ट केअर सेंटर अँण्ड स्पेसिअलिटी हॉस्पिटल संस्थेचा दिलेला धनादेश फक्त रक्कम रु.5,000/- चा होता. त्यामुळे तक्रारदारांनी ताबडतोब सामनेवाला बँकेत जावून पासबुकातील नोंद चुकीची असल्याचे निदर्शनास आणून रक्कम रु.45,000/- पुन्हा जमा करावी अशी विनंती केली व तसे पत्र दि.29/11/2008 रोजी सामनेवाला बँकेचे मॅनेजर यांस पाठविले. सदर पत्राची छायांकीत प्रत तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत निशाणी ‘ब’ ला दाखल केली आहे.
4) त्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाला बँकेमध्ये सदरच्या धनादेशाची पाहणी केली असता सदर धनादेशामध्ये खाडाखोड करुन रक्कम रु.5,000/- चे रु.50,000/- केल्याचे आढळून आले. सदरची खाडाखोड धनादेश पाहताच स्पष्टपणे निदर्शनास येत होती. सदर धनादेशाची छायांकीत प्रत तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत निशाणी ‘क’ ला दाखल केली आहे. तक्रारदारांनी सामनेवाला बँकेला सदर धनादेशामध्ये नंतर खाडाखोड केल्याचे निदर्शनास आणले. त्यानंतर सामनेवाला बँकेने दि.17/12/08 च्या पत्राने तक्रारदारांना त्यांनी याबाबत ‘धनादेशाचे प्रोसेसिंग ज्या सर्व्हीस ब्रँचमध्ये झाले त्या ब्रँचकडे विचारणा केली असून या संबंधीची माहिती अद्याप मिळालेली नाही’असे तक्रारदारांना कळविले. वरील पत्राची छायांकीत प्रत तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत निशाणी ‘ड’ ला दाखल केली आहे.
5) तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी शुश्रुषा हार्ट केअर सेंटर अँण्ड स्पेसिअलिटी हॉस्पिटलकडे याबाबत चौकशी केली असता सदरचा धनादेश हा त्यांच्या हॉस्पीटलमध्ये रुग्ण रामभाऊ पाटील यांच्या खात्यात दि.31/08/2008 रोजी जमा दाखविण्यात आला. सदरचा रु.50,000/- चा धनादेश हॉस्पिटलला मिळाल्यासंबंधी रामभाऊ पाटील यांना पोच दिली. त्या पोचपावतीची छायांकीत प्रत तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत निशाणी‘इ’ला दाखल केली आहे.
6) तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला बँकेच्या निष्काळजीपणामुळे वर नमूद केलेल्या रु.5,000/- रकमेच्या धनादेशमध्ये खाडाखोड करुन तो रु.50,000/- चा केलेला असतानासुध्दा तो धनादेश वठला गेला. सदर धनादेशातील रक्कमेत खाडाखोड केली गेली आहे हे प्रथमदर्शनी दिसून येते असा धनादेश वठविणे ही सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता असून सामनेवाला बँकेचा फार मोठा निष्काळजीपणा आहे.
7) वरील बाब सामनेवाला क्र.1 न्यासाच्या विश्वस्तांच्या निदर्शनास आल्यानंतर विश्वस्तांच्या वतीने एलटी मार्ग पोलिस स्टेशनला दि.19/01/09 रोजी तक्रार दाखल करण्यात आली असून सदर तक्रारीबाबतचा तपास चालू आहे. तक्रारदार क्र.1 न्सास ही नावाजलेली सार्वजनिक न्यास असून त्यांनी सामनेवाला बँकचे वर नमूद धनादेशासंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार करुनही सामनेवाला यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तक्रारदार न्यासाचे आर्थिक नुकसान झाले तसेच बदनामीही झाली आहे. सामनेवाला बँकेबरोबर केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती तक्रारअर्जासोबत निशाणी ‘फ’ ला दाखल करणेत आल्या. वर नमूद खाडाखोड केलेला धनादेश वठवण्यामध्ये बँकेने फार मोठा निष्काळजीपणा केला असून ही बाब सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता आहे. बनावट धनादेश वटवल्यामुळे तक्रारदार न्यासाचे फार मोठे नुकसान व बदनामी झाली म्हणून तक्रारदार न्यासाने सदर तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदारांनी वर नमूद केलेल्या धनादेशाच्या संदर्भात सामनेवाला यांनी तक्रारदार न्यासाच्या खात्यातून जादा वसुल केलेली रक्कम रु.45,000/- त्यावर जुलै, 2009 पर्यंत 18 टक्के दराने होणारे व्याजाची रक्कम रु.7,545/- सामनेवाला यांनी तक्रारदार न्सासास द्यावेत असा आदेश सामनेवाला यांना करावा अशी विनंती केली आहे. तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून नुकसानभरपाई दाखल रक्कम रु.1 लाख अशी एकूण रककम रु.1,52,545/- ची मागणी सामनेवाला बँकेकडून केली आहे. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत पृष्ठ क्र.9 ते 31 ला कागदपत्रांच्या प्रती दाखल केल्या असून तक्रारदार न्यासाच्या विश्वस्तांच्या दि.06/08/2009 रोजीच्या पास झालेल्या सभेतील ठरावाची प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली. तक्रारअर्जाच्या पुष्टयर्थ तक्रारदार न्यासाचे सचिव व विश्वस्त नंदकिशोर यांनी शपथपत्र दाखल केले. तसेच एलटी मार्ग पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या तक्रारअर्जाची छायांकीत प्रत, अमिता लालजी पटेल यांचे वैद्यकीत मदतीचा अर्ज व त्यासोबतच्या कागदपत्राच्या प्रती, संबंधीत धनादेशाची छायांकीत प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
8) सामनेवाला बँकेस तक्रारअर्जाच्या नोटीसीची बजावणी होवून सुध्दा सामनेवाला या मंचासमोर हजर राहिले नाहीत म्हणून दि.11/06/2010 रोजी सामनेवाला यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करणेत आला.
9) तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल करुन त्यासोबत एलटी मार्ग पोलीस स्टेशनला दि.17/11/09 रोजी दाखल केलेल्या तक्रारअर्जाची छायांकीत प्रत, वैद्यकीय मदतीसाठी श्रीमती अमिता लालजी पटेल यांनी दाखल केलेला अर्ज, त्यासोबत डॉ.हेमंत मेहता यांचे प्रमाणपत्र, शुश्रुषा हॉस्पिटचा मासिक डायलेसिसचा खर्चासंबंधीचा तपशिल, रेनल फीजिशियन श्री.मेहता यांचे केसपेपर्स, तक्रारदारांनी सुश्रुषा हॉस्पिटलला दिलेल्या दि.25/08/08 रोजीच्या धनादेशाची कलर छायांकीत प्रत, तक्रारदारांच्या सामनेवाला बँकेतील खात्याचा उतारा इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदारांनी दि.21/07/2012 रोजी डॉ.बिहारीलाल चितलंगिया - तक्रारदार क्र.1 न्यासाचे विश्वस्त यांचे शपथपत्र दाखल करुन तक्रारदार क्र.1 न्यासाच्या विश्वस्तांच्या दि.22/11/05 रोजी झालेल्या बैठकीतील ठरावाचे सहीशिक्क्याची प्रत तसेच श्रीमती ऋता सामंत यांचे शपथपत्र, तक्रारदार क्र.1 न्यासाने दि.09/04/08 ते 23/03/09 या कालावधीत दिलेल्या वैद्यकीय मदतीचा तपशील, दि.05/08/08 ते 29/08/08 या कालावधीतील सामनेवाला बँकेत जमा केलेल्या धनादेशाचा तपशील, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
10) तक्रारदारांचे वकील श्रीमती बिंदू जैन यांच्या म्हणण्याप्रमाणे सन् 1982 साली तक्रारदार क्र.1 चिकित्सा सहायता कोष या सार्वजनिक न्यासाची स्थापना करुन तो बॉम्बे पब्लिक ट्रस्ट, 1960 च्या तरतूदीनुसार रजिस्टर करण्यात आला आहे. न्यासाचा नोंदणी क्र.पीटीआर नं.पी-9286 (बॉंम्बे) असा आहे. गरीब रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत करणे हे तक्रारदार न्यासाचे मुख्य उद्दीष्ट आहे. न्यासाच्या विश्वस्तांनी पारित केलेल्या ठरावाप्रमाणे गरजू रुग्णांना रु.5,000/- ते जास्तीत जास्त 25,000/- पर्यंत आर्थिक मदत दिली जाते. रुग्णांच्या वतीने आर्थिक मदतीसाठी अर्ज आल्यानंतर या अर्जासोबतच्या वैद्यकीय कागदपत्रांची पाहणी करुन न्यासाच्या विश्वस्तांच्या सभेत किती रक्कम वैद्यकीय उपचारासाठी द्यावी यासंबंधी ठराव केला जातो व त्यानंतरच सदरच्या रकमेचा धनादेश संबंधीत हॉस्प्टिलला पाठविणेत येतो. तक्रारदारांनी न्यासाच्या दि.21/11/05 रोजी झालेल्या विश्वस्तांच्या सभेतील ठरावाची खरी नक्कल दाखल केली असून त्यामध्ये न्यासाचे सदस्य किंवा त्यांच्या परिवारातील व्यक्तीस वैद्यकीय मदतीची आवश्यकता असल्यास न्यासामार्फत जास्तीत जास्त रु.25,000/- तसेच जे रुग्ण्ा न्यासाचे सदस्य नाहीत त्यांना जास्तीत जास्त रु.10,000/- पर्यंतची आर्थिक मदत कोणत्याही एका रुग्णला दिली जाईल असा ठराव करण्यात आला तो निदर्शनास आणला. या प्रकरणातील रुग्ण कु.लक्ष्मी पटेल ही शुश्रुषा हॉस्पिटमध्ये किडणी ट्रान्सप्लांन्टसाठी अंर्तरुग्ण म्हणून दाखल होती असे कागदपत्रांवरुन दिसून येते. तक्रारदार क्र.1 च्या विश्वस्तांनी कु.लक्ष्मी पटेल वरील उपचारसाठी रक्कम रु.5,000/- मंजूर केली. डॉ.बिहारीलाल चितलंगिया जे तक्रारदार क्र.1 न्यासाचे विश्वस्त आहेत त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये असे नमूद केले आहे की, रुग्ण कु.लक्ष्मी पटेल हिच्या वतीने करण्यात आलेल्या अर्जावरुन विश्वस्तांच्या ठरावाप्रमाणे रक्कम रु.5,000/- चा धनादेश न्यासाचे लेखाधिकारी श्रीमती ऋता उपेंद्र सामंत यांनी तयार केला. सदरचा रक्कम रु.5,000/- चा धनादेश क्र.501525 यावर विश्वस्त म्हणून त्यांनी सही केली. श्रीमती ऋता उपेंद्र सामंत यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्या लेखाधिकारी/कॅशिअर म्हणून महेश्वरी प्रगती मंडळ व चिकित्सा सहायता कोष यांचेकडे काम करत होत्या. चिकित्सा सहायता कोष यांनी मंजूर केलेले वैद्यकीय मदतीचे धनादेश त्या तयार करीत असत व त्यावर दोन विश्वस्तांच्या सहया घेवून तो संबंधीत व्यक्तींना दिला जात असे. श्रीमती ऋुता उ. सामंत यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारअर्जासोबत दाखल केलेला धनादेश क्र.501525 हा त्यांनी विश्वस्तांच्या सांगण्याप्रमाणे रक्कम रु.5,000/- चा तयार केला व त्या धनादेशावर डॉ.श्री.बिहारीलाल चितलंगिया व श्री.चंद्रपालजी तपारिया यांच्या सहया घेतल्या. नंतर सदरचा धनादेश कु.लक्ष्मी पटेल यांना दिला. त्यांना नोव्हेंबर, 08 मध्ये तक्रारदार न्यासाचे सामनेवाला बँकेचे पासबुक मिळाले त्यावेळी न्यासाच्या धनादेश क्र.501525 पोटी रक्कम रु.50,000/- वजा करणेत आलेचे दिसून आले. तक्रारदारांनी दि.09/04/08 ते 21/03/09 या कालावधीत तक्रारदार न्यासामार्फत ज्या व्यक्तीला वैद्यकीत मदत दिली त्याचा तपशील दि.25/08/08 या तारखेस धनादेश क्र.501525 रक्कम रु.5,000/- रुग्ण कु.लक्ष्मी पटेल यांना दिल्याची नोंद आहे. तक्रारदार वकीलांनी चेक बुकच्या काऊंटर फाईलच्या संबंधीत पानाची छायांकीत प्रत दाखल केली असून त्यामध्ये दि.25/08/08 रोजी कु.लक्ष्मी पटेल यांचे वैद्यकीय मदतीसाठी रक्कम रु.5,000/- चा धनादेश शुश्रुषा हॉस्पिटलला दिला अशी नोंद आहे.
11) तक्रारदार वकीलांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक्षात रुग्ण्ा कु.लक्ष्मी पटेल हिच्या वैद्यकीय मदतीसाठी रक्कम रु.5,000/- चा धनादेश शुश्रुषा हॉस्पिटलला पाठविला असताना या धनादेशापोटी रक्कम रु.50,000/- न्यासाच्या खात्यातून सामनेवाला बँकेने वजाती केले. सदरची बाब निदर्शनास आल्यानंतर तक्रारदारांनी दि.21/11/08 रोजी सामनेवाला बँकेस पत्र लिहून दि.25/08/08 चा शुश्रुषा हार्ट केअरच्या नांव धनोदश क्र.501525 हा फक्त रु.5,000/-साठी असताना त्याच्या खात्यातून रु.50,000/- कमी करण्यात आले ही बाब निदर्शनास आणून चुकीने वजा केलेली रक्कम रु.45,000/- पुन्हा न्यासाच्या नांवाने खात्यात जमा करावी अशी विनंती केली. सदरच्या पत्राची छायांकीत प्रत तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत निशाणी ‘ब’ ला दाखल केली आहे. तक्रारदार वकीलांनी सामनेवाला बँकेतून मिळालेल्या संबंधीत धनादेश क्र.501525 ची कलर झेरॉक्स दाखल केली असून तक्रारदार वकीलांनी सदर धनादेशामधील अक्षरी लिहिलेल्या रकमेमध्ये खाडाखेड केल्याचे निदर्शनास आणले. सदर धनादेशात अक्षरामध्ये जी रक्कम लिहिलेली आहे त्यामध्ये 50 या अक्षराठिकाणी खाडाखोड केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तक्रारदार वकीलांच्या म्हणण्याप्रमाणे Five हा शब्द लिहिला होता त्यामध्ये खाडाखोड करुन Fifty करण्यात आले आहे. धनादेशावर अंकामध्ये जी रक्कम लिहिली आहे त्यामध्ये बेमालूमपणे एक अधिक शुन्य लिहिला आहे असे दिसते. वर नमूद केल्याप्रमाणे उघडया डोळयाने अक्षरात लिहिलेल्या Fifty हा शब्द खाडाखोड करुन लिहिला आहे असे स्पष्टपणे दिसते. तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे याबाबत तक्रार केलेली असताना दि.17/12/08 च्या पत्राने सामनेवाला यांनी तक्रारदार न्यासाच्या ट्रस्टींना पत्र पाठवून धनादेश क्र.201525 यातील रकमेमध्ये जी खाडाखोड करण्यात आली आहे त्याबाबत त्यांनी त्यांच्या ज्या ब्रँचने सदरचा धनादेश प्रोसेस केला त्यांच्याकडे चौकशी केली परंतु अद्यापही सदर ब्रँचने त्यांना काहीही कळविलेले नाही असे सांगितले. दि.17/12/08 चे वरील पत्र, तक्रारअर्जासोबत नि.’ड’ ला सादर केलेल्या पत्रामध्ये सामनेवाला यांच्या बँकेने तक्रारदारांनी त्यांना तो धनादेश देणेत आला आहे त्यांच्याकडे याबाबत चौकशी करावी अशी विनंती केल्याचे दिसते.
12) तक्रारदार वकीलांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी त्याप्रमाणे शुश्रुषा हॉस्पिटलकडे चौकशी केली असता सदरचा धनादेश क्र.501525 ची एकूण रक्कम रु.50,000/- श्री. रामभाऊ पाटील यांचे नांवे जमा केली. आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ तक्रारदारांनी शुश्रुषा हॉस्पिटल दि.31/08/08 च्या पावतीची छायांकीत प्रत (निशाणी ‘इ’) निदर्शनास आणली. शुश्रुषा हॉस्पिटलने सदर धनादेशाची रक्कम रु.50,000/- श्री.रामभाऊ पाटील यांचे नांवे जमा केल्याचे दिसते. तक्रारदार वकीलांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी याबाबत सामनेवाला बँकेस याबाबत पत्र पाठविली त्याच्या प्रती तक्रारअर्जासोबत पुष्ठ क्र.19, 20 ला दाखल केल्या आहेत. सामनेवाला बँकेने तक्रारदारांकडून मागितलेलेली सर्व माहिती सामनेवाला यांना देवून सुध्दा सामनेवाला यांनी तक्रारदारांची रक्कम रु.45,000/- पुन्हा त्यांच्या खात्यात जमा करणेची विनंती मान्य केली नाही. धनादेशावरील रकमेमध्ये खाडाखोड केलेचे उघडया डोळयांनी स्पष्टपणे दिसत असताना सामनेवाला यांच्या कर्मचारी/अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे मूळचा रक्कम रु.5,000/- च्या धनादेश रक्कम रु.50,000/- साठी वठवून तक्रारदार न्यासाच्या खात्यातून जादा रक्कम वजाती करणेत आली. जादा वसुल केलेली रक्कम रु.45,000/- तक्रारदारांच्या खात्यात विनंती करुनसुध्दा सामनेवाला बँकेने जमा केली नाही.
13) या कामी तक्रारदारांनी दि.25/08/08 चा धनादेश शुश्रुषा हॉस्पिटलच्या नांवे लिहिलेला धनादेश क्र.501525 हा रु,5000/- रकमेचा होता हे तक्रारदारांचे साक्षीदार श्रीमती ऋता उपेंद्र सामंत यांनी सदरचा धनादेश लिहिला असे स्पष्टपणे सांगितले. सदर धनादेशावर सही करणारे विश्वस्त डॉ.बिहारीलाल चितलंगिया यांनी सुध्दा सदरचा धनादेश रु.5,000/-चा होता असे स्पष्टपणे सांगितले आहे. सामनेवाला यांचेकडून मिळालेली धनादेशाची कलर झेरॉक्स प्रत तक्रारदारांनी दाखल केली आहे त्यामध्ये जी रक्कम अक्षरी लिहिलेली आहे त्यातील ‘Fifty’ शब्दामध्ये खाडाखोड केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तक्रारदार क्र.1 या न्यासाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही रुग्णास जास्तीत जास्त वैद्यकीय मदत म्हणून रक्कम रु.25,000/- दिली जाते असे दिसते. उपलब्ध पुराव्यावरुन दि.25/08/08 रोजी तक्रारदार न्यासाने रुग्ण कु.लक्ष्मी पटेल हिच्या वैद्यकीय मदतीचा रक्कम रु.5,000/- चा धनादेश शुश्रुषा हार्ट केअर सेंटर अँण्ड स्पेसिअलीटी हॉस्पिटल यांना पाठविला होता असे दिसून येते. परंतु प्रत्येक्षात सदरचा चेक सामनेवाला बँकेत जमा केला त्यावेळी सदरच्या धनादेशातील रकमेत खाडाखोड करण्यात आली होती असे दिसते. धनादेशातील रकमेवर खाडाखोड केल्याचे स्पष्टपणे दिसत असलेमुळे सामनेवाला बँकेतील संबंधीत कर्मचारी/अधिकारी यांनी सदरचा धनादेश वठविण्यापूर्वी याबाबत तक्रारदार न्यासाकडे चौकशी करणे आवश्यक होते. सामनेवाला बँक नोटीस मिळूनही या मंचासमोर हजर राहिली नाही. खाडाखोड केलेला धनादेश वठविण्यात सामनेवाला बँकेचे कर्मचारी/अधिकारी यांनी निष्काळजीपणा केला असे दिसून येते. त्यामुळे रु.5,000/- ऐवजी रक्कम रु.50,000/- न्यासाच्या खात्यातून वजा करण्यात आली. अशा त-हेने खाडाखोड केलेला धनादेश वठविण्यापूर्वी योग्य ती काळजी न घेणे ही सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता आहे असे म्हणावे लागते.
14) तक्रारदारांनी सामनेवाला यांच्या निष्काळजीपणामुळे व सेवेतील कमतरतेमुळे जी जादा रक्कम रु.45,000/- वजाती करण्यात आली आहे ती सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या खात्यात पुन्हा जमा करावी असा आदेश सामनेवाला यांना करावा अशी विनंती केली आहे. वरील वस्तुस्थितीचा विचार करता सामनेवाला यांचे कर्मचारी/अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदार न्यासाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांना रु.45,000/- द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल.
15) तक्रारदारांनी रक्कम रु.45,000/- यावर द.सा.द.शे.18 टक्के दराने दि.31/07/09 पर्यंत व्याजपोटी रक्कम रु.7,545/- ची मागणी सामनेवाला यांचेकडून केली आहे. तक्रारदारांनी केलेली व्याजाची मागणी अवास्तव जादा दराने केली आहे तसेच तक्रारदारांनी न्यासाची बदनामी झाली त्यापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.1 लाखाची मागणी केली आहे. नुकसानभरपाई म्हणून मागितलेली रक्कम रु.1 लाख ही सुध्दा अवास्तव असून त्याच्या समर्थनार्थ तक्रारदारांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. या प्रकरणातील वस्तुस्थितीचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्कम रु.45,000/- यावर सदरची रक्कम तक्रारदारा न्यासाच्या खात्यातून वजा केली त्या वेळेपासून म्हणजे दि.04/09/2008 पासून सदरची रक्कम तक्रारदारांना प्रत्यक्षात देईपर्यंत त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे असा आदेश करणे योग्य होईल. तसेच तक्रारदार न्यासाच्या विश्वस्तांना झालेल्या मानसिक त्रासापोटी व गैरसोयीपोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.10,000/- व या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- तक्रारदार क्र.1 न्सासास सामनेवाला यांनी द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल.
सबब तक्रारअर्ज अंशतः मंजूर करुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे -
अं ति म आ दे श
1. तक्रारअर्ज क्रमांक 308/2009 अंशतः मंजूर करणेत येतो.
2. सामनेवाला बँकेने तक्रारदार चिकित्सा सहायता कोष या न्यासास रक्कम रु.45,000/- (रु.पंचेचाळीस हजार मात्र) द्यावेत व सदर रकमेवर दि.04/09/2008 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज संपूर्ण
रक्कम तक्रारदारांना मिळेपर्यंत द्यावेत.
3. सामनेवाला बँकेने तक्रारदार चिकित्सा सहायता कोष या न्यासाच्या विश्वस्तांना झालेल्या मानसिक त्रासापोटी, गैरसोयीपोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.10,000/- (रु.दहा हजार मात्र) व या अर्जाच्या
खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (रु.पाच हजार मात्र) द्यावेत.
4. सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षकारांना देणेत यावी.