निकालपत्रः- श्रीमती सुमन प्र.महाजन, अध्यक्षा ठिकाणः बांद्रा निकालपत्र तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- तक्रारदाराचे सामनेवाले बँकेत बचत खाते आहे. त्याचा खाते क्र.15412 (आताचा खाते क्र.04120100002836) असा आहे. तक्रारदाराचे म्हणणे की, दि.29.09.2006 रोजी त्याच्या खात्यात रु.25,943.50पैसे एवढी रक्कम शिल्लक होती. परंतु सामनेवाले यांनी त्याच्या खात्यात रु.25,696.72पैसे एवढी रक्कम चुकीने खर्ची टाकली. ही रक्कम त्याने खात्यातून काढली नव्हती, म्हणून त्याने सामनेवाले यांना दि.17.10.2006 रोजी पत्र पाठवून कळविले व ती रक्कम त्याच्या खात्यात जमा करण्यास सांगितले परंतु सामनेवाले यांनी ती जमा केली नाही व त्याच्या पत्राला उत्तरही दिले नाही. 2 तक्रारदाराचे म्हणणे की, पुन्हा दि.23.10.2006 रोजी रु.44,786.45पैसे व दि.25.10.2006 रोजी रु.14,717.21पैसे सामनेवाले यांनी पुन्हा त्याच्या खात्यात चुकीने खर्ची टाकले. म्हणून त्याने दि.02.11.2006 रोजी सामनेवाले यांना पत्र पाठवून एकूण रक्कम रु.85,200.38पैसे एवढी त्याच्या खात्यात जमा करण्यास सांगितले. तरीही सामनेवाले यांनी प्रतिसाद दिला नाही. त्याने पुन्हा सामनेवाले यांना दि.07.11.2006 चे स्मरणपत्र पाठविले. परंतु काही उपयोग झाला नाही. 3 तक्रारदाराचे म्हणणे की, सामनेवाले यांनी जो त्रास दिला, त्याला कंटाळून त्याने सामनेवाले यांच्या वसुली विभागाकडे चौकशी केली. त्यावेळी त्याला कळाले की, त्याच्या डेबिट कार्डवर हे सर्व व्यवहार झालेले आहेत. परंतु त्याचे म्हणणे की, त्याने डेबिट कार्ड वापरलेच नव्हते किंवा कोणलाही दिले नव्हते. सामनेवाले यांनी दि.17.10.2006 च्या तक्रारीची नोंद घेतली होती, मात्र दि.02.11.2006 च्या तक्रारीची नोंद घेतली नव्हती. म्हणून दि.11.11.2006 रोजी त्याने पुन्हा तक्रार दिली. तो सामनेवाले यांच्या शाखा व्यवस्थापकींना भेटला व त्यांना वरील हकीकत सांगितली. त्यांनी योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. शेवटी सामनेवाले यांनी तक्रारदाराला पत्र पाठविले व सांगितले की, त्यांची तक्रार समझोता विभागाकडे पाठविली आहे आणि ते ती व्हिसा विभागाकडे पाठवतील. व्हिसा विभागाला त्याच्या चौकशीसाठी कमीत कमी 65 दिवस लागतील. परंतु 65 दिवस होऊन गेले तरीही सामनेवाले यांनी काहीच कळविले नाही. म्हणून तक्रारदाराने दि.16.02.2007 रोजी सामनेवाले यांना पुन्हा स्मरणपत्र पाठविले. त्या पत्रात त्याने लिहीले की, कार्ड विभागाकडून त्याला कळाले की, त्याचे कार्ड U.K. मध्ये वापरले आहे. परंतु तो भारताबाहेर कधीच गेला नाही. शेवटी दि.20.02.2007 रोजी त्याला सामनेवाले यांचेकडून पत्र आले की, त्याची दि.17.10.2006 व दि.02.11.2006 ची पत्रं समझोता विभागाकडे पाठविली होती व त्याबाबतीत चौकशी केल्यानंतर त्यांना कळाले की, एक रु.14,646.82पैसेचा व्यवहार वगळता सर्व व्यवहार यशस्वी झालेले आहेत व ही रु14,646.82पैसे रक्कम त्यांनी त्यांच्या खात्यात जमा केली आहे. तक्रारदाराचे म्हणणे की, व्यवहार यशस्वी झाल्याचा काहीही पुरावा नाही. त्याच्या खाती चुकीने पडलेली रक्कम सामनेवाले यांनी त्याच्या खात्यात जमा करावी, त्याला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल रु.10,000/- नुकसानभरपाई द्यावी व या तक्रारीचा खर्च रु.50,000/- द्यावा यासाठी सदरची तक्रार दाखल केली आहे. 4 सामनेवाले यांनी कैफियत देऊन तक्रारदाराचे आरोप नाकारले. त्यांचे म्हणणे की, तक्रारदाराने त्याच्या वैयक्तिक नावाने बीओबी (बँक ऑफ बरोडा) व्हिसा डेबीट कार्डसाठी अर्ज केला होता. त्यावेळी त्याने अर्जातच कबूल केले होते की, डेबीट कार्डचा वापर ते एक्सचेंज कंट्रोल रेग्युलेशन्स प्रमाणे करतील. त्याप्रमाणे वापर न केल्यास त्यांच्या विरुध्द कारवाई करता येईल. तसेच डेबीट कार्ड त्यांनी त्यांच्या जबाबदारीवर घेतले आहे व त्यासाठी बँकेविरुध्द काही क्लेम करणार नाही. तक्रारदाराचा तो अर्ज बीओबी कार्डच्या विभागाने मंजूर करुन त्यांना बीओबी कार्ड दिले. ते कार्ड पाठवितांना त्या बरोबर पत्र लिहीले होते व बीओबी इंटरनॅशनल कार्डचा वापर कसा करावा याबद्दलची नियमावली (User’s Guide) पाठविल्या होत्या. या नियमावलीतील नियम क्र.8(1) मध्ये असे म्हटले आहे की, जर कार्ड चोरीला गेले किंवा हरवले तर त्याबाबत बँकेत ताबडतोब कळवावे व ते कार्ड Listing करु नये असे कळवावे. त्यांचे सेवाकेंद्र 24 तास चालु असते. बँकेला असे कळविल्यानंतर जर त्या डेबीट कार्डवरुन माल विकत घेतला तर त्याला बँक जबाबदार राहते. परंतु ए.टी.एम. व्दारा पैसे काढण्याच्या व्यवहारात बँक जबाबदार रहात नाही कारण ए.टी.एम.व्दारा पैसे काढण्यासाठी PIN ची आवश्यकता असते व तो क्रमांक फक्त कार्डधारकाला माहिती असतो. त्यामुळे त्रयस्थ व्यक्ती पैसे काढू शकत नाही. जर कार्डधारकाच्या निष्काळजीपणामुळे त्याच्या खात्यात एखादा अनधिकृत, बेकायदेशिर व्यवहार झाला तर सामनेवाले त्याला जबाबदार नाही. 5 सामनेवाले यांचे म्हणणे की, तक्रारदाराने त्यांच्याशी जो पत्रव्यवहार केला त्यात त्यांचे डेबीट कार्ड हरवले आहे किंवा त्रयस्थ व्यक्तीने त्याचे कार्ड वापरले आहे असे म्हटले नाही. त्याने डेबीट कार्ड हरविल्याबद्दल पोलीसांकडेही तक्रार केली नाही. डेबीट कार्डच्या अटी व शर्ती प्रमाणे बँकेत त्याबद्दल कळविणे व पोलीस स्टेशनला तक्रार देणे हे त्याचे कर्तव्य होते. त्याने सामनेवाले यांना फक्त कळविले की, त्याच्या खात्यात चुकीने रक्कमा खर्ची पडला आहेत. त्याची सविस्तर माहिती तक्रारदाराने सामनेवाले यांना पाठविली. डेबीट कार्ड हरविल्याचे किंवा त्याचा गैरवापर झाल्याचे त्यांनी त्यांना कळविले नाही. तक्रारदाराच्या खात्यात ज्या रक्कमा खर्ची पडल्या व जे व्यवहार झाले ते बीओबीचे कार्ड वापरुन झाले आहेत. परंतु PIN हा तक्रारदारालाच माहित होता. म्हणजे तो व्यवहार तक्रारदाराने स्वतः केला असेल किंवा डेबीट कार्ड हरविले असेल व ज्याच्या जवळ ते असेल त्याला PIN माहिती असेल व त्याने तो व्यवहार केला असेल किंवा एखादा व्यक्ती जो तक्रारदाराला ओळखत असेल व त्याला PIN माहित असेल तर तक्रारदाराच्या संमतीनेच त्याने पैसे काढले असतील. म्हणून सदरच्या व्यवहारांना बँक जबाबदार नाही. बँकेने चुकीने ती रक्कम तक्रारदाराच्या खात्यात खर्ची टाकलेली नाही. त्यांनी कर्तव्यात कसुर किंवा निष्काळजीपणा केलेला नाही. 6 आम्हीं तक्रारदारातर्फे वकील-श्री.वानखेडे व सामनेवाले यांचेतर्फे वकील-श्रीमती विद्या कांबळे यांचा युक्तीवाद ऐकला व कागदपत्रं वाचली. 7 तक्रारदाराच्या खात्यात खालीलप्रमाणे रक्कमां खर्ची पडल्या यात दुमत नाही. रु.25,696.72पैसे दि.17.10.2006 रु.44,786.45पैसे दि.23.10.2006 रु.14,717.21पैसे दि.25.10.2006 =========== रु.85,200.38पैसे वरील व्यवहारांपैकी दि.25.10.2006 चा व्यवहार अयशस्वी झाल्याने ती रक्कम तक्रारदाराच्या खात्यात बँकेने जमा केली आहे. 8 तक्रारदाराने सामनेवाले बँकेकडे दि.17.10.2006 रोजी रु.25,696.72पैसे या रक्कमेसंबंधात तक्रार केली होती व दि.23.10.2006 आणि दि.25.10.2006 या व्यवहारांबाबतीत दि.02.11.2006 रोजी तक्रार केली होती. सदर व्यवहाराबाबत व्हिसा विभागाने चौकशी केल्यानंतर असे समजले की, सदरचे व्यवहार तक्रारदारच्या डेबीट कार्डवर Hove येथे झालेले आहे व दि.25.10.2006 चा व्यवहार वगळता इतर सर्व व्यवहार यशस्वी झालेले आहेत. त्याबद्दलच्या रिपोर्टच्या छायांकित प्रती सामनेवाले यांनी त्यांच्या कैफियतीबरोबर पान क्र.52 व 56 वर दाखल केलेले आहे. 9 तक्रारदाराचे म्हणणे की, हे व्यवहार त्याने केलेले नाहीत. तो भारताबाहेर कधी गेला नाही, त्याचे डेबीट कार्ड हरविलेले नाही ते त्याचेकडेच आहे. त्याने PIN क्रमांक कोणलाही सांगितलेला नाही. त्याचे हे कथन जर खरे असते तर डेबीट कार्डवर त्याच्या खात्यातून पैसे काढण्याचे वरील व्यवहार झालेच नसते. डेबीट कार्डबरोबर ते कसे वापरावे याबद्दलची नियमावली, तसेच त्याच्या शर्ती व अटी पाठविलेल्या नव्हत्या असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. हे तक्रारदाराचे कथन जरी मान्य केले तरी डेबीट कार्ड कोणाला द्यायचे नाही, तसेच त्याच्या PIN क्रमांकाबद्दल गुप्तता राखावी हे तक्रारदाराला माहित होते. त्याच्या खात्यातून डेबीट कार्डवरुन पैसे काढले गेले याचाच अर्थ त्याने PIN बद्दल गुप्तता पाळलेली दिसत नाही व डेबीट कार्डबद्दलही काळजी घेतलेली नाही. तो सत्य परिस्थिती मंचापासून लपवू पाहत आहे. एक तर त्यानेच डेबीट कार्डचा वापर करुन पैसे काढलेले असावे किंवा त्याच्या संमतीने कोणीतरी ज्याला PIN क्रमांक माहित होता व ज्याच्याजवळ ते कार्ड होते त्याने ते पैसे काढले असावे किंवा तक्रारदाराचे डेबीट कार्ड हरविले असावे व त्याने PIN बद्दल काळजी घेतलेली नसावी आणि तो क्रमांक ज्याला ते कार्ड सापडले त्याला माहिती असावा व त्याने ते पैसे काढले असावे. तक्रारदार त्या संबंधीत तारखांना भारतातच होता याबद्दल त्यांने काही लेखी पुरावा दाखल केला नाही. तक्रारदाराचे असेही म्हणणे नाही की, त्याला PIN MAILER आला त्यावेळी ते कोणीतरी हाताळलेले होते. त्यामुळे बँकचे अधिकारी किंवा इतर कोणालाही या डेबीट कार्डचा PIN क्रमांक, तक्रारदाराला मिळण्यापूर्वी माहित होता व त्यांनी खात्यातून पैसे काढले असावे असे म्हणता येत नाही. सामनेवाले यांनी या तक्रारीचे कामी मा.राष्ट्रीय आयोगाच्या खालील निकालाची प्रत दाखल केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया विरुध्द के.के.भाला II ( 2011) CPJ 106 (NC) या निकालामध्ये मा. राष्ट्रीय आयोगाने असा दृष्टीकोन घेतला आहे की, कार्ड व PIN हे जर तक्रारदाराच्या ताब्यात असेल तर अनधिकृत व्यक्ती ए.टी.एम.कार्डव्दारे खात्यातून पैसे काढू शकत नाही. त्याबद्दलचा संबंधीत परिच्छेद खालीलप्रमाणे आहे. “Merely because the CCTV was not working on those dates and its footage was thus not available, does not mean that the money could be withdrawn fraudulently without using the ATM Card and the PIN number. In case the ATM Card had been stolen or the PIN number had become known to persons other than ATM card holder then the CCTV coverage could have helped in identifying the persons who had fraudulently used the card. In the instant case it is not disputed that the ATM Card or PIN remained in the self-custody / knowledge of the Respondent. In view of elaborate procedure evolved by the Petitioner / Bank to ensure that without the ATM Card and knowledge of the PIN number, it is not possible for money to be withdrawn by an unauthorized person from an ATM, we find it difficult to accept the Respondent’s contention. No doubt there have been cases of fraudulent withdrawals as stated by the State Commission but the circumstances of those cases may not be the same as in this case and in all probability, these fraudulent withdrawals occurred either because the ATM Card or the PIN number fell in wrong hands”. 10 तक्रारदाराने सामनेवाले यांना पत्र पाठवूनतक्रार केली होती, त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, त्यांनी सदरचे व्यवहार केलेले नाही. चुकीने त्यांच्या खात्यात या रक्कमां खर्ची पडल्या. म्हणून सामनेवाले यांनी लक्ष देऊन पुन्हा त्याच्या खात्यात या रक्कमा जमा कराव्यात. परंतु असे व्यवहार भविष्यात पुन्हा होऊ नयेत यासाठी त्याने त्याचे डेबीट कार्ड स्थगीत /रद्द करण्यास बँकेला सांगितले नाही. त्यामुळे तशा व्यवहाराची पुनरावृत्ती झाली याला सामनेवाले जबाबदार नाहीत. वरील विवेचन लक्षात घेता, मंचाचे असे मत आहे, तक्रारदार यांनी सामनेवाले यांची सेवेत न्यूनता आहे हे सिध्द केलेले नाही. सदरची तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. म्हणून मंच खालीलप्रमाणे आदेश करीत आहे. आदेश (1) तक्रार क्र.66/2010 रद्द करण्यात येते. (2) उभय पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा. (3) आदेशाच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्या.
| [HONABLE MR. G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |