जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्षा-श्रीमती.वी.वी.दाणी. मा.सदस्या-श्रीमती.एस.एस.जैन.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – ५६/२०१०
तक्रार दाखल दिनांक – ०१/०२/२०१०
तक्रार निकाली दिनांक – २४/०५/२०१३
श्री.यशवंत अरविंद शिवदे. ----- तक्रारदार.
उ.व.- ,धंदा-खाजगी नोकरी.
रा.जिल्हा कारागृह वर्ग नं.१
रुम नं.४,जेल लाईन,जेल रोड,धुळे.
विरुध्द
(१)शाखा अधिकारी भारतीय स्टेट बॅंक, ----- सामनेवाले.
धुळे कोषागार शाखा,धुळे.
(२)अॅक्सीस/यु.टी.आय.बॅंक
ग.नं.२,राजेंद्र लॉज समोर,धुळे.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः श्रीमती.वी.वी.दाणी.)
(मा.सदस्याः श्रीमती.एस.एस.जैन.)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.एस.पी.कुलकर्णी.)
(सामनेवाले नं.१ तर्फे – वकील श्री.एम.एस.पाटील.)
(सामनेवाले नं.२ तर्फे – वकील श्री.ए.जी.शाह.)
-------------------------------------------------------------------------
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा - श्रीमती.वी.वी.दाणी.)
(१) तक्रारदारांनी, ए.टी.एम. मध्ये गहाळ झालेली रक्कम सामनेवाले यांच्याकडून मिळणेकामी सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांचे सामनेवाले यांच्या भारतीय स्टेट बॅंक धुळे येथे बचत खाते क्र.३०४९७५७५५४८ असून त्यांनी सामनेवाले यांच्याकडून ए.टी.एम. सेवेचा लाभ घेतलेला आहे. त्यांचा ए.टी.एम. कार्ड नं. ६२२०१८०८२५४०००६०८४४ असा आहे. तक्रारदारांच्या खात्यातून दि.०७-०८-२००९ रोजी रक्कम रु.३,०००/-, दि.१६-०९-२००९ रोजी रक्कम रु.५,०००/- व दि.२६-०९-२००९ रोजी रक्कम रु.१,३००/- असे एकूण रु.९,३००/- परस्पर काढण्यात आले आहेत. त्याबाबत ए.टी.एम. कार्डवरील टोल फ्री नंबरने तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे तक्रार केली व दि.०३-१०-२००९ रोजी तक्रार विनंती अर्ज केला. परंतु सामनेवाले यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. म्हणून वकीला मार्फत दि.२९-१०-२००९ रोजी नोटिस पाठविली. सदर नोटीसीस सामनेवाले यांनी खोटे उत्तर देऊन पैसे देण्याचे साफ नाकारले आहे. त्यामुळे सदरचा तक्रार अर्ज दाखल करावा लागला आहे.
(३) तक्रारदारांची विनंती अशी आहे की, सामनेवाले यांचेकडून खात्यातुन गहाळ झालेली रक्कम रु.९,३००/- हे गहाळ झालेल्या दिवसापासून दररोज रु.१००/- दंडा प्रमाणे मिळावेत तसेच मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.१५,०००/- व अर्जाचा खर्च रु.५,०००/- अशी सर्व रक्कम १३ टक्के व्याजासह मिळावी.
(४) सामनेवाले नं.१ यांनी त्यांचा लेखी खुलासा नि.नं.१४ वर आणि शपथपञ नि.नं १५ वर दाखल केले आहे. त्यात त्यांनी तक्रार अर्ज नाकारला असून असे नमूद केले आहे की, तक्रारदार यांच्या खात्यातून दि.०७-०८-२००९ रोजी रक्कम रु.३,०००/-, दि.१६-०९-२००९ रोजी रक्कम रु.५,०००/- व दि.२६-०९-२००९ रोजी रक्कम रु.१,३००/- असे एकूण रु.९,३००/- परस्पर कोणीतरी काढून घेतले या बाबत सामनेवालेंना कल्पना नसल्याचे म्हटले आहे. तक्रारदाराने त्यांचे खात्यावरील सदर रक्कम परस्पर कोणी काढून नेल्याची तक्रार लेखी स्वरुपात बॅंकेकडे कधीही केलेली नाही किंवा तक्रारदाराचे ए.टी.एम. कार्ड गहाळ झाले अशी बॅंकेला व पोलिस स्टेशनला तक्रारही केलेली नाही. तक्रारदारांचे खात्यावरुन ए.टी.एम. कार्डचा वापर करुन परस्पर कोणीतरी रक्कम काढली हा मजकूर अशक्यप्राय आहे. त्यास बॅंक जबाबदार नाही. ए.टी.एम.कार्ड व त्याचा कोड नंबर हा गुप्त असल्याने तो फक्त खातेदारासच माहिती आहे. त्यामुळे त्यांचे खात्यावरील पैसे इतर व्यक्तीने काढण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. तसे असल्यास त्यास वैयक्तिक रित्या तक्रारदार जबाबदार आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारांना लेखी सविस्तर खुलासा दिलेला आहे व नोटिस उत्तरही दिलेले आहे. सामनेवाले यांनी सेवेत कोणताही कसूर केलेला नाही सबब तक्रार अर्ज खर्चासह रद्द करावा, अशी सामनेवाले नं.१ यांनी विनंती केली आहे.
(५) सामनेवाले नं.२ यांनी त्यांचा खुलासा नि.नं.२५ वर दाखल केला आहे. त्यात त्यांनी असे नमूद केले आहे की, सदरचा तक्रार अर्ज खोटा असून तो मान्य नाही. तक्रारदार हा सामनेवाले नं.२ यांचा ग्राहक नाही. सदर मंचास कार्यक्षेञ नाही. तक्रारदार यांना सामनेवाले नं.१ यांनी बचत खाते व ए.टी.एम.कार्ड दिलेले आहे. त्याच्याशी सामनेवाले नं.२ यांचा संबंध नाही. तक्रारादारांची तक्रार ही सामनेवाले नं.१ यांच्याकडील बचत खात्यावरील रक्कम काढल्या बाबत आहे. सामनेवाले नं.२ हे केवळ ग्राहकांची गरज लक्षात घेऊन सेवा देतात. त्याकामी कोणताही मोबदला ते आकारत नूसन मोफत सेवा देतात. त्यामुळे सदरचा तक्रार अर्ज खर्चासह रद्द करावा अशी त्यांनी विनंती केली आहे.
(६) तक्रारदारांचा अर्ज नि.नं.२, शपथपञ नि.नं.३, कागदपञ नि.नं.५ वर एकूण १ ते ८, तसेच सामनेवाले नं.१ यांचा खुलासा नि.नं. १४, शपथपञ नि.नं.१५ व सामनेवाले नं.२ यांचा खुलासा नि.नं. २६ आणि सामनेवाले नं.१ व २ यांची प्रश्नावलीस उत्तरे नि.नं.२१ पाहता तसेच तक्रारदार व सामनेवाले नं.१ व २ यांच्या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब)सामनेवाले यांच्या सेवेत ञृटी स्पष्ट होते काय ? | : नाही. |
(क)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे. |
विवेचन
(७) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांचे सामनेवाले नं.१ यांच्या बॅंकेत बचत खाते आहे या बाबतची छायांकीत प्रत नि.नं.५/३ वर दाखल आहे. तसेच त्यासाठी तक्रारदारांनी सामनेवाले नं.१ यांच्याकडून ए.टी.एम. कार्डची सेवा घेतली असल्याचे सामनेवालेंनी मान्य केले आहे. यावरुन तक्रारदार हे सामनेवाले नं.१ चे ग्राहक आहेत हे स्पष्ट होते. तसेच तक्रारदार यांचे सामनेवाले नं.२ यांच्या बॅंकेत खाते नाही परंतु सामनेवाले नं.२ यांनी ग्राहकांना पैसे काढणेकामी ए.टी.एम. ची सेवा त्यांच्या बॅंकेमार्फत दिलेली आहे. याचा विचार होता तक्रारदार हे त्यांचे ग्राहक आहेत. म्हणून मुद्दा क्र. “अ” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘ब’’ –
(१) तक्रारदार यांची तक्रार अशी आहे की, त्यांच्या खात्यातून दि.०७-०८-२००९ रोजी रक्कम रु.३,०००/-, दि.१६-०९-२००९ रोजी रक्कम रु.५,०००/- व दि.२६-०९-२००९ रोजी रक्कम रु.१,३००/- असे एकूण रु.९,३००/- परस्पर कोणीतरी काढून नेले आहेत. ही गहाळ झालेली रक्कम सामनेवाले यांचेकडून परत मिळावी अशी त्यांनी मागणी केली आहे.
या कामी तक्रारदार यांनी सामनेवाले नं.१ यांच्याकडे दि.०३-१०-२००९ रोजी विनंती अर्ज दिलेला आहे. सदर अर्ज नि.नं.५/१ वर दाखल आहे. सदरचा अर्ज पाहता यामध्ये तक्रारदार यांनी त्यांच्या बचत खाते क्र. ३०४९७५७५५४८ मधून ए.टी.एम.कार्ड नं. ६२२०१८०८२५४०००६०८४४ द्वारे दि.०७-०८-२००९, दि.१६-०९-२००९ व दि.२६-०९-२०९ रोजी मिळूण, एकूण रक्कम रु.९,३००/- गहाळ झाले आहेत व या प्रकरणाबाबत तपशिल मिळणेकामी अर्ज दिलेला आहे, असा मजकूर नमूद आहे.
या अर्जावरुन असे दिसते की, तक्रारदार यांनी त्यांचे ए.टी.एम. कार्ड हरविले आहे याबाबत तक्रार दिलेली नसून केवळ त्यांच्या खात्यामधून पैसे काढले आहेत या कामी माहिती मिळणेसाठी अर्ज दिलेला दिसत आहे.
त्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदार यांना माहिती अधिकारात त्या बाबतचा खुलासा दिलेला आहे. सदर खुलासा नि.नं.५/६ वर दाखल आहे. हे कागदपञ पाहता तक्रारदारांचे बचत खात्यामधून ए.टी.एम. कार्ड नं. ६२२०१८०८२५४०००६०८४४ द्वारे दि.०७-०८-२००९ व दि.१९-०९-२००९ रोजी यु.टी.आय. बॅंकेमधून एकूण रु.८,०००/- व दि.२६-०९-२००९ रोजी रु.१३,०००/- स्टेट बॅंकेमधून काढले आहेत या बाबतची माहिती सामनेवाले यांनी तक्रारदारांना दिलेली आहे.
(२) तक्रारदारांनी त्यांचे बचत खात्याची छायांकीत प्रत नि.नं.५/६ वर दाखल केली आहे. त्यातील नोंदी पाहता बचत खाते क्र. ३०४९७५७५५४८ मधून ए.टी.एम.कार्ड नं. ६२२०१८०८२५४०००६०८४४ द्वारे दि.०७-०८-२००९ रोजी रक्कम रु.३,०००/-, दि.१६-०९-२००९ रोजी रक्कम रु.५,०००/- व दि.२६-०९-२००९ रोजी रक्कम रु.१,३००/- असे एकूण रु.९,३००/- काढलेले दिसत आहेत. यावरुन असे दिसते की, तक्रारदारांचे उपरोक्त नमूद खात्यामधून तक्रारदारांच्या ए.टी.एम. कार्डद्वारे पैसे काढलेले आहेत. त्यामुळे सदरची रक्कम ही गहाळ किंवा चोरी झालेली नाही असे स्पष्ट होत आहे.
(३) तक्रारदार यांनी सामनेवाले यांना प्रश्नावली देऊन उत्तरे मागविलेली आहेत. ती नि.नं.२१ वर दाखल आहेत. या उत्तराप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारांचे पैसे त्यांच्या ए.टी.एम. कार्ड द्वारे यु.टी.आय. बॅंक व एस.बी.आय. बॅंकद्वारे काढले गेले आहेत या बाबतची उत्तरे दिलेली आहेत.
या प्रश्नावली व उत्तरांमार्फत तक्रारदार यांना कोणता पुरावा आणावयाचा आहे याचा कोणताही बोध होत नाही. त्यामुळे सदरच्या प्रश्नावलीची उत्तरे यामधून तक्रारदाराचे पैसे गहाळ झाले किंवा चोरी झाले असे व त्यास सामनेवाले कसे जबाबदार आहेत हे सिध्द होत नाही.
(४) तक्रारदार यांच्या सामनेवाले बॅंकेतील बचत खात्याची छायांकीत प्रत, सामनेवाले यांनी दिलेला खुलासा यावरुन असे लक्षात येते की तक्रारदार यांच्या वरील रकमा या त्यांचे ए.टी.एम.कार्ड नं. ६२२०१८०८२५४०००६०८४४ द्वारे काढल्या गेलेल्या आहेत. सदर रकमा या ए.टी.एम. द्वारे काढल्या गेल्या असल्याने त्याचा वापर हा फक्त खातेधारकच करु शकतो. कारण ए.टी.एम. नंबर व त्याचा गुप्त पीन कोड नंबर हा केवळ खातेधारकासच माहिती असतो. त्याचप्रमाणे तक्रारदारांची त्यांचे ए.टी.एम. कार्ड हरविले असल्याची तक्रार नाही किंवा तसे त्यांनी बॅंकेला कळविलेले नाही. तसेच बॅंकेला सदर खात्यावरील स्टॉप पेमेंट करण्याबाबत माहिती दिलेली नाही. मुख्यत संबंधित पोलिस स्टेशनला तशी तक्रार केलेली दिसत नाही. यावरुन असे लक्षात येते की, तक्रारदारांचे ए.टी.एम. कार्ड हे हरविलेले नाही.
ए.टी.एम. कार्ड ही अशी व्यक्ती वापरु शकते की ज्या व्यक्तीस त्याचा गुप्त पीन कोड नंबर माहिती आहे. या प्रमाणे ज्या व्यक्तीस पीन कोड नंबर माहिती आहे व त्याचेजवळ ए.टी.एम. कार्ड आहे त्या वेळेसच सदर व्यक्ती खात्यावरुरील पैसे ए.टी.एम. द्वारे काढू शकते. याचा विचार होता सदरचे ए.टी.एम. कार्ड व त्याचा पीनकोड नंबर हा तक्रारदाराने गुप्त ठेवलेला नाही. तो ञयस्थ इसमास माहिती असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने या माहितीचा व कार्डचा वापर करुन तक्रारदारांच्या नकळत परस्पर पैसे काढलेले दिसत आहेत. त्यामुळे या परिस्थितीस तक्रारदार हे स्वत: वैयक्तिक रित्या जबाबदार आहेत. त्यास सामनेवाले जबाबदार होऊ शकत नाहीत.
(५) आमच्या मते ए.टी.एम. ही सुविधा बॅंकेने ग्राहकांना त्यांचे पैसे लवकरात लवकर सहजतेने प्राप्त होणेकामी दिलेली सेवा आहे. या प्रक्रियेत बॅंकेच्या संगणक प्रणालीमध्ये खातेदारांचे नांव, त्यांचा खाते क्रमांक, त्यांना दिलेला ए.टी.एम. नंबर व त्यास असलेला कोड नंबर आणि इतर सर्व अनुषंगीक माहिती संकलीत केलेली असते. या माहितीप्रमाणे संगणकीकृत माहिती असलेले ए.टी.एम. मशीन, त्यास पुरविलेल्या माहिती प्रमाणे म्हणजेच अधिकृत ए.टी.एम. कार्ड व त्याचा गुप्त कोड याची पडताळणी करुन काम करीत असते व त्या प्रमाणे त्यांचे पैसे ग्राहकांना देत असते. यामध्ये जर सर्व माहिती एकमेकांशी जुळली तरच पैसे ए.टी.एम. मशिनमूधून बाहेर येतात. यामध्ये थोडा बदल किंवा माहिती खोटी असेल तर पैसे मशिनद्वारे बाहेर येत नाहीत.
यावरुन असे दिसते की, ए.टी.एम. मधून पैसे काढतांना ए.टी.एम. मशीन केवळ कार्ड नंबर व माहिती बघते ती काढणारी व्यक्ती बघत नाही. त्यामुळे या प्रणालीमध्ये प्रत्येक खातेदाराने आपल्या खात्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आपले कार्ड व त्याचा कोड नंबर गुप्त ठेवणे आवश्यक आहे. हा गुप्त पिनकोड नंबर इतर व्यक्तीस माहिती असल्यास व त्यांना सदर ए.टी.एम. कार्ड प्राप्त झाल्यास त्याचा वापर करुन कोणीही ञयस्थ व्यक्ती पैसे काढू शकते. त्यामुळे त्यास बॅंक जबाबदार असू शकत नाही.
सदर तक्रार अर्जामध्ये तक्रारदारांचे ए.टी.एम. कार्ड हरविले आहे अशी तक्रार नाही. खाते पुस्तकावरील नोंदी प्रमाणे ए.टी.एम. कार्डचा नंबर व कोड नंबर जुळल्यामुळे पैसे काढले गेले आहेत. सदर परिस्थीतीस केवळ खातेदार हा स्वत: जबाबदार आहे असे स्पष्ट होत आहे. खात्यावरील रक्कम ही गहाळ किंवा चोरी झालेली नाही. त्यामुळे त्यास सामनेवाले हे जबाबदार होऊ शकत नाहीत व त्यांच्या सेवेत ञृटी नाही असे आमचे मत आहे.
सामनेवाले नं.२ यांनी केवळ तक्रारदार यांनी ए.टी.एम. कार्ड द्वारे पैसे काढणेकामी सेवा उपलब्ध करुन दिलेली आहे. सदर सेवा देणेकामी सामनेवाले हे त्या ग्राहकाकडून मोबदला घेत नाहीत किंवा कोणतीही फी आकारली जात नाही. तसेच तक्रारदार यांचे या सामनेवालेंच्या बॅंके खाते नाही. याचा विचार होता, तक्रारदार यांनी सामनेवाले नं.२ यांच्याकडून मोफत सेवा घेतलेली आहे. त्यामुळे त्यांना या अर्जात जबाबदार धरता येणार नाही. त्यांच्या विरुध्दची मागणी योग्य व रास्त नाही असे आमचे मत आहे. त्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे. म्हणून मुद्दा क्र. “ब” चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(९) मुद्दा क्र. ‘‘क’’ – वरील सर्व कारणांचा व कागदपञांचा विचार होता तक्रारदारांची मागणी योग्य व रास्त नाही. त्यामुळे तक्रार अर्ज नामंजूर करावा या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांकः २४/०५/२०१३.
(श्रीमती.एस.एस.जैन.) (श्रीमती.वी.वी.दाणी.)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.