निकाल
(घोषित दि. 12.09.2014 व्दारा श्रीमती. नीलिमा संत, अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे मौजे देवमुर्ती तालुका व जिल्हा जालना येथे राहतात व शेती करतात. गैरअर्जदार क्रमांक 1 ही बॅंक आहे. या बॅंकेत तक्रारदार व शांताबाई आनंदा हिवाळे यांचे संयुक्त खाते उघडलेले होते. त्यांचा बचत खाते क्रमांक 36999 असा होता. सदर खाते उघडत असतांना पैसे काढावयाचे असल्यास अर्जदार व शांताबाई या दोघांच्या सहया आवश्यक आहेत अशी नोंद अर्जात केलेली होती. दिनांक 17.11.2011 रोजी वरील खात्यात रुपये 1,83,936/- जमा करण्यात आले. मध्यंतरीच्या काळात तक्रारदाराला बॅंकेत येण्यास काहीही कारण घडलेले नाही. नंतर दिनांक 16.01.2014 रोजी तक्रारदार गैरअर्जदाराकडे आला असता चौकशीअंती त्याच्या लक्षात आले की, त्याच्या खात्यातील रक्कम रुपये 1,86,200/- कमी झालेले आहेत. वरील रक्कम तक्रारदारांनी गैरअर्जदारांकडून उचललेली नाही. शांताबाई हिवाळे यांचेकडे चौकशी केली असता त्यांना या गोष्टीची कल्पना नाही. असे असतांना गैरअर्जदार यांनी तक्रारदारांच्या खात्यातील रक्कम वजा करुन तक्रारदारांची फसवणूक केली आहे व तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत कमतरता केली आहे.
तक्रारदारानी दिनांक 17.01.2014 रोजी रजिस्टर पोस्टाने तक्रार अर्ज गैरअर्जदाराकडे पाठवला. परंतू गैरअर्जदाराने त्याचे काहीही उत्तर दिलेले नाही. म्हणून तक्रारदारानी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदाराना दिनांक 17.01.2014 रोजी रक्कम वजा झाल्याचे समजले म्हणून तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार मुदतीत आहे.
तक्रारदार या तक्रारीव्दारे रुपये 3,00,000/- एवढी नुकसान भरपाई मागत आहेत. त्यांनी आपल्या तक्रारी सोबत गैरअर्जदारांनी त्यांना दिलेले पत्र, माहितीच्या अधिकारा अंतर्गत त्यांनी दिलेला अर्ज, त्यांचा व गैरअर्जदाराचा पत्रव्यवहार, खाते क्रमांक 36999 चा खाते उतारा अशी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार मंचा समोर हजर झाले. त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या जबाबानुसार शांताबाई हिवाळे यांनी त्यांच्या बॅंकेत दिनांक 31.10.2009 रोजी बचत खाते उघडले. त्यात ओळख म्हणून अभिमन्यू भुरेवाल यांची स्वाक्षरी आहे. वरील खात्यात नॉमिनी म्हणून शांताबाई यांनी भास्कर भालेराव (तक्रारदार) यांना नामांकन केले होते.
दिनांक 16.06.2011 रोजी गैरअर्जदारांनी शांताबाई यांना पत्र लिहीले व 100/- रुपयाच्या बॉंड पेपरवर एक दस्ताऐवज करुन दिला. ज्यात तक्रारदार यांना बॅंक खाते चालविण्याचा अधिकार देण्यात येत आहे असे नमूद केले होते. परंतू तक्रारदारानी त्यासाठी आवश्यक असलेला स्वत:चा स्वाक्षरी नमुना बॅंकेत दाखल केला नाही. दिनांक 11.11.2011 रोजी शांताबाई यांनी पुन्हा गैरअर्जदार यांचेकडे 100/- रुपयाचा बॉंड लिहून दिला की, शांताबाई हिवाळे यांनी दशरथ भालेराव यांना दिलेले अधिकारपत्र रद्द करण्यात येत आहे व त्यांच्या बॅंकेत असलेली फिक्स डिपॉझिटची रक्कम खातेदारासच देण्यात यावी. त्यानुसार गैरअर्जदार बॅंकेने वरील रक्कम बचत खाते धारक शांताबाई हिवाळे यांच्या खात्यात जमा केली. ती नंतर वेळोवेळी शांताबाईनी काढून घेतली. शांताबाई सर्व व्यवहार अंगठयाचा ठसा देवून करत. रक्कम काढतेवेळी गैरअर्जदारांच्या अधिका-यांनी त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींची नावे व त्यांचे नाते नमूद करुन त्यावर स्वाक्षरी घेतलेली आहे व बॅंकेच्या सर्व नियमांचे पालन केलेले आहे.
गैरअर्जदाराचे म्हणणे आहे की, बचत खाते क्रमांक 36999 हे संयुक्तपणे उघडण्यात आले होते. ही गोष्ट संपूर्ण खोटी आहे. बचत खाते शांताबाईच्याच नावे होते. शांताबाई हिवाळे यांनी तक्रारदारांचे सर्व अधिकार काढून घेतल्यामुळे तक्रारदारांचा वरील खात्याशी काही संबंध नाही. वरील बचत खाते चालविण्यासाठी दोन लोकांची स्वाक्षरी आवश्यक आहे असे दर्शविणारा कोणताही कागद खाते धारकांनी बॅंकेकडे सादर केलेला नाही. शांताबाई यांनी स्वत:च्या अंगठयाच्या ठशाने त्यांच्या खात्यातून सर्व रक्कमा (दिनांक 31.12.2011 पर्यंत) काढून घेतलेल्या आहेत. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज दिनांक 21.01.2014 रोजी मंचात दाखल केला आहे. गैरअर्जदारांच्या माहिती नुसार शांताबाई यांचा मृत्यू तक्रार दाखल करण्यापुर्वीच झालेला आहे. तक्रारदारांनी त्यांच्या हयातीत तक्रार दाखल न करता मृत्यू नंतर खोटी तक्रार दाखल केली आहे. म्हणून तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात यावी व त्यांना रुपये 5,000/- दंड लावण्यात यावा अशी प्रार्थना गैरअर्जदार यांनी केली आहे.
गैरअर्जदारांनी आपल्या जबाबा सोबत बचत खाते क्रमांक 36999 उघडतांना करुन दिलेली कागदपत्रे, शांताबाई यांनी अनुक्रमे दिनांक 13.06.2011 व 16.11.2011 रोजी करुन दिलेले शपथपत्र, शांताबाईंनी गैरअर्जदार यांना लिहीलेले पत्र, गैरअर्जदार यांच्या बॅंकेचे पैसे काढून घेतल्याच्या पावत्या, खाते क्रमांक 36999 चा खाते उतारा अशी कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रारदारांची तक्रार, गैरअर्जदारांचा जबाब व दाखल कागदपत्र यांच्या अभ्यासा वरुन मंचाने खालील मुद्दे विचारात घेतले.
मुद्दे निष्कर्ष
1.गैरअर्जदारांनी तक्रारदारांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी केली आहे का ? नाही
2.काय आदेश ? अंतिम आदेश नुसार
तक्रारदारातर्फे विव्दान वकील श्री.एस.बी.मोरे व गैरअर्जदारांतर्फे विव्दान वकील श्री.आनंद एन झा यांचा युक्तीवाद ऐकला. दोघांनीही लेखी युक्तीवाद दाखल केला त्याचे वाचन केले.
कारणमिमांसा
मुद्दा क्रमांक 1 साठी – खाते क्रमांक 36999 उघडतांना शांताबाई हिवाळे यांनी भरुन दिलेल्या फॉर्मचे अवलोकन करता त्यात तक्रारदार भास्कर भालेराव यांचा उल्लेख केवळ नॉमीनी म्हणून केल्याचे स्पष्ट दिसते. त्यात कोठेही वरील खाते संयुक्तपणे चालविले जाईल (Joint Account) असा उल्लेख केल्याचे दिसत नाही. त्यावरुन वरील खाते हे तक्रारदार म्हणतात त्या प्रमाणे संयुक्त बचत खाते असल्याचे दिसत नाही.
शांताबाई हिवाळे यांनी दिनांक 13.06.2011 रोजी बॅंकेला खाते क्रमांक 36999 हे चालविण्याचा अधिकार त्यांनी तक्रारदार भास्कर दशरथ भालेराव यांना दिल्याचे व वरील खाते संयुक्तीक करण्याचे पत्र दिले होते असे दिसते. परंतू त्यांनीच दिनांक 16.11.2011 रोजी पुन्हा रुपये 100/- च्या बॉंड पेपरवर नोटरी यांचेकडे शपथपत्र दिले. त्यात त्यांनी भास्कर भालेराव यांना देण्यात आलेले सर्व अधिकार रद्द करत असल्याचे व मुदत ठेवीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी असे सांगितल्याचे दिसते.
त्यानंतर वेळोवेळी शांताबाई यांनी या त्यांच्या बचत खात्यातून वेगवेगळया रकमा काढल्याचे दिसते. त्या सर्व पावत्यावर शांताबाई यांचा अंगठा आहे व ओळख म्हणून रतन रामा हिवाळे व इतर यांचे नाव व तक्रारदाराशी नाते नमूद करुन स्वाक्षरी केलेली दिसत आहे.
वरील सर्व कागदपत्रात कोठेही बचत खाते क्रमांक 36999 मधील रक्कम काढून घेण्यासाठी शांताबाई हिवाळे व भास्कर भालेराव या दोघांच्याही स्वाक्षरी आवश्यक होत्या असे दिसत नाही. भास्कर भालेराव यांचे नावे खात्यात केवळ नॉमीनी म्हणून होते व त्यांना शांताबाई यांच्या मृत्यू नंतरच अधिकार प्राप्त होणार होता. खात्यातील रक्कम शांताबाई यांच्या हयातीतच काढली गेलेली दिसते. तक्रारदार म्हणतात की, रक्कम काढल्याच्या पावत्यावरील शांताबाई यांचा अंगठा बनावट आहे. परंतू हे सिध्द् करण्यासाठी कोणताही पुरावा तक्रारदारांनी आणला नाही. अथवा वरील दस्तऐवजा बाबत हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल मागवला नाही. अशा परिस्थितीत तक्रारदार गैरअर्जदारांनी खोटेपणाने शांताबाई हिवाळे यांच्या नावाने खात्यातील रक्कम उचलली व तक्रारदारांची फसवणूक केली ही गोष्ट तक्रारदार पुराव्यानिशी सिध्द् करु शकलेले नाहीत असा निष्कर्ष मंच काढत आहे.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चा बाबत आदेश नाहीत.