जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २८०/२०१०
तक्रार दाखल दिनांक – २८/०९/२०१०
तक्रार निकाल दिनांक – १९/०८/२०१३
श्री.शिरीष सिताराम पाटील,
उ.व. ४५ वर्षे, धंदाः- नोकरी
राहणार ५५, विश्वेश्वर हौसिंग
सोसा. जि.धुळे. ................ तक्रारदार
विरुध्द
१ बजाज फायनान्स लिमीटेड
रॉयल ऑटो, बजाज शोरूम
हॉटेल साहेब जवळ, मालेगाव रोड, धुळे. ................. सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.के.आर. लोहार)
(सामनेवाला तर्फे – अॅड.एस.वाय.शिंपी)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
सामनेवाला यांनी तक्रारदार यास संपूर्ण रक्कम भरूनही वाहनाचे कागदपत्रे व निल दाखला न देवून सेवेत कमतरता केलेने तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदारने सामनेवाला जे वित्तपुरवठा करण्याचा व्यवसाय करतात, यांचेकडुन दि.२९/१२/२००६ रोजी दुचाकी वाहन (बजाब प्लॅटीना) खरेदी करणेसाठी खाते नं.४४५०३६३१८ नुसार रक्कम रूपये ३१,२००/- चे कर्ज घेतलेले आहे. त्यासाठी दरमहा रक्कम रू.१३०० प्रमाणे एकूण २४ हप्ते परतफेड भरणा करायचे होते.
सदर कर्जाचा भरणा तक्रारदारचे पगारातून कपातीने होणार असल्याने तक्रारदारच्या सांगली बॅंकेच्या खाते नं.२६० मधून दि.०७/०२/०७ पासून दि.०७/०३/०८ पर्यंत एकूण १४ हप्त्यांचा भरणा झालेला होता.
२. दरम्यान सांगली बॅंक डबघाईस गेली. सदर बॅंक ही आ.सी.आय.सी.आय बॅंकेत विलीन झाली. यासर्व बॅंकेच्या तांत्रीक अडचणींमुळे पगाराचे व्यवहार सुरळीत होण्यास विलंब झाला. याबाबत संपूर्ण माहिती तक्रारदारने सामनेवाला यांना दिलेली आहे. तक्रारदार यांचा सामनेवाला यांचे रिकव्हरी एजन्सीचे अभिकर्ता यांचेशी संपर्क झाल्याबरोबर तक्रारदारने रितसर हप्त्यांची रक्कम रोख स्वरूपात अदा केलेली आहे. असे असूनही सामनेवाला यांनी दि.३०/०४/२०१० रोजी तडजोडीने प्रकरण मिटविणेबाबत पत्र पाठवून हप्त्यांपोटी रक्कम रू.२,६००/- तसेच पेनल्टीपोटी रक्कम रू.८,३५०/- अशी एकूण रक्कम रू.१०,९५०/- तक्रारदारकडे घेणे असल्याचे नमूद केले.
३. तक्रारदारने याबाबत सामनेवाला यांचेकडे प्रत्यक्ष जावून कर्ज रक्कम भरणा केल्याबाबतच्या सांगली बॅंकेचे खाते उतारे तसेच रोखीच्या पावत्या निदर्शनास आणून दिल्या व संबंधीत गाडीचे कागदपत्रे व निल दाखला देण्याची विनंती केली. परंतु सामनेवाला यांनी रक्कम रू.१०,९५०/- ची मागणी केली. त्यावर तक्रारदारने खाते उतारा मागितला असता सामनेवाला यांनी नकार दिला.
४. त्यामुळे तक्रारदारने सामनेवाला यांनी मागणी केलेली रक्कम रू.१०,९५०/- व त्यावरील व्याज रदृ होवून मिळावे, गाडीचे कागदपत्रे व निल दाखला मिळावा. तसेच मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रू.१५,०००/- मिळावे, अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.
५. तक्रारदारने आपल्या म्हणण्याच्या पृष्टयार्थ नि.५ सोबत नि.५/१ वर गहाण खत, नि.५/२ वर डिलेव्हरी सर्टिफिकिट, नि.५/३ वर पेमेंट एस्टीमेट, नि.५/४ वर खाते उतारा, नि.५/५ ते नि.५/९ वर हप्ता भरल्याच्या पावत्या, नि.५/१० वर सामनेवाला यांचे पत्र, नि.१५ वर बचत खात्याची झेरॉक्स प्रत, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
६. सामनेवाला यांनी आपला खुलासा नि.११ वर दाखल केला असून त्यात त्यांनी तक्रारीतील मागणी खोटी, लबाडीची व परिस्थिती विपर्यास करणारी असल्याने मान्य व कबूल नाही. तक्रारदारने सामनेवाला यांचेकडून कर्ज घेवून वाहन खरेदी केले होते. त्यानुसार सामनेवाला व तक्रारदार यांच्यातील नाते हे धनको व ऋणको असे आहे. त्यामुळे तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक संरक्षण कायदा १९८६ च्या कलम २(१) (डी) नुसार ‘ग्राहक’ नव्हता व नाही. सामनेवाला कंपनी ही तक्रारदारास कुठल्याही प्रकारची सेवा पुरवत नाही. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा १९८६ च्या तरतुदी या करारास लागू होत नाही. तक्रारदार हा थकबाकीदार असल्याने ग्राहक होवू शकत नाही. त्यामुळे सदरची तक्रार रदृ होणेस पात्र आहे.
७. वस्तुतः सदरची बॅंक बंद पडल्याने तक्रारदारने कर्ज प्रकरणात कर्ज परत फेडीसाठी दिलेले चेक बदलून दयावे, यासाठी सामनेवाला तर्फे वारंवार तक्रारदारचे घरी जावून माहिती देण्यात आलेली होती. परंतु तरीही तक्रारदारने कर्ज परतफेडीसाठी दिलेले चेक बदलून दिले नाही. सामनेवाला यांचे ऑफिस बंद झाल्यावर सुध्दा प्राधिकृत व्यक्ती श्री.पंकज पाटील वारंवार तक्रारदारकडे जावून रोखीने हप्ते व दंड व्याज भरण्याची विनंती तक्रारदारास करत होते. परंतु तक्रारदार यांनी बॅंक बंद झाल्यामुळे न भरलेल्या हप्त्यांचे दंड व्याज सामनेवाला यांना अदा केलेले नाही.
८. सामनेवाला यांचे पुढे असे म्हणणे आहे की, तक्रारदार हा सांगली बॅंक बंद पडली त्यासाठी तुम्ही मला दंड व्याज लावू शकत नाही. असे म्हणून केवळ हप्त्यांची रक्कम भरत होता व दंड व्याज भरण्यास नकार देत होता. सांगली बॅंक बंद पडली हयात सामनेवाला यांचा दोष नसल्याने तक्रारदारचे जे हप्ते थकले होते त्यावर दंड व्याज देणे हे झालेल्या करारनाम्यानुसार तक्रारदार यास बंधनकारक होते व आहे. त्यामुळे तक्रारदार कडे थकीत हप्ता व इन्शुरन्सची रक्कम घेणे बाकी आहे. तक्रारदारने कधीही खाते उता-याची मागणी सामनेवाला यांचेकडे केलेली नाही. तक्रारदारास लावलेली पेनल्टी ही तक्रारदार व सामनेवाला यांच्यात झालेल्या करारानुसारच लावलेली आहे. सदर करारनामा तक्रारदार नाकारू शकत नाही. त्यास Rule of Estoppel ची बाधा येते. त्यामुळे तक्रारदार यास देण्याच्या सेवेत कसूर केलेली नसल्याने सदरची तक्रार नामंजूर करण्यात यावी. तसेच तक्रारदाराकडून तक्रार अर्जाचा खर्च रू.१०,०००/- मिळावे असे नमूद केले आहे.
९. सामनेवाला यांनी आपले म्हणण्याचे पृष्टयार्थ नि.१३ सोबत नि.१३/१ वर पॉवर ऑफ अॅटर्नीची झेरॉक्स प्रत, नि.१३/२ वर खाते उता-याची झेरॉक्स प्रत, नि.१४ वर Agreement ची झेरॉक्स प्रत, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
१०. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचा खुलासा, दाखल कागदपत्रे पाहता व दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थीत होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्दे निष्कर्ष
१. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक
आहे काय ? होय
२. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना
दयावयाच्या सेवेत कमतरता केली आहे काय ? नाही
३. आदेश काय? खालीलप्रमाणे
विवेचन
११. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी नि.५ सोबत नि.५/१ वर टॅक्स इन्व्हाईस (Tax Invoice) नि.५/२ वर वाहन दिल्याचे प्रमाणपत्र (Vehicle Delivery Certificate) दाखल केलेले आहेत. सदर दोन्ही कागदपत्रांवर ‘VehicleHypothecation with Bajaj Auto Finance Ltd.’ असे नमुद आहे. यावरून सामनेवाला यांनी तक्रारदार यांना कर्ज पुरवठा केल्याचे दिसुन येत आहे. कर्ज घेणारा व कर्जपुरवठा करणारी संस्था यात ग्राहक व मालक संबंध प्रस्थापित होत असल्याने तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुदृा क्रं. १ चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
१२. मुद्दा क्र.२- तक्रारदार यांची मुख्य तक्रार अशी आहे की, त्यांनी सामनेवाला फायनान्स कंपनी कडून दि.२९/१२/२००६ रोजी दुचाकी वाहन खरेदी करणेसाठी रू.३१,२००/- चे फायनान्स घेतलेले आहे. सदर कर्जाचा भरणा तक्रारदारच्या पगारातून कपातीने तक्रारदारचे सांगली बॅंकेच्या खाते नं.२६० मधून दि.०७/०२/२००७ पासून दि.०७/०३/२००८ पर्यंत एकूण १४ हप्त्यांचा झालेला होता. त्यानंतर सांगली बॅंक बंद पडलेने सामनेवाला यांचे रिकव्हरी एजन्सीचे अभिकर्ता यांचेकडे पुढील रितसर हप्त्यांची रक्कम रोख स्वरूपात अदा केलेली आहे. तरीसुध्दा सामनेवाला यांनी दि.३०/०४/२१० रोजी तडजोडीचे पत्र पाठवून हप्त्यापोटी रक्कम रू.२,६००/- व पेनल्टी रक्कम रू.८,३५०/- अशी एकूण रक्कम रू.१०,९५०/- तक्रारदारकडे घेणे असल्याचे नमुद केले.
तक्रारदारने सामनेवाला यांचेकडे प्रत्यक्ष जावून त्यांना सांगली बॅंकेचा खाते उतारा व रोखीने भरणा केल्याच्या पावत्या निर्देशनास आणून देऊन संबंधीत वाहनाची कागदपत्रे व निल दाखला मागितला असता सामनेवाला यांनी तसे करण्यास स्पष्ट नकार दिला.
१३. याबाबत सामनेवाला यांनी आपल्या खुलाश्यात तक्रारदार हे केवळ हप्त्यांची रककम भरत होते व थकित हप्त्यांचे देय व्याज भरण्यास नकार देत होते. तसेच इन्शुरन्सची रक्कम ही देण्यास नकार देत होते. तसेच तक्रारदार व सामनेवाला यांच्यात झालेल्या करारानुसार तक्रारदारवर थकलेले हप्ते व देय व्याज देणे बंधनकारक असतांनाही सांगली बॅंक बंद पडली हा माझा दोष नाही. सांगली बॅंकेचे चेक तुमच्याजवळ आहे असे म्हणून उर्वरित रक्कम देण्यास नकार देत होते. याउलट सामनेवाला यांनी वारंवार तक्रारदार यांचेकडे सदर बॅंक बंद पडल्याने कर्ज परतफेडीसाठी दिलेले चेक बदलून दयावे अशी मागणी करूनही चेक बदलून दिलेले नाही असे नमुद केलेले आहे.
१४. या संदर्भात आम्ही सामनेवाला यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले आहे. त्यात त्यांनी नि.१३/२ खाते उतारा दाखल केलेला आहे. सदर खाते उता-याच्या पान नं.३ वर दि.०९/०२/२००८ ची चेक नं.४१९५९३ ची entry आहे. सदर चेक Bounced (अनादरीत) झालेचे निर्दशनास येत आहे. सदर चेक दि.०७/०२/०८ रोजी १३ व्या हप्त्यापोटी भरल्याचे खाते उता-याच्या पान नं.२ वरील entry वरून दिसुन येत आहे. तसेच खाते उता-यातील पान नं.५ वर दि.३१/१२/०८ ची entry वरून विम्याच्या हप्त्याची रक्कम रू.७२२/- तक्रारदारकडे घेणे बाकी असल्याचे दिसुन येते. सदर खाते उतारा पाहता तक्रारदारकडे १३ व्या हप्त्यापोटीची रक्कम व विम्याची रक्कम घेणे बाकी असल्याचे दिसुन येते. तसेच तक्रारदारने नि.१५ सोबत आपले बचत खात्याची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. सदर बचत खात्याच्या नोंदी पाहता त्यात चेक नं.९५९१,९५९२ व ९५९४ च्या Bajaj Auto च्या नावाच्या नोंदी दिसुन येतात परंतु चेक नं.९५९३ ची entry दिसुन येत नाही. तसेच तक्रारदार यांनी २२ व्या थकीत हप्त्याची रक्कम ही चेक अनादरीत झाल्याने रोख स्वरूपात भरल्याचे सामनेवाला यांनी युक्तिवादात नमूद करून मान्य केलेले आहे. सदर हप्त्याची रोख भरणा पावतीही तक्रारदारने तक्रारीसोबत दाखल केलेली आहे. याउलट १३ व्या हप्त्याच्या रकमेचा चेक भरणा केल्या संदर्भात तक्रारदारने खाते उतारा दाखल केलेला आहे. परंतु सदर चेक अनादरित झाल्यानंतर सदर हप्त्याची रक्कम सामनेवाला यांना कशी परतफेड केली यासंदर्भात कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. यामुळे तक्रारदारचे म्हणणे की त्यांनी सर्व हप्त्यांची रक्कम व विम्याची रक्कम पूर्ण परतफेड केलेली आहे हे स्पष्टपणे शाबीत होत नाही. यावरून सामनेवाला यांनी तक्रारदार यास गाडीचे कागदपत्रे व नील दाखला न देवून कुठल्याही प्रकारची सेवेत कमतरता केलेली नाही या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुदृा क्रं.२ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
१५. मुद्दा क्र.३- वरील सर्व विवेचनावरून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
२. तक्रारदार व सामनेवाला यांनी आपआपला खर्च सोसावा.
ठिकाणः धुळे
दिनांकः १९/०८/२०१३
(सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.