::निकालपत्र ::
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष.)
(पारित दिनांक-17 मार्च, 2017)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्षा विरुध्द त्यांचे कडून घेण्यात आलेल्या चपाती बनविण्याच्या मशीन मध्ये उदभवलेला निर्मिती दोष (Manufacturing defect) दुर न केल्या प्रकरणी दाखल केली आहे.
02. तक्रारकर्त्या ट्रस्ट तर्फे दाखल तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता एक नोंदणीकृत पब्लीक ट्रस्ट आहे, तर विरुध्दपक्ष क्रं-1) हा बी.एस. फुड टेक्नॉलॉजीचा मालक आहे, तर विरुध्दपक्ष क्रं-3) मेक डिल इंडस्ट्रीयल कॉर्पोरेशन आहे. तक्रारकर्त्या ट्रस्ट तर्फे शिख धर्माचे पालन करण्यात येते तसेच सार्वजनिक लंगर भोजनाची व्यवस्था करण्यात येते, ज्यामध्ये हजारो लोकानां मोफत जेवण्याचे वाटप करण्यात येते. तक्रारकर्त्या ट्रस्टने त्यासाठी चपाती बनविण्याचे मशीनचा वापर करण्याचे ठरविले. विरुध्दपक्ष क्रं-1) हा सुध्दा शिख समाजाचा असून त्याचेकडे चपाती बनविण्याची मशीन असल्यामुळे, तक्रारकर्त्या ट्रस्टने ती मशीन विरुध्दपक्ष क्रं-1) तर्फे रुपये-5,01,000/- एवढया किमतीत फेब्रुवारी-2010 मध्ये विकत घेतली परंतु ती मशीन योग्यरितीने काम करीत नव्हती व त्यामुळे मशीन मधून चांगल्या चपाती तयार होत नव्हत्या. सदर्हू मशीन विरुध्दपक्ष क्रं-2) व्दारा निर्मित असल्याने त्या संबधीची तक्रार तक्रारकर्त्याने दोन्ही विरुध्दपक्षां
कडे केली परंतु अनेकदा विनंत्या करुनही विरुध्दपक्षाने चपाती तयार करण्याच्या मशीन मधील दोष दुरुस्त केले नाही आणि अशाप्रकारे सेवेत कमतरता ठेवली. मशीन मधील खराबी मुळे तक्रारकर्त्या ट्रस्टला 10 व्यक्तींना चपाती बनविण्यासाठी कामावर ठेवावे लागले, ज्यासाठी प्रतीदिन रुपये-4000/- एवढा खर्च येत आहे. म्हणून तक्रारकर्त्या ट्रस्ट तर्फे या तक्रारीव्दारे मशीनची किम्मत वार्षिक् 18 टक्के दराने व्याजासह मागितली असून, दैनंदिन होत असलेला खर्च तसेच नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च विरुध्दपक्षा कडून मागितला आहे.
03. दोन्ही विरुध्दपक्षानीं आपला लेखी जबाब नि.क्रं-6 प्रमाणे एकत्रितरित्या दाखल केला. विरुध्दपक्षांनी आपल्या लेखी उत्तरात ही तक्रार सार्वजनिक ट्रस्टच्या अधिकृत व्यक्तीने दाखल केली असल्याची बाब नाकबुल केली. ज्या व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे, त्याला तक्रार दाखल करण्याचे अधिकार नाही. तसेच सदर्हू ट्रस्ट अस्तित्वात असल्याची बाब सुध्दा नाकबुल केली आहे. विरुध्दपक्ष क्रं-1) चा तक्रारकर्त्याशी कुठल्याही प्रकारे व्यवसायिक संबध नाही, त्याने फक्त तक्रारकर्त्याला चपाती बनविण्याची मशीन विकत घेण्यासाठी साहाय्य केले होते. तसेच हे सुध्दा नाकबुल करण्यात आले की, ती मशीन रुपये-5,01,000/- मध्ये विरुध्दपक्षा कडून विकत घेतली होती व ती रक्कम विरुध्दपक्षाला देण्यात आली होती. तक्रारकर्त्याला त्यांनी कुठल्याही प्रकारची सेवा पुरविलेली नाही, अशाप्रकारे तक्रार नाकबुल करुन ती खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्षां तर्फे करण्यात आली.
04. या प्रकरणात मौखीक युक्तीवादाचे वेळी तक्रारकर्त्या ट्रस्ट तर्फे कोणीही उपस्थित झाले नाही, त्यांनी फक्त पुरसिस दाखल करुन कळविले की, त्यांचे लेखी युक्तीवादालाच मौखीक युक्तीवाद समजण्यात यावा, त्या नुसार विरुध्दपक्षाचे वकील श्री आशिरगडे यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात
आला. दाखल लेखी युक्तीवाद तसेच उपलब्ध दस्तऐवजांचे अवलोकन करुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
:: निष्कर्ष ::
05. सदर प्रकरणात विरुध्दपक्षा तर्फे काही प्राथमिक आक्षेप घेतले आहेत, त्यांचे म्हणण्या नुसार ही तक्रार नोंदणीकृत सार्वजनिक ट्रस्टने अशा इसमा व्दारे दाखल केली आहे, ज्याला तक्रार दाखल करण्याचे अधिकार ट्रस्टने दिलेले नाहीत.
06. तक्रारी मध्ये ट्रस्टचा उल्लेख “ गुरुव्दारा गुरुनानक दरबार ” असा केलेला आहे. आमचे निदर्शनास पुढे असे आणून दिले की, परविंदरसिंग विज या नावाच्या ईसमाने ट्रस्टचा सचिव म्हणून ही तक्रार दाखल केल्याचे दिसून येते, परंतु ट्रस्ट मार्फत जो ठराव पारीत करण्यात आला तो असे दर्शवितो की, ट्रस्ट “ श्री गुरुनानक दरबार कमेटी ” या नावाने नोंदणीकृत आहे. अशाप्रकारे विरुध्दपक्षा कडून असा युक्तीवाद करण्यात आला की, ज्या ट्रस्टने तिच्या सचिवाला ही तक्रार दाखल करण्याचा अधिकार दिला आहे, तो ट्रस्ट आणि तक्रारकर्ता ट्रस्ट हे वेगवेगळे आहेत. असा पण युक्तीवाद करण्यात आला की, तक्रारीमध्ये तक्रारकर्ता ट्रस्टचा जो पत्ता दिलेला आहे तो त्याच बरोबर दाखल पारीत ठराव आणि दाखल बिला मध्ये असलेला ट्रस्टचा पत्ता हा वेगवेगळा आहे. तक्रारी मध्ये दिलेला पत्ता- “राहणार-627, काश्मीरी गल्ली, नागपूर-17” असा दिलेला आहे परंतु वास्तविक पाहता हा पत्ता ट्रस्टचा नसून सचिव श्री परविंदरसिंग विज या इसमाचा आहे, असे ठरावाच्या प्रतीवरुन दिसून येते. ठरावा मध्ये “PRAVINDER SINGH S/O KARTAR SINGH VIJ, RESIDENT OF 627, KASMIRI GALLI, NAGPUR-17” असा पत्ता नमुद केलेला आहे . तसेच जे बिल दाखल केलेले आहे त्यामध्ये दिलेला पत्ता “गुरुनानकपुरा, नागपूर” असा आहे आणि तो ट्रस्टचा पत्ता आहे असे ठरावाच्या प्रतीवरुन स्पष्ट होते.
07. असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने ट्रस्टच्या पत्त्या बद्दल संभ्रम केलेला आहे परंतु त्या कारणास्तव तक्रार खारीज करण्याचे कोणतेही कारण दिसून येत नाही परंतु ही बाब पण तेवढीच खरी आहे की, ज्या सचिवाला तक्रार दाखल करण्याचे अधिकार दिले आहे त्या ट्रस्टचा पत्ता आणि तक्रारीतील तक्रारकर्त्या ट्रस्टचा पत्ता भिन्न आहे.
08. ही तक्रार चपाती बनविण्याच्या मशीन मध्ये निर्मिती दोष (Manufacturing defects) असल्या संबधीची आहे आणि त्यामुळे केवळ मशीनचा उत्पादक (Manufacturer) हाच जबाबदार राहू शकतो. तक्रारकर्त्याचे म्हणण्या नुसार मशीनचा उत्पादक हा विरुध्दपक्ष क्रं-2) आहे परंतु ही बाब विरुध्दपक्षाने नाकबुल केलेली आहे. तक्रारकर्त्याने पाठविलेल्या नोटीसच्या उत्तरामध्ये विरुध्दपक्षाने हे स्पष्टपणे नमुद केले आहे की, ती चपाती बनविण्याच्या मशीनचे उत्पादक मास्टर क्रॉफ्ट इंडस्ट्रीज, प्लॉट क्रं-21, इंडस्ट्रीज एरिया, फेज-9, मोहाली पंजाब हे आहेत. चपाती बनविण्याची मशीन सदर्हू उत्पादका कडून मागविण्यात आली होती व त्यानुसार तक्रारकर्त्या ट्रस्टला ती पुरविली होती. तक्रारकर्त्या ट्रस्टचे वकील श्री आर.एस.सहगल यांना विरुध्दपक्ष क्रं-1) चे वकील श्री आशिरगडे यांनी नोटीसचे उत्तर दिनांक-28/08/2012 ला दिले होते परंतु त्यावर तक्रारकर्त्या ट्रस्ट तर्फे त्यानुसार तक्रारी मध्ये योग्य ती दुरुस्ती करण्यासाठी कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. तक्रारकर्त्या ट्रस्ट तर्फे असा कुठलाही पुरावा दाखल केला नाही, ज्यावरुन हे सिध्द होईल की, विरुध्दपक्ष क्रं-2) हा त्या चपाती बनविण्याच्या मशीनचा उत्पादक आहे. तसेच विरुध्दपक्ष क्रं-1) ने मशीन विकत घेण्यासाठी केवळ सहाय्यकाची भूमीका घेतली होती आणि त्याशिवाय त्याचा या व्यवहारात काहीही संबध नाही, दाखल दस्तऐवजा वरुन विरुध्दपक्षाच्या या म्हणण्या मध्ये तथ्य दिसून येते.
09. मुख्य मुद्दा असा आहे की, त्या मशीन मध्ये निर्मिती दोष (Manufacturing defect) आहे किंवा नाही, त्यासाठी तक्रारकर्त्या ट्रस्ट तर्फे कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. केवळ त्यांच्या तक्रारी शिवाय त्यांचे म्हणण्याला बळकटी आणण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पुरावा अभिलेखावर आलेला नाही. मशीन मध्ये निर्मिती दोष असल्या संबधी तज्ञांचा अहवाल (Expert opinion) सुध्दा घेतलेला नाही. केवळ तक्रारकर्त्या ट्रस्ट तर्फे दाखल तक्रारी वरुन असे म्हणता येणार नाही की, त्या मशीन मध्ये निर्मिती दोष होता. विरुध्दपक्षाच्या या म्हणण्याशी आम्ही सहमत आहोत की, त्या मशीनचा निट वापर व योग्य ती देखभाल (Proper maintenance) केल्या गेली नसल्याने मशीन मध्ये दोष येऊ शकतो, म्हणून सबळ आणि पुरेश्या पुराव्या अभावी असे ठरविणे कठीण आहे की, त्या मशीन मध्ये निर्मिती दोष होता. सबब तक्रारकर्त्या ट्रस्ट तर्फे दाखल करण्यात आलेली तक्रार खारीज होण्यास पात्र आहे, त्यावरुन मंच तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(1) तक्रारकर्ता गुरुद्वारा गुरुनानक दरबार तर्फे सचिव श्री परसिंदर सिंग विज यांची, विरुध्दपक्ष क्रं-1) श्री बलदेव सिंग रेणु तर्फे मालक बी.एस. फुड टेक्नॉलॉजी, नागपूर आणि विरुध्दपक्ष क्रं-2) मेक डिल इंडस्ट्रीयल कॉर्पोरेशन तर्फे मालक, नागपूर-23 यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध
करुन देण्यात याव्यात.