न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदया कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
यातील तक्रारदार यांनी वि प क्र.1 यांचेकडून फ्रिज खरेदीकरिता रक्कम रु.15,800/- चे कर्ज मंजूर करुन पैकी रक्कम रु.5,268/- रोखीने व डिलरकडे भरणा करुन रु.10,536/- चे कर्ज वि प क्र.1 यांचेकडून दि.21/02/2017 रोजी उचल केले होते. सदर कर्जास रु.1,317/- इतका हप्ता ठरला होता व एकूण सात हप्त्यांमध्ये कर्ज परतफेड करणेचे होते. सदर कर्जाचे सुरक्षिततेपोटी तक्रारदार यांनी वि प क्र.1 यांना कोरे चेक सही करुन दिलेले होते. तक्रारदार यांचे वि प क्र.2 बॅंकेत बचत खाते असून त्याचा क्र.560104000042875 आहे. तक्रारदार यांनी ठरलेप्रमाणे हप्त्यांच्या तारखेनंतर थोडया उशिराने वेळोवेळी हप्ते रोखीने भरलेले होते व आहेत. तक्रारदार यांनी सदर कर्जाच्या परतफेडीपोटी वि प क्र.1 यांचेकडे रु.11,088/- इतकी रोखीने भरणा केलेली आहे. असे असताना वि प क्र.1 कंपनीने हप्ता वसुलीसाठी तक्रारदार यांचे चेक वि प क्र.2 बँकेच्या खातेवर वटणेसाठी वारंवार सोडून चेक बाऊन्स चार्जेस तक्रारदार यांचे कर्ज खातेवर खर्ची टाकलेले आहेत. वि प क्र.1 यांना अशाप्रकारचा कोणताही अधिकार नसताना वि प क्र.1 यांनी तक्रारदाराचे वि प क.2 कडे असलेल्या बचत खातेवरुन एकाच तारखेला रक्कम रु.10,497.31 पै. इतकी रक्कम अनाधिकाराने वसूल करुन घेतलेली आहे. तक्रारदार यांनी वि प क्र.1 यांचेकडील कर्ज पूर्णफेड केले असतानाही वि प क्र.1 कंपनीने तक्रारदार यांचेकडून वि प क्र.2 चे तक्रारदाराचे खातेवरुन दंड चार्जेस म्हणून रक्कम रु.10,497.31पै. वसूल केले आहेत. ही वि प क्र.1 यांचे सेवेतील त्रुटी असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी आहे. सदरची रक्कम वि प क्र.1 यांचेकडून वसूल होऊन मिळणेसाठी सदरची तक्रार दाखल केली आहे. सबब वि प क्र.1 यांनी अनाधिकाराने वसुल केलेली रक्कम रु.10,497.31/- व मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- अशी एकूण रक्कम रु.60,497.31/- वि प क्र.1 यांचेकडून वसूल होऊन मिळावेत व सदर रक्कमेवर द.सा.द.शे.18 टक्के व्याज वि प यांचेकडून वसूल होऊन मिळावेत अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत वि प क्र.1 यांचेकडील कर्ज खातेउतारा व वि प क्र.2 यांचेकडील बचतखातेचा उतारा इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केले आहे.
3. प्रस्तुतकामी वि.प. क्र.1 यांनी हजर होवून आपले लेखी म्हणणे व पुरावा शपथपत्र दाखल केले आहे. वि.प. क्र.1 यांचे कथनानुसार, तक्रारदार यांनी वि प क्र.1 यांचेकडून रक्कम रु.10,536/- चे कर्ज घेतले होते. सदर कर्जाचा मासिक हप्ता रु.1,317/- चा होता. कर्ज परतफेडीचा कालावधी दि.02/04/17 ते 02/11/17 असा होता. हप्त्याची तारीख प्रतयेक महिन्याच्या 2 तारखेला होती. परंतु तक्रारदार यांनी पहिला हप्ता दि.02/04/17 चा दि.17/04/17 रोजी म्हणजे 15 दिवस उशिराने भरला आहे. तसेच दुसरा हप्ता 13, तिसरा हप्ता 10 दिवस, चौथा हप्ता 8 दिवस, पाचवा हप्ता 13 दिवस, सहावा हप्ता 14 दिवस, सातवा हप्ता 12 दिवस व 8 वा हप्ता 4 दिवस उशिराने भरला आहे. त्यामुळे तक्रारदाराचे कर्जखातेवर बाऊन्सींग चार्जेसची रक्कम रु.3,475/- कर्जखातेवर दाखवली आहे. तसेच तक्रारदाराचे वि प क्र.2 बॅंकेचे बचत खाते उतारा पाहता रक्कम रु.590/- व 266/- ईएमआय बाऊन्स ट्रान्झॅक्शन्सचे चार्जेस लावलेले आहेत सदर चार्जेस वि प क्र.2 बँकेने लावलेले असून वि प क्र.2 बँकेने तक्रारदाराचे खातेवरुन खर्ची टाकलेले आहेत. याचा वि प क्र.1 यांचेशी काही संबंध नाही. सबब तक्रारदार यांचे कथनाप्रमाणे तक्रारदाराचे बचत खातेवरुन रक्कम रु.10,497.31/- ची केलेली वजावट याचा वि प क्र.1 यांचेशी काही संबंध नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करुन तक्रारदाराने वि प क्र.1 याना ईसीएस बाऊंसिंग चार्ज रक्कम रु.3,475/- देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती वि प क्र.1 यांनी केली आहे.
वि प क्र.2 यांनी हजर होऊन आपले लेखी महणणे शपथपत्रासह दाखल केले आहे. वि प क.2 यांचे कथनानुसार, तक्रारदार यांचे वि प क्र.2 यांचेकडे बचत खाते असलेचे मान्य आहे. तसेच तक्रारदाराचे वि प बॅंकेचे सदर बचत खातेवरील चेक वारंवार न वटता परत गेले या व्यतिरिक्त कोणत्याही इतर मजकूर मान्य व कबूल नाही. तक्रारदाराने सदर वि प क्र.2 यांचेविरुध्द कोणतीही दाद मागितलेली नाही. तक्रारीचा विषय हा तक्रारदार व वि प क्र.1 यांचे दरम्यानचा वाद आहे. त्याबाबत वि प क्र.2 यांचा काहीही संबंध नाही. सबब वि प क्र.2 यांनी तक्रारदार यांना कोणतीही सेवात्रुटी दिलेली नसलेने तक्रारदाराने वि प क्र.2 यांचेविरुध्द कोणतीही दाद मागितलेली नाही.
4. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र तसेच वि.प.यांचे म्हणणे व शपथपत्र यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि प यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि प यांनी तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि प यांनी अनाधिकाराने वसुल केलेली रक्कम परत मिळणेस व मानसिक, शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
मुद्दा क्र.1 –
5. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी वि.प. क्र.1 यांचेकडून फ्रिज खरेदी करणेसाठी रक्कम रु.10,536/- इतके कर्ज घेतले होते. सदर कर्जाचा परतफेडीचा मासिक हप्ता रक्कम रु.1,317/- चा ठरला होता. तसेच तक्रारदार यांचे वि प क्र.2 बॅंकेकडे बचत खाते होते. त्याचा खाते क्र.560104000042875 असा आहे. हे तक्रारदाराने दाखल केलेल्या वि प क्र.1 यांचेकडील कर्ज खाते उतारा व वि प क्र.2 यांचेकडील बॅंक बचत खातेचे पासबुकावरुन स्पष्ट होते. सदरच्या बाबी वि प यांनी नाकारलेल्या नाहीत. वरील सर्व बाबींचा विचार करता, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
6. तक्रारदाराचे कथनानुसार, तक्रारदार यांनी फ्रिज खरेदीकरिता करुन रु.10,536/- चे कर्ज वि प क्र.1 यांचेकडून दि.21/02/2017 रोजी उचल केले होते. सदर कर्जास रु.1,317/- इतका हप्ता ठरला होता व एकूण सात हप्त्यांमध्ये कर्ज परतफेड करणेचे होते. सदर कर्जाचे सुरक्षिततेपोटी तक्रारदार यांनी वि प क्र.1 यांना कोरे चेक सही करुन दिलेले होते. तक्रारदार यांनी ठरलेप्रमाणे हप्त्यांच्या तारखेनंतर थोडया उशिराने वेळोवेळी हप्ते रोखीने भरलेले होते व आहेत. तक्रारदार यांनी सदर कर्जाच्या परतफेडीपोटी वि प क्र.1 यांचेकडे रु.11,088/- इतकी रोखीने भरणा केलेली आहे. तक्रारदार यांचे वि प क्र.2 बॅंकेत बचत खाते असून त्याचा क्र.560104000042875 आहे. असे असताना वि प क्र.1 कंपनीने हप्ता वसुलीसाठी तक्रारदार यांचे चेक वि प क्र.2 बँकेच्या खातेवर वटणेसाठी वारंवार सोडून चेक बाऊन्स चार्जेस तक्रारदार यांचे कर्ज खातेवर खर्ची टाकलेले आहेत. वि प क्र.1 यांनी तक्रारदाराचे वि प क.2 कडे असलेल्या बचत खातेवरुन एकाच तारखेला रक्कम रु.10,497.31 पै. इतकी रक्कम कर्ज पूर्णफेड केले असतानाही दंड चार्जेस म्हणून रक्कम रु.10,497.31पै. वसूल केले आहेत.
वि प क्र.1 यांनी त्यांचे म्हणणेमध्ये तक्रारदाराने कर्ज परतफेडीचे हप्ते वेळेत न भरलेने तक्रारदाराचे कर्जखातेवर बाऊन्सींग चार्जेसची रक्कम रु.3,475/- कर्जखातेवर दाखवली आहे. तक्रारदाराचे वि प क्र.2 बॅंकेचे बचत खाते उतारा पाहता रक्कम रु.590/- व 266/- ईएमआय बाऊन्स ट्रान्झॅक्शन्सचे चार्जेस लावलेले आहेत सदर चार्जेस वि प क्र.2 बँकेने लावलेले असून वि प क्र.2 बँकेने तक्रारदाराचे खातेवरुन खर्ची टाकलेले आहेत. याचा वि प क्र.1 यांचेशी काही संबंध नाही असे कथन केले आहे.
वि प क्र.2 यांनी तक्रारदाराचे वि प क्र.2 बॅंकेचे सदर बचत खातेवरील चेक वारंवार न वटता परत गेले या व्यतिरिक्त कोणताही इतर मजकूर मान्य केलेला नाही. तक्रारदाराने सदर वि प क्र.2 यांचेविरुध्द कोणतीही दाद मागितलेली नाही. तक्रारीचा विषय हा तक्रारदार व वि प क्र.1 यांचे दरम्यानचा वाद असलेचे कथन केले आहे.
तक्रारदाराने दाखल केलेले वि प क्र.2 यांचेकडील बचत खातेवरील खातेउताराचे अवलोकन केले असता दि.11/09/2018 रोजी एकाच दिवशी 29 चेक्स वि प क्र.1 यांचे नांवे चेक बाऊन्स झालेबाबतचे रक्कम रु.590/- चे 9 वेळा व रक्कम रु.266/- चे 18 वेळा, रु.23/-चा एक व 234.73/- चा एक असे 29 चेक बाऊन्स चार्जेस तक्रारदाराचे नांवे खर्ची टाकलेचे दिसून येते. असे 29 चेक्स एकाच दिवशी तक्रारदाराचे कर्जखाती खर्ची टाकून वि प क्र.1 यांनी तक्रारदाराचे बचत खातेवरुन एकाच तारखेला रक्कम रु.10,497.31/- इतकी अनाधिकाराने वसूल करुन घेतलेली असलेचे स्पष्ट होते. तक्रारदारास सदर चेकची कल्पना न देता एकाच दिवशी एवढे चेक वटणेसाठी टाकणे ही वि प क्र.1 यांची सेवेतील त्रुटी असलेचे स्पष्ट होते. त्यामुळे वि प क्र.1 हे तक्रारदाराची चेक बाऊन्सची अनाधिकाराने वसुल केलेली रक्कम रु.10,497/- परत करण्यास जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3 व 4
7. सबब, वि.प. क.1 यांनी चेक बाऊन्सची तक्रारदाराचे वि प क.2 चे बचत खातेवरुन वसुल केलेली एकूण रक्कम रु.10,497/- परत मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदर रक्कमेवर संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 % प्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. प्रस्तुत कामी वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार यांना मानसिक त्रास व शारिरिक त्रास झाला तसेच सदरचे तक्रारअर्जासाठी खर्च करावा लागला. त्याकारणाने तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
सबब, याकामी खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येतो.
- आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि प क्र.1 यांचेकडून तक्रारदाराने उचल केलेले कर्ज तक्रारदाराने पूर्णफेड केलेचा दाखला वि प क्र.1 यांनी तक्रारदारास अदा करावा.
- वि.प. क्र.1 यांनी तक्रारदारांना तक्रारदाराचे वि प क्र.2 यांचेकडील बचत खातेवरुन वसुल केलेली रक्कम रु.10,497/- अदा करावी. सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो सदर रक्कमेवर द.सा.द.शे. 6 % प्रमाणे व्याज अदा करावे.
- वि.प. क्र.1 यांनी तक्रारदार यांना मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. क्र.1 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|