जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक 1543/2009 तक्रार दाखल करणेत आलेची तारीखः- 12/10/2009.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-30/06/2015.
सोयब सलीम खाटीक,
उ.व.सज्ञान, धंदाः हातमजुरी,
रा.निंभोरा,ता.रावेर,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. बजाज ऑटो फायनान्स लि,
व्दारा बजाज ऑटो लि,मुंबई पुणे रोड, आकुर्डी, पुणे.
2. शाखा व्यवस्थापक,
बजाज ऑटो फायनान्स लि, पगारीया ऑटो सेंटरचे वर,
पितृछाया, दुसरा मजला, नेहरु चौक,जळगांव,जि.जळगांव.
3. रिकव्हरी एजंट, श्री.आर.बी.सुर्यवंशी,
बजाज ऑटो फायनान्स लि, पगारिया ऑटो सेंटरचे वर,
पितृछाया, दुसरा मजला, नेहरु चौक,जळगांव,
जि.जळगांव. ........ सामनेवाला.
कोरम-
श्री.विनायक रावजी लोंढे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदारातर्फे श्री.संतोषकुमार पी.चोपडा वकील.
सामनेवाला क्र. 1 ते 3 तर्फे श्री.आनंद शरद मुजूमदार वकील.
निकाल-पत्र
आदेश व्दारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्षः
1. तक्रारदाराने सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी द्यावयाचे सेवेत कसुर केला आहे म्हणुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणेः-
2. तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 यांचेकडुन बजाज सी.टी.मोटारसायकल क्रमांक एम.एच.19/ ऐ जे 5136 खरेदी करण्यासाठी कर्ज घेतलेले आहे. सामनेवाला क्र. 3 हे सामनेवाला क्र. 1 चे रिकव्हरी एजंट आहेत. सदरील मोटार सायकलची किंमत रु.37,500/- होती. तक्रारदाराने डाऊन पेमेंट रक्कम रु.10,000/- भरले व राहीलेली रक्कम सामनेवाला क्र. 1 यांच्याकडुन कर्जाऊ घेतली. सदरील कर्ज समान 36 हप्त्यात प्रत्येक हप्ता रक्कम रु.1,125/- प्रमाणे फेडावयाचे होते. एकुण रु.40,500/- सामनेवाला यांचेकडे जमा करावयाचे होते. तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे 32 हप्त्यापर्यंत सर्व हप्ते वेळोवेळी भरलेले आहेत. सामनेवाला यांना एकुण रक्कम रु.51,000/- मिळालेले आहेत. उर्वरीत 4 हप्त्यांची रक्कम रु.4,500/- तक्रारदार भरावयास तयार आहेत. सदरील रक्कम भरण्यासाठी तक्रारदार तयार असतांनाही सामनेवाला यांची व्यक्ती तक्रारदार यांचेकडे आली व गाडी जप्त करुन घेऊन जाऊ अशी धमकी दिली तसेच तक्रारदारास कर्जाची रक्कम व दंड भरण्यास सांगीतले. तक्रारदार हे कर्ज रक्कम भरण्यास तयार होते. सबब तक्रारदाराने अशी विनंती केली आहे की, सामनेवाला यांनी सदरील मोटार सायकलचा कब्जा घेऊ नये, तक्रारदारांना हिशोब द्यावा, तक्रारीचा खर्च व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी.
3. सामनेवाला क्र. 1 ते 3 या मंचासमोर हजर झाले व त्यांनी लेखी कैफीयत दाखल केली. सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या तक्रारीतील कथने स्पष्टपणे नाकारलेली आहेत. तक्रारदाराने सामनेवाला यांच्याकडुन कर्ज घेतले आहे ही बाब मान्य आहे. सामनेवाला यांचे कथन की, तक्रारदार हे थकबाकीदार झालेले आहेत. त्यांचेकडुन कर्ज रक्कम व व्याज येणे बाकी आहे. तक्रारदाराने 4 हप्ते फेडले नाहीत. सामनेवाला यांचे बरोबर झालेल्या कराराच्या अनुषंगाने संपुर्ण कर्ज फेड दि.10/05/2009 रोजी होणे आवश्यक होते. तक्रारदाराने कर्जाचे हप्ते, व्याज व दंड भरले नाही. सामनेवाला यांनी द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार रद्य करण्यात यावी.
4. तक्रारदाराने तक्रारीसोबत कर्ज भरल्याच्या पावत्या हजर केल्या आहेत. तसेच आर.टी.ओ.चे प्रमाणपत्र हजर केले आहे. तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराचे कर्ज खाते उतारा दाखल केला आहे. तक्रारदार व सामनेवाला हे युक्तीवादाचे वेळेस गैरहजर राहील्यामुळे उपलब्ध पुरावा व कागदपत्रांवरुन गुण-दोषावर तक्रार निकालासाठी घेतली. न्याय-निर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवली
आहे काय ? नाही.
2) तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? नाही.
3) काय आदेश ? शेवटी दिलेप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्या क्र. 1 व 2
5. तक्रारदाराची तक्रार व दस्त यांचे काळजीपुर्वक अवलोकन केले असता तक्रारदाराचे कथन की, त्यांनी सामनेवाला यांच्याकडुन मोटार सायकल खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले आहे. सदरील कर्ज 36 हप्त्यामध्ये प्रत्येक हप्ता रु.1,125/- प्रमाणे भरावयाचा होता. तक्रारदाराने एकुण 32 हप्ते सामनेवाला यांचेकडे भरलेले आहेत. तक्रारदाराने सामनेवाला यांना 4 हप्ते नियमित भरलेले नाहीत. सामनेवाला यांनी तक्रारदाराने हप्ते न भरल्यामुळे हप्त्यांची रक्कम व दंड याची मागणी केली आहे. तक्रारदार यांनी असे नमुद केलेले आहे की, ते उर्वरीत हप्ते भरावयास तयार होते परंतु तक्रारदाराने त्यासंबंधी कोणतेही दस्त हजर केले नाहीत. तक्रारदारास उर्वरीत हप्ते भरावयाचे असते तर त्यांनी सामनेवाला यांच्याकडे रक्कम भरली असती अथवा रक्कम चेकने पाठविली असती. तक्रारदाराने उर्वरीत हप्ते भरण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये जो हायर परचसे करारनामा झाला आहे त्यानुसार तक्रारदाराने दरमहा हप्ता भरणे आवश्यक होते. सदरील हप्ते वेळेवर न भरल्यास सामनेवाला यांना वाहनाचा ताबा घेण्याचे हक्क प्राप्त होतात. तक्रारदाराचे संपुर्ण तक्रारीचे अवलोकन करता तक्रारदाराने नमुद हप्ते भरलेले नाहीत ते थकबाकीदार झालेले आहेत त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्यात त्रृटी ठेवली आहे असा निष्कर्ष काढता येणार नाही. तक्रारदाराची तक्रार रद्य होण्यास पात्र आहे. सबब आदेश.
आ दे श
1) तक्रारदारांची तक्रार रद्य करण्यात येते.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
ज ळ गा व
दिनांकः- 30/06/2015. ( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विनायक रा.लोंढे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.