न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकडे विमा उतरविलेला असून त्याचा हप्ता वार्षिक आहे व तो वि.प. कंपनीकडे दि. 31/10/2019 रोजी अदा केलेला आहे. त्याचा परतावा हा एक हप्ता भरल्यापासून देणार होते. वि.प.कंपनीने त्याची हमी व शाश्वती दिलेली होती. परंतु वि.प. कंपनीने विविध आमिष दाखवून त्यांना योग्य तो मोबदला दिलेला नाही. तक्रारदार हे वि.प. कंपनीचे ऑफिसवर गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिलेली आहेत. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या आयोगात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून मूळ रक्कम रु.70,420/- व त्यावर द.सा.द.शे.15 टक्के व्याजदराने रु. 22,880/- अशी एकूण रक्कम रु.93,300/- मिळावी, मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व तक्रारीचा खर्च रु.15,000/- वि.प. कडून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत विमा शेडयुल व पॉलिसी रद्द करणेबाबत दिलेला अर्ज इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. प्रस्तुत कामी वि.प. यांना नोटीस लागू होऊनही सदर वि.प. याकामी गैरहजर राहिलेने वि.प. यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर पारीत झालेला आहे.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमा रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकडे विमा उतरविलेला असून त्याचा हप्ता वार्षिक आहे व तो वि.प. कंपनीकडे दि. 31/10/2019 रोजी अदा केलेला आहे. तक्रारदारांनी याकामी पॉलिसी शेडयुल दाखल केले आहे. त्यामध्ये तक्रारदाराने भरलेल्या विमाहप्त्याचा तपशील नमूद आहे. वि.प. यांनी याकामी हजर होवून प्रस्तुत बाब नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट सिध्द झाली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. तक्रारदारांचे तक्रारअर्जातील कथनानुसार, वि.प. विमा कंपनी हे पॉलिसीचा परतावा हा एक हप्ता भरल्यापासून देणार होते. वि.प. कंपनीने त्याची हमी व शाश्वती दिलेली होती. परंतु वि.प. कंपनीने विविध आमिष दाखवून त्यांना योग्य तो मोबदला दिलेला नाही. तक्रारदार हे वि.प. कंपनीचे ऑफिसवर गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिलेली आहेत. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे असे तक्रारदाराचे कथन आहे. तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सदरची कथने वि.प. यांनी याकामी हजर होवून नाकारलेली नाहीत. वि.प. यांना तक्रारअर्जाची नोटीस लागू होऊनसुध्दा ते याकामी मंचात हजर झाले नाहीत. म्हणून, वि.प. यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. म्हणजेच वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. तक्रारदारांनी त्यांचे कथनाचे पुष्ठयर्थ पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. सबब, तक्रारदाराने तक्रारअर्जात केले कथनांवर विश्वासार्हता ठेवणे न्यायोचित वाटते. सदरची बाब विचारात घेता, वि.प. यांनी तक्रारदार यांना विमा पॉलिसीपोटी एक हप्ता भरलेनंतर देय असणारा परतावा दिलेला नाही ही बाब शाबीत होते. सबब, वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचेकडून वि.प. कंपनीकडे भरलेली मूळ रक्कम रु. 70,420/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज मिळणेस पात्र आहेत. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- अशी रक्कम वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग मंच येत आहे.
सबब, प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. यांनी तक्रारदार यांना विमा पॉलिसीपोटी भरलेली रक्कम रु.70,420/- अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. यांनी तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 71 व 72 अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.