न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 व 13 प्रमाणे दाखल केला आहे. प्रस्तुतची तक्रार स्वीकृत होवून जाबदार क्र.1 व 2 यांना नोटीस आदेश झाले. जाबदार क्र.1 व 2 यांनी मंचासमोर हजर होवून आपले म्हणणे दाखल केले. तक्रारदार यांनी आपले संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यायामासाठी व्यायामशाळा उभारुन दि. 21/4/2016 रोजी जाबदार क्र.1 कडून ऑनलाईन कोटेशन मागणी करुन त्यामध्ये व्यायाम साहित्य घेणेसाठी दि. 9/6/2016 रोजी ऑर्डर केली व जाबदार यांचे खात्यामध्ये रक्कम रु.5,000/- भरले. जाबदार क्र.1 यांनी मागणी केलेले साहित्य जाबदार क्र.2 या कंपनीमार्फत तक्रारदारांना पाठवले. परंतु सदरचे सर्व साहित्य खराब झालेले आहे. तक्रारदार यांनी एकूण रु. 1,10,000/- दिलेले आहेत. परंतु जाबदार यांनी ऑर्डरप्रमाणे डिलीव्हरी दिली नसल्याने तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 यांचेशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु जाबदार हे प्रतिसाद देत नाहीत. याबाबत जाबदार क्र.2 यांचेशी संपर्क केला असता त्यांनी सदरचे पार्सल योग्य प्रकारे पॅक न केल्यामुळे सदरचे सामानाचे नुकसान झाले आहे असे सांगितले. अशा प्रकारे जाबदार यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे. सबब, तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले असे तक्रारदाराचे कथन आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी आपले संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यायामासाठी व्यायामशाळा उभारुन दि. 21/4/2016 रोजी जाबदार क्र.1 कडून ऑनलाईन कोटेशन मागणी करुन त्यामध्ये व्यायाम साहित्य घेणेसाठी दि. 9/6/2016 रोजी ऑर्डर केली व जाबदार यांचे खात्यामध्ये रक्कम रु.5,000/- भरले. जाबदार यांना सदरचा माल पोच करणेसाठी रोड परमिट हवे होते. ते तक्रारदार यांनी दि. 9/6/2016 रोजी जाबदार यांना पाठवून दिले. जाबदार क्र.1 यांनी मागणी केलेले साहित्य जाबदार क्र.2 या कंपनीमार्फत तक्रारदारांना पाठवले. परंतु सदरचे सर्व साहित्य खराब झालेले आहे. तक्रारदार यांनी एकूण रु. 1,10,000/- दिलेले आहेत. परंतु जाबदार यांनी ऑर्डरप्रमाणे डिलीव्हरी दिली नसल्याने तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 यांचेशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु जाबदार हे प्रतिसाद देत नाहीत. तक्रारदाराने दि. 26/8/2016 रोजी जाबदारांना ई-मेल पाठविला परंतु त्याचीही दखल त्यांनी घेतलेली नाही. याबाबत जाबदार क्र.2 यांचेशी संपर्क केला असता त्यांनी सदरचे पार्सल योग्य प्रकारे पॅक न केल्यामुळे त्यामधील सामानाचे नुकसान झाले आहे असे सांगितले. याचा अर्थ असा होतो की जाबदार क्र.1 यांनी सामान पॅकींगचे वेळी योग्य ती काळजी घेतलेली नव्हती. अशा प्रकारे जाबदार यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे. सबब, जाबदार यांचेकडून खराब झालेल्या व्यायाम शाळेच्या साहित्याची रक्कम रु.1,10,000/- व सदर रकमेवर 18 टक्के दराने व्याज मिळावे, मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रु.50,000/- व तक्रारीचा खर्च रु.20,000/-, तसेच तक्रारदार यांचे प्रतिदिन होणा-या नुकसान भरपाईपोटी रु.500/- प्रमाणे नुकसान भरपाई जाबदार यांचेकडून मिळावी अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत प्रतिनिधी नेमणुकीचा ठराव, जाबदार यांनी दिलेले कोटेशन, तक्रारदाराचे बँक खातेचा उतारा, रोड परमिट, जाबदारांना पाठविलेला ई-मेल इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. जाबदार क्र.1 व 2 यांना नोटीस लागू झालेनंतर जाबदार यांनी मंचासमोर हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केले. जाबदार क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील संपूर्ण मजकूर नाकारला आहे. त्यांचे कथनानुसार, तक्रारदार संस्था ही फिटनेस व जिमचा व्यवसाय करीत असलेने ती ग्राहक या संज्ञेमध्ये बसत नाही. जाबदार क्र.1 यांनी जाबदार क्र.2 यांचेकडे तक्रारदाराने मागणी केलेले साहित्य दिले, तेव्हा ते नवीन व चांगल्या स्थितीत होते. सदरचे जाबदार क्र.2 यांना याकामी तक्रारदाराने आवश्यक पक्षकार म्हणून सामील केलेले नाही. इन्व्हॉइस नुसार मागणी केलेल्या साहित्याची किंमत रु.62,000/- असून टॅक्सची रक्कम रु. 8,990/- इतकी आहे. त्यामुळे तक्रारदाराने नमूद केलेली रक्कम रु.1,10,000/- चूकीची आहे. जाबदारांनी वादातील साहित्य हे योग्यरित्या पॅकींग केलेले होते. जर सदरचे साहित्य हे योग्य प्रकारे पॅकींग केले नसते तर जाबदार क्र.2 यांनी ते वाहतुकीकरिता स्वीकारलेच नसते. तक्रारदारांना सदरचे साहित्य परत करण्यास सांगितले होते, परंतु ते त्यांनी परत केलेले नाही. सबब, तक्रारअर्ज नामंजूर करावा अशी मागणी जाबदार क्र.1 यांनी केली आहे.
5. जाबदार क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. जाबदार क्र.2 यांनी सेवा देण्यात कोणतीही त्रुटी केली नसल्याने जाबदार क्र.2 विरुध्द प्रस्तुतची तक्रार चालणेस पात्र नाही. कन्साईनरने वादातील साहित्य हे रेसिडेन्शीयल क्रिकेट अॅकॅडमीच्या नावे बुक केले होते. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदाराला तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. बुक केलेले साहित्य हे जाबदार क्र.2 यांनी सुस्थितीत तक्रारदार यांना दि. 24/7/16 रोजी पोहोच केले आहे. साहित्याचे पॅकींग योग्य प्रकारे करण्याची जबाबदारी ही जाबदार क्र.1 यांची होती. जेव्हा जाबदार क्र.1 यांनी जाबदार क्र.2 यांचेकडे साहित्य आणून दिले, त्यावेळी सदरचे पॅकींग हे योग्य प्रकारे केलेले नव्हते. सदरची बाब जाबदार क्र.2 यांनी जाबदार क्र.1 यांचे निदर्शनास आणून दिली होती. तक्रारदाराने सदरचे साहित्य हे कोणतीही तक्रार न करता जाबदार क्र.2 कडून स्वीकारले आहे. सबब, जाबदार क्र.2 विरुध्द तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. सबब, तक्रारअर्ज नामंजूर करण्यात यावा अशी मागणी जाबदार क्र.2 यांनी केली आहे.
6. जाबदार क्र.1 व 2 यांनी याकामी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
7. तक्रारदाराची तक्रार, दाखल पुरावे व युक्तिवाद तसेच जाबदार यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन मंचासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | जाबदार यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
8. तक्रारदार हे राष्ट्रप्रेम निवासी क्रिकेट अॅकॅडमी मौजे तासगांव रोड, मौजे तासगांव ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथील कायम रहिवासी आहेत. तक्रारदार यांनी विद्यार्थ्यांच्या व्यायामासाठी व्यायामशाळा उभारणी करुन दि. 21/4/16 रोजी जाबदार क्र.1 बजाज इंडस्ट्रीजकडून ऑनलाईन कोटेशन मागणी करुन त्यामध्ये व्यायाम साहित्य घेणेसाठी नमूद असलेल्या साहित्यापैकी आठ साहित्ये दि. 9/6/2016 रोजी ऑर्डर केली व जाबदार यांचे बँक खातेमध्ये रक्कम रु. 5,000/- भरले. जाबदार क्र.1 यांनी त्यांच्या लेटरहेडवर असलेल्या लेटरपॅडवर तक्रारदारास कोटेशन दिलेची प्रतही तक्रारदार यांनी जोडलेली आहे व सदरचे साहित्याची मागणी केलेबद्दल उभय पक्षांमध्ये वाद नाही व त्यांचेमध्ये सेवा घेणार व सेवा देणार हे नाते प्रस्थापित झालेने तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(ड) खाली जाबदार यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4 एकत्रित
9. तक्रारदार हे राष्ट्रप्रेम निवासी क्रिकेट अॅकॅडमी मौजे तासगांव रोड, मौजे तासगांव ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथील कायम रहिवासी आहेत. तक्रारदार यांनी विद्यार्थ्यांच्या व्यायामासाठी व्यायामशाळा उभारणी करुन दि. 21/4/16 रोजी जाबदार क्र.1 बजाज इंडस्ट्रीजकडून ऑनलाईन कोटेशन मागणी करुन त्यामध्ये व्यायाम साहित्य घेणेसाठी नमूद असलेल्या साहित्यापैकी आठ साहित्ये दि. 9/6/2016 रोजी ऑर्डर केली व जाबदार यांचे बँक खातेमध्ये रक्कम रु. 5,000/- भरले. जाबदार क्र.1 यांनी त्यांच्या लेटरहेडवर असलेल्या लेटरपॅडवर तक्रारदारास कोटेशन दिलेची प्रतही तक्रारदार यांनी जोडलेली आहे व सदरचे साहित्याची मागणी केलेबदृल उभय पक्षांमध्ये वाद नाही. सदरच्या तक्रारीचा वादाचा मुद्दा इतकाच आहे की, तक्रारदार यांनी मागणी केलेला व्यायाम शाळेचा माल हा जाबदार यांनी वेळेतही पाठविला नाही व पाठविलेला माल हा नासधूस झालेल्या स्थितीत होता. तक्रारदार यांनी जाबदार यांना माल पोच करणेसाठी लागणारे रोड परमिट दि. 9/6/2016 रोजी सी.ए. श्री सचिन कुलकर्णी यांचेकडून पाठवून दिले व त्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की, This is to certify that M/s Bajaj Industries, Meerat (U.P.) has been ordered to supply Gym material for use of Trashtraprem Krida VA Shaikshanik Sanstha Peth, Vadgaon supply order No. 1312016 dated 09/06/2016”. तक्रारदार यांनी रक्कम रु.1,10,000/- भरलेले आहेत व तसे बँक स्टेटमेंटची प्रत तक्रारदाराने याकामी दाखल केली आहे. तथापि तक्रारदाराने सदरचे साहित्यास लागणारी सर्व पूर्तता करुनही जाबदार क्र.1 यांनी ऑर्डरप्रमाणे डिलीव्हरी दिलेचे दिसून येत नाही. तसेच तक्रारदारांनी तक्रारअर्जात हेही नमूद केले आहे की, तक्रारदार यांनी जाबदार यांना वारंवार फोन करुन साहित्य मागणेचा प्रयत्न केला. मात्र जाबदार यांनी हेतुपुरस्सर फोन उचललेला नसलेचे दिसून येते. तदनंतर तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 यांना दि. 26/8/2016 रोजी र्इमेल करुन तशी सूचना देखील दिली. मात्र जाबदार यांनी त्याची दखलही घेतलेचे दिसून येत नाही.
10. जाबदार क्र.1 यांचा TIN No. 09376701328 असून C.S.T. ME – 5007723 असा आहे. तक्रारदार यांना ज्यावेळी साहित्य चांगल्या कंडीशनमध्ये मिळाले नाही, तेव्हा तक्रारदार यांनी VRL Logistic Transport म्हणजेच जाबदार क्र.2 यांचेशी संपर्क साधला असता सदरचे पार्सल हे व्यवस्थितरित्या पॅक न केलेमुळे सामानाची नासधूस झालेचे तक्रारदार यांचे निदर्शनास आले. सबब, तक्रारदार यांना खराब व्यायामाचे साहित्य देवून तक्रारदार यांची फसवणूक करुन व्यवस्थित पॅकींग न करता त्यांना द्यावयाचे सेवेमध्ये त्रुटी केली आहे असे मंचाचे ठाम मत आहे. सबब, तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेमध्ये त्रुटी केलेने तक्रारदार यांनी केलेल्या मागण्या मान्य करणेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. जाबदार यांनी घेतलेल्या आक्षेपांबाबत मंचासमोर कोणताच पुरावा नसलेने हे मंच सर्व आक्षेप फेटाळून लावत आहे.
11. तक्रारदार यांना जाबदार यांनी अर्जात नमूद केलेप्रमाणे खराब व्यायामाचे साहित्य दिलेने त्यापोटी दिलेले रक्कम रु.1,10,000/- तक्रारदारास परत देणेचे आदेश जाबदार क्र.1 यांना करणेत येतात. तक्रारदार यांनी देवू केलेले सर्व साहित्य जाबदार क्र.1 यांना परत करावे. सदरची रक्कम स्वीकारले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत तक्रारदार यांना रक्कम द.सा.द.शे. 9 टक्के दराने देणेचे आदेश जाबदार क्र.1 यांना करणेत येतात. तक्रारदार यांनी मागितलेली नकसान भरपाईची रक्कम रु.50,000/- तसेच खर्चाची रक्कम रु.20,000/- ही या मंचास संयुक्तिक वाटत नसलेने त्यापोटी अनुक्रमे रक्कम रु. 10,000/- व रु. 5,000/- देणेचे आदेश जाबदार क्र.1 यांना करणेत येतात. तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 यांना सदरचे सर्व साहित्य परत करणेचे आदेश जाबदार क्र.1 यांना करणेत येतात. जाबदार क्र.2 ही ट्रान्सपोर्ट कंपनी असलेने व आलेला माल व्यवस्थितरित्या पोचविणेचे काम असलेने जाबदार क्र.2 यांना याकामी जबाबदार धरणेत येत नाही. सबब, हे मंच खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार क्र.1 कंपनीने तक्रारदार यांना रक्कम रु.1,10,000/- अदा करणेचे आदेश करणेत येतात. तसेच सदरचे रकमेवर जाबदार क्र.1 यांनी तक्रारदार यांना रक्कम स्वीकारले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज अदा करावे.
3. तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- देणेचे आदेश जाबदार क्र.1 यांना करणेत येतात.
4. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून मिळालेले सर्व साहित्य जाबदार क्र.1 यांना परत करावे.
5. वर नमूद आदेशांची पूर्तता जाबदार क्र.1 यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6. विहीत मुदतीत जाबदार यांनी आदेशाची पूर्तता न केलेस तक्रारदारास ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 खाली दाद मागणेची मुभा राहिल.
7. जर यापूर्वी जाबदार यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची जाबदार यांना मुभा राहील.
8. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.