ग्राहक तक्रार क्र. 70/2016
अर्ज दाखल तारीख : 18/02/2016
निकाल तारीख : 13/04/2017
कालावधी: 01 वर्षे 01 महिने 25 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) लक्ष्मण मारुती करणवर,
वय.-58, धंदा – शेती,
रा.भोगलगाव, ता. भुम, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) बळीराजा एंटरप्रायजेस, प्रो, प्रा. विजय विठठल ढगे,
तहसील कार्यालयासमोर परंडा रोड भुम,
ता.भुम, जि. उस्मानाबाद.
2) एरिया मॅनेजर, जी.एन.शिंदे,
नॅशनल सीड कंपनी लि.
एफ. 8/2 एम. आय.डी.सी. एरिया,
नरेगांव, चिखलठाणा, औरंगाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : अॅड.शालीनी तावरे.
विप क्र.1 तर्फे विधिज्ञ : श्री.सी.एन.डोंबाळे.
विप क्र.2 तर्फे विधिज्ञ : श्री.पी.एम.नळेगावकर.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते यांचे व्दारा :
1) तक हे मौजे भेगलगांव ता. भुम येथील रहिवाशी असुन ते शेती व्यवसाय करतात व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
जमीन स.नं.99 मध्ये 00 हे. 40 आर. जमिन आहे. दि.24/06/2015 रोजी उडीदाचे एन.एस.स. 04 किलोची बॅग किंमत रक्कम रु.540 व मुगाचे पोकर या कंपनीचे एक बँग रक्कम रु.240/- बियाणाच्या प्रत्येक एक बॅग विकत घेतल्या. त्याप्रमाणे विप क्र.1 ने तक यास पावती क्र.2,560/- दिली. मात्र विप क्र. 1 यांनी पावती देतांना हेतुपुरस्सर बियाणाचा लॉट क्रमांक व अंतीम तारीख टाकली नाही. सदरची पावती तक यांनी दाखल केली आहे. सदर बियाणे 40 आर. क्षेत्रामध्ये दि.27/06/2015 रोजी योग्य पध्दतीने पेरले होते पैकी मुग पिकाची 100 टक्के उगवण झाली परंतु उडीद बियाणाची 100 उगवण न होता 90 टक्के मुगीचे पिकासारखी मिक्स उगवून आले आहे. म्हणून तक यांनी विप क्र. 1 व 2 यांना तसेच मा.कृषी अधिकारी पं.स.भुम व तालुका कृषी अधिकारी भुम यांना पत्रवयवहार करुन माहिती दिली त्याप्रमाणे दि.17/10/2015 रोजी उपविभागीय कृषी अधिकारी भुम व कृषी अधिकारी पंचायत समिती, भुम यांनी समक्ष येऊन विप क्र. 1 व 2 यांच्या समक्ष पंचनामा केला. विप यांनी नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले मात्र दिली नाही म्हणून तक यांनी वारंवार पाठपुरावा केला तसेच विधिज्ञा मार्फत नोटीस पाठवली असता असता प्रतिसाद दिला नाही् म्हणून तक यांची फसवणूक करुण्यात आली आहे म्हणून विप यांनी तक यांना आर्थिक व मानसीक त्रासापोटी नुकसान भरपाई पोटी रु.1,00,000/- दि.27/06/2015 पासून 12 टक्के व्याज दराने व सदर प्रकरणाचा खर्च देण्याचा हुकुम व्हावा अशी विनंती केली आहे.
2) सदर तक्रारीबाबत विप क्र.1 यांना नोटीस पाठवण्यात आली असता त्यांनी आपले म्हणणे पुढीलप्रमाणे दखल केले आहे.
तक यांनी सदर बियाणे तक यांनी खरेदी केले असल्याचे मान्य केले आहे. मात्र तक यांनी योग्यवेळी पेरणी केली नाही तसेच कोणतेही रासायनिक तसेच शेणखत टाकलेले नाहीत. तसेच पेरणीपुर्व कोणतीही मशागत केली नाही. सदर सातबारा ऊता-यावर गट क्र.99 मध्ये क्षेत्र तक यांच्या नावे नाही. तसेच सदर बियाणे पेरल्याबाबत पुरावा नाही. सदर बॅगचे प्रमाणपत्र व सील तक ने अर्जासोबत सादर केले नाही या सर्व बाबींवरुन तक मा. कोर्टाची दिशाभुल करित आहे. तक याने दि.27/06/2015 रोजी पेरणी केली असली तरी सदर पीक केवळ 90 दिवसाचे पीक असल्याने दि.17/10/2015 पर्यंत पंचनामा करेपर्यत शेतात राहणार नाही यावरुन पाहणी पंचनामा खोटा तयार केला आहे. विप हे सदर बियाणांचे विक्री करण्याचे काम करतात त्यामुळे बियाणांची उगवण क्षमता, भेसळ या बाबी बियाणे कंपनीच्या कार्यावर अवलंबून असतात व त्यात विप क्र.1 चा काहीही हस्तक्षेप नसतो. त्यामुळे तक यांचा नुकसान भरपाईचा अर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी विनंती केली आहे.
3) विप क्र.2 यांना सदर तक्रारीबाबत नोटीस पाठवण्यात आली असता त्यांनी आपले म्हणणे पुढीलप्रमाणे दाखल केले आहे.
तक यांनी सदर बियाणे खरेदी केले तसेच सदर जमीनीवर लागवड केली बगैरे तक यांनी पुराव्यासह सिध्द करावे. तक 40 आर क्षेत्रामध्ये उडीद व मुग या पिकाची 2 बॅग मधील पिक पेरले असे म्हणतो म्हणजे दोन्ही बियाणे मिक्स होऊन गडबड झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर पंचनामे विप यांना न कळविल्याने त्यांचे समोर झालेला नाही. विप यांनी सदर बियाणे प्रयोगशाळेत तपासणी करुन बियाणे पॅक करुन बॅगा विक्रीसाठी पाठवलेल्या आहेत. सदर बियाणे 90 टक्के उगवले असताना ते पुर्णत्वास येण्या अगोदरच काढुन टाकलेले आहे. म्हणून तक यांची तक्रार खोटी असून त्यांची झालेली नुकसान विप यांना मान्य नाही म्हणून सदरची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी असे नमूद केले आहे.
4) तक यांची तक्रार, सोबत दाखल केलेली कागदपत्रे, विप यांचे म्हणणे व उभयतांचा युक्तिवाद यांचा विचार करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात आम्ही त्यांची उत्तरे त्यांचे समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) तक विप चा ग्राहक आहे काय ? होय.
2) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
3) तक अनुतोषास पात्र आहे काय? होय.
4) आदेश कोणता ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 ते 3 :
5) सदरची तक्रार ही मुख्यत: तक यांनी खरेदी केलेले बियाणे उडीद व मुगा पैकी मुगाचे व्यवस्थित उत्पन्न मिळाले पण उडीदा एैवजी मुग सदृष्य पीक आले त्यामुळे तक यांनी सदरची तक्रार दाखल केलेली आहे. तक यांनी तक्रारी सोबत बियाणे खरेदी केल्याची पावती दि.24/06/2015 ची दिसुन येते. तसेच तालूका तक्रार निवारण समितीचा क्षेत्रय भेटींचा अहवाल वपंचनामा दाखल केला असून त्यात नमूद केल्या प्रमाणे पिकांची किती टक्के झाडांना फल धारणा झालेली नाही या रकान्या समोर 90 टक्के असे नमूद केले आहे व अपेक्षित उत्पादनापेक्ष किती टक्के उत्पादन घट अपेक्षित आहे या समोर 90 टक्के असे नमूद केले आहे तसेच क्षेत्र 40 आर. व वापरलेले बियाणे 4 किलो व अनुवंशिक भेसळ बाबत प्रकार असल्यास या रकान्यात उडीद वाणा ऐवजी स्थानिक मुग वाणासारखीच झाडांची वाढ दिसुन येते असे नमूद केले आहे. निष्कर्ष या रकान्यात संबंधीत लाभार्थीस उडिद म्हणून दिलेलया बियाण्यात मुग बियाण्याची 90 टक्के भेस दिसुन येते त्यामुळे पीक उत्पादनात 90 घट अपेक्षित आहे असे नमूद करण्यात आले आहे. सदर पंचनामा विप क्र. 1 याची साक्ष नोदविण्यात आलेली असून त्यावर त्यांचा सही व शिक्का दिसून येतो. सदर पंचनामा उपविभागीय कृषी अधिकारी भुम जि. उस्मानाबाद यांध्यक्षते खाली केला असल्याचे दिसुन येते. विप क्र.1 यांनी सदर घटने बाबत आपली बाजू मांडतांना तक यांनी बियाणे पेरणी पुर्वी तसेच नंतर त्याची योग्य ती काळजी व मेहनत न घेतल्याने त्यांचे नुकसान झाले असून तक यांनी आपलेच बियाणे पेरले होते की अन्य कोणते बियाणे पेरले याबाबतचा पुरावा तक यांनी सादर करावा तसेच इतर शेतक-यांच्या अशा प्रकारच्या तक्रारी नसून केवळ तक यांचीच आहे व सदरबाबत विप यांची भुमिका केवळ विक्रेता म्हणून असून विक्रीबाबत तक यांची तक्रार नाही व उत्पादनातील दोषा करीता विप क्र.1 हे जबाबदार नाही असे म्हणणे दिले आहे.
6) तर विप क्र. 2 यांनी सदर पंचनामे विप यांना न कळविल्याने त्यांचे समोर झालेला नाही. विप यांनी सदर बियाणे प्रयोगशाळेत तपासणी करुन बियाणे पॅक करुन बॅगा विक्रीसाठी पाठवलेल्या आहेत. सदर बियाणे 90 टक्के उगवले असताना ते पुर्णत्वास येण्या अगोदरच काढुन टाकलेले आहे तसेच दाखल पंचनामा देखील चुकीचा असल्याने अमान्य करण्यात आलेला आहे इत्यादी म्हणणे दिले आहे.
7) तक यांनी दाखल केलेली तक्रार ही मुग व उडीद या बियाण्याच्या भेसळी विषयी आहे. हे खरे की ही दोन्ही पिके खरीपात हंगामात असतात व एकाच वेळी असतात परंतु उडीदाचा रंग काळा असतो तर मुगाचा रंग पिवळा किंवा पिवळसर हिरवा असतो. पेरणी करते वेळीस हा फरक निदर्शनास येणे शक्य असते. परंतु या बाबतीत विप ही फारसा आक्षेप घेतांना दिसुन येत नाही.
8) तक ने पावती दाखल केली त्यावर लॉट क्रमांक नाही ती विक्रेत्याने का टाकला नाही किंवा बियाण्याच्या पिशवीवर लॉट क्रमांकच नव्हता हे समजु शकले नाही. तक ने बियाण्याची पिशवीबरोबरच टॅग पेपर दाखल केला असता तर हे समजु शकले असते. परंतु तक्रारकत्यास तक्रार सिध्द करण्याचे बंधन असतांना व तक तर्फे विधिज्ञ असतांना तक हे सक्षम पुरावे सादर करण्यास कमी पडतात हे खेदाने नमुद करावे लागेल तथापि तक ने दाखल केलेला कृषि अधिका-याचा अहवाल हा पुरावा म्हणून स्विकारण्यास योग्य नाही किंवा विश्वासार्ह नाही हे विप सिध्द करु शकला नाही. सदर अहवालावर विप क्र. 1 ची सही आहे तसेच असा अहवाल बनवताना काही त्रुटी राहिल्या असतील व तो विहित पध्दतीने बनवला नसेल तर त्यासाठी शेतक-याला जबाबदार धरता येणार नाही अथवा शेतक-याचे नुकसान अमान्य करता येणार नाही. कृषि अधिकारी हे शासकीय अधिकारी असतात व त्यांचा अहवाल हाच प्रत्यक्ष पाहणी अहवाल व तज्ञ व्यक्तीने केलेला पाहणी अहवाल असल्याने अमान्य करता येणार नही. शेतक-याची प्राथमिक जबाबदारी ही अश्या अधिका-यांना कळवणे एवढीच आहे. त्यामुळे कृषि अधिका-याचा अहवाल हा प्रमाण मानुन तक्रार मान्य करण्यात येते तसेच मुद्दा क्र. 1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देतो व पुढीलप्रमाणे आदेश करतो.
नुकसान भरपाईबाबत:
9) तक ने नुकसान भरपाईपोटी रु.1,00,000/- ची मागणी तक्रारीत तर खाडाखोड करुन रु.50,000/- ची मागणी प्रार्थना क्लॉजमध्ये टाकली आहे. या रकमेचे कोणेतही पटण्यासारखे स्पष्टीकरण सप्रमाण सिध्द केले नाहीत तथापि सांकेतीक स्वरुपात झालेले नुकसान म्हणून तक यास रु.30,000/- एवढे नुकसान मंजूर करण्यात येते.
आदेश
तक यांची तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
1) विप यांनी तक यांना झालेल्या नुकसानीपोटी रु.30,000/- (रुपये तिस हजार फक्त) द्यावी.
2) विप क्र.1 व 2 यांनी संयुक्तीकरित्या किंवा स्वतंत्ररित्या तक यांना नुकसान भरपाईपोटी रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावे.
3) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे दाखल तक्रारीतील मा.सदस्यांसाठींचे संच इच्छूक अपिलार्थी पक्षकाराने हस्तगत करावेत.
(श्री.मुकुंद.बी.सस्ते) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद