निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदार हा एक होतकरु शेतकरी असून शेतीच्या लागवडीतील पिकातून उत्पादन घेवून स्वतःचा व कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. गैरअर्जदार 1 व 2 यांनी अर्जदार यांना सन 2012-13 मध्ये त्यांच्या शेतात संकरीत बीज उत्पादन प्लांट घेण्यास सांगितले. सदर प्लांटमधून गैरअर्जदार यांनी कापूस बियाणे तयार करण्यासाठी निघणारा कापूस खरेदी करण्याचे मान्य केले. गैरअर्जदार 1 यांच्यामार्फत अर्जदारास बियाणाची रक्कम भरुन बियाणे पुरविण्यात आले. अर्जदार यांनी गैरअर्जदार 1 यांच्याकडून बियाणाची रक्कम भरुन बियाणे घेतलेले असल्यामुळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत. सदर बियाणाचा लॉट नं. 205461 (एम-1) व 204444 (एफ-1) असा आहे. गैरअर्जदार यांच्या मार्गदर्शनानुसार अर्जदाराने त्याचे शेत गट नं. 205 क्षेत्र 0 हेक्टर 30 आर (सामाईक क्षेत्र) मौजे वडगांव ता. लोहा जि. नांदेड येथील प्लॉटमध्ये सर्व ती काळजी घेवून बियाणाची लागवड दिनांक 18/05/2013 रोजी केली. अर्जदाराने पिकाची संपूर्ण काळजी घेतलेली आहे. अर्जदाराने पिकासाठी लागणारी खते, तसेच फवारणी, औषधी देवून व्यवस्थीतरित्या मेहनत घेवून मशागत केलेली आहे. अर्जदारास रक्कम रु. 6,000/- खर्च आलेला आहे. अर्जदार यांच्या शेतातील कापसाच्या झाडांची होत असलेली वाढ पाहून त्यांना आनंद झाला परंतू सदर बियाण्यांत मादी 5040, बीजी II, असून नर 5034 (नॉन बीटी) असल्यामुळे फुल व पानगळ मोठयाप्रमाणावर झाल्यामुळे संकरीकरण कार्यक्रम घेता आला नाही. तसेच नर फुल, नर किड, रोगांना बळी पडला आणि त्यामुळे संकरीत बिज उत्पादन कार्यक्रम पूर्णतः अयशस्वी झाला. अर्जदार यांनी ही बाब गैरअर्जदार 1 व 2 यांना सांगितली व शेतातील असलेल्या परिस्थितीचा आढावा घ्यावा अशी विनंती केली. गैरअर्जदार हे जायमोक्यावर आले व निकृष्ट दर्जाच्या बियाण्यामुळे गैरअर्जदार यांनी सदरील प्लांट सिडस् साठी योग्य नसल्याचे सांगून अर्जदारांचा प्लांट नामंजूर केला त्यामुळे अर्जदाराचे खूप मोठे नुकसान झाले. वास्तविक पाहता गैरअर्जदार यांनी अर्जदारास सदर बियाणांच्या लागवडीद्वारे व सदर प्लांटद्वारे तुम्हाला भरपूर उत्पन्न मिळेल असे आश्वासन दिले होते. कारण नियमित कापसाचा भाव हा वेगळा असतो व सदर प्लांटच्या कापसाचा भाव हा जास्त असतो असे सांगितले होते. परंतू गैरअर्जदारांचे बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याने अर्जदारांचा प्लांट घेण्यास गैरअर्जदाराने इन्कार केला. दिनांक 05/08/2013 रोजी अर्जदाराने जिल्हा कृषी अधिकारी, पंचायत समिती, लोहा, तसेच तहसील कार्यालय लोहा, जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे तक्रार दिली. त्यानुसार अर्जदार यांच्या शेतात दिनांक 30/08/2013 रोजी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अधिकारी, मोहीम अधिकारी,जि.प.नांदेड, डीव्हीजन मॅनेजर-कृषीधन सिडस् कंपनी, कृषी विकास अधिकारी, जेष्ठ शास्त्रज्ञ कापूस संशोधन केंद्र सदस्य, कृषी विकास अधिकारी गोडेस्वार, संयोजक- के.पी. मालपाणी तसेच तालुका कृषी अधिकारी, यांनी अर्जदारांच्या शेतात जायमोक्यावर येवून पाहणी केली व पंचनामा करुन अहवाल दिला. त्यामध्ये खालीलप्रमाणे निष्कर्ष काढला.
‘’सदर बियाण्यांत मादी 5040, बीजी II असून नर 5034 (नॉन बीटी) असल्याने फुल व पानगळ मोठयाप्रमाणात झाल्यामुळे संकरीकरण कार्यक्रम घेता आला नाही तसेच नर फुल, नर किड, रोगांना बळी पडला आणि त्यामुळे संकरीत बिजोत्पादन कार्यक्रम पूर्णतः अयशस्वी झाला त्यामुळे प्रति प्लॉट 150 कि.ग्रॉ. इतके कापसाच्या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे प्रत्येक अर्जदारांचे प्रत्येकी रक्कम रु. 45,600/- नुकसान झाले.’’
2. अर्जदाराने त्यांच्या शेतीची मशागत केली आणि बियाणे, खतांचा वापर करुन, शेतातील कापसांची योग्य प्रकारे निगराणी केली परंतू गैरअर्जदार यांनी निकृष्ट दर्जाचे बियाणे दिल्यामुळे अर्जदारास प्रचंड आर्थिक नुकसान झालेले आहे त्यामुळे अर्जदारास मानसिक व शारीरिक त्रास झालेला आहे. याकरीता अर्जदाराने तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून तक्रारीतील अर्जदारांच्या झालेल्या नुकसानीबद्दल रक्कम रु. 45,600/- 12 टक्के व्याजासह गैरअर्जदारांनी अर्जदारांना दयावेत, बियाणे लागवडीसाठी अर्जदारांना आलेल्या खर्चाची रक्कम रु.25,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 20,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी तक्रारीद्वारे केलेली आहे.
गैरअर्जदार 1 व 2 हे प्रकरणात हजर झाले असून त्यांनी आपले लेखी जबाब, युक्तीवाद दाखल केलेले आहेत. त्यांच्या लेखी जबाबांचे अवलोकन केले असता गैरअर्जदार 1 व 2 यांच्या लेखी जबाबातील कथन सारखेच असल्याने त्यांचा संयुक्त लेखी जबाब खालील प्रमाणे आहे.
गैरअर्जदार 1 व 2 यांचा लेखी जबाब थोडक्यात खालील प्रमाणे.
3. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक नाहीत कारण अर्जदार हे ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 2 मध्ये दिलेल्या व्याख्येमध्ये बसत नाहीत. गैरअर्जदार 2 हे बिज उत्पादक आहेत व अर्जदार हे शेतकरी आहेत. गैरअर्जदार 1 हे अर्जदार व गैरअर्जदार 2 मधील संयोजक आहेत. गैरअर्जदार 2 हे बियाणे पुरवठा करतात व शेतकरी गैरअर्जदार 1 च्या मार्फत बियाणे नेवून शेतात लागवड करतात. बियाणे तयार झाल्यानंतर शेतकरी कापूस गैरअर्जदार क्र. 2 यांनी ठरवून दिलेल्या जिनिंगवर पुढील प्रक्रियासाठी नेतात व बियाण्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जर बियाणे पास झाल्यास बियाण्याच्या ठरलेल्या दराप्रमाणे गैरअर्जदार क्र. 2 हे गैरअर्जदार 1 कडे रक्कम देतात व ती रक्कम ठरलेल्या दराने गैरअर्जदार 2 हे शेतक-यांना देत असतात. गैरअर्जदारांनी अर्जदारांना वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे. अर्जदाराने केलेले आरोप खोटे असून अर्जदाराने नर व मादी बियाण्यांची पेरणी केल्यानंतर जी काळजी घेणे आवश्यक होते ती घेतलेली नाही. गैरअर्जदार 2 यांचे प्रतिनिधी यांनी दिनांक 22/08/2013 रोजी अर्जदार यांच्या सिड प्लॉटला भेट देण्यासाठी गेले असता असे निदर्शनास आले की, स्वप्रागिकरण झालेले बोंड मादीच्या झाडास लागले होते व अर्जदाराने सिड्सची क्रॉसिंग चालू केली नव्हती. गैरअर्जदारांच्या प्रतिनिधीने अर्जदारास सांगितले की, त्यांनी स्वप्रागिकरण झालेले बोंड तोडावे नाही तर सिड प्लॉन्ट फेल होईल. तसेच त्यांना फुलतोडेच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाची फवारणी करण्यास सुचविले होते. अर्जदाराने योग्य निगरानी न केल्यामुळे व वेळोवेळी क्रॉसिंग न केल्यामुळे गैरअर्जदार 2 यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. अर्जदाराने नर व मादीची क्रॉसिंग न करता तसेच सोडून दिले म्हणून सदरच्या कापसाच्या वाणाला स्वप्रागिकरण झाले व त्यातून अर्जदारास कापसाचे उत्पादन झालेले आहे व त्याची रक्कम त्यांना बाजारातून मिळालेली आहे. दिनांक 30/08/2013 रोजी तपासणी करण्यात आली. त्यामध्ये समितीचे अध्यक्ष हजर नव्हते. त्यांच्या माघारी केलेली तपासणीचा अहवाल ग्राहय धरता येवू शकत नाही. अर्जदाराने बियाणे तपासणीकरीता पाठविणे जरुरी होते. परंतू अर्जदाराने बियाणाची तपासणी केलेली नाही त्यामुळे बियाणामध्ये दोष आहे असे म्हणता येणार नाही. अर्जदाराच्या सदर तपासणी अहवालाला कोणताही शास्त्रीय आधार नाही त्यामुळे सदर अहवालाचा विचार करणे योग्य नाही. अर्जदाराने गैरअर्जदारांच्या सुचनेचे पालन केलेले नाही. अर्जदाराने नर व मादी फुलांचे स्वपरागीकरण/क्रॉसींग केलेले नाही त्यामुळे नर व मादी झाडांना बोंड लागले होते. नर झाडांच्या फुलांचा उपयोग परागीकरण करण्याकरिता करावयाचा होता व त्या झाडांना बोंड लागू दयावयाचे नव्हते. परागीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नर झाड तोडून फेकून दयावयाचे होते. अर्जदाराने परागीकरण न केल्यामुळे नर झाडांना बोंड लागले. सदरच्या सिड प्लॉटला कमर्शियल प्लॉट म्हणून करुन घेतले व सदरच्या झाडातून आलेला कापूस बाजारामध्ये विकून टाकला. सदर प्रकरण किरकोळ चौकशीने संपणारे नाही. प्रकरण किचकट असल्याने मंचास चालविण्याचा अधिकार नाही. सिड तपासणी समितीने दिलेला अहवाल हा मोघम असून अर्जदारास खुष करण्याच्या उद्देशाने दिलेला आहे त्यासाठी कुठलाही शास्त्रीय आधार नाही त्यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती लेखी जबाबाद्वारे गैरअर्जदार 1 व 2 यांनी केलेली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
4. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांनी उत्पादित केलेले कापूस बियाणे गैरअर्जदार क्र. 1 मार्फत खरेदी केले असल्याचे दोन्ही बाजूस मान्य आहे. सदर बियाणांचा प्रकार हा मादी 5040, बीजी II, असून नर 5034 (नॉन बीटी) असा आहे. अर्जदाराने खरेदी करुन शेतात लावलेले बियाणे हे बिजोत्पादन योजने अंतर्गत खरेदी केलेले बियाणे होते. म्हणजेच गैरअर्जदार यांच्या मार्गदर्शनानुसार शेतक-यांनी बियाण्यांची लागवड करावयाची व आलेले उत्पन्न गैरअर्जदार यांनी खरेदी करावयाचे व त्यावर प्रक्रिया करुन बीज निर्मिती करावयाची. त्यानुसार अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून कापसाचे बियाण्याची खरेदी करुन शेतात लागवड केलेली असल्याचे सिध्द होते. अर्जदार यांनी बियाण्यांची लागवड केल्यानंतर पिकाची मशागत केलेली आहे. लागवड केलेल्या कापसाच्या झाडांची वाढ चांगल्याप्रकारे झाली परंतू नर झाडास फुल व पानगळ झाल्यामुळे व नर झाडास किड रोगाचा प्रार्दूभाव झाल्याने अर्जदारास पुढील प्रक्रियेचा कार्यक्रम हाती घेता आलेला नाही. अर्जदाराने गैरअर्जदार यांना सदरील बाब कळविल्यानंतर गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या शेतावर येवून पाहणी केलेली आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या फिल्ड इन्स्पेक्शन रिपोर्ट दिनांक 22/08/2013 वरुन सिध्द होते. त्यामध्ये गैरअर्जदार यांच्या प्रतिनिधीने अर्जदाराने खताचा वापर (Fertilizer) तसेच मशागत (Weeding) केलेली असल्याचे नमूद आहे. यावरुन अर्जदाराने पिकाची मशागत योग्यरित्या केलेली असल्याचे दिसते. तसेच मावा, तुडतुडे व आळयांच्या नियंत्रणासाठी (फेम व कॉर्न्फडॉर) योग्य प्रमाणात फवारणी करावी असे नमूद आहे. यावरुन अर्जदाराच्या पिकावर रोगाचा प्रार्दूभाव झालेला असल्याचे दिसून येते. यापूर्वीच म्हणजेच दिनांक 05/08/2013 रोजी अर्जदाराने कृषी अधिकारी यांना शेतातील पिकाबाबत तक्रार दिलेली होती. तरीही जिल्हा समितीने पिकाची पाहणी केलेली नसल्याने अर्जदाराने दिनांक 19/08/2013 रोजी स्मरणपत्र दिलेले आहे. त्यानुसार दिनांक 30/08/2013 रोजी जिल्हा स्तरीय समितीने पिकाची पाहणी करुन खालीलप्रमाणे अहवाल दिलेला आहे.
‘’सदर बियाण्यांत मादी 5040, बीजी II असून नर 5034 (नॉन बीटी) असल्यामुळे फुल व पानगळ मोठयाप्रमाणात झाल्यामुळे संकरीकरण कार्यक्रम घेता आला नाही. संकरीत बिज उत्पादन कार्यक्रम पूर्णतः अयशस्वी झाला आहे. नर किड रोगाला बळी पडला आहे’’.
वरील अहवालावरुन बियाण्यामधील नर झाडांना किड रोगाचा प्रार्दूभाव झालेला आहे व ही बाब गैरअर्जदार यांनीही यापूर्वीच म्हणजेच दिनांक 22/08/2013 रोजीच्या पाहणीमध्ये मान्य केलेली आहे.
जिल्हास्तरीय समितीमध्ये कृषी विकास अधिकारी जि.प. नांदेड, जेष्ठ शास्त्रज्ञ कापूस संशोधन केंद्र, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, मोहीम अधिकारी, डिव्हीजनल मॅनेजर-कृषीधन कंपनी, संयोजक पी.ई. व अर्जदार व इतर साक्षीदार उपस्थित होते. यावरुन अर्जदाराच्या पिकाची पाहणी करतांना सर्व तज्ञ व्यक्ती हजर होत्या. त्यामध्ये जेष्ठ शास्त्रज्ञ कापूस संशोधन केंद्र हे देखील समक्ष हजर होते व पाहणी करुन सर्व तज्ञ व्यक्तींनी अर्जदाराच्या पिकाचे नुकसान बियाण्यांमध्ये मादी 5040, बीजी II, असून नर 5034 (नॉन बीटी) असल्यामुळे झालेले आहे व संकरीत बिज उत्पादन कार्यक्रम पूर्णतः अयशस्वी झालेला आहे असा अहवाल दिलेला आहे. सदर पिकाची पाहणी करीत असतांना गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे प्रतिनिधी हजर होते व त्यांनी सदर अहवालावर कोणताही आक्षेप न नोंदविता सही केलेली आहे. याचाच अर्थ गैरअर्जदार यांना सदर अहवाल मान्य आहे. गैरअर्जदार यांना अर्जदाराचा संकरीत बिज उत्पादनाचा कार्यक्रम बियाणे मादी 5040, बीजी II, असून नर 5034 (नॉन बीटी) असल्याने संपूर्णपणे अयशस्वी झालेला आहे याची माहिती दिनांक 30/08/2013 रोजीच झालेली होती. तरीही गैरअर्जदार यांनी अर्जदारास नुकसान भरपाईची रक्कम दिलेली नाही. या उलट गैरअर्जदार यांनी लेखी जबाबामध्ये बिज उत्पादन करण्यामध्ये अर्जदारामुळे गैरअर्जदार यांचेच नुकसान झालेले आहे असे नमूद केलेले आहे. त्याबद्दल गैरअर्जदार यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदारास पुरविलेल्या सदोष बियाण्यामुळे अर्जदाराचा संकरीत बिज उत्पादन हा कार्यक्रम अयशस्वी झालेला असल्याचे दाखल कागदपत्रावरुन सिध्द होते. गैरअर्जदार यांना सदरील बाबींची माहिती झाल्यानंतरही गैरअर्जदार यांनी अर्जदारास नुकसान भरपाईची रक्कम दिलेली नाही व अर्जदारास तक्रार दाखल करणे भाग पाडलेले आहे. गैरअर्जदार यांच्या या कृतीमुळे अर्जदारास निश्चितच मानसिक त्रास झालेला आहे. जिल्हास्तरीय समितीने अहवालामध्ये परागीकरणामधून अर्जदारास 2 क्विंटल उत्पादन होवू शकले असते असे नमूद केलेले आहे. अर्जदाराने त्यास नेमके किती उत्पन्न आले याचा उल्लेख तक्रारीमध्ये केलेला नाही, त्यामुळे अर्जदाराची तक्रारीमधील मागणी रु.45,600/- नुकसान भरपाई मिळण्यासाची मागणी मान्य करता येत नाही. अर्जदाराने पिकाची मशागत करीत असतांना योग्यती खते व फवारणी केलेली असल्याने अर्जदाराचा मशागतीसाठी खर्च झालेला आहे. त्यामुळे मंच अर्जदारास झालेला खर्च व पिकाच्या नुकसानी पोटी एकूण नुकसान भरपाई देत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या अर्जदारास एकूण नुकसान भरपाईची रक्कम रु. 25,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावे.
3. गैरअर्जदार 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या अर्जदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,500/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 2,500/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावे.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा. प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.
(श्री आर. एच. बिलोलीकर ) (सौ. स्मिता बी.कुलकर्णी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, नांदेड