निकालपत्र प्रेरणा रा.काळुंखे, सदस्या यांनी पारीत केले
नि का ल प त्र
तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 (यापुढे संक्षेपासाठी ‘ग्रा.स.कायदा’) चे कलम 12 नुसार प्रस्तूत तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारदाराचे म्हणणे थोडक्यात असे की, सामनेवाला क्र. 1 यांनी आगर टाकळी शिवारातील सर्व्हे नं.31 पैकी प्लॉट नं 10 व 11 यावर संघमित्र गृह निर्माण संस्था स्थापन केली. त्यावर बांधण्यात येणा-या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र.8 चा व्यवहार त्यांनी सामनेवाला क्र.1 यांच्याशी केलेला आहे. सदर सदनिकेची किंमत रक्कम रु.2,25,000/- इतकी ठरलेली आहे. त्यासाठी त्यांनी सामनेवाला क्र.1 यांना रक्कम रु.1,75,250/- अदा केलेत. व राहिलेली रक्कम रु.49,750/- सामनेवाल्यांनी मागणी केल्यानंतर त्यांनी द्यावयाचे असे ठरले होते. त्यानंतर त्यांनी सामनेवाल्यांना वेळोवेळी समक्ष भेटून सदनिकेच्या ताब्याची विचारणा केली असता सामनेवाल्यांनी त्यांना सदनिकेचा ताबा दिलेला नाही. सामनेवाला संस्थेत बरेच गैरव्यवहार झाल्याने शासनाने सामनेवाला क्र. 2 यांची प्रशासक व लिक्वीडेटर म्हणुन नेमणूक केलेली आहे. सामनेवाल्यांनी कराराप्रमाणे त्यांना सदनिकेचा ताबा दिलेला नसल्याने सेवेत कमतरता केलेली आहे. त्यामुळे सामनेवाला यांच्याकडून सदनिका क्र.8 चा बांधकाम पुर्णत्वाचा दाखला देवून ताबा त्वरीत मिळावा किंवा त्यांनी सामनेवाल्यांना अदा केलेली रक्कम रु.1,75,250/- व्याजासह परत मिळावी किंवा सदर सदनिकेची जागा (भुखंड) मिळावा. सेवेतील कमतरतेपोटी रु.10,00,000/- शारीरीक व मानसीक त्रासापोटी रु.5,00,000/- अर्ज खर्चापोटी रु.10,000/- मिळावेत, अशा मागण्या तक्रारदारांनी मंचाकडे केलेल्या आहेत.
3. तक्रार अर्जाचे पुष्ठयर्थ दस्तऐवज यादी नि.4 लगत करारनामा, सामनेवाला क्र.2 यांची अवसायक म्हणुन नेमणूक केल्याबाबतचे उपनिबंधक यांचे कडील नियुक्ती आदेश, इ.कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5. सामनेवाला यांना मंचाची नोटीस मिळूनही ते हजर न झाल्याने त्यांच्या विरुध्द प्रस्तुत तक्रार अर्ज एकतर्फा चालविण्यात आला.
6. तक्रारदारातर्फे त्यांचे वकील अॅड.श्रीमती पंडीत यांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात व विचारात घेण्यात आला.
7. निष्कर्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना
सेवा देण्यात कमतरता केली काय? होय.
2. आदेशाबाबत काय? अंतिम आदेशाप्रमाणे
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः
8. तक्रारदार हे सामनेवाला संस्थेचे सभासद आहेत. सामनेवाला क्र. 1 यांनी आगर टाकळी शिवारातील सर्व्हे नं.31 पैकी प्लॉट नं 10 व 11 यावर संघमित्र गृह निर्माण संस्था स्थापन केली. त्यावर बांधण्यात येणा-या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र.8 चा व्यवहार तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 यांच्याशी केलेला आहे. करारनाम्याप्रमाणे तक्रारदाराने सामनेवाल्यांना रक्कम रु.1,75,250/- अदा केलेत. राहिलेली रक्कम रु.49,750/- सामनेवाल्यांनी मागणी केल्यानंतर तक्रारदारांनी द्यावयाचे असे ठरले होते. त्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाल्यांना वेळोवेळी समक्ष भेटून सदनिकेचा ताबा मिळण्याची मागणी केली असता सामनेवाल्यांनी दि.30/01/2003 च्या करारनाम्यानुसार तक्रारदारास सदनिका क्र.8 चा ताबा दिला नाही. सामनेवाला संस्थेत बरेच गैरव्यवहार झाल्याने शासनाने सामनेवाला क्र. 2 यांची प्रशासक व लिक्वीडेटर म्हणुन नेमणूक केलेली आहे. सामनेवाल्यांनी कराराप्रमाणे त्यांना सदनिकेचा ताबा दिलेला नसल्याने सेवेत कमतरता केलेली आहे, असे तक्रारदाराने शपथेवर कथन केलेले आहे.
9. सामनेवाला यांना मंचाची नोटीस मिळूनही हजर होवून तक्रारदाराची तक्रार आव्हानीत केलेली नाही. परीणामी तक्रारदाराची तक्रार सामनेवाला यांना मान्य असल्याचा प्रतिकुल निष्कर्ष काढण्यास आम्हास वाव आहे. तक्रारदारांची नि.4 लगत दाखल कागदपत्रे तक्रारदाराच्या वरील कथनास पुष्टी देणारी आहेत. सादर पुराव्यांवरुन तक्रारदारांनी सामनेवाला यांना सदनिका क्र.8 करिता रक्कम रु.1,75,250/- दिलेली असुन उर्वरीत रक्कम रु.49,750/- सामनेवाल्यांना देण्यास तयार असतांनाही सामनेवाल्यांनी तक्रारदार यांना सदनिकेचा ताबा दिलेला नाही, ही बाब सेवेतील कमतरता ठरते, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
10. मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष स्पष्ट करतो की, तक्रारदारांनी सामनेवाल्यांना कराराप्रमाणे सदनिकेची रक्कम रु.1,75,250/- दिलेली असुन उर्वरीत रक्कम रु.49,750/- सामनेवाल्यांना देण्यास तयार असतांनाही सामनेवाल्यांनी तक्रारदारास सदनिकेचा ताबा दिलेला नसल्याने सेवेत कमतरता केलेली आहे. त्यामुळे सामनेवाला यांच्याकडून आगर टाकळी शिवारातील सर्व्हे नं.31 पैकी प्लॉट नं.10 व 11 यावरील इमारतीतील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र.8 चा बांधकाम पुर्णत्वाचा दाखला देवून तक्रारदाराकडून उर्वरीत रक्कम रु.49,750/- स्विकारुन ताबा मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत. सामनेवाला यांना सदर सदनिकेचा ताबा देणे शक्य नसल्यास तक्रारदार यांनी करारनाम्याप्रमाणे दिलेली रक्कम रु.1,75,250/- करारनाम्याची तारीख म्हणजेच दि.30/01/2003 पासुन प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.12% प्रमाणे सामनेवाल्यांकडून मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत. तसेच तक्रारदारांना शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.15,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.3000/- मिळण्यासही तक्रारदार पात्र आहेत, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.2 च्या निष्कर्षापोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
1.सामनेवाल्यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास आगर टाकळी शिवारातील सर्व्हे नं.31 पैकी प्लॉट नं.10 व 11 यावरील इमारतीतील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र.8 चा बांधकाम पुर्णत्वाचा दाखला देवून ताबा तात्काळ द्यावा.
2. सामनेवाल्यांना असेही आदेशीत करण्यात येते की, सामनेवाला यांना सदर सदनिकेचा ताबा देणे शक्य नसल्यास तक्रारदार यांनी करारनाम्याप्रमाणे दिलेली रक्कम रु.1,75,250/- दि.30/01/2003 पासुन प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.12% प्रमाणे अदा करावेत
2. सामनेवाल्यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व अर्ज खर्चापोटी रु.3000/- अदा करावेत.
3. उभय पक्षांना निकालपत्राच्या प्रती विनामुल्य देण्यात याव्यात.
नाशिक
दिनांकः26/03/2015