जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र. 338/2008. प्रकरण दाखल दिनांक – 17/10/2009. प्रकरण निकाल दिनांक – 08/05/2009. समक्ष - मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा. श्री.सतीश सामते. सदस्य. शंकर नरसीमलू सुरकुटलावार वय वर्षे 30, व्यवसाय मंजूरी, शिवनेरी नगर, देगलूर ता.देगलूर जि.नांदेड. अर्जदार विरुध्द 1. प्रो.प्रा.श्री. बालाजी सेल्स, द्वारा, श्री. मुद्रनालय, मेन रोड, शिवाजी नगर, नांदेड. 2. आर.के.रिम प्रा.लि.. गैरअर्जदार ऑफिस, 2-बी. स्टेट, गुलाम कॉम्प्लेक्स, व्हॅलि व्हासा रोड, ठाणे, मुंबई. अर्जदारा तर्फे. - अड.ऐ.व्ही.चौधरी. गैरअर्जदार क्र.1 तर्फे - अड.व्ही.एस.गोळेगांवकर. गैरअर्जदार क्र.2 तर्फे - वगळण्यात आले. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष) गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार हा खाजगी नौकरी करुन स्वतःचा व कूटूंबाचा उदरनिर्वाह करतो. अर्जदार यांनी दि.05.12.2006 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून ई बाईक मॅटि्क्स ही बॅटरीवर चालणारी गाडी रु.29,000/- ला खरेदी केली. गाडीस एक वर्षाची गॅरंटी राहील व त्या दरम्यान गाडीचे पार्ट तसेच कूठलीही खराबी झालयास बदलून मिळेल असे आश्वासन देण्यात आले होते. गाडी खरेदी केल्यानंतर दूस-याच महिन्यात गाडीचे किरकोळ काम नीघावयास सूरुवात झाली. गैरअर्जदारांनी ती दूरुस्त करुन दिली. काही दिवसानंतर गाडीचे हेड लाईट तसेच रिअर ब्रेक तसेच रिअर व्हील हे चांगल्या प्रकारे चालत नव्हते. त्यांची दूरुस्ती गैरअर्जदारांनी करुन दिली. परंतु काही दिवसांतच गाडी बंद पडली. त्यामूळे अर्जदार यांनी ती गाडी नांदेड येथे आणली व गैरअर्जदाराकडे तिन चार दिवस दूरुस्तीसाठी ठेवली व दूरुस्त करुन दिल्यानंतर आता कोणतीच समस्या येणार नाही असे सांगितले. परंतु त्यानंतर पून्हा गाडी स्पीड घेत नव्हती तसेच लाईट लागत नव्हते, बॅटरी काम करीत नव्हती. नंतर गैरअर्जदार यांचेकडे गाडी दूरुस्तीसाठी आणली असता त्यांनी गाडीस रु.10,000/- ते रु.12,000/- खर्च येईल असे सांगितले तसेच नागपूरचा मॅकेनिक नौकरी सोडून गेला अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामूळे अर्जदार यांनी त्यांना दि.17.1.1.2007 रोजी कायदेशीर नोटीस दिली. ज्यामध्ये वरील कंपनीची मोटार नं.ओ.वाय.48 व्ही.18 ए.डब्ल्यू.1456 चॉकलेटी कलरची ज्यांचा चेसीस नंबर 6 के 848 ज्यांचे बिल नंबर 7 असलेले दूचाकी वाहन अर्जदारास दूरुस्त करुन दयावे अन्यथा बदलून दयावे असे न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अशी नोटीस दिली. परंतु गैरअर्जदार यांनी कूठलाही प्रतिसाद दिला नाही व गाडीही दूरुस्त करुन दिली नाही. आजही गाडी त्यांचेच कडे आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केलेली असून, अर्जदार यांची मागणी आहे की, सदरील कंपनीची गाडी बदलून दयावी अन्यथा रु.29,000/- व्याजासह परत करावेत तसेच मानसिक, शारीरिक व आर्थिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना देण्याचे आदेश व्हावेत. गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडून वाहन रु.29,000/- ला दि.05.12.2006 रोजी खरेदी केले आहे हे त्यांना मान्य आहे.ही गाडी बॅटरीवर चालते व तिला आर.टी. ओ. कर, परवाना, पेट्रोल तसेच रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही हे मान्य केले आहे. गैरअर्जदार हे अमान्य करतात की, दूचाकीस एक वर्षाची गॅरंटी राहील व त्या दरम्यान गाडीचे पार्टस तसेच कूठल्याही प्रकारचे खराबी झाल्यास गाडी बदलून मिळेल. हे म्हणणे खोटे आहे की, गाडी खरेदी केल्यानंतर दूस-याच महिन्यात गाडीचे किरकोळ काम नीघावयास सुरुवात झाली. हे म्हणणे खरे आहे की, अर्जदाराची गाडी दूरुस्ती करावयास आणली असता गैरअर्जदाराने मॅकेनिक मार्फत दूरुस्त करुन दिली. गाडी वारंटी कालावधीत दूरुस्त करुन दिलेली आहे व गाडीतील दोष पूर्ण निट करुन दिलेले आहेत. गाडीच्या हेड लाईट, ब्रेक, रिव्हर व्हील या बददल कंपनीने कूठलीही वारंटी दिलेली नाही. हे म्हणणे खोटे आहे की, गाडीतील दोषामुळे गाडी चार महिनेच बंद राहीली. हे म्हणणे खोटे आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास गाडीचा दूरुस्तीचा खर्च रु.10,000/- ते रु.12,000/- सांगितला. अर्जदाराने दि.23.07.2008 रोजी गाडीची वारंटी संपल्यानंतर गैरअर्जदार क्र.1 कडून बॅटरी बदलून देण्यासाठी लागणारा खर्चाची माहीती बिलाद्वारे घेतली होती. हे म्हणणे खोटे आहे की, अर्जदार यांनी गाडी दूरुस्तीसाठी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे ठेवली. वास्तवीक अर्जदार यांनी दि.01.12.2007 रोजी गाडी दूरुस्तीसाठी आणली होती व गैरअर्जदारांनी ती दूरुस्त करुन दि.19.12.2007 रोजी त्यांना परत केली. अर्जदाराकडून गाडी परत मिळाल्याची , दूरुस्त करुन व्यवस्थितपणे परत मिळाल्याची पोच देखील गैरअर्जदाराने घेतली आहे. अर्जदाराने खोटे दोषारोप लावून खोटी तक्रार दाखल केली आहे. वकिलामार्फत पाठविलेल्या नोटीसी मध्ये गाडी मध्ये जे दोष दाखविले आहेत ते कंपनीच्या वारंटी मध्ये येत नाहीत. तसे असताना देखील गैरअर्जदार क्र.1 यांनी देगलूर येथे मॅकेनिक पाठवून गाडी दूरुस्त करुन दिली व तशा आशयाचे पञ दि.22.11.2007 रोजी अर्जदारास पाठविले व त्यांची प्रत वकिलास दिली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी नेहमीच अर्जदारास सेवा पूरवीली आहे. गैरअर्जदाराने वारंटी कालावधीत कूठलीच सेवेतील ञूटी निर्माण होऊ दिली नाही. वास्तविक पाहता अर्जदाराने गाडी ही दि.5.12.2006 रोजी खरेदी केली त्यामूळे दि.05.12.2007 रोजी गाडीचा वारंटी कालावधी संपूष्टात आलेला आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांच्या सेवेत कोणतीही ञूटी नाही म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार ही खर्चासह फेटाळावी अशी मागणी केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होत काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून दि.5.12.2006 रोजी बॅटरी वर चालणारी दूचाकी वाहनपावती नंबर 7 द्वारे रु.29,000/- खरेदी केले हे गैरअर्जदार यांना मान्य आहे. ती पावती अर्जदाराने दाखल केलेली आहे. तसेच अर्जदार यांनी वेळोवेळी गाडीतील जे काही दोष दाखविले ते सूध्दा वेळोवेळी दूरुस्त करुन दिलेले आहेत. वाहनाची वारंटी एक वर्षाची असताना वाहनात आलेले सर्व दोष गैरअर्जदारांनी दूरुस्त करुन दिलेले आहेत. आता अर्जदार हे बॅटरी बदलून देण्याची मागणी करीत आहेत. पण वारंटी कालावधी संपल्यामूळे बँटरी बदलून देता येणार नाही. तसेच गाडीमध्ये जी काही दूरुस्ती करावयाची असल्यास किंवा पार्टस बदलून दयावयाचे असल्यास गैरअर्जदार क्र.1 हे तयार आहेत पण त्यांची किमत किंवा भाडे मजूरी अर्जदारास दयावी लागेल. गैरअर्जदार क्र.1 यांनी दि.19.12.2007 रोजीची अर्जदार शंकर सुरकुटलावर रा. देगलूर यांनी श्री बालाजी सेल्स नांदेड यांचे कडून मॅट्रीक्स बाईक चांगल्यास्थितीत चालू करुन मिळाली. काहीही तक्रार नाही. असे अर्जदारांने लिहून दिलेले आहे. ती पावती गैरअर्जदार क्र.1 यांनी प्रकरणात दाखल केलेली आहे. अर्जदार यांनी स्वतः च गाडी खरेदी केल्यानंतर एक वर्षानंतर गाडी बाबत काहीही तक्रार नसल्याचे लिहून दिलेले आहे.तसेच तक्रार दाखल केल्यानंतरची ही पावती दाखल केलेली आहे. त्यामूळे त्यांची बाईक विषयी काहीही तक्रार राहीलेली नाही. परत अर्जदारास बाईक वीषयी काही तक्रार उदभवल्यास ते गैरअर्जदार क्र.1 कडे जाऊ शकतात व गैरअर्जदार क्र.1 आजही त्यांची बाईकस दूरुस्त करुन देण्यास तयार आहेत पण वारंटी कालावधी संपल्यामूळे त्यांना पार्टसची किंमत व मजूरी बाबतचा खर्च गैरअर्जदार क्र.1 यांना दयावा लागेल. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्री. सतीश सामते) अध्यक्ष. सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |