ग्राहक तक्रार क्र. 321/2014
अर्ज दाखल तारीख : 16/12/2014
अर्ज निकाल तारीख: 11/06/2015
कालावधी: 0 वर्षे 05 महिने 25 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. श्री. बाळासाहेब उत्तमराव तांबारे,
वय - 28 वर्षे, धंदा – शेती,
रा.अंदोरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. बळीराजा कृषि सेवा केंद्र,
मार्केट यार्ड मेन रोड, कळंब,
ता. कळंब, जि. उस्मानाबाद.
2. किर्तीमान अॅग्रो जेनेटिक लि.,
गट नं.11, वाळूज-लांजी रोड, वाकी,
इमामपूर, ता.पैठण, जि. औरंगाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. प्र. अध्यक्ष.
2) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.ए.डी.भिसे.
विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 तर्फे विधीज्ञ : श्री.बी.आर.पवार.
न्यायनिर्णय
मा. प्र.अध्यक्ष श्रीमती विद्युलता जे.दलभंजन यांचे व्दारा:
1. तक्रारदार बाळासाहेब उत्तमराव तांबारे हे मौजे अंदोरा ता. कळंब जि. उस्मानाबाद येथील रहिवाशी आहेत त्यांनी विरुध्द पक्ष यांचेवर नुकसान भरपाईची तक्रार दाखल केली आहे.
2. अर्जदार यांना मौजे अंदोरा येथे जमीन गट क्र.394 क्षेत्र 3 एच 45 आर. एवढी जमीन आहे व ते शेतीवर उपजिविका करतात.
3. साल सन 2014/215 मधील खरीप हंगामासाठी अर्जदाराचे कुटूंबियांना शेतीचे नांगरण मोगडण, पाळी, इ. प्रकारची मशागत ट्रॅक्टरव्दारे करुन जमीन पेरणीसाठी तयार केली होती. अर्जदार यांनी विप क्र.1 (संक्षिप्त रुपात कृषी केंद्र) यांचे कडून विप क्र.2 (संक्षिप्त रुपात उत्पादित कंपनी) चे बियाणे 25 किलो वजनाचे 2 बॅग असे एकूण किंमत रु.4,600/- अदा करुन दि.26/05/2014 रोजी खरेदी केली व बियाणे खरेदीबाबत कृषीकेंद्र यांनी रितसर कॅशमेमोची पावती क्र.1382 अर्जदारास दिली. अर्जदारास कृषी केंद्र यांनी आश्वासन दिले कि बियाणे उच्च उगवण शक्तीचे व गुणवत्ताक्षम भरपूर उत्पन्न देणारे आहे व उत्पादित कंपनीच्या सोयाबीनचे बियाणांसाठी नावलौकीक आहे.
4. त्यानंतर अर्जदाराने दि.11/07/2014 रोजी जमीन गट नंबर मधील एक 1 हे. 45 आर. क्षेत्रापैकी 1 हे. या क्षेत्रात सोयाबीन पेरले.
5. पेरणी करतांना प्रती बॅग पेरणीसाठी 1 पोते डि.ए.पी. खत ज्याची किंमत रु.1,200/- असून पेरणी करण्यास प्रति एकर रु.800/-, राखणी करण्यास रु.500/- येणेप्रमाणे प्रतिबॅग रु.2,500/- खर्च आला.
6. पेरणीनंतर अर्जदाराने शेतात जाऊन पिकाची पाहणी केली असता सोयाबीनची अत्यंत कमी रोपे उगवून आल्याचे दिसुन आले कृषी केंद्राला बियाणांची योग्य उगवण नसल्याची तक्रार केली त्यावेळेस त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. बियाणे न उगवल्याने अर्जदाराने कृषी अधिकारी कार्यालय पंचायत समीती कळंब यांना दि.17/07/2014 रोजी तक्रार दिली व पंचनामा करण्याबाबत कळवले.
7. कृषी अधिकारी यांना जमीन गट नं.394 मध्ये प्रत्यक्ष पिकाची पहाणी केली व खरेदी दिनांक, लॉट नंबर, बियाणे उत्पादक कंपनी नाव व जात (वाण) बियाणे विक्रेता पेरणी दिनांक, क्षेत्र, जमिनीची, खत, खताचा एकरी वापर, बियाणे दोषामुळे रोपांची उगवण अत्यंत कमी प्रमाणात झाल्याचे दिसुन आले त्यामुळे बियाणे सदोष असल्याने त्याचे योग्य प्रकारे उगवण झाली नाही असा अहवाल दिला.
8. अर्जदाराने सोयाबीन न उगवल्यामुळे खरीप पेरणीचा हंगाम सोडून दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे त्यास परत रु.8,600/- खर्च करावा लागला. प्रती बॅग सोयाबीनचे उत्पन्न 12 क्विंटल असते परंतू उशीरा पेरणी करावी लागल्याने प्रती क्विंटलचे नुकसान झाले. चालू हंगामातील प्रती क्विंटलचे निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरवल्यामुळे अर्जदाराच्या नुकसानीस कृषी केंद्र व उत्पादित कंपनी हे जाबाबदार आहेत.
9. उत्पनातील घट झाल्याने अर्जदाराचे रक्कम रु.63,000/- व पेरणीचा खर्च 9,600/, प्रथम वेळी व दुबारपेरणीसाठी रु.9,600/- असे एकूण रु.19,200/- खर्च झाले असे एकूण रु.82,200/- इतका खर्च झाला.
10. अर्जदाराने विप क्र.1 व 2 यांना वकिलामार्फत दि.12/11/2014 रोजी नोटीस पाठवली. नोटिसची बजावणी झाली तरीही नुकसान भरपाईची रक्कम दिली नाही म्हणून अर्जदाराने रु.82,200/-, मानसिक त्रासापोटी रु.10,000/-, तक्रारीचा खर्च रु.7,000/- असे एकूण रु.99,200/- विप कडून मिळावे म्हणून विनंती केली आहे.
ब) विप क्र.1 कृषी केंद्र यांनी त्यांचे म्हणणे अभिलेखावर दाखल केले आहे. त्यांचे म्हणण्यानुसार तक्रार निखालस खोटी आहे त्यामुळे नामंजूर करावी. कृषी अधिकारी पंचायत समितीकडे दिलेला अर्ज व तक्रार अर्ज हे एकमेकांशी विसंगत आहे. सातबारा 2012 चा आहे. सोयाबीन पीक पेरल्याचा कागदोपत्री पुरावा नाही. पंचनामा अपुरा आहे त्यामुळे सदरचा अर्ज नामंजूर होणे योग्य आहे असे म्हंटले आहे. पेरणीसाठी जमीन तयार केली हे खोटे आहे. विप क्र. 1 यांनी चांगल्या पिकाबाबत आश्वासन दिले हे खोटे आहे. अर्जदाराने दि.26/05/2014 रोजीचे खरेदी केलेले बियाणे पेरले हे सिध्द होऊ शकत नाही. बियाणे कशाप्रकारे ठेवले हे नमूद नाही. बियाणे ओलावा असलेल्या ठिकाणी ठेवले तर ते खराब होते. सदरचा अहवाल विसंगत आहे. अर्जदाराच्या नोटीसला विप क्र.1 ने उत्तर दिलेले आहे. विप क्र.1 हे विप क्र.2 च्या निर्देशानुसार विक्री करतात तेव्हा नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत त्यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी विनंती विप क्र.1 यांनी केलेली आहे.
क) विप क्र.2 यांनी म्हणणे अभिलेखावर दाखल केलेले आहे. त्यांचे म्हणणेनुसार अर्जदार ग्राहक नाही. बियाणे व्यवसाय करणेसाठी खरेदी केलेले आहे. त्यामुळे मंचाला अधिकार क्षेत्र येत नाही. अर्जदाराची तक्रार खोटी आहे. विप यांना तक यांनी कोणतीही नोटीस पाठवलेली नाही. कोणताही पंचनामा केलेला नाही. अर्जदाराचा जबाब नोंद केलेला नाही. शेजारच्या शेतक-यांचा जबाब नोंदविलेला नाही. बियाणाचे बिल, लेबल, रिकाम्या बँग, अभिलेखावर दाखल नाही, पंचनाम्यामध्ये बियाणांबद्दल काहीही नोंद केलेले नाही, बियाणांचे रासायनिक अहवाल प्राप्त नाही. जर बियाणे सदोष असतील तर उत्पादन करणारी कंपनी जबाबदार राहिल. अर्जदाराने रु.99,200/- नुकसान भरपाई मागितली ती बिनबुडाची आहे. परिपत्रकाप्रमाणे तपासणी अहवाल दाखल नाही त्यामुळे तक्रारदाराची तक्रार, रु.1,00,000/- ची मागणी व इ. खर्चासह खारीज करावी असे नमूद केले आहे.
ड) अर्जदाराने तक्रारी सोबत बियाणे खरेदीची पावती, सातबारा, तपासणी अहवाल, तक्रार अर्ज, किर्तीमान उत्पादीत कंपनीचे लेबल, नोटिस, अर्जदाराने दाखल केलेला तपासणी अहवाल, विप क्र.2 यांने दाखल केलेले परीपत्रक, दोन्ही विधिज्ञांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद वाचला, तोंडी युक्तिवाद ऐकला असता सदर प्रकरणात खालील प्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) उत्पादित कंपनीचे बियाणे सदोष आहे हे सिध्द होते का ? होय.
2) उत्पादित कंपनीने सेवा देण्यास त्रुटी केली का ? होय.
3) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे का होय ? होय.
4) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
इ) कारणमीमांसा
मुद्दा क्र. 1 :
1. उत्पादित कंपनीचे बियाणे सदोष आहे का नाही हा प्रमूख मुद्दा या प्रकरणात उपस्थित होत आहे. तपासणी अहवाल अर्जदाराने दोन वेळेस दाखल केलेला आहे. एकावर तारीख नोंद नसल्याने नंतरच्या तपासणी अहवालवर तारीख आहे. नंतर दाखल केलेला तपासणी अहवाल आहे तो मुळ (original) आहे. विप क्र.2 उत्पादित कंपनीचे असे म्हणणे आहे की खोटा अहवाल तयार करुन दिला परंतू विप यांनी तपासणी अहवाल कसा संगनमत करुन तयार केला किंवा कसा खोटा आहे हे शाबीत केलेले नाही किंवा त्याबाबत कसलाही पुरावा अभिलेखावर दाखल नाही. तसेच अर्जदाराने बियाणांची अधिसुचित प्रयोगशाळेकडून त्याची तपासणी करुन घ्यावी असे म्हंटले आहे. उलटपक्षी अर्जदार व तपासणी अहवाल असे सांगतो कि बियाणे सदोष आहे तर विप क्र.2 उत्पादित कंपनीने सदर बियाणांचे सॅम्पल (नमूना) अधिसुचित प्रयोग शाळेकडून त्याची तपासणी करुन उत्पादित कंपनीचे बियाणे कसे सदोष नाही हे सांगायला पाहिजे होते किंवा तसा रासायनिक विष्लेषण अहवाल अभिलेखावर दाखल करणे गरजेचे होते. परंतू विप क्र.2 यांनी अभिलेखावर बियाणे सदोष नसल्याचा पुरावा दखल केलेला नाही त्यामुळे उत्पादित कंपनीकडून अर्जदाराने खरेदी केलेले बियाणे हे सदोष आहे हे सिध्द होते त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.3 :
2. विप क्र. 1 व 2 यांनी अशी हरकत घेतलेली आहे की, बियाणे सदोष नाहीत परंतू तपासणी अहवालाचे सुक्ष्म अवलोकन केले तर असे निदर्शनास येते की, उगवण शक्तिचे कारण हे बियाणे दोषामुळे उगवण शक्तीचे प्रमाणे हे 24 टक्के असे नोंदविलेले आहे. सदर तपासणी अहवालावर बियाणे विक्रेताचे नाव व स्वाक्षरी आहे म्हणजे बियाणे विक्रेत्याला कृषी अधिकारी यांनी केलेला सदर तपासणी अहवाल माहित आहे व सदर बियाणे हे सदोष असल्यानेच बियाणांची उगवण टक्केवारी कमी झाली हे ही माहित आहे. तसेच सदर तपासणी अहवालावर उपविभागीय कृषी अधिकारी भुम जि. उस्मानाबाद तसेच मंडळ कृषी अधिकारी कळंब, यांच्या स्वाक्षी-या आहेत त्यामुळे सदर अहवाल हा विप यांनी प्रकरणात हजर झाले नंतर मिळालेलाच आहे त्यांनतर विप नी त्यांचे म्हणणे व नंतर लेखी युक्तिवाद दाखल केला त्यापुर्वी विप क्र.2 यांनी बियाणांचा नमूना घेऊन अधिसुचित योग्य शाळेकडून तपासणी करुन दाखल करु शकले असते आणि उत्पादित कंपनीने उत्पादित केलेले बियाणे सदोष नाही याबाबत काहीही पुरावा दाखल करु शकले असते परंतू उत्पादित कंपनीने तसे केलेले नाही आणि सेवेत त्रुटी केली ही बाब गंभीर आहे.
3. अर्जदाराने Kirtiman Agro Genetics Ltd. चे Truthfule Lable अभिलेखावर दाखल केलेले आहे त्यामध्ये pure seed (min) 98 टक्के Genetic Purity (min) 98 टक्के Germination (70 टक्के) झालेच पाहिजे अशी खात्री दिली आहे. परंतू सदर प्रकरणातील अर्जदाराने घेतलेले बियाणे हे शुध्द नाही व फक्त 24 टक्केच झाडांना मोड आले किंवा अंकूरले. विप क्र.2 उत्पादित कंपनीने जर 98 टक्के शुध्दतेची खात्री दिली होती तर बियाणांचा नमुना हा अधिसुचित प्रयोगशाळेत तपासून घेणे गरजेच होते व त्यांना उत्पादीत केलेले बियाणे कसे सदोष नाही व शुध्द आहे याबाबत पुरावा दाखल करणे गरजेचेच होते परंतू विप यांनी काही केले नाही. उलटपक्षी तक्रार खोटी आहे असे म्हंटले आहे हि सेवेतील त्रुटी आहे.
4. अर्जदाराचे निश्चितच नुकसान झालेले आहे आणि त्यांनी 1 हेक्टर मध्ये बियाणांची पेरणी केली हे ही तपासणी अहवालावरुन दिसुन येते.
5. अर्जदाराने दोन बॅगचे नुकसान रु.63,000/- मागितले आहे, रु.30,000/- जरी धरले तरी रु.60 हजाराचे नुकसान अर्जदाराचे झाले आहे तसेच बियाणांचे रु.4,600/-, खताचे रु.2,400/- असे एकूण रु.67,000/- चे नुकसान झालेले आहे हे ग्राहय धरावेच लागणार;
6. दुबार पेरणी केली याचा काही पुरावा अभिलेखावर दाखल नाही. पेरणी आणि राखणी याचा काही सबळ पुरावा दाखल नाही त्यामुळे तो खर्च किंवा नुकसान भरपाई देता येणार नाही.
7. वरील सर्व विवेचनावरुन आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत कि अर्जदार सदोष बियाणांपोटी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे म्हणून मुद्दा क्र. 1 व 2 यांचे उतर होकारार्थी देऊन पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश.
तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
1) विप क्र.2 यांनी अर्जदारास सदोष बियाणे विक्री केले व त्यामुळे झालेल्या नुकसान भरपाई पोटी रु.67,000/- (रुपये सदुसष्ट हजार फक्त) दि.27/07/2014 पासून 9 टक्के व्याज दराने आदेश पारीत दिनांकापासून 30 दिवसात द्यावेत.
2) विप क्र. 2 यांनी अर्जदारास तक्रार खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) आदेश पारीत दिनांकापासून 30 दिवसात द्यावेत.
3) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज दयावा.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य प्र.अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.