सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 93/2009
तक्रार दाखल झाल्याचा दि. 09/11/2009
तक्रार निकाल झाल्याचा दि. 13/01/2010
श्री रवळनाथ रामा पाटील
वय 59 वर्षे, धंदा – सेवानिवृत्त
रा.गडहिंग्लज, चिदंबरनगर पुरंदर,
ता.गडहिंग्लज, जि. कोल्हापूर ... तक्रारदार
विरुध्द
1) बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप.सोसायटी
लिमिटेड तर्फे चेअरमन श्री सहदेव सुखाजी सातार्डेकर
रा.बांदा, तालुका सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
2) बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप.सोसायटी
लिमिटेड तर्फे व्हाईस चेअरमन श्री हनुमत शंकर आळवे
रा.बाजारपेठ बांदा, तालुका सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
3) श्री दशरथ अर्जुन परब
सरव्यवस्थापक, बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप.सोसायटी
लिमिटेड बाजारपेठ बांदा, तालुका सावंतवाडी,
जि.सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
3) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
तक्रारदारातर्फेः- व्यक्तीशः
विरुद्धपक्षातर्फे- श्री दशरथ अर्जुन परब.
(मंचाच्या निर्णयाद्वारे श्रीमती उल्का गावकर, सदस्या)
नि का ल प त्र
(दि.13/01/2010)
1) तक्रारदारांनी विरुध्द पक्ष यांचे पतसंस्थेत ठेवी ठेवलेल्या होत्या व त्या ठेवीच्या रकमा त्यांचे बचत खाते क्र.3136 मध्ये वर्ग करण्यात आल्या होत्या व या बचत खात्यात असलेली रक्क्म तक्रारदाराने मागणी करुनदेखील विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी अदा केलेली नसलेमुळे तक्रारदारांने सदरहू तक्रार दाखल केलेली आहे. याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, बांदानगर अर्बन क्रेडीटको.ऑप. सोसायटी लि. बांदा ही पतसंस्था असून या पतसंस्थेचे विरुध्द पक्ष क.1 हे चेअरमन असून विरुध्द पक्ष क.2 हे व्हाईस चेअरमन आहेत. विरुध्द पक्ष क.3 हे सदरील पतसंस्थेचे जनरल मॅनेजर आहेत. तक्रारदाराचे विरुध्द पक्ष यांचे पतसंस्थेत बचत ठेव खाते असून त्याचा क्रमांक 3136 असा असून या खात्यात दि.26/05/2009 रोजी पर्यंत रक्कम रु.1,49,812/- (रुपये एक लाख एकोणपन्नास हजार आठशे बारा मात्र) जमा आहेत. तक्रारदाराने सदरहू रक्कमेची मागणी करुनही विरुध्द पक्षाने रक्कम अदा केलेली नसल्यामुळे सदरहू रक्कमेची व्याजासहीत तक्रारदाराने मागणी केलेली आहे. तसेच आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.40,000/- तसेच एकरक्कमी रक्कम न दिल्यास रक्कम घेण्यासाठी यावे लागणारा खर्च व इतर खर्च मिळून रु.15,000/- ची मागणी केलेली आहे.
2) तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र दिलेले आहे. तक्रारदाराने नि. 3/5 वर बचत खाते क्र.3136 च्या खातेपुस्तकाच्या पहिल्या व शेवटच्या पानाची प्रत हजर केलेली आहे.
3) सदरहू तक्रारीच्या नोटीसा विरुध्द पक्षकार यांना बजावण्यात आलेल्या आहेत. नि.14 वर विरुध्द पक्ष क्र.3 यांनी आपले म्हणणे दिलेले आहे. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे हजर झालेले आहेत, परंतु त्यांनी आपले म्हणणे सादर केलेले नाही. तक्रारदाराची तक्रार, त्यासोबतचे शपथपत्र, हजर केलेली कागदपत्रे विरुध्द पक्ष क्र.3 चे म्हणणे यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी निघतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
2 | ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत विरुध्द पक्ष यांनी त्रुटी केली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदाराची तक्रार मंजूर होणेस पात्र आहे काय ? | होय./ अंशतः |
-का र ण मि मां सा-
मुद्दा क्रमांक 1 व 2 - तक्रारदाराने विरुध्द पक्ष यांचे पतसंस्थेत काही ठेवी ठेवलेल्या होत्या. सदरच्या ठेवी तक्रारदाराने मागणी केली असता, त्या रक्कमा विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदार यांच्या बचत खात्यात जमा केल्या. सदरहू बचत खात्याचा क्र.3136 असा असून त्या बचत खात्याची झेरॉक्स प्रत नि.3/5 वर हजर केली आहे. विरुध्द पक्ष ही वित्त पुरवठा करणारी पतसंस्था असलेने व तक्रारदारानी त्यांचेकडे रक्कमा गुंतविलेल्या असलेने तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे “ग्राहक” होतात. तक्रारदाराचे बचत खात्यात दि.26/05/2009 अखेर रक्कम रु.1,49,812/- (रुपये एक लाख एकोनपन्नास हजार आठशे बारा) एवढी रक्कम जमा आहे. सदरहू रक्कमेची तक्रारदाराने विरुध्द पक्षकार यांचेकडे वेळोवेळी तोंडी मागणी केलेली होती; परंतु विरुध्द पक्षकार यांनी रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी दि.21/03/2009 रोजी लेखी पत्राने विरुध्द पक्षकार यांचेकडे मागणी केली. सदरहू पत्राची झेरॉक्स प्रत नि.3/4 वर आहे; परंतु तरीही विरुध्द पक्षकार यांनी रक्कम अदा केली नाही. तसेच मे. जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांनी तक्रारदाराचे अर्जाबाबत उचीत कार्यवाही करणेसंबंधी दि.03/12/2008, दि.15/06/2009 रोजी विरुध्द पक्ष यांना पाठविलेल्या पत्राची दखल विरुध्द पक्ष यांनी घेतली नाही. सदरहू पत्र नि.3/1 व नि.3/2 वर आहे. तक्रारदार हे पेशाने शिक्षक असून ते सेवानिवृत्त झालेले आहेत व सेवानिवृत्तीनंतर त्यांना पैशाची आवश्यकता लागणार या हेतूनेच त्यांनी विरुध्द पक्षकार यांचेकडे पैसे गुंतविलेले होते; परंतु विरुध्द पक्षकार यांनी जाणूनबुजून सदरहू बचत खात्यातील रक्कम तक्रारदारास अदा करणेस विलंब केलेला आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी त्रुटी केलेली आहे असे आमचे मत आहे.
मुद्दा क्रमांक 3 - तक्रारदार यांची विरुध्द पक्ष यांचे पतसंस्थेत दि.26/05/2009 रोजी अखेर रक्कम रु.1,49,812/- एवढी रक्कम बचत खाते क्र.3136 मध्ये जमा आहे. त्यामुळे सदरहू रक्कम विरुध्द पक्षकार हे तक्रारदार यांना व्याजासहीत देणे लागतात. सदरहू बचत खाते पुस्तकाची झेरॉक्स नि.3/5 वर हजर आहे. या रक्कमेबाबत विरुध्द पक्षकार यांनी कोणतीही हरकत उभारलेली नाही. त्यामुळे या रकमेवर रिझर्व्ह बँकेच्या दिशानिर्देशानुसार 6 टक्के व्याजदराने तक्रारदाराला व्याज अदा करणे योग्य होईल असे आमचे मत आहे. त्याप्रमाणे आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करीत आहोत.
अं ति म आ दे श
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करणेत येत आहे.
2) बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप.सोसायटी लि.बांदा यांनी व विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदाराचे बचत खाते क्र.3136 मधील जमा रक्कम रु.1,49,812/- (रुपये एक लाख एकोणपन्नास हजार आठशे बारा मात्र) एवढी रक्कम तक्रारदारास अदा करावी व त्यावर दि.26/05/2009 पासून सदरील रक्कम पूर्ण फेड होईपर्यंत 6 टक्के व्याजदराने व्याज अदा करावे.
3) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत कसूर केलेमुळे तक्रारदारास झालेल्या त्रासापोटी व प्रकरण खर्चाबद्दल तक्रारदार यांस रक्कम रु.3,500/- (रुपये तीन हजार पाचशे मात्र) वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास अदा करावे.
4) तक्रारदाराच्या इतर मागण्या फेटाळण्यात येतात.
5) वरील आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीच्या 45 दिवसांच्या आत करणेत यावी.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 13/01/2010
सही/- सही/- सही/-
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.
Ars/-