सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 176/2014
तक्रार दाखल दि.03-11-2014.
तक्रार निकाली दि.15-09-2015.
1. श्रीमती मेघना मोहन भट,
रा.14 अ,व्यंकटपुरा पेठ,
देवेश अपार्टमेंट,सातारा,
ता.जि.सातारा
2. रत्नमाला सदाशिव पिलके,
रा. भैरवनाथ आळी, गडकर आळी,
सातारा,ता.जि. सातारा. .... तक्रारदार.
विरुध्द
बालाजी टुर्स अँन्ड ट्रॅव्हल्स,
तर्फे प्रोप्रा. श्रीमती राजश्री सपकाळ,
रसिक अपार्टमेंट,
मानकर डोसा सेंटर शेजारी,
दशभुजा गणपती, कर्वे रस्ता,
पौंडा फाटा, पुणे – 04. .... जाबदार.
तक्रारदारांतर्फे –अँड.डी.वाय.मुतालीक
अँड.एम.एम.ताथवडेकर.
जाबदार तर्फे – एकतर्फा.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार सातारा येथील कायमस्वरुपी रहिवासी आहेत. दोघेही तक्रारदार इंडियन शासकीय सेवेतून निवृत्त झाले असून दोघेही जेष्ठ नागरीक आहेत. तर जाबदार ही रेल्वे बुकींग, एअर बुकींग वगैरे बुकींग करुन देणे तसेच लोकांकडून पैसे घेऊन लोकांसाठी वेगवेगळया सहलींचे नियोजन करणेचा व्यवसाय करतात. सदर जाबदाराचे व्यवसायाची जाहीरात वर्तमानपत्रात व इतर माध्यमातून करतात. प्रस्तुत जाहीरातींवर विश्वास ठेवून जाबदाराने मे,2013 मध्ये आयोजीत केलेल्या चारधाम यात्रेसाठी तक्रारदार क्र. 1 यांनी जाबदार यांचेकडे तक्रारदार यांनी चौकशी केली. त्यावेळी जाबदाराने तक्रारदार यांना सहलीबाबत योग्य ती माहिती दिली व काय गोष्टी सहलीमध्ये दाखवणार, काय सुविधा देणार, याची प्रींटआऊट काढून जाबदार यांनी तक्रारदाराला पाठवल्या. सदर प्रिंटआऊटमध्ये घटनांचा क्रम लिहीलेला आहे. तो घटनाक्रम व कार्यक्रम तक्रारदार यांना योग्य वाटल्याने तक्रारदाराने जाबदार कंपनीबरोबर यात्रा करणेचे निश्चित केले व जाबदार यांना तसे कळविले. त्यानंतर जाबदार यांनी तक्रारदार क्र. 1 हिचेकडे चेक घेणेसाठी जाबदारांचा प्रतिनिधी पाठवून दिला व त्याचवेळी तक्रारदार क्र. 1 ने तिच्या अँक्सीस बँकेचा रक्कम रु.19,500/- (रुपये एकोणीस हजार मात्र) चा धनादेश क्र.069520 जाबदाराचे प्रतिनिधी नरेंद्र पवार यांचेकडे दिला. जाबदाराने चेक वटलेनंतर त्याची पावती तक्रारदार क्र. 1 कडे पाठवून दिली. तक्रारदार क्र. 1 ही यात्रेस जाणार आहे हे कळल्यावर तक्रारदार क्र. 2 यांनीही सहलीला येणार असलेचे जाबदाराला कळविले त्यावेळी सदर जाबदाराने प्रस्तुत जाबदार नं.2 कडे त्याच सहलीसाठी रक्कम रु.22,820/- (रुपये बावीस हजार आठशे वीस मात्र) ची मागणी केली. तक्रारदार क्र. 2 ने सदरची मागणी मान्य केली. परंतू त्यावेळी जाबदाराने प्रस्तुतची सहल ही 15 मे ऐवजी 17 मे रोजी जाणार असलेचे तक्रारदार यांना सांगितले व दि.17 मे रोजीच्या कार्यक्रमाची पत्रिका तक्रारदार क्र. 1 ला पाठवली. सदर तक्रारदार क्र.2 कडेही जाबदाराने प्रतिनिधी नरेंद्र पवार यास पाठवले त्यावेळी तक्रारदार क्र. 2 करीता तक्रारदार नं. हिचेकडून रक्कम रु.22,820/- चा अँक्सीस बँकेचा धनादेश क्र. 849261 हा चेक नरेंद्र पवार यांनी बेअरर चेकची मागणी केलेने तसा चेक दिला. सदर चेकची रक्कम जाबदाराला मिळालेनंतर जाबदार यांनी तक्रारदार क्र. 2 यांचे नावे पावती क्र. 829 तक्रारदार क्र. 2 कडे पाठवून दिली. तक्रारदाराने जाबदारांकडे टूरसंबंधी चौकशी केली असता, जाबदाराने दि. 18/5/2014 रोजी चौकशी करा असे सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदाराने दि. 18/5/2014 रोजी जाबदारांकडे चौकशी केली असता पुन्हा 19/5/2014 रोजी सकाळी जाबदाराला फोन केला असता, सदरची ट्रीप माणसांअभावी रद्द झालेचे सांगितले व ट्रीपचे दुस-या सहलीचे नियोजन झालेनंतर तसे तुम्हास कळवितो वाटल्यास तुमची रक्कम परत देतो असे सांगीतले. दरम्यानचे काळात जाबदाराने तक्रारदार क्र. 1 चे मावसभावानेही सदर बुकींग केले होते त्याचे पैसे परत केले त्यामुळे तक्रारदाराचा जाबदारवरील विश्वास दृढ झाला. त्यामुळे तक्रारदारानी जाबदाराकडे पैशाचा तगादा लावला नाही तर तक्रारदार यांनी वेळोवेळी जाबदारांकडे नवीन सहलीच्या नियोजनाबद्दल विचारले असता फक्त नियोजन चालू आहे. नियोजन होताच कळवितो असे सांगून वेळ मारुन नेली. नंतर डिसेंबर 2013 मध्ये जाबदाराने तक्रारदार यांना सांगीतले की, दि.17/1/2014 ते 27/1/2014 या कालावधीसाठी काशी, गया,प्रयाग अशी यात्रा जाणार आहे. त्यासाठी आवश्यक तेवढे लोक जमले आहेत, तुम्ही भरलेल्या पैशात ती यात्रा घडवून आणतो असे तक्रारदार यांना सांगीतले. त्यावेळी तक्रारदार यांनाही देवधर्म करणेचा असलेने त्यास तक्रारदारांनी संमती दिली. सदर यात्रेचे नियोजन तक्रारदारास त्यांचे कुटूंबास व मैत्रीणींना समजलेनंतर तक्रारदारची मैत्रिण शोभना टिळक यांनी तक्रारदार यांचेबरोबर धार्मीक यात्रा करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी जाबदाराकडे चौकशी केली असता, जाबदाराने त्यासाठी रक्कम रु.15,000/- (रुपये पंधरा हजार फक्त) भरण्यास सांगितले त्याप्रमाणे शोभना टिळक यांनी जाबदारांकडे जमा केले. तक्रारदार व त्यांची मैत्रिण शोभना सहलीस येणार हे निश्चित झालेनंतर सदर सहलीचा कार्यक्रम असा आहे, सहलीसाठी इतर कोण कोण प्रवासी आहेत ते कोणत्या हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत याबाबत वेळापत्रक वगैरे माहितीपत्रकाचे दोन वेगवेगळे चार्ट जाबदाराने तक्रारदाराला पाठवले या सर्वांवर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी ता.17/01/2014 रोजी पुणे येथे जाण्याची तयारी केली. त्यासाठी प्रवासात लागणा-या वस्तू, थंडीची सर्व सपडे वगैरे सर्व साहित्यांची जुळवाजुळव करुन पुणे येथे सहलीसाठी वेळेत पोहोचावे सोबतचे सामान गहाळ होऊ नये व प्रवासात कुठेही अडचण येऊ नये यासाठी तक्रारदार यांनी स्वतंत्र भाडयाची गाडी निश्चित करुन गाडी मालकास रक्कम रु.1,500/- गाडी भाडे दिले व तक्रारदार पुणे येथे निघणेचे दरम्यान जाबदाराचा दुपारी 12 वाजता तक्रारदार यांना फोन आला की सदरची सहल रद्द झाली आहे. व तुमचे पैसे तुम्हाला परत करणार आहे. त्या फोनमुळे तक्रारदार यांना प्रचंड मानसीक धक्का बसला व प्रवासासाठी केलेला सर्व खर्च वाया गेला. त्यामुळे तक्रारदार यांना मानसिकत्रास झाला. जाबदाराने दि.17/1/2014 रोजी तक्रारदार यांना दुपारी 12.00 वाजता फोन करुन दि.17/1/2014 रोजीची ट्रीप रद्द झाली आहे व तुमचे भरलेले पैसे व्याजासह परत करते असे सांगितले. परंतू त्यानंतर तक्रारदार यांनी जाबदारांकडे वेळोवेळी संपर्क साधून रकमेची मागणी केली असता, जाबदाराने दरवेळी वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदाराची रक्कम देणेचे टाळले व जाबदाराने यात्रेचे नियोजन करुन तक्रारदारांचेकडून रक्कम स्विकारुन यात्रा रद्द केली व यात्रा रद्द करुनही तक्रारदाराची रक्कम परत करणेस जाबदार टाळाटाळ करत आहेत. जवळ-जवळ सहा महिन्यांचा कालावधी झाला तरीही जाबदाराने तक्रारदाराची सदर रक्कम परत अदा केलेली नाही. त्यामुळे जाबदाराने तक्रारदार यांना सदोष सेवा दिली व सेवेत त्रुटी केलेने तक्रारदाराने तशी नोटीस जाबदाराला पाठवली व सदरची नोटीस जाबदार यांनी स्विकारलेली नाही त्यामुळे परत आली आहे. सबब जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिलेने तक्रारदार यांनी जाबदारांविरुध्द प्रस्तुत तक्रारअर्ज मे. मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदार यांनी प्रस्तुत कामी जाबदार यांचेकडून तक्रारदार क्र. 1 यांची रक्कम रु.19,500/- तक्रारदार क्र. 2 यांची रक्कम रु.22,820/- अशी एकूण रक्कम रु.42,320/- वसूल होऊन मिळावी, प्रस्तुत रकमेवर रक्कम जाबदाराने स्विकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराला मिळेपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे व्याज मिळावे, प्रस्तुत जाबदाराने यात्रेचे नियोजन करुन यांत्रा रद्द केलेमुळे तक्रारदारांना झाले मानसिक व आर्थीक त्रासासाठी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.25,000/- जाबदार कडून मिळावेत. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- जाबदारांकडून मिळावेत व पुन्हा मानसीक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- जाबदारांकडून तक्रारदार यांना मिळावेत अशी विनंती तक्रारदार यांनी याकामी केली आहे.
3. तक्रारदार यांनी प्रस्तुत कामी नि.2 व 3 कडे प्रतिज्ञापत्रे, नि.6 चे कागदयादीसोबत नि.6/1 ते नि.6/6 कडे अनुक्रमे तक्रारदार क्र. 1 ने जाबदाराला दिले धनादेशाची जाबदाराने तक्रारदाराला दिलेली पावती, तक्रारदार क्र. 2 ने जाबदाराला दिले धनादेशाची जाबदाराने तक्रारदाराला दिलेली पावती, तक्रारदार यांनी जाबदाराला वकीलांमार्फत पाठवलेली नोटीस, सदर नोटीस पाठवलेची पोस्टाची पावती, प्रस्तुत नोटीस जाबदाराने स्विकारली नाही म्हणून परत आलेला नोटीसचा लखोटा, जाबदार यांनी तक्रारदाराला सहलीबाबत दिलेले नियोजन तक्ता, नि. 9 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि.10 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि. 11 कडे तक्रारदाराने दाखल केलेला पुरावा हाच लेखी युक्तीवाद समजणेत यावा म्हणून पुरसीस वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार यांना नोटीस लागू झालेली आहे. त्यांना पाठवले नोटीसचा लखोटा Unclaimed शे-याने परत आला आहे. तो नि.8 कडे दाखल केला आहे. म्हणून नोटीस लागू झाली आहे असे गृहीत धरुन जाबदार यांचेविरुध्द नि. 1 कडे एकतर्फा आदेश पारीत केलेला आहे. जाबदार हे याकामी हजर झाले नाहीत व त्यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन जाबदार यांनी खोडून काढलेले नाही असे दिसते.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.नं. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार हे जाबदारचे ग्राहक आहेत काय ? होय
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे काय ? होय
3. अंतिम आदेश काय ? खालील नमूद
आदेशाप्रमाणे
विवेचन-
5. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराने जाबदार यांचेकडे जाबदाराचे बालाजी टूर्स अँन्ड ट्रॅव्हल्स तर्फे जाणारे सहलीसाठी अनुक्रमे रक्कम रु.19,500/- व रक्कम रु.22,820/- अशी जाबदार यांना चेकव्दारे अदा केली आहे. त्याच्या पावत्यांच्या सत्यप्रती नि. 6/1 व 6/2 कडे दाखल आहेत. नि. 6/3 कडे तक्रारदाराने जाबदारांना पाठवलेली नोटीसची स्थळप्रत, व नि. 6/4 कडे नोटीस स्विकारत नाही म्हणून परत आलेला लखोटा, व पोष्टाची पावती, नि. 6/5 कडे जाबदारातर्फे जाणा-या ट्रीपचे नियोजन चार्ट व नि. 6/6 कडे चारधाम यात्रेचा जाबदाराचा नियोजनाचा चार्ट, नि.9 कडील पुराव्याचे शपथपत्र वगैरे कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार व जाबदार यांचेत ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते आहे हे सिध्द होते व जाबदार यांनी प्रस्तुत तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही सबब त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. त्यामुळे तक्रारदाराने तक्रार अर्जात नमूद केलेले कथन जाबदार यांना मान्य आहे असेच गृहीत धरावे लागेल. त्यामुळे प्रस्तुत जाबदार यांनी तक्रारदार क्र. 1 व 2 यांचेकडून सहलीचे पैसे रक्कम रु.19,500/- व रु.22,820/- अशी रक्कम चेकव्दारे जमा करुन घेवून ही दोन वेळा यात्रेचे नियोजन ठरवून ते अचानक रद्दबादल करुन तक्रारदार यांना सेवेत कमतरता देवून/सदोष सेवा पुरवून तक्रारदारांची सदरची रक्कमही वारंवार मागणी करुनही तक्रारदार यांना परत अदा न करुन अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब या जाबदार यांनी केलेला आहे असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब तक्रारदार हे जाबदार यांचेकडून तक्रारदार क्र. 1 ची रक्कम रु.19,500/- तर तक्रारदार क्र. 2 ची रक्कम रु.22,820/- अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजाने जाबदार यांचेकडून मिळणेस पात्र आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे. तसेच मानसिक व आर्थीक त्रास व अर्जाचा खर्च मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे.
7. सबब आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार यांनी तक्रारदार क्र. 1 यांना रक्कम रु.19,500/- (रुपये एकोणीस
हजार पाचशे मात्र) व तक्रारदार क्र. 2 यांना रक्कम रु.22,820/- (रुपये बावीस
हजार आठशे वीस मात्र) अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत
द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने होणारी सर्व रक्कम अदा करावी.
3. तक्रारदार क्र. 1 व 2 यांना जाबदार यांनी प्रत्येकी रक्कम रु.5,000/-(रुपये
पाच हजार मात्र) मानसिकत्रासापोटी अदा करावेत.
4. तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/-(रुपये तीन हजार मात्र) तक्रारदार
क्र. 1 व 2 यांना जाबदार यांनी अदा करावेत.
5. वरील नमूद सर्व आदेशाचे पालन/पूर्तता जाबदार यांनी आदेश
पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावे.
6. विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण
कायदा कलम 25 व 27 नुसार जाबदारांविरुध्द कारवाई करणेची मुभा राहील.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
8. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 15-09-2015.
सौ.सुरेखा हजारे श्री.श्रीकांत कुंभार सौ.सविता भोसले
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.