निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 25/07/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 26/07/2012
तक्रार निकाल दिनांकः- 10/10/2013
कालावधी 01वर्ष. 02 महिने.14दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM,LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
प्रभाकर पिता रावसाहेब लंगोटे. अर्जदार
वय 45 वर्षे. धंदा.शेती. अॅड.एम.आर.ढोबळे.
रा.दुसलगांव ता.गंगाखेड.जि.परभणी.
विरुध्द
1 मे.बालाजी कृषी केंद्र,नवा मोंढा, गैरअर्जदार.
गंगाखेड.ता.गंगाखेड.जि. परभणी. अॅड.एन.व्ही.मनियार.
2 मे.निर्मल सिड्स प्रा.लि.जळगांव. अॅड.एस.एच.बंग.
ता.जि.जळगांव.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर.सदस्य.)
गैरअर्जदाराने अर्जदारास सदोष सोयाबीन बीची विक्री करुन त्रुटीची सेवा दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा दुसलगांव ता.गंगाखेड जि.परभणी येथील रहीवासी असून गट क्रमांक 30 मध्ये त्यास 1 एकर जमीन आहे. सदर जमिनी मध्ये अर्जदाराने वर्ष 2011 मध्ये खरीप हंगामासाठी त्याच्या शेतामध्ये जमिनीची मशागत करुन पेरणीसाठी तयार करुन ठेवली व अर्जदाराने सोयाबीन पेरण्याचे ठरवले त्या प्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे जावून गैरअर्जदार क्रमांक 2 या कंपनीची उत्पादीत निर्मल 21 जातीचे बियाणे विकत घेण्याचे ठरवले. व दिनांक 23/06/2011 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडून सोयाबीनचे 30 किलोची एक बॅग ज्याचा लॉट क्रमांक 90345, रुपये 1400/- ला पावती क्रमांक 1 अन्वये 2652 खरेदी केल्यानंतर अर्जदाराने दिनांक 06/07/2011 रोजी शास्त्रोक्त पध्दतीने व नियमा प्रमाणे पेरणी केली, परंतु सदरचे बियाणे उगवले नसल्यामुळे व सदरचे सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे गैरअर्जदार क्रमांक 1 यांना सांगीतले त्यावेळेस गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी उडवा उडवीचे उत्तरे देवुन अर्जदारास हाकलून लावले. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, पेरणी झाल्यानंतर 7 दिवसानंतर सुध्दा त्याने सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड यांना 13/07/2011 रोजी लेखी तक्रार दिली त्यानुसार गटविकास अधिकारी गंगाखेड यांनी अर्जदाराच्या शेतावर 14 /07/2011 रोजी भेट दिली व साक्षीदारा समक्ष तपासणी केली व त्या दिवशी उपस्थित साक्षीदारा समंक्ष रितसर अहवाल दिला, त्या अहवाला मध्ये पिकाचे उगवण टक्केवारी केवळ 0.5 टक्के आहे. असा अभिप्राय मध्ये प्रथम दर्शनी बियाणे सदोष असल्याचे दिसून येते असे स्पष्ट नमुद केले. गैरअर्जदार क्रमांक 1 याने अर्जदारास सदोष बियाणे पुरवून त्यास अत्यंत चुकीची व निष्काळजीपणाची सेवा पुरवून त्याची फसवणुक करुन अर्जदाराचे 30,000/- रुपयाचे झालेल्या नुकसानीस गैरअर्जदार जबाबदार आहेत. त्यानंतर अर्जदाराने पोलीस स्टेशन गंगाखेड येथे रितसर फौजदारी दाखल केली अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदारास सदर बियाणे पेरणी करते वेळी त्याने मशागतीसाठी 3,000/- रुपये खर्च केला, निर्मल 21 जातीचे 1 बॅगचे 1400/- रुपयेला खरेदी केली व डी.ए.पी. खताच्या 2 बॅगा 1800/- रुपये व पेरणीचा खर्च 3,000/- रुपये असे एकूण 9,200/- रुपये खर्च झाला.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदर बियाणे खरेदी करते वेळी गैरअर्जदार क्रमांक 1 ने भरघोस उत्पादनाची हमी गैरअर्जदार क्रमांक 1 ने दिली होती, परंतु गैरअर्जदाराने पुरवीलेल्या सदोष बियाण्यांमुळे अर्जदाराचे नुकसान झाले त्यामुळे सदरची तक्रार दाखल करण्यास भाड पडले. व मंचास विनंती केली आहे की, सदरचा अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारास असा आदेश व्हावा की, गैरअर्जदाराने अर्जदारास 30,000/- रुपये 13/07/2011 पासून 12 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम मिळे पर्यंत गैरअर्जदाराने संयुक्तिक व वैयक्तिकरित्या अर्जदारास द्यावे.व गैरअर्जदाराने नुकसान भरपाई म्हणून 20,000/- रुपये व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा अशी मंचास विनंती केली आहे.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. अर्जदाराने नि.क्रमांक 4 वर 8 कागदपत्रांच्या यादीसह 8 कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या ज्यामध्ये 7/12 उतारा, बालाजी कृषी केंद्र यांचे दिनांक 23/06/2011 ची पावती, बियाणे तक्रार अनुषंगाने प्रक्षेत्र भेट अहवाल, अर्जदाराने गटविकास अधिकारी गंगाखेड यांना दिलेला अर्ज, अर्जदाराने जिल्हा कृषी अधिक्षक परभणी यांना लिहिलेला अर्ज, अर्जदाराने तालुका कृषी अधिकारी गंगाखेड यांना लिहिलेला अर्ज, फसवणुकीचे फिर्याद अर्ज, एफ.आय.आर.ची कॉपी इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
मंचातर्फे गैरअर्जदारांना आपला लेखी जबाब दाखल करण्यासाठी नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार क्रमांक 1 वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 16 वर आपला लेखी जबाब सादर केला व त्यात त्याचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व सदरची तक्रार सी.पी. अॅक्ट 1986 अंतर्गत विद्यमान मंचास चालवण्याचा अधिकार नाही. कारण अर्जदाराने गैरअर्जदारां विरुध्द भा.द.वि. 420, 418 अन्वये गंगाखेड येथे फौजदारी दाखल केलेली आहे. व ती सध्या प्रलंबीत आहे. म्हणून सदरची तक्रार मंचासमोर चालवणे योग्य नाही. गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 हे बियाणे विक्रेता असून गैरअर्जदार क्रमांक 2 हे बियाणे उत्पादन कंपनी आहे व तसेच अर्जदाराने त्याचे शेतात पेरलेले सोयाबीनचे बी गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी उत्पादित केलेले होते व तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 चे असे म्हणणे आहे की,अर्जदाराने दिनाक 23/06/2011 रोजी लॉट क्रमांक 90345 असलेले सोयाबीन निर्मन 21 जातीचे बियाणे खरेदी केले होते, परंतु खरेदी केलेलेच बियाणे अर्जदाराने त्याच्या शेतात पेरले याचा पुरावा नाही व तसेच अर्जदार यांन दिनांक 06/07/2011 रोजी त्याच्या शेतात गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी उत्पादित केलेले सोयाबीन निर्मल 21 या जातीचे बियाणे शिफारस केल्यानुसार व शास्त्रोक्त पध्दीतने पेरले या बद्दल अर्जदाराने कोठलाही पुरावा मंचासमोर आणला नाही तसेच पेरणीस समाधान कारक पाऊस झाला हे ही म्हणणे गैरअर्जदारास मान्य नाही.
व तसेच अर्जदाराने पेरलेले बियाण्यांची नोंद 7/12 उता-यावर नाही व तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराच्या जमिनी मध्ये ओल नसलेल्या जमिनीत अर्जदाराने सदर बियाणे पेरले, त्यामुळे योग्य त्या पावसाचा अभाव व पाण्याची कमतरता व जमिनीत असलेल्या टणक आवरण इत्यादी सर्व बाबी बियाण्यांचे कमी उगवण शक्तीस कारणीभुत ठरल्या व तसेच त्यापूर्वी वापरलेल्या खतांची मात्रा हे सुध्दा एक कारण बियाण्यांच्या उगवणी शक्तीवर होवु शकते. तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे असे म्हणणे आहे की, बियाणे निरीक्षक गंगाखेड यांनी तयार केलेला कथीत अहवाल हा शासनाने दिलेल्या दिशा निर्देशानुसार नाही. व सदरचा अहवाल हा जिल्हा स्तरिय समितीचा नसल्याने कायद्याने तो वैध नाही व अशा प्रकारचा अहवाल पुरावा म्हणून ग्राहय धरता येणार नाही. सदर संबंधीत कृषी अधिकारी यांनी त्यांचा अहवाल तयार करण्या आधी ज्या काही आवश्यक बाबींचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक होते ते केलेले आढळलेले नाही अशी कथीत पाहणी प्रतिवादीला कळविता व न करता त्याच्या अपरोक्ष झालेली असल्यास ती प्रतिवादीवर बंधन कारक नाही. व सदरचा अहवाल हा नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरुध्द आहे.तसेच संबंधी अधिका-याने कोठल्याही प्रकारची तंत्रशुध्द व शास्त्रोक्त पाहणी न करता मोघम स्वरुपाचा अहवाल तयार केला आहे व त्यात नमुद निष्कर्ष व बियाणेत दोष आहे अशा प्रकारचा अहवाल देणे हा फक्त अर्जदाराचा फायदा करणे अथवा त्याचे दबावात येवून अशा प्रकारचा अहवाल देणे हीच मानसिकता संबंधित अधिका-याची होती असे दिसून येते व त्यामुळे सदरच्या अहवालास कोठल्याही प्रकारे आधार नाही.
गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदारास कोठल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही व अर्जदाराने गैरअर्जदाराला मागणी केलेली 30,000/- रुपयाची नुकसान भरपाई देण्यास पात्र नाही. अर्जदाराने कोठलाही ठोस पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने पेरणी पूर्वी मशागत व खत व बियाणे खरेदीसाठी व पेरणी खत असे एकूण 9200/- रुपये एवढे खर्च केले या बद्दल अर्जदाराने कोठलाही ठोस पुरावा मंचासमोर आणला नाही व तसेच अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, 15 क्वींटल उत्पादन होते व त्यामधून अर्जदारास 30,000/- किंमत मिळाली असती हे सर्व काल्पनिक असून त्या बद्दल कोठलाही ठोस पुरावा अर्जदाराने मंचासमोर आणला नाही तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 चे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने त्याच्या शेतातील सदोष बियाणांची पाहणी करते वेळी शासकीय नियमांचे पालन केलेले नाही व तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांस कसल्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही म्हणून सदरची तक्रार खोटी व बनावटी असल्याने गैरअर्जदार क्रमांक 1 ने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार 5,000/- खर्चासह फेटाळण्यात यावी.
नि.क्रमांक 17 व 18 वर गैरअर्जदार क्रमांक 1 ने आपला शपथपत्र दाखल केलेला आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 9 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्याचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व ती खारीज होणे योग्य आहे व तसेच त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरच्या अर्जदाराने 420 कलमा अंतर्गत त्यांच्या विरुध्द गंगाखेड येथील पोलीस स्टेशन मध्ये फौजदारी केलेली आहे. त्यामुळे सदरची तक्रार मंचामध्ये चालू शकत नाही व त्यांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी उत्पादित केलेले बियाणे निर्मल 21 या सोयाबीन जातीचे बियाणे हे उच्च प्रतीचेच होते व सर्व लॅबोरेटरी टेस्ट करुन व सर्टिफाईड करुनच त्याला बाजारात विक्रीसाठी आणते. अर्जदाराने दाखल कलेली सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे. तसेच अर्जदाराने सदरचे बी खरेदी केल्यानंतर योग्य ती काळजी न घेतल्यामुळे सदर बियाण्यांची उगवण झालेली नाही व तसेच अर्जदाराने दाखल केलेल्या प्रक्षेत्र पाहणी अहवाल हा योग्य नाही. कारण शासनाच्या परिपत्रका प्रमाणे या कामासाठी शासनाने गठीत केलेल्या कमेटीनेच सदरचा पाहणी पंचनामा करुन अहवाल सादर करावा लागतो, परंतु सदरच्या तक्रारी मध्ये अर्जदाराने पाहणी करते वेळी त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिलेली नव्हती. व तसेच सिड्स इन्सपेक्टर यांनी एकट्यानेच फक्त पाहणी केलेली आहे. त्यामुळे शासनाच्या परिपत्रका प्रमाणे गठीत केलेली संपूर्ण बॉडी त्यावेळेस उपस्थित नव्हती व शासनाच्या परिपत्रका प्रमाणे अर्जदाराने कोणत्याही नियमांचे पालन केलेले नाही. म्हणून अर्जदाराने दाखल केलेला पुराव्या बद्दल प्रक्षेत्र पाहणी अहवाल हा ग्राहय धरता येणार नाही. अर्जदाराने मंचासमोर निर्मल 21 हे बियाणे सदोष होते या बद्दल कोणताही ठोस पुरावा मंचासमोर आणला नाही. म्हणून सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी. अशी विनंती केली आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 1 ने गैरअर्जदार क्रमांक 2 ने
उत्पादित केलेले सदोष सोयाबीन बियाणेची अर्जदारास
विक्री करुन अर्जदारास झालेल्या नुकसानीस जबाबदार आहेत काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदारास मौजे दुसलगांव येथे गट क्रमांक 30 मध्ये शेत जमीन आहे ही बाब नि.क्रमांक 4/1 वरील दाखल केलेल्या 7/12 वरुन सिध्द होते. तसेच अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडून दिनांक 23/06/2011 रोजी निर्मल 21 या जातीचे सोयाबीन बी रु. 1400/- देवुन खरेदी केले होते ही बाब नि.क्रमांक 4/2 वरील कागदपत्रांवरुन सिध्द होते अर्जदाराने सदरचे बी पेरल्यानंतर उगवले नसल्या बद्दल गट विकास अधिकारी गंगाखेड, जिल्हा कृषी अधिकक्षक परभणी, तालुका कृषी अधिकारी गंगाखेड यांना तक्रार अर्ज दिला होता ही बाब नि.क्रमांक 4/4, 4/5 व 4/6 वरील कागदपत्रांवरुन सिध्द होते तसेच तक्रारीच्या अनुषंगाने सिड्स इन्सपेक्टर गंगाखेड यांने अर्जदाराच्या शेतात जावून 14/07/2011 रोजी पाहणी केली व बियाणे तक्रार अनुषंगाने प्रक्षेत्र भेट अहवाल दिला ही बाब नि. क्रमांक 4/3 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते, तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 ने सदोष बियाणांची अर्जदारास विक्री करुन फसवणुक केली या बद्दलची तक्रार अर्जदाराने गंगाखेड पोलीस स्टेशन येथे दिली होती ही बाब नि.क्रमांक 4/9 वरील एफ.आय.आर. कॉपी वरुन सिध्द होते. परंतु शासनाच्या परिपत्रका प्रमाणे बियाणेत उगवण शक्ती कमी असणे किंवा पिक पेरणी नंतर भेसळ निघाल्याचे चौकशी करण्या बाबत महाराष्ट्र राज्याने एक परिपत्रत काढले होते, ज्या परिपत्रका प्रमाणे शासनाने 7 लोकांची कमेटी गठीत केली होती व या कमेटीस पेरलेल्या बियाणांची उगवणशक्ती कमी झालेल्याची पाहणी करुन अहवाल देणे बंधनकारक आहे व सदरच्या कमेटीवर जबाबदारी सोपविलेली आहे. सदरच्या प्रकरणामध्ये कागदपत्रे पाहिले असता अर्जदाराने दाखल केलेला प्रक्षेत्र पाहणी अहवाल हा शासकीय परिपत्रका प्रमाणे नाही. म्हणून अर्जदाराने दाखल केलेला सदरचा पुरावा ग्राहय धरता येणार नाही.
गैरअर्जदाराने अर्जदारास विक्री केलेले सदरचे बियाणे निकृष्ट होते हे सिध्द करण्यात अर्जदार असमर्थ ठरला आहे. तसेच अर्जदाराने दाखल केलेल्या महाराष्ट्र राज्य आयोगाचे केस लॉ First Appeal No.1438 of 2001, 2009 (1) CPR 92 Rashi Seeds Pvt. Ltd and Anr. V/s Sau. Kalabai Digambar Badgujar याचे अवलोकन केले असता असे दिसते की, सदरील तक्रारी मध्ये देखील पाहणी पंचनामा शासन नियुक्त जिल्हा परिषदाचे सिड्स कमेटीनेच केली होती.व या तक्रारी मध्ये अर्जदाराने दाखल केलेला पहाणी अहवाल हा शासकीय परिपत्रका प्रमाणे गठीत समितीने पंचनामा केलेला नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.अध्यक्ष.