::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 08/07/2015 )
आदरणीय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …
तक्रारकर्ते यांच्याकडे गट क्र. 231 एकुण 3.02 हे.आर. शेती मौजे गोरेगांव ता. मुर्तीजापुर, जि. अकोला येथे आहे. तक्रारकर्त्यांनी विरुध्दपक्ष क्र. 2 यांचे दुकानातून विरुध्दपक्ष क्र. 1 कंपनीचे सोयाबिन या वानाचे लॉट नंबर मे-ऑक्टोबर-13-12-915-172229-सी.आय. हे बियाणे दि. 19/07/2014 रोजी प्रत्येकी रु. 1900/- प्रमाणे एकूण 6 नग रु. 11,400/- ला विकत घेतले. सदर बियाणे उपरोक्त शेतजमीनीमध्ये पेरणी केल्यानंतर जवळपास 25 टक्केच उगवले. पेरणीचे वेळी पुरेसा पाऊस व चांगले वातावरण होते. तक्रारकर्त्याने सदर बियाणे न उगवल्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 कडे अर्ज देऊन नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. या बाबतची तक्रार तालुका कृषी अधिकारी, मुर्तीजापुर यांच्याकडे दि. 06/09/2014 रोजी केल्यानंतर त्या अनुषंगाने अध्यक्ष तालुका तक्रार निवारण समिती तथा कृषी अधिकारी मुर्तीजापुर यांनी पेरणी क्षेत्राला दि. 06/09/2014 रोजी भेट दिली व निरीक्षण केले. यावेळी त्यांना एकूण 2.40 हे. क्षेत्र बाधीत असल्याचे निदर्शनास आले. त्याअनुषंगाने चौकशी अहवाल तक्रारकर्त्यास प्राप्त झाला. तक्रारकर्त्याने दि. 30/09/2014 रोजी विरुध्दपक्ष यांना वकीलामार्फत नोटीस पाठवीली व नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु त्याची दखल विरुध्दपक्षाने घेतली नाही. म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व विरुध्दपक्ष यांनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचे घोषीत करुन तक्रारकर्ते यांना प्रत्येकी रु. 2,00,000/- नुकसान भरपाई, तसेच शेताची पेरणी, बियाणे, खते, मशागत इत्यादी करिता रु. 50,000/-, तसेच सोयाबीन बियाणे न उगवल्यामुळे प्रति एकरी 7 क्विंटल प्रमाणे 42 क्विंटल उत्पन्न न मिळाल्याने एकूण रु. 1,26,000/- नुकसान भरपाई व मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु. 50,000/- तसेच तक्रारीचा खर्च रु. 25,000/- विरुध्दपक्षाकडून देण्याचा आदेश व्हावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 11 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा लेखीजवाब :-
2. सदर तक्रारीचे अनुषंगाने, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी आपला लेखीजवाब, शपथेवर दाखल केला त्यानुसार तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करुन अधिकचे कथनात असे नमुद केले आहे की,…
कृषी अधिकारी तसेच तालुका स्तरीय समिती यांनी बियाणे कायदा कलम 23-अ प्रमाणे कोणत्याही तरतुदीचे पालन केले नाही. उगवण शक्तीचा अहवाल देण्यापुर्वी त्या बियाण्याचे पुर्ण परिक्षण बिज परिक्षण प्रयोगशाळेद्वारे करुन त्या नंतरच अहवाल द्यायचा असतो. कारण उगवण शक्तीला तापमान, हवामान, पाण्याची आद्रता तसेच जमिनीचा दर्जा, पर्जन्यमान, पेरणीची पध्दत ह्या सर्व बाबी आवश्यक असतात. मध्यप्रदेश राज्य बिज प्रमाणीकरण संस्था, भोपाल येथून हे बियाणे प्रमाणीत करण्यात येते व नंतरच त्याची विक्री करण्यात येते. तक्रारकर्त्या-व्यतिरिक्त इतर कोणत्याही शेतक-याची बियाण्याच्या बाबतीत तक्रार आलेली नाही. चौकशी समितीने दिलेला अहवाल दोषपुर्ण आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्र. 2 यांचा लेखीजवाब :-
विरुध्दपक्ष क्र. 2 यांना सदर प्रकरणाची नोटीस बजावण्यात आल्यानंतर देखील ते या प्रकरणात हजर झाले नाहीत व म्हणून विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द सदर प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने पारीत केला.
3. त्यानंतर तक्रारकर्त्यातर्फे प्रतिज्ञापत्राद्वारे सरतपासणीचा लेख, दाखल करण्यात आला. तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 तर्फे लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आला व दोन्ही पक्षांतर्फे तोंडी युक्तीवाद करण्यात आला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. तक्रारकर्त्याची तक्रार, दाखल दस्तऐवज, विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा लेखी जवाब, तक्रारकर्ते यांचा पुरावा, तक्रारकर्त्याचा तोंडी युक्तीवाद व विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा लेखी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देऊन पारीत केला तो येणे प्रमाणे –
या प्रकरणात तक्रारकर्ते यांचा युक्तीवाद असा आहे की, त्यांनी विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्या दुकानातून विरुध्दपक्ष क्र. 1 या कंपनीचे सोयाबीन या वानाचे लॉट नंबर मे-ऑक्टोबर-13-12-915-172229-सी.आय, या बियाण्याची त्यांच्या शेतात पेरणी केली. तक्रारकर्त्याने सदर बियाणे दि. 19/7/2014 रोजी खरेदी केले होते. सदर बियाणे पेरणी केल्यानंतर जवळपास 25 टक्केच उगवले, त्यामुळे त्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी मुर्तीजापुर यांच्या कडे केली असता, त्यांनी दि. 6/9/2014 रोजी पेरणी क्षेत्राला भेट दिली व सदर बियाणे हे सदोष असल्याचे मत नोंदविले. त्यामुळे प्रार्थनेप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी.
तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्तऐवज जसे की, बियाणे खरेदी पावती, ज्याचा क्रमांक 1337 आहे, व जो तालुका स्तरीय तक्रार निवारण समिती, मुर्तीजापुर यांच्या चौकशी अहवालात देखील नमुद आहे. या पावतीचे अवलोकन केले असता, असे दिसते की, सदर पावतीमध्ये नमुद सोयाबीन बियाण्याचा लॉट नंबर व चौकशी अहवालात जो लॉट नंबर सदोष दाखविण्यात आला आहे, तो भिन्न आहे. तक्रारकर्ते यांनी तक्रारीत सदर सोयाबीन या वानाचा लॉट नंबर मे-ऑक्टोबर-13-12-915-172229-सी.आय हा नमुद केलेला आहे व हाच लॉट नंबर सदोष असल्याचे मत तालुका कृषी अधिकारी यांनी चौकशी अहवालात नमुद केलेला आहे, परंतु बियाणे खरेदी पावतीवर लॉट नंबर 122265 व 122267 असा नमुद आहे. या संदीग्धतेमुळे तक्रारकर्त्याने मागीतलेली नुकसान भरपाई मंचाला मंजुर करता येणे शक्य नाही. सबब अंतिम आदेश पारीत करण्यात येतो तो खालील प्रमाणे….
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्ते यांची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
3) सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.