(पारीत व्दारा मा. श्री भास्कर बी.योगी, मा.अध्यक्ष)
01. उपरोक्त नमुद तक्रारदारांनी विरुध्दपक्ष मे. श्री बालाजी रियल इस्टेट अॅन्ड डेव्हलपर्स ही बांधकाम करुन देणारी फर्म आणि तिचे भागीदार यांचे विरुध्द खरेदी केलेल्या सदनीकां संबधाने योग्य त्या सर्व सोयी सुविधा करुन मिळाव्यात अथवा सदर सोयी सुविधां संबधात नुकसान भरपाईची रक्कम मिळावी तसेच अन्य अनुषंगिक मागण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा-1986चे कलम 12 अंतर्गत प्रस्तुत तक्रार एकत्रीतरित्या जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष ही एक ईमारतीचे बांधकाम करुन देणारी आणि त्यातील सदनीका गरजू ग्राहकांना विकणारी भागीदारी फर्म आहे. विरुध्दपक्ष फर्म भूखंड विकसित करुन त्यावर निवासी सदनीका बांधून त्याची विकी करते. विरुध्दपक्ष बांधकाम फर्म तर्फे उपरोक्त नमुद भागीदारांनी मौजा भोजापूर, तलाठी साझा क्रं 12, येथील गट क्रं 164/1/18 मधील भूखंड क्रं-22 ते 24 आणि क्रं-31 ते 33, क्षेत्रफळ आराजी 83610 चौरसमीटर म्हणजे 9000 चौरसफूट या जागेवर व्यंकटेश रेसिडेन्सी या नावाने विंग-ए, विंग-बी, विंग-सी अशा ईमारती मध्ये सदनीका तयार केल्यात. उपरोक्त नमुद तक्रारदारांनी विरुध्दपक्षां कडून खालील प्रमाणे सदनीका खरेदी केलेल्या आहेत, त्याचा तपशिल खालील प्रमाणे आहे-
अक्रं | नाव सर्वश्री- | खरेदी केलेला फ्लॅट क्रं | खरेदीचा दिनांक |
1 | विनोद नामदेवराव देशमुख | 101 | 24/03/2015 |
2 | केवलराम बुधाजी खोब्रागडे | 001 | 29/12/2014 |
3 | ईश्वरी कुंडलिक भास्कर | 003 | 18/10/2014 |
4 | सौ. उषा सखाराम वाढई | 004 | 07/01/2015 |
5 | पुरुषोत्तम सोमाजी बडगे | 005 | 29/12/2014 |
6 | नितीन गजाननराव निनावे | 006 | 20/10/2014 |
7 | संजिव वामनराव देशमुख | 103 | 29/12/2014 |
8 | लोकश लालचंद चौधरी | 104 | 22/01/2015 |
9 | रत्नाकर श्रीराम शहारे | 105 | 10/11/2015 |
10 | दिलीपसिंग भारतसिंग ठाकूर | 106 | 18/09/2014 |
11 | सुरेन्द्र भय्याजी रोकडे | 201 | 29/12/2014 |
12 | लेखराजसिंग हिरासिंग ठाकरे | 203 | 01/02/2014 |
13 | पवनकुमार सूर्यप्रकाश कवी | 204 | 02/03/2015 |
14 | सौ.रिना सुरेश टिचकुले | 205 | 23/06/2015 |
15 | गणेश नामदेव शेंडे | 206 | 31/12/2015 |
16 | विधन सुनिल सरकार | 301 | 29/01/2016 |
17 | विलास महादेवराव पाटील | 302 | 09/01/2015 |
18 | धमेंद्र बनवारी यादव | 305 | 22/01/2015 |
19 | मोहन कुलदिप राव | 306 | 24/12/2013 |
20 | सुरेश विठोबाजी वालुलकर | 406 | 21/04/2017 |
21 | अविनाश शंकरराव निनावे | 002 | 03/02/2015 |
उपरोक्त नमुद सर्व सदनीकांचे प्रत्येकी क्षेत्रफळ 890 चौरसफूट असे आहे. उपरोक्त नमुद तक्रारदारांनी त्यांच्या त्यांच्या सदनीकेचे करारा प्रमाणे संपूर्ण किम्मत विरुध्दपक्ष बिल्डर यांना अदा केलेली आहे, त्यामुळे तक्रारदार आणि विरुध्दपक्ष बिल्डर यांचे मध्ये ग्राहक आणि सेवा देणारे असे संबध प्रस्थापित होतात.
तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, जरी त्यांनी खरेदी नंतर सदनीकांचेताबे घेतले तरी सदर सदनीकांमध्ये विरुध्दपक्ष बिल्डर यांनी खालील प्रमाणे सोयी सुविधा करुन दिलेल्या नाहीत-
- विरुध्दपक्ष यांनी सदनीके मध्ये सांड पाण्याची योग्य व्यवस्था केलेली नाही
- तक्रारदारांचे वाहनां करीता ईमारती मध्ये पार्कींगची योग्य व्यवस्था केलेली नाही. विक्रीपत्र मध्ये दिलेल्या नकाशा प्रमाणे पार्कींगची व्यवस्था नाही.पार्कींगची व्यवस्था ही विक्रीपत्रामध्ये आणि वास्तविकते मध्ये वेगळी आहे.
- ग्राम पंचायतीचे मंजूरी प्रमाणे ईमारती मध्ये रेन वॉटर हार्वेस्टींगची व्यवस्था केलेली नसल्याने उन्हाळयातील एप्रिल ते जुलै महिन्या पर्यंत पाण्याची भरपूर टंचाई असते.
- विरुध्दपक्ष बिल्डर यांनी सदनीकाधारकांची सोसायटी स्थापीत करुन दिलेली नाही.
- ईमारती मधील छतावर विशेषतः पावसाळयात पाणी जमा होते व ते भिंती मधून गळत आहे. विरुध्दपक्षांनी सदनिकांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करुन दिलेले आहे. काही सदनीकां मध्ये वरील बाथरुम व लॅट्रीनचे घाण पाणी गळत आहे , त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
6. विरुध्दपक्ष बिल्डर यांनी योग्य प्रकारचा जिना बनविलेला नाही त्यामुळे पावसाळयाचे दिवसात पावसाचे पाणी हे जिन्यावरुन सदनीकां मध्ये शिरते.
7. विरुध्दपक्ष बिल्डर यांनी पार्कींग मधील जमीनीवर योग्य प्रकारे गट्टूच्या विटांचे काम केलेले नाही तसेच पार्कींग करीता शेडस पूर्णतः बनविलेले नाही.
8. सदर विंग मधील ईमारतीचे बाथरुम व लॅट्रीन हे गटारा मध्ये जोडलेल नाही.
9. विरुध्दपक्ष बिल्डर यांनी सदनीकांची अपूर्ण कामे घाई गडबडीने आटोपलेली असून तक्रारदारांचे नावे विक्रीपत्र नोंदवून दिलेली आहेत.
10. विरुध्दपक्ष बिल्डर यांनी दिलेल्या जाहिराती मध्ये ईमारतीचे मोकळया जागेत श्री व्यंकटेश मंदिर आणि लहान मुलांकरीता खेळण्यासाठी मैदान बनवून देण्याचे आश्वासन दिले होते परंतु प्रत्यक्षात काहीही केलेले नाही.
11. विरुध्दपक्ष बिल्डर यांनी कायदेशीर तरतुदी प्रमाणे बांधकाम केलेले नाही.
तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, उपरोक्त नमुद बांधकामातील त्रृटी वेळोवेळी विरुध्दपक्ष बिल्डरांचे लक्षात आणून दिल्यात परंतु मालमत्तेचे संपूर्ण मुल्य मिळालेले असल्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही, परिणामी त्यांना आज अनेक समस्या भेडसावत आहेत म्हणून तक्रारदारांनी अधिवक्ता यांचे मार्फतीने विरुध्दपक्ष बिल्डर यांना दिनांक-29.11.2016 रोजीची कायदेशीर नोटीस पाठविली परंतु सदर नोटीस मिळूनही कोणताही प्रतिसाद दिला नाही तसेच नोटीसला साधे उत्तर सुध्दा दिले नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष बिल्डर यांनी दोषपूर्ण सेवा तसेच अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केलेला आहे आणि त्यामुळे तक्रारदारांना शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विरुध्दपक्ष् बिल्डर हे ईमारत व सदनीकां मधील उर्वरीत सर्व कामे करुन देण्यास जबाबदार आहेत व त्याकरीता एकमुस्त रक्कम रुपये-10,00,000/- विरुध्दपक्ष यांचे कडून मिळणे आवश्यक आहे. म्हणून शेवटी तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्ष बिल्डर यांचे विरुध्द खालील प्रकारे मागण्या केल्यात-
- विरुध्दपक्ष बिल्डर यांनी तक्रारी मधील परिच्छेद क्रं 4 मध्ये उल्लेखित संपूर्ण कामे तातडीने करण्याचे आदेशित व्हावे किंवा त्या करीता लागणा-या संपूर्ण खर्चाची रक्कम रुपये-10,00,000/- तक्रारदार यांचे कडे जमा करण्याचे आदेशित व्हावे.
2. विरुध्दपक्ष बिल्डर यांनी नुकसान भरपाईची रक्कम म्हणून प्रत्येक तक्रारकर्ता यांना रुपये-15,000/- प्रमाणे देण्याचे आदेशित व्हावे.
3. विरुध्दपक्ष बिल्डर यांनी अनुचित व्यापारी पध्दतीच्या अवलंब केल्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करावी लागली असल्याने तक्रारीचा खर्च तक्रारदारांना प्रत्येकी रुपये-15,000/- विरुध्दपक्षांनी देण्याचे आदेशित व्हावे.
4. विरुध्दपक्ष बिल्डरांचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्येक तक्रारकर्ता यांना रुपये-15,000/- देण्याचे विरुध्दपक्षांना आदेशित व्हावे.
5. या शिवाय योगय ती दाद तक्रारदार यांचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष मे. श्री बालाजी रियल इस्टेट अॅन्ड डेव्हलपर्स ही बांधकाम करणारी फर्म आणि तिचे तर्फे भागीदार विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांनी एकत्रीत लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. विरुध्दपक्षांनी आपले लेखी उत्तरात प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारदारांनी खरेदी केलेल्या सदनीका या स्वमर्जीने आणि पूर्ण अवलेकन करुन खरेदी केल्यात. सदर ईमारती मध्ये कोणत्याही प्रकारची त्रृटी नव्हती. ईमारती मधील सदनीकाधारकांनीच सोसायटी तयार करुन देखभाल खर्च करावा लागतो, त्यासाठी विरुध्दपक्ष यांचे परवानगीची गरज नाही. तक्रारदार हे त्यांचे ग्राहक होत नाहीत. तक्रारदार यांनी सदनीका खरेदी करते वेळी दाखल केलेल्या दस्तऐवजात पूणपणे स्पष्ट नमुद आहे की, सदर ईमारतीची मोकळी जागा असलेला परिसर याचा उपयोग सर्वांना करता येईल. तसेच महत्वाची बाब अशी आहे की, सदर ईमारती मध्ये झालेल्या कोणत्याही लिकेज किंवा सिपेज या बद्दल कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई विरुध्दपक्ष देणार नाही असे स्पष्टपणे
नमुद आहे. या सर्व बाबी माहिती असतानाही तक्रारदारांनी प्रस्तुत चुकीची तक्रार दाखल केलेली आहे.ते पुराव्यार्थ रजिस्ट्रीची प्रत दाखल करीत आहे. प्रस्तुत तक्रार दिवाणी स्वरुपाची आहे त्यामुळे ती खारीज होण्यास पात्र आहे. परिच्छेद निहाय उत्तरे देताना असे नमुद केले की, विरुध्दपक्षांनी सदर सदनीकेत सांडपाण्याची योग्य व्यवस्था केलेली आहे व ही बाब तक्रारदारांना चांगली माहिती आहे. तक्रारदार राहत असलेल्या बी विंग च्या आजू बाजूला सुध्दा ईमारती आहेत म्हणजेच ए विंग, बी विंग आणि सी विंग अशा ईमारती आहेत व तक्रारदार राहत असलेल्या बी विंगच्या दोन्ही बाजूला पार्कींगची व्यवस्था आहे. पार्कींगची जागा कोणासही वैयक्तिकरित्या दिलेली नाही. पार्कींग सामूहिक आहे व त्याबाबतचा उल्लेख विक्रीपत्रात केलेला आहे. सदर ईमारती मध्ये पाण्याची कोणतीही टंचाई नाही, वर्षभर भरपूर पाणी असते. प्रत्येक विंग असलेल्या ईमारती मध्ये पाण्या करीता दोन बोरींग तयार केलेल्या असून त्यावर पंप सुध्दा बसविलेले आहेत व ते सुरु आहेत. वॉटर हार्वेस्टींग करुन देण्या बाबत नकाशात तसेच परवानगीत कुठेही नमुद नाही त्यामुळे वॉटर हार्वेस्टींग करुन दिले नाही मात्र स्लॅबचे पाणी काढण्या करीता व्यवस्थित पाईप लाईन टाकलेली आहे. सदनीकेच्या छतावर पाणी जमा होत नाही व ते भिंती मधून सुध्दा गळत नाही, जर छतावर पाणी जमा होत असेल तर सदनीकाधारकांनी छताची साफ सफाई करुन कचरा काढून टाकणे आवश्यक आहे. विरुध्दपक्ष यांनी बनविलेला जिना योग्य असून जिन्यामुळे पावसाळयात कोणत्याही सदनीके मध्ये पाणी शिरत नाही. विरुध्दपक्षांनी पार्कींग मधील जमीनीवर योग्य प्रकारे गट्टू विटांचे काम केलेले आहे तसेच पार्कींग करीता शेडस सुध्दा बनविलेले आहे. सदर सदनीके मधील बाथरुम व संडास सेप्टी टॅंकला जोडलेले आहेत. सदनीकांचे विक्रीपत्र हे तक्रारदारांचे स्वतःचे मर्जीने लावून दिलेले आहेत त्यांनी कोणतीही घाई गडबड केलेली नाही. ईमारतीचे योजने मध्ये लहान मुलांना खेळण्याचे मैदान आणि मंदिर होते परंतु तक्रारदारांनीच सर्व जाती धर्माचे लोक राहत असल्यामुळे मंदिर बनवू नये तसेच लहान मुलांचे खेळण्याचे मैदान बनविल्यास ईमारतीचे आवारात सदनीकाधारकांना खाजगी कार्यक्रम घेण्यास अडथळे येतील म्हणून तक्रारदारांनी मंदिर व लहान मुलांचे खेळाचे मैदान बनवू नये अशी विनंती केली असल्यामुळे मंदिर व मैदान बनविले नाही त्यासाठी तक्रारदारच जबाबदार आहेत. विरुध्दपक्षांनी कोणत्याही कायदेशीर तरतुदींचा भंग केलेला नाही. सदनीका खरेदी नंतरची जबाबदारी ही सदनिका मालकाची असते. तक्रारदारांची संपूर्ण तक्रार खोटी असून त्यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. त्यांनी केलेल्या ईमारत आणि सदनीके मधील बांधकामात कोणतीही त्रृटी नाही. सबब प्रस्तुत तक्रार तक्रादारांवर खर्च बसवून खारीज व्हावी अशी विनंती विरुध्दपक्षांनी केली.
04. तक्रारदारांची तक्रार, विरुध्दपक्ष बिल्डरांचे उत्तर, कोर्ट कमीश्नर अहवाल, प्रकरणातील साक्षी पुरावे तसेच प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज आणि तक्रारदारांचे वकील श्री तौसीफ खान आणि विरुध्दपक्ष क्रा 1 ते 3 बिल्डर तर्फे वकील श्री भोळे यांचा मौखीक युक्तीवाद यावरुन जिल्हा ग्राहक आयोगाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
::निष्कर्ष::
05. सदर प्रकरणात ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 (1) (सी) प्रमाणे तक्रारदारांनी संयुक्त तक्रार जिल्हा ग्राहक मंचा समक्ष दाखल करताना ग्राहक मंचाची परवानगी घेतली होती आणि त्याच ईमारती मध्ये राहत असलेल्या अन्य कोणत्या सदनीकाधारकाचा काही हेतू तसेच आक्षेप असल्यास त्याचे निराकरण होणे शक्य होईल, यासाठी जिल्हा ग्राहक आयोगाचे आदेशा प्रमाणे दैनिक नवराष्ट्र भंडारा या स्थानिक वर्तमानपत्रातून दिनांक-15.10.2022 रोजी पब्लीक नोटीस प्रसिध्द केली होती आणि त्या नोटीसची प्रत पुराव्यार्थ अभिलेखावर दाखल केली. संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 (1) (सी) तरतुद खालील प्रमाणे आहे’
Section 12(1)(c) in the Consumer Protection Act, 1986
(c) one or more consumers, where there are numerous consumers having the same interest, with the permission of the District Forum, on behalf of, or for the benefit of, all consumers so interested; or
06. सदर प्रकरणात आदेश देण्यापूर्वी उभय पक्षां मध्ये सदनीका खरेदी संबधात झाल्रेले करार, विक्रीपत्र, तपासून पाहणे आवश्यक आहे. त्याच बरोबर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, भंडारा यांनी विरुध्दपक्ष बिल्डरांनी बांधकामात कोण कोणत्या त्रृटी ठेवलेल्या आहेत हे तपासून पाहण्यासाठी अधिवक्ता श्री वाय.जी. निर्वाण यांना कोर्ट कमीश्नर म्हणून नियुक्त केले होते, त्यांनी प्रत्यक्ष मोक्यावर जाऊन तपासणी करुन आपला दिनांक-31 मे, 2022 रोजीचा अहवाल दाखल केला तो सुध्दा अभ्यासणे महत्वाचे आहे. कोर्ट कमीश्नर यांचे मोका तपासणीचे वेळी तक्रारदार यांचे अधिवक्ता श्री तौसीफ खान आणि विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांचे अधिवक्ता सौ.पी.डी.पशीने हजर होत्या. कोर्ट कमीश्नर यांनी पाहणी करुन कच्या नोंदी घेऊन त्यावरुन मौका पंचनामा करुन उपस्थित पक्षांच्या सहया घेतलेल्या आहेत.
7. कमीश्नर यांचे अहवाला मध्ये खालील नोंदी घेण्यात आलेल्या आहेत-
पार्कींगचे व्यवस्थे बाबत-
तक्रारकर्ता श्री विनोद नामदेवराव देशमुख यांना विरुध्दपक्ष फर्म मे. श्री बालाजी रियल इस्टेट अॅन्ड डेव्हलपर्स तर्फे तिचे भागीदार आणि या प्रकरणातील तीन विरुध्दपक्ष यांनी सदनीका विक्री संबधात दिनांक-22 जून, 2012 रोजी जो विक्री करार केलेला आहे, त्यामधील परिच्छेद क्रं 9 मध्ये खालील प्रमाणे नमुद आहे-
9) The available open space, common area and common facilities as may be provided in the building shall be common use of all apartment owners and shall remain undivided and partition or division of the same shall not permissible. सदर करारा मध्ये तक्रारकर्ता श्री विनोद देशमुख यांचे प्रकरणात 3.33 टक्के अनडिव्हाईडेड शेअर असल्याचे सुध्दा नमुद आहे. त्यामुळे सर्व सदनीकाधारकांना अविभक्त जागेचा उपयोग करावयाचा आहे, त्या जागेचे पार्टीशन करता येणार नाही. परंतु कोर्ट कमीश्नर यांचे अहवाला प्रमाणे विरुघ्दपक्ष बिल्डर यांनी ईमारतीचे मंजूर नकाशा प्रमाणे पार्कींगची व्यवस्था करुन दिलेली नसून पार्कींग व्यवस्था व बांधकाम यामध्ये तफावत असल्याचे नमुद केलेले आहे. जिल्हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, कोर्ट कमीश्नर यांनी तफावती संबधात सुस्पष्ट न लिहिल्याने पार्कींग व्यवस्थे संबधात भाष्य करता येणार नाही. आता सोसायटी फार्म झालेली असल्याने सोसायटीने त्या बाबत योग्य तो निर्णय घ्यावा.
प्रत्येक विंग मधील सांडपाण्याचे व्यवस्थे संदर्भात-
कमीश्नर यांचे अहवाला प्रमाणे सदनीका तयार करताना वेगळी नाल्याची व्यव्स्था दिसून आली. सदनीकेच्या पश्चीम दिशेला सांडपाण्या करीता सदनीकेला लागून नाली दिसत आहे, तक्रारकर्ता क्रं 1 यांनी सदर नाली व त्यामधील चेंबर स्वतः बनविल्याचे सांगितले. याचा अर्थ असा होतो की, विरुध्दपक्ष बिल्डर यांनी सांडपाण्यासाठी नालीची व्यवस्था करुन दिलेली नाही. ईतर कोणत्याही प्रकारे सांडपाणी निघण्या करीता व्यवस्था केली नसल्याचे कोर्ट कमीश्नर अहवालात नमुद आहे. तक्रारदारांनी सन-2016-2017 मध्ये सदनीका खरेदी केलेल्या आहेत. सांडपाणी ईमारतीचे परिसरात जमा होते असा कोणताही पुरावा आमचे समोर आलेला नाही.
रेन हार्वेस्टींगचे व्यवस्थे बाबत-
विरुध्दपक्ष बिल्डर यांनी दिलेल्या नोंदणीकृत विक्रीपत्रा मध्ये ग्राम पंचायत कार्यालय खोकरला यांनी बांधकाम परवानगी देताना दिनांक-29.09.2016 मधील अट क्रं 14 मध्ये छताचे पाणी जमीनी मध्ये पुरविणे बंधनकारक राहिल असे कोर्ट कमीशनर अहवाला मध्ये नमुद आहे. तक्रारदार यांनी रेन हार्वेस्टींगवर रुपये-1,30,323/- खर्च केल्याचे दसतऐवज जोडलेले आहेत असे नमुद आहे. थोडक्यात विरुध्दपक्ष बिल्डर यांनी रेन हार्वेस्टींगची सुविधा बांधकाम परवानगी मध्ये नमुद केल्या प्रमाणे दिलेली नाही ही बाब सिध्द होते.
सोसायटीची स्थापना करुन देण्या बाबत-
रहिवाशी ईमारत बांधून दिल्या नंतर सोसायटी स्थापन करुन देण्याची जबाबदारी संबधीत बिल्डरची असते परंतु कोर्ट कमीश्नर अहवाला प्रमाणे विरुध्दपक्ष बिल्डर यांनी सोसायटी स्थापीत करुन दिलेली नाही तर या उलट सदनीकाधारकांनीच किरकोळ खर्च रुपये-20,000/- करुन सोसायटी स्थापन केलया बाबत नोंदणी प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. यावरुन ही बाब सिध्द होते की, विरुध्दपक्ष बिल्डर यांची जबाबदारी असतानाही त्यांनी सोसायटी स्थापन करुन दिलेली नाही.
ईमारतीचे छतावर पावसाळयातील पाणी जमा होते व ते भिंतीमधून गळत आहे. काही सदनीकां मधील बाथरुम व लॅट्रीनचे घाण पाणी गळत आहे-
कमीश्नर यांचे अहवाला प्रमाणे ईमारतीचे छत सिमेंट क्रॉकीटने बनविलेले आहे परंतु ते एकसमान दिसत नाही. सबंधित सदनीकाधाकांनी पाण्याची दुरुस्ती स्वतः केल्याचे दिसून येते व सिमेंटचे प्लॅस्टर केलेले आहे. यावरुन ही बाब सिध्द होते की, छतावरील पाणी निचरा होण्यासाठी स्लोप बरोबर तयार केलेला नाही तसेच बाथरुम व लॅट्रीनचे पाणी जाण्यासाठी योग्य दर्जाचे पाईप बसविलेले नसल्याने पाईप मधून पाणी गळण्याचे प्रकार उदभवतात.
ईमारती मधील जिना योग्य बनविलेला नसल्याने जिन्या वरुन फ्लॅट मध्ये पाणी शिरते-
या संदर्भात कोर्ट कमीश्नर अहवाला मध्ये पहिल्या माळयावरील जिन्याच्या भिंतीवर पाणी वाहत असल्याने शेवाळाचे डाग दिसून आलेत. पावसाळयाचे दिवस नसल्याने ही बाब सखोल तपासता आली नाही परंतु ज्या अर्थी जिन्यावर पाणी वाहत असल्या बाबत शेवाळाचे डाग आहेत त्याअर्थी जिन्यावरुन फ्लॅट मध्ये पाणी शिरते ही बाब सिध्द होते.
पार्कींग मधील जागेवर गटटू विटांचे काम केले किंवा नाही तसेच पार्कींग करीता शेडस बनविले किंवा नाही या बाबत-
कोर्ट कमीश्नर अहवाला प्रमाणे वाहनाचे पार्कींग करीता गटटूचे काम तसेच टिनाचे शेड बनविलेले आहे परंतु हे काम जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष तक्रार दाखल केल्या नंतर केलेले आहे
ईमारती मधील सदनीकांचे बाथरुम व लॅट्रीन हे गटारा मध्ये जोडलेले आहे किंवा नाही-
कमीश्नर यांचे अहवाला प्रमाणे विंग बी या ईमारतील मधील संडास व बाथरुमचे पाईप हे विंग ए मधील सेप्टीक टॅंक सोबत जोडलेले आहे. विंग ए, विंग बी व विंग सी असे मिळून फक्त दोन सेप्टीक टॅंक असल्याचे सांगण्यात आले व ही बाब विरुध्दपक्ष बिल्डर यांनी पाहणीचे वेळी मान्य केलेली आहे. याचाच अर्थ तक्रारदार राहत असलेल्या विंग बी मधील सदनीकाधारकांचे लॅट्रीन व बाथरुम मधील पाण्यासाठी वेगळी स्वतंत्र टॅंकची व्यवस्था करुन दिलेली नाही ही बाब सिध्द होते.
ईमारती मध्ये मंदिर व लहान मुलांना खेळण्याचे मैदान उपलब्ध करुन देण्या बाबत-
कोर्ट कमीश्नर अहवाला प्रमाणे विरुध्दपक्ष बिल्डर यांनी प्रत्यक्ष मोक्यावर मंदिर तसेच लहान मुलां करीता खेळण्या करीता मैदान तयार करुन दिलेले नाही, जेंव्हा की, विरुध्दपक्ष बिल्डर यांनी त्यांचे ब्राऊचर मध्ये मंदिर आणि खेळण्याचे मैदान अशा सोयी देण्याची बाब मान्य केलेली आहे परंतु मंदिर व खेळण्याचे मैदानाची सोय उपलब्ध करुन दिलेली नाही ही बाब सिध्द होते.
कोर्ट कमीश्नर यांनी आपले अहवाला सोबत पुराव्यार्थ सदनीकाधारकांनी खर्च केलेल्या बिलांच्या प्रती दाखल केलेलया आहेत. तक्रारदारांनी सांडपाण्याचे पाईप तसेच क्लिप, बेंड ईत्यादी साहित्य विकत घेतल्या बाबत हिंद हार्डवेअर भंडारा यांचे दिनांक-26.06.2019 रोजी रुपये-11000/- चे बिल दाखल केलेले आहे. रेन हार्वेस्टींग करीता रुपये-8500/- चे दिनांक-14.06.2020 रोजीचे बिल दाखल केलेले आहे. तसेच हिंद हार्डवेअर यांचे दिनांक-15.06.2020 रोजीचे रुपये-25,732/- चे बिल दाखल केलेले आहे. श्री राजेश खोब्रागडे यांनी रेन हार्वेस्टींग करीता रुपये-45,000/- मिळाल्या बाबत दिनांक-24.04.2021 रोजीची पावती दाखल केलेली आहे. ग्रामपंचायत खोकरला यांचे बाधकाम परवानगीची प्रत सुध्दा दाखल आहे. या शिवाय सोसायटी स्थापीत केल्या बाबत सहायक निबंधक सहकारी संस्था भंडारा यांचे दिनांक-14.12.2017 चे प्रमाणपत्राची प्रत दाखल केलेली आहे.
कोर्ट कमीश्नर अहवाला वरुन प्रामुख्याने बाबी दिसून येतात की, रेन हार्वेस्टींगची व्यवस्था तक्रारदार यांनी रुपये-1,30,323/- खर्च करुन केलेली आहे. विरुध्दपक्ष बिल्डर यांनी सोसायटी स्थापन न केल्यामुळे तक्रारदारांना सोसायटीसाठी रुपये-20,000/- खर्च आलेला आहे. तक्रारदार राहत असलेलया विंग बी साठी स्वतंत्र सेप्टीक टूंक बनविलेले नाही.तसेच मंदिर व खेळाचे मैदानाची व्यवस्था ब्राऊचर मध्ये नमुद करुनही दिलेली नाही या बाबी दिसून येतात. भागीदारी कायदया प्रमाणे भागीदारी फर्म नोंदणीकृत असो किंवा नसो एका भागीदाराचे कृत्यू बद्दल सर्व भागीदारांची जबाबदारी येते, त्यामुळे यामध्ये सर्वच विरुध्दपक्ष यांची जबाबदारी येते असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
08. जिल्हा ग्राहक आयोगाचे मते विरुध्दपक्ष बिल्डरांनी कोर्ट कमीश्नर अहवाला प्रमाणे उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे सोयी सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत. काही सोयी सुविधा तक्रारदार यांनी विंग बी मध्ये केलेल्या आहेत व त्या करीता त्यांना जवळपास रुपये-2,00,000/- खर्च आलेला आहे तसेच अजूनही ईमारतीचे छतावरील पाण्यासाठी योग्य व्यवस्था करणे, जिन्यावरील पाण्यासाठी योग्य व्यवस्था करणे, तसेच विंग बी मधील सदनीकाधारकांचे लॅट्रीन व बाथरुमचे पाण्याचे व्यवस्थे करीता स्वतंत्र सेप्टीक टॅंक ईत्यादी सोयीसाठी जवळपास रुपये-2,00,000/- खर्च अपेक्षीत आहे. तसेच लहान मुलांसाठी खेळाचे मैदान व मंदिर या सोयी सुविधा दिलेल्या नाहीत. पार्कींग बाबतीत आता सोसायटी स्थापन झालेली असल्याने सर्व सदनीकाधारकानीं पार्कींग अलॉटमेंट बाबतीत योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.कमीश्नर अहवाला प्रमाणे विरुध्दपक्ष बिल्डर यांनी तक्रारदारांना आवश्यक असलेल्या सोयी व सुविधा दिलेल्या नाहीत व त्यासाठी त्यांना स्वतःला खर्च करावा लागला यासाठी प्रत्येक सदनीकाधारकास शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला त्यामुळे प्रत्येकी रुपये-1000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून प्रत्येकी रुपये-1000/- प्रमाणे विरुध्दपक्ष बिल्डर यांचे कडून तक्रारदारांना मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
09 उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन जिल्हा ग्राहक आयोग प्रस्तुत तक्रारीमध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
:: अंतीम आदेश ::
- उपरोक्त नमुद तक्रारदार श्री विनोद नामदेवराव देशमुख आणि ईतर तक्रारदार यांची विरुध्दपक्ष मे. श्री बालाजी रियल इस्टेट अॅन्ड डेव्हलपर्स ही बांधकाम करणारी भागीदारी फर्म आणि सदर फर्मचे भागीदार क्रं 1 श्री मनोज शंकराव रक्षीये, भागीदार क्रं 2 श्री सचिन यशवंतराव कुंभलकर आणि भागीदार क्रं 3 श्री प्रशांत पुरुषोत्तमराव निंभोलकर यांचे विरुध्दची तक्रार वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष मे. श्री बालाजी रियल इस्टेट अॅन्ड डेव्हलपर्स ही बांधकाम करणारी भागीदारी फर्म आणि सदर फर्मचे भागीदार क्रं 1 श्री मनोज शंकराव रक्षीये, भागीदार क्रं 2 श्री सचिन यशवंतराव कुंभलकर आणि भागीदार क्रं 3 श्री प्रशांत पुरुषोत्तमराव निंभोलकर यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी निकालपत्रात नमुद केल्या प्रमाणे विंग बी मध्ये तक्रारदारांनी केलेल्या खर्चा बाबत तसेच अपेक्षीत सोयी सुविधांचे खर्चा बाबत एकूण रुपये-4,00,000/- (अक्षरी रुपये एकूण चार लक्ष फक्त) सर्व तक्रारदारांचे वतीने तक्रारकर्ता क्रं 1 श्री विनोद नामदेवराव देशमुख यांना दयावेत.
- विरुध्दपक्ष मे. श्री बालाजी रियल इस्टेट अॅन्ड डेव्हलपर्स ही बांधकाम करणारी भागीदारी फर्म आणि सदर फर्मचे भागीदार क्रं 1 श्री मनोज शंकराव रक्षीये, भागीदार क्रं 2 श्री सचिन यशवंतराव कुंभलकर आणि भागीदार क्रं 3 श्री प्रशांत पुरुषोत्तमराव निंभोलकर यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी प्रत्येक तक्रारदारास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-1000/- (अक्षरी प्रत्येकी रुपये एक हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून प्रत्येकी रुपये-1000/-(प्रत्येकी रुपये एक हजार फक्त) दयावेत.
- तक्रारदारांनी सोसायटी स्थापन केलेली असल्याने सर्व तक्रारदारांनी सोसायटीची सभा घेऊन पार्कींगचे व्यवस्थे बाबत योग्य तो निर्णय घ्यावा.
- विरुध्दपक्ष मे. श्री बालाजी रियल इस्टेट अॅन्ड डेव्हलपर्स ही बांधकाम करणारी भागीदारी फर्म आणि सदर फर्मचे भागीदार क्रं 1 श्री मनोज शंकराव रक्षीये, भागीदार क्रं 2 श्री सचिन यशवंतराव कुंभलकर आणि भागीदार क्रं 3 श्री प्रशांत पुरुषोत्तमराव निंभोलकर यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी ईमारतीचे ब्राऊचर मध्ये नमुद केल्या प्रमाणे लहान मुलांसाठी खेळाचे मैदान आणि मंदिर बांधून दयावे.
- विरुध्दपक्ष मे. श्री बालाजी रियल इस्टेट अॅन्ड डेव्हलपर्स ही बांधकाम करणारी भागीदारी फर्म आणि सदर फर्मचे भागीदार क्रं 1 श्री मनोज शंकराव रक्षीये, भागीदार क्रं 2 श्री सचिन यशवंतराव कुंभलकर आणि भागीदार क्रं 3 श्री प्रशांत पुरुषोत्तमराव निंभोलकर यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या सदर आदेशाचे अनुपालन निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत विरुध्दपक्ष मे. बालीजी रियल इस्टेट अॅन्ड डेव्हलपर्स ही बांधकाम करणारी फर्म आणि नमुद भागीदार क्रं 1 ते 3 यांनी सदर आदेशाचे अनुपालन न केल्यास अंतीम आदेशातील आदेशीत संपूर्ण रकमा या मुदती नंतर पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-7 टक्के दराने व्याजासह तक्रारदारांना देण्यास विरुध्दपक्ष फर्म व तिचे भागीदार हे जबाबदार राहतील.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन दयावी.
8. उभय पक्षकार व त्यांचे अधिवक्ता यांना निर्देशित करण्यात येते की, त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष प्रकरणात दाखल केलेले अतिरिक्त संच जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.