जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 445/2011
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-21/10/2011.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 18/02/2014.
श्री.रामराव नथ्थु पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः शेती,
रा.कळमडु,ता.चाळीसगांव,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. मॅनेजिंग डायरेक्टर,बजाज ऑटो लि,आकुर्डी,
पुणे 35.
2. व्यवस्थापक, पगारीया आटो सेंटर, खरजई नाका,
भडगांव रोड, टाकळी,ता.चाळीसगांव,जि.जळगांव.
3. हेरंब आटो,
रा.291/1, कैलास नगर, वाणी मंगल कार्यालयासमोर,
भडगांव रोड,चाळीसगांव,ता.चाळीसगांव,जि.जळगांव. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.प्रकाश बी.तिवारी वकील.
विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 तर्फे श्री.सिंचन व्ही.सरोदे वकील.
निकालपत्र
श्री.विश्वास दौ.ढवळे,अध्यक्षः बजाज कंपनीचे प्लॅटीना या दुचाकी वाहनातील दोष वॉरंटी कालावधीमध्ये व्यवस्थीत न करुन दिल्यामुळे दिलेल्या सदोष सेवेतील त्रृटीदाखल तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
विरुध्द पक्ष क्र. 1 हे बजाज ब्रॅण्डच्या दुचाकी उत्पादीत करणारी प्रसिध्द कंपनी असुन विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 हे त्यांचे अधिकृत डिलर आहेत. तक्रारदाराने बजाज प्लॅटीना हे दुचाकी वाहन दि.8/1/2011 रोजी रोख रक्कम रु.36,180/- इनव्हाईस क्रमांक टी 10494 अन्वये खरेदी केले. सदरचे वाहन आर.टी.ओ.कार्यालयास एम.एच.19/बीए 3991 या क्रमांकाने दि.11/01/2011 रोजी रजिस्टर करण्यात आले. वाहन विकत घेतांना विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी उत्कृष्ठतेचा हवाला देऊन त्याचे डिलर व अधिकृत सर्व्हीस स्टेशन विरुध्द पक्ष क्र.2 व 3 हे त्यास उत्कृष्ठ सेवा देतील असा हवाला दिलेला होता. तक्रारदाराने सदरचे वाहन खरेदी केल्यानंतर 15/20 दिवस व्यवस्थीत चालले नंतर वाहनातील मशिनरीमध्ये बिघाड असल्यामुळे दुचाकी चालवणेकामी त्रास होऊ लागला. तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 2 कडे संपर्क साधला असता त्यांनी थातुरमातुर काम करुन तक्रारदाराचे समाधान केले. सदर वाहनात स्टार्टीग स्ट्रबल, अव्हरेज न देणे अशा तक्रारी निर्माण झाल्या. तक्रारदाराने अनुक्रमे दि.21/2/2011, दि.23/3/2011 व दि.4/8/2011 रोजी विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 कडे सर्व्हीसींग केले तथापी दुचाकीच्या मशिनरीमध्ये असलेला दोष दुर झाला नाही. सदर दुचाकी 4/5 महीन्यापासुन सुरु होत नाही त्यामुळे तिचा वापरही तक्रारदारास करता येत नाही. तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 1 कडे संपर्क साधला असता त्यांनी विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 कडुन दुरुस्ती अथवा पार्ट बदलुन घेणेची सुचना केली. तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 3 कडे दुचाकी बैलगाडीवरुन आणुन दाखवली असता त्यांनी त्यात किरकोळ फेरफार केले तथापी त्यानंतरही तक्रारदाराच्या दुचाकीत समस्या जशाच्या तशा आहेत. तक्रारदाराने दि.4/8/2011 रोजी विरुध्द पक्ष क्र. 3 कडे रु.220/- स्पेअर पार्ट पोटी देऊन दुरुस्ती केली पण उपयोग झाला नाही. तक्रारदाराने सरतेशेवटी विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना नोटीसीने कळवुन नुकसानीची मागणी केली परंतु त्यांनी दाद दिली नाही. अशा प्रकारे विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारास दोषयुक्त वाहनाची विक्री करुन सदोष सेवा प्रदान केलेली आहे. सबब वॉरंटी कालावधी मध्ये आवश्यक ती सेवा न दिल्याने झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.20,000/- + वाहनाची मुळ किंमत रु.36,180/- + वेळोवेळी दुरुस्तीचा खर्च अशी एकुण रक्कम रु.75,000/- नुकसानी दाखल मिळावेत, विरुध्द पक्षाने तक्रारदारास गाडी संपुर्णपणे दुरुस्त करुन देण्याचा अथवा तक्रारदारास नवीन दुचाकी देण्याचा आदेश व्हावा, नोटीस खर्च रु.2,000/-, तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/-, जळगांव जाणे येणे कामी येणारा खर्च रु.2,000/- अशी एकुण रु.9,000/- खर्चापोटी मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या.
4. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 2 कडुन बजाज प्लॅटीना वाहन रजिस्ट्रेशन क्रमांक एम.एच.19/बी ए 3991 दि.8/1/2011 रोजी विकत घेतली त्यानंतर दि.21/2/2011 रोजी प्रथम सर्व्हीसींग केली त्यावेळी तक्रारदाराने स्पीडोमिटरशिवाय अन्य कोणतीही तक्रार उपस्थित केली नाही. त्या वेळेस तक्रारदाराचे वाहन चांगल्याप्रकारे सर्व्हीसींग करुन ताब्यात दिले. दरम्यानचे काळात विरुध्द पक्ष क्र. 2 चे चाळीसगांव येथील दुकान बंद झाले व विरुध्द पक्ष क्र.3 चे दुकान सुरु झाले त्यानंतर दि.25/5/2011 रोजी तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.3 कडे दुसरी सर्व्हीसींग केली त्यावेळी इंडीकेटरचा प्रॉब्लेम, वायरींग वगैरे चेक करुन वाहन पूर्ण चांगले करुन तक्रारदार घेऊन गेला. दि.4/8/2011 रोजी तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 3 कडुन तिसरी सर्व्हीसींग केली त्यावेळी वाहनाच्या खराबी बद्यल अगर दोषाबद्यल काहीएक अडचण समोर मांडली नाही. तक्रारदाराने दि.4/8/2011 रोजी इंटरनेटवरुन केलेल्या तक्रारीनुसार तक्रारदाराचे वाहन दि.6/8/2011 रोजी चेक केले असता बॅटरीचे एक झाकण ढिले असल्याने बॅटरीतील असीड वायरवर पडल्यामुळे वायर खराब झाली ती दुरुस्त करुन दिली व तक्रारदाराचे समाधान झाल्याबाबत जॉब कार्डवर सही घेतली. त्यानंतर तक्रारदाराने दि.23/08/2011 रोजी वकीलामार्फत खोटया मजकुराची नोटीस पाठविली त्यास योग्य ते उत्तर दिले आहे. त्यानंतर तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडे वाहन न आणल्याने विरुध्द पक्षाचे वर्कशॉप मॅनेजर व मेकॅनीक दि.8/9/2011 रोजी तक्रारदाराकडे कळमडु येथे गेले असता तक्रारदार घरी नसल्याने ते भेटले नाही व दुचाकी वाहनही घरी नव्हते तेव्हा तक्रारदाराच्या पत्नीकडे चौकशी केली असता त्यांनी योग्य ती उत्तरे दिली नाहीत. तेव्हा शेजारील व्यक्तींकडे चौकशी केली असात तक्रारदार हे दुचाकी वाहनावरुन येजा करतात व ती चालु स्थितीत असल्याचे समजले. त्यानंतर दि.15/09/2011 रोजी पुन्हा पत्र देऊन तक्रारदारास त्याचे वाहन दुरुस्तीसाठी आणण्याबाबत कळविले असता तक्रारदाराने त्यास प्रतिसाद दिला नाही. विरुध्द पक्षाने तक्रारदारास योग्य ती सेवा दिलेली असुन कोणताही कसुर केलेला नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्य व्हावी व खर्चापोटी तक्रारदाराकडुन रु.10,000/- मिळावेत अशी विनंती विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी केलेली आहे.
5. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, विरुध्द पक्ष यांचे लेखी म्हणणे, तसेच तक्रारदाराचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर.
1. विरुध्द पक्षांनी तक्रारदारास सेवा देण्यात त्रुटी केली
आहे काय ? होय.
2. तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे अंतीम आदेशानुसार
6. मुद्या क्र. 1 - तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.1 निर्मित बजाज प्लॅटीना हे दुचाकी वाहन दि.8/1/2011 रोजी रोख रक्कम रु.36,180/- इनव्हाईस क्रमांक टी 10494 अन्वये खरेदी केले. तसेच सदरचे वाहन आर.टी.ओ.कार्यालयास एम.एच.19/बीए 3991 या क्रमांकाने दि.11/01/2011 रोजी रजिस्टर करण्यात आले याबाबत उभयतांमध्ये कोणताही वाद नाही. तथापी सदरचे खरेदी केलेले दुचाकी वाहनाचे मशिनरीमध्ये खरेदीनंतर 15 ते 20 दिवसात दोष निर्माण झाले व त्या दोषांचे समाधानकारकरित्या निवारण विरुध्द पक्षाने केले नाही ही तक्रारदाराची प्रमुख तक्रार आहे.
7. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी याकामी हजर होऊन तक्रारदाराने अनुक्रमे दि.25/5/2011, दि.4/8/2011, दि.6/8/2011 या तारखांना वाहनाचे सर्व्हीसींग केले त्यावेळी ज्या जुजबी अडचणी उदा.इंडीकेटर प्रॉब्लेम, वायर चेक, ऑईल बदलणे, वायरींगचा पुन्हा प्रॉब्लेम इत्यादी तक्रारदाराच्या अडचणी सोडवुन वाहन योग्य रित्या सर्व्हीसींग करुन दिल्याचे लेखी म्हणण्यात नमुद केले असुन वेळोवेळी तक्रारदाराने समाधान पत्रकावर सही केल्याचे नमुद केले आहे.
8. तक्रारदाराने त्याचे दुचाकी वाहन खराब व दोषयुक्त असल्याबाबत बालाजी आटो गॅरेज, प्रोप्रा.बाळासाहेब पाटील, सुवर्णताई कॉम्प्लेक्स,करगांव रोड, चाळीसगांव, गाळा नं.15 यांनी दिलेल्या दाखल्याची सत्यप्रत तक्रार अर्जाचे कामी दि.4/6/2013 चे पुरसीस व्दारा दाखल केलेली आहे. सदरचे दाखल्याचे अवलोकन करता त्यातील मजकुर असा की, मी श्री.रामराव नथ्थु पाटील यांचे गाडी क्र.एम.एच.19/डीजे 3991 यातील समस्या बघीतली आहे या गाडीचा वायरलुप शॉर्ट झाल्यामुळे गाडी पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे सुरु होत नाही असे नमुद केले आहे. सदर दाखल्याचे पुष्ठयर्थ दाखला देणारे मेकॅनिक श्री.बाळासाहेब बारकु पाटील यांचे शपथपत्रही दाखल केलेले असुन तक्रारदाराचे दुचाकी वाहनात दोष असल्याचे त्यांनी शपथेवर सांगीतलेले आहे. विरुध्द पक्षाने तक्रारदाराचे सदरचे दाखला व शपथेवरील कथनास कोणताही आक्षेप घेतलेला नाही तसेच युक्तीवादाचे वेळेसही ते गैरहजर राहीले. तसेच तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडील वाहन दुरुस्ती करुन दिलेच्या जॉब कार्डवर समाधानकारक सहया केल्या त्याही पुराव्याचेकामी मंचासमोर लेखी म्हणण्यासोबत दाखल केलेल्या नाहीत.
9. उपरोक्त एकुण विवेचनावरुन तक्रारदाराला विरुध्द पक्षाने मशिनरीमध्ये दोष असलेले वाहन विक्री करुन व त्याची विक्री पश्चात वॉरंटी कालावधीमध्ये योग्य ती सेवा न पुरवून सदोष सेवा दिलेली असल्याचे निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. सबब मुद्या क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
10. मुद्या क्र. 2 – तक्रारदाराने तक्रार अर्जातुन वॉरंटी कालावधी मध्ये आवश्यक ती सेवा न दिल्याने झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.20,000/- + वाहनाची मुळ किंमत रु.36,180/- + वेळोवेळी दुरुस्तीचा खर्च अशी एकुण रक्कम रु.75,000/- नुकसानी दाखल मिळावेत, विरुध्द पक्षाने तक्रारदारास गाडी संपुर्णपणे दुरुस्त करुन देण्याचा अथवा तक्रारदारास नवीन दुचाकी देण्याचा आदेश व्हावा, नोटीस खर्च रु.2,000/-, तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/-, जळगांव जाणे येणे कामी येणारा खर्च रु.2,000/- अशी एकुण रु.9,000/- खर्चापोटी मिळावेत अशी विनंती केलेली आहे. आमचे मते तक्रारदाराने त्याचे दुचाकी वाहन बजाज प्लॅटीना रजिस्टेशन क्रमांक एम.एच.19/बीए 3991 हे मालकी हक्कासह विरुध्द पक्ष क्र. 3 यांचेकडे तात्काळ परत करावे., विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी तक्रारदारास सदर वाहनाची खरेदी किंमत रु.36,180/- परत करावी. तक्रारदार हा मानसिक त्रासापोटी रु.18,000/- व खर्चादाखल रु.7,000/- विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांचेकडुन मिळण्यास पात्र आहे. यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो.
2. तक्रारदाराने त्याचे दुचाकी वाहन बजाज प्लॅटीना रजिस्टेशन क्रमांक एम.एच.19/बीए 3991 हे मालकी हक्कासह विरुध्द पक्ष क्र. 3 यांचेकडे तात्काळ परत करावे., विरुध्द पक्ष क्र. 3 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास सदर वाहनाची खरेदी किंमत रु.36,180/- (अक्षरी रक्कम रु.छत्तीस हजार एकशे एशी मात्र ) तक्रारदाराने वाहन जमा केल्यानंतर तात्काळ परत करावी.
3. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासा दाखल रु.18,000/-(अक्षरी रक्कम रु.अठरा हजार मात्र ) व खर्चादाखल रु.7,000/- (अक्षरी रु.सात हजार मात्र ) या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
ज ळ गा व
दिनांकः- 18/02/2014.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.