जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –39/2011 तक्रार दाखल तारीख –25/02/2011
वैशाली भ्र.जितेंद्र देशपांडे
वय 32 वर्षे,धंदा व्यापार व घरकाम ..तक्रारदार
रा.सारडा नगरी, बीड
विरुध्द
बालाजी एन्टरप्रायजेस,
प्रो.प्रा.श्री.एस.एस.व्हटकर
रा.78/क,गोकुळनगर, जुने सोलापुर,
डी मार्ट जवळ, बालाजी मंगल कार्यालयासमोर,
सोलापूर ता.जि.सोलापूर ...सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे - अँड.डी.जी.भगत
सामनेवाले तर्फे - स्वतः
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,तक्रारदारांनी सामनेवाला यांचे दूकानातून दि.27.02.2010 रोजी दोन एचपी ची बालाजी आटा चक्की रक्कम रु.17,500/- रोख देऊन विकत घेतली. त्या बाबत सामनेवाला यांनी तक्रारदारांना रु.26,000/- दिलेले आहे. सदरच्या आटा चक्कीची सामनेवाला यांनी एक वर्षाची गॅरंटी दिलेली आहे.
आटा चक्कीची मोटार सप्टेंबर 2010 मध्ये खराब झाली त्यावेळी तक्रारदाराचे पती सामनेवाला कडे सदर मोटार घेऊन आले असते. सामनेवाला यांनी ती दूरुस्त करुन दिली नाही. मोटार खराब झाली नाही. त्यांनी त्यांचेकडे दि.19.12.2010 रोजी पर्यत ठेऊन घेतली. त्यानंतर सामनेवाला यांनी त्यांचा मूलगा सागर व्हटकर यांस दि.19.12.2010 रोजी मोटार घेऊन फिटींग करण्यासाठी पाठविले तो त्यातील तज्ञ नसल्यामुळे त्यासाठी फिटींग करुन चालू करुन देता आली नाही. सदर मोटार दूरुस्त करुन देण्याबाबत माहिती देऊनही सामनेवाले यांनी मोटार अद्यापपर्यत दुरुस्त करुन दिलेली नाही. तक्रारदारांनी सदर मशीन हे व्यवसाय करण्याकरिता व उपजिविकेकरिता घेतलेली होती. सदरची मोटार नादुरुस्त झाल्याने तक्रारदारांना नियमीतपणे व्यवसाय करता आला नाही. सामनेवाला यांनी हमीप्रमाणे सेवा दिलेली नाही.
तक्रारदार हे ज्याठिकाणी राहत त्याठिकाणी 200 पेक्षा जास्त घरे आहेत. तक्रारदाराच्या चक्कीशिवाय त्याठिकाणी दुसरी चक्की नाही. सदर मशीन घेतली त्यावेळी रु.200/- ते 250/- रोज मिळत होता. तो आज पूर्णपणे बंद झाला आहे. तक्रारदाराने घरातील मिटरवर स्वतंत्र डी.पी.त्यासाठी तयार केलेली होती. त्यामुळे तक्रारदाराची कधीही न भरुन येणारे नूकसान झालेले आहे. नूकसान खालील प्रमाणे
1. आटा चक्की किंमत रु.17,500/-
2. झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबददल रु.10,000/-
3. मशीन दूरुस्ती करण्याकरिता सामनेवालास केंलेला
फोनचा खर्च रु.500/-
4. नोटीसचा खर्च रु.1500/-
5. प्रस्तुत तक्रारीचा खर्च रु.3000/-
एकूण खर्च रु.32,500/-
दि.29.10.2010 रोजी नोटीस पाठवून वरीलप्रमाणे नूकसान भरपाईची मागणी केली होती. नोटीस मिळाल्यानंतर दि.18.01.2011 रोजी सदर नोटीसला चूकीचे उत्तर पाठविले होते.
विनंती की, तक्रारदारांना नूकसान भरपाई रक्कम रु.32,500/-देण्या बाबत सामनेवाला यांना आदेश व्हावा. सदर रक्कम 18टक्के व्याज तक्रार दाखल दिनांकापासून देण्यात यावा.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी निवेदन दि.11.2.2011 रोजी दाखल केले.सामनेवाला यांनी तक्रारीतील सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. तक्रारदारांना सामनेवाला यांनी जी आटा चक्की दिली आहे ती घरगुती वापरासाठी दिलेली आहे. त्यावर अधिकृत दळण्याचे बाहेरील गि-हाईल करता येत नाही. तक्रारदारांनी शॉप अँक्टचा परवाना न काढता बेकायदेशीररित्या अटाचक्कीचा वापर करुन बाहेरील गि-हाईक केले आहे. तक्रारदार यांची पैसे कमविण्याची आशा वाढल्याने घरगूती कनेक्शनवर चालणा-या आटाचक्कीला स्वंतत्र डि.पी.कनेक्शन जोडून मशिनच्या क्षमतेपेक्षा जास्तीचे इलेक्ट्रीक लोड टाकून मोटार जाळली आहे.त्यांस तक्रारदार स्वतः जबाबदार आहे.
सामनेवाला यांचा मुलगा दि.19.12.2010 रोजी इलेक्ट्रीक मोटार घेऊन केले असताना तक्रारदार यांचे पती जितेंद्र देशपांडे व त्यांचे लाईट मॅकेनिक असे 5-6 लोक मिळून त्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन कोर्टात जाण्याची भाषा वापरुन धमकी दिलेली आहे. हा सर्व प्रकार तक्रारदारांनी सामनेवाला यांचे मोटारीचा खर्च न देण्याच्या हेतूने स्वार्थापोटी केलेली आहे. तक्रारदारांनी मोटाराची रक्कम रु.12,000/- दिले नाही उलट सामनेवाला यांचे मूलास शिवीगाळ करुन कोर्टात केस दाखल करण्या बाबत धमकावलेले आहे म्हणून सामनेवाला यांचे मुलाने मोटार फिट केलेली नाही तसाच तो परत आलेला आहे. सदरील मोटार ही दगडी नसुन ग्राईडर मशीन आहे त्यावर बाहेरील व्यवसाय करता येत नाही. विनंती की, खर्चासह फेटाळण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र,सामनेवाला यांचा खुलासा,शपथपत्र, त्यांचे कागदपत्रे, तक्रारदारांचा लेखी युक्तीवाद, सामनेवाला यांचा लेखी युक्तीवाद यांचे सखोल वाचन केले.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी सामनेवाला कडून आटाचक्की विकत घेतली आहे.त्या बाबतचचे बिल नंबर 26 सामनेवाला यांनी तक्रारदारांना दिलेले आहे. सदर मोटारची गॅरंटीएक वर्षाची सदर बिलातच नमुद केलेली आहे.
तक्रारदारांनी सदरची चक्की ही घरगुती वापरासाठी न वापरता त्यावर गिरणीचा पुरवठा सुरु केल्याचे तक्रारदाराच्या तक्राररीवरुनच स्पष्ट होते. सदर आटाचक्कीपासुन तक्रारदारांना रु.200/- ते रु.250/- रोज मिळत होता असे तक्रारदारांने नमूद केलेले आहे.
या संदर्भात सदरची चक्की ही फक्त घरगुती वापरासाठी आहे असे सामनेवाला यांनी त्यांचे जाहीरातीत कूठेही नमुद केलेले नाही असे तक्रारदाराचे म्हणणे आहे परंतु तक्रारदाराने दाखल केलेले जाहीर पत्रक पाहता त्यात फक्त अर्धा तास दळण क्षमता असे स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे व त्या अर्धा तासात कूठलेही धान्य किंवा डाळी किती किलोचे दळण करु शकतात या बाबत तक्ता या जाहीरातीत नमूद आहे. सदर फरकात बाहेरचेच दळण न करण्या बाबतचा कोणताही उल्लेख नसला तरी जाहीर पत्रकावरुन स्पष्ट होते की, सदरची चक्की ही फक्त घरगुती वापरासाठीच आहे.
जर जाहीर नमुद केल्याप्रमाणे तिचा वापर योग्य रितीने होत नसेल तर सदरचे यंत्रनादुरुस्त होणारच त्याप्रमाणे तक्रारदाराची चक्की नादुरुस्त झालेली आहे.
या संदर्भात सामनेवाला यांनी मोटार बदलून देण्यासाठी त्यांचा मुलगा पाठविला असताना त्यांना मोटार बसवता आली नाही असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. या संदर्भात सामनेवाले यांचे मुलास अर्वाच्च शिवीगाळ केली व कोर्टात जाण्याची धमकी दिली त्यामुळे तो मुलगा मोटार न बसवता परत आलेला आहे. या संदर्भात सामनेवाला यांचे मुलाने बीड पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्याचे खुलाशात नमुद आहे परंतु या संदर्भात मुलाचे शपथपत्र व पोलिस स्टेशनची फिर्याद खुलाशासोबत दाखल केलेली नाही. तसेच मोटार बसविलेली नसल्याने त्यांची रक्कम तक्रारदारांना देण्याची गरज नाही.सर्वात महत्वाचे सदर आटाचक्कीतील मोटारीची गॅरंटी एक वर्षाची आहे. तक्रारदारांनी सदरची आटाचक्की दि.27.02.2010 रोजी विकत घेतली आहे. सदरची मोटार सप्टेंबर 2010 मध्ये खराब झालेली आहे व ती गॅरंटचीच्या कालावधीत खराब झालेली असल्याने सामनेवाला यांनी सदरची मोटार तक्रारदारांना गॅरंटी कालावधीत असल्याने बदलून देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी तक्रारदाराकडे सदर मोटारीचे किंमत रु.12,000/- घेतली व त्यावरुनच दोन्हीमध्ये वाद निर्माण झाल्याचे दोन्हीच्या विधानावरुन दिसून येते.
सामनेवाला यांनी मोटारीची एक वर्षाची गॅरंटी दिलेली आहे तर सामनेवाला यांची सदरच्या गॅरंटीच्या कालावधीत मोटार बदलून देण्याची त्यांची जबाबदारी आहे परंतु तसे न केल्याने निश्चितच तक्रारदारांना आटाचक्की विकत घेऊन उपयोग झालेला नाही. आटाचक्की ही बंद स्वरुपात आहे त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांना गॅरंटी कालावधीतील मोटार ही कोणताही मोबदला न घेता बदलून देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे. तसेच गॅरंटी कालावधीत मोटार न बदलून दिल्याने तक्रारदारास मानसिक त्रासाबददल रु.1,000/- व खर्चाचे रु.1,000/-सामनेवाला यांनी तक्रारदारांना देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार अंशतःमंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना आटाचक्कीची मोटार कोणताही मोबदला न घेता आदेश दिनांकापासून 30 दिवसांचे आंत बदलून दयावी.
3. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मानसिक त्रासाबददल रु.1,000/- व खर्चाबददल रु.1,000/- आदेश प्राप्ती पासून 30 दिवसांचे आंत अदा करावेत.
4. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड