(द्वारा मा. सदस्य – श्री. ना.द.कदम )
1. सामनेवाले ही इमारत बांधकाम व्यवसायिक भागिदारी संस्था तसेच त्यांचे भागिदार आहेत. सामनेवाले यांनी प्रस्तावित केलेल्या चाळ बांधकामामधील खोलीच्या खरेदी विक्री व्यवहारातून प्रस्तुत वाद निर्माण झाला आहे.
2. तक्रारदाराच्या तक्रारीमधील कथनानुसार सामनेवाले यांनी कल्याण (पुर्व) येथील पिसवली मध्ये विकसित केलेल्या फेज II मधील चाळीच्या बांधकामामधील 350 चौ.फुट क्षेत्रफळाची 1 खोली रु. 3.25 लाख या किमतीस विकत घेण्याचा व्यवहार सामनेवाले यांचेशी केला. त्यानुसार दि. 19/09/2012 रोजी रु. 11,000/- बुकिंग रक्कम दिली व त्यानंतर दि. 04/11/2012 रोजी रु. 1,00,000/-, अशी एकुण रक्कम रु. 1.11 लाख सामनेवाले यांना दिली. सामनेवाले यांनी खोली विक्रीचा करारनामा दि. 25/02/2013 रोजी केला व त्यानुसार मार्च 2013 पर्यंत खोलीचा ताबा देण्याचे मान्य केले. यानंतर, खोलीची उर्वरित किंमत देवुन ताबा घेण्यासाठी, सामनेवाले यांचेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता सामनेवाले हे साईट वरील कार्यालय बंद करुन फरार झाल्याचे दिसुन आले. तक्रारदारांनी सामनेवाले यांना अनेकवेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता सामनेवाले हे आढळुन आले नाहीत. त्यामुळे त्यांना नोटिस दिली असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करुन रु. 1.11 लाख व व्याज रक्कम रु. 35,000/- सह परत मिळावी तक्रार खर्च मिळावा अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
3. सामनेवाले यांना पाठविण्यात आलेली तक्रारीची नोटिस ‘लेफ्ट’ या शे-यासह परत आल्याने, सामनेवाले यांना दि. 02/09/2016 रोजीच्या ‘नवशक्ती’ या दैनिकामध्ये जाहीर नोटिस देवुन दि. 01/10/2016 रोजी मंचामध्ये हजर राहण्याचे सुचीत केले होते. त्यानंतर दि. 15/10/2016 पर्यंत कैफियत दाखल करण्याची संधी देण्यात आली. तथापी ते गैरहजर राहिल्याने, तक्रार त्यांचे विरुध्द एकतर्फा चालविण्यात आली.
4. तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेली कागपत्रे व शपथपत्र यांचे वाचन मंचाने केले. त्यावरुन प्रकरणात खालील प्रमाणे निष्कर्ष निघतात.
अ) सामनेवाले यांनी, मौजे नेवाळी, ता. अंबरनाथ मधील ग्रामपंचायत नेवाळी विभागातील सर्वे नं. 113 हिस्सा नं. 5, या भुखंडावर प्रस्तावित केलेल्या चाळ बांधकामामधील 350 चौ.फु श्रेत्रफळाची खोली रु. 3.25 लाख या किंमतीस विकत घेण्याचा व्यवहार सामनेवाले 1 यांच्याशी करुन रु. 11,000/- दि. 19/09/2012 व रू. 1 लाख दि. 04/11/2012 रोजी सामनेवाले यांना दिल्याबाबतच्या पावत्या तक्रारदारांनी दाखल केल्या आहेत. त्यानुसार उभय पक्षामध्ये दि. 25/02/2013 रोजी सदनिका विक्री करारनामा करण्यात आला. या करारनाम्यानुसार खोलीची उर्वरित रक्कम तक्रारदारांनी सामनेवाले यांना देण्यापेक्षा मार्च 2013 मध्ये खोलीचा ताबा सामनेवाले यांनी तक्रारदारांना देण्याचे मान्य केल्याचे दिसुन येते.
ब) यानंतर तक्रारदारांनी बांधकामाची सद्यस्थिती पाहण्याच्या हेतुने प्रत्यक्ष जागेवर अनेकवेळा भेट दिली असता सामनेवाले हे कार्यालय बंद करुन फरार झाल्याचे तक्रारदारांना ज्ञात झाले. यानंतर सामनेवाले यांचे विरुध्द पोलीसामध्ये तक्रार केल्याचे दिसुन येते. तथापी सामनेवाले यांनी, खोलीचे बांधकाम करण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे तक्रारदारांनी शपथेवर नमुद केले आहे.
क) सामनेवाले यांनी तक्रारदाराकडुन खोली विक्रीसाठी रु. 1.11 लाख स्विकारुन, खोली विक्री करारनामा करुन त्यानंतर खोलीचे बांधकाम करण्यासाठी पर्यायाने खोलीचा ताबा तक्रारदारांना देण्यासाठी कोणतीही कृती केल्याचे दिसुन येत नाही. सबब सामनेवाले यांनी खोली विक्रीसाठी तक्रारदाराकडुन बरीच रक्कम स्वीकारुन त्या मोबद्दल्यात खोलीचा ताबा तक्रारदारांना देण्यासाठी कोणतीही कार्यवाही न करुन त्रृटीची सेवा दिल्याचे स्पष्ट होते. त्यावरुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येतात.
आदेश
1) तक्रार क्रमांक 560/2014 अंशतः मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाले यांनी तक्रारदाराकडुन स्वीकारलेली रक्कम रु. 1,11,000/- (अक्षरी एक लाख अकरा हजार फक्त) दि. 01/12/2012 पासून 12% व्याजासह दि. 30/04/2017 पूर्वी तक्रारदारांना परत करावी. आदेश पुर्ती नमुद कालावधीमध्ये न केल्यास दि. 01/12/2012 पासून ते आदेश पुर्ती पर्यंत 15% व्याजासह संपुर्ण रक्कम तक्रारदारांना परत करावी.
3) तक्रार खर्चासाठी रु. 10,000/- (अक्षरी रु. दहा हजार फक्त) सामनेवाले यांना दि. 30/04/2017 पुर्वी तक्रारदारांना द्यावेत.
4) आदेश पुर्तीसाठी सामनेवाले 1 भागिदारी संस्था व अन्य सामनेवाले हे वैयक्तिक व संयुक्तिकपणे जबाबदार असतील.
5) आदेशाच्या प्रति उभय पक्षांना विनाशुल विनाविलंब पाठविण्यात याव्यात.
6) संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.