ग्राहक तक्रार अर्ज क्र.237/2011
ग्राहक तक्रार अर्ज दाखल दि.24/11/2011
अंतीम आदेश दि.27/02/2012
नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नाशिक
श्री.सोनीराम सखाराम गायकवाड, तक्रारदार
रा.मु.पो.करंजाळी, ता.दिंडोरी, जि.नाशिक. (अँड.एफ.डी.पठाण)
विरुध्द
बजाज फायनान्स लि. सामनेवाला
द्वारा पटवा ऑटोमोबाईल्स दिंडोरी, (एकतर्फा)
ता.दिंडोरी,जि.नाशिक
(मा.सदस्या अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना सामनेवाला फायनान्स कंपनीने ओढून नेलेली बजाज प्लॅटीना मोटार सायकल एम.एच.15 सी एफ परत मिळावी अथवा रक्कम रु.1,00,000/- वसूल होवून मिळावी व त्यावर प्रत्यक्ष रक्कम हातात मिळेपावेतो द.सा.द.शे.19% व्याज मिळावे, अर्जाचा खर्च रक्कम रु.5000/- मिळावा, देय उपरोक्त नुकसान भरपाई व्यतिरीक्त रक्कम रु.1,00,000/- मिळावी या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला यांना मंचाची नोटीशीची बजावणी झाल्याची पोष्टाची पोहोच पावती पान क्र.24 लगत दाखल आहे. सामनेवाला मंचाची नोटीस घेवूनही हजर झाले नाहीत अगर म्हणणे दाखल केले नाही म्हणून त्यांचे विरुध्द दि.04/01/2012 रोजी एकतर्फा आदेश करण्यात आले.
अर्जदार यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतले आहेत.
मुद्देः
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय.
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे
काय?- नाही.
3) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द
नामंजूर करण्यात येत आहे.
तक्रार क्र.237/2011
विवेचन
या कामी अर्जदार यांनी युक्तीवाद केलेला नाही.
सामनेवाला यांनी अर्जदार यांना बजाज प्लॅटीना मोटारसायकल खरेदीसाठी कर्जाऊ रक्कम दिली होती ही बाब सामनेवाला यांनी म्हणणे दाखल करुन नाकारलेली नाही. अर्जदार यांनी पान क्र.11 ते पान क्र.15 लगत हप्त्यापोटी रक्कम भरल्याच्या मुळ अस्सल पावत्या हजर केलेल्या आहेत. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदाराने यांनी तक्रार कलम 4 मध्ये अर्जदार यांची आर्थीक परिस्थिती दुष्काळी परिस्थिती असल्याकारणाने खालावली असल्याबाबत कंपनीच्या प्रतिनीधीस प्रत्यक्ष भेटून कर्ज हप्त्याचे उर्वरीत चेक टाकु नये याबाबत सांगितले असल्याचे नमूद केलेले आहे. त्यानंतर तक्रार कलम 5 मध्ये दि.11/05/2009 ते दि.15/02/2011 पर्यंत हप्त्याची रक्कम दंडासहीत भरल्याबाबतची नोंदी नमूद आहेत. तक्रार कलम 7 मध्ये थकीत हप्त्याची रक्कम रु.7182/- भरण्याचा मनोदय अर्जदार यांनी केला परंतु सामनेवाला यांनी स्विकारण्यास नकार दिला. सामनेवाला यांनी अर्जदार यांचेकडे रक्कम रु.24,000/- घेणे आहे व सदर रक्कम भरल्यानंतर गाडी परत देवु असे म्हणून गाडी बेकायदेशीररित्या घेवून गेले असल्याचे नमूद आहे.
अर्जदार यांनी पान क्र.11 ते 15 लगत सामनेवाला यांचेकडे हप्त्याची रक्कम
जमा केल्याच्या पावत्या दाखल केलेल्या आहेत. पान क्र.16 लगत सामनेवाला यांनी अर्जदार यांना पाठवलेली नोटीस दाखल आहे. त्यानंतर अर्जदार यांनी पान क्र.18 लगत सामनेवाला यांना वकीलामार्फत दि.13/09/2011 रोजी पाठवलेली नोटीस दाखल केलेली आहे.
सदर पावत्यांचा विचार होता त्या पावत्या हया सलग मासिक तारखेचे दिसत नाहीत. सदर पावत्यामधील शेवटची पावती दि.15/02/2011 या तारखेची असून त्यानंतरच्या तारखांच्या पावत्या दाखल नाहीत. सदर पावत्यांचा विचार होता अर्जदार यांनी मासिक हप्ते सलगपणे प्रत्येक महिन्याला भरलेले दिसत नाहीत.
त्यानंतर सामनेवाला यांनी पाठवलेली नोटीस दि.09/08/2011 रोजीची दाखल केलेली आहे. त्या नोटीस प्रमाणे सामनेवाला यांनी अर्जदार यांना, त्यांचे मासिक हप्ते थकले आहेत त्याकामी दिलेले धनादेश न वटता परत आलेले आहेत. अर्जदार यांनी कर्जाची परतफेड करण्यास कसूर केलेली आहे. सदर नोटीस
तारखेपर्यंत थकीत रक्कम रु.17,856/- ही रक्कम सात दिवसाची आत भरण्यास सांगितलेली आहे.या नोटीशीचा विचार करता अर्जदार यांनी सदर नोटीसप्रमाणे वर्तन केलेले दिसत नाही परंतु त्या नोटीसीस अर्जदार यांनी दि.13/09/2011 रोजी वकीलामार्फत नोटीस उत्तर पाठविलेले आहे. सदर नोटीशीप्रमाणे अर्जदार यांनी सदर थकीत रक्कम नाकारलेली आहे.
सामनेवाला यांनी अर्जदार यांना थकीत कर्ज भरण्याची नोटीस देवून त्याची पुर्तता न केल्याने सदर वाहन कर्जाचे हप्ते थकल्यामुळे ओढून नेलेले आहे. यात सामनेवाला यांच्या सेवेत कुठलीही कमतरता आढळून येत नाही.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.