ORDER | ( पारीत दिनांक : 08/09/2014) ( मा. प्रभारी अध्यक्ष, श्री मिलींद आर.केदार यांच्या आदेशान्वये).) तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये विरुध्द पक्ष यांच्या विरुध्द दाखल केली असून, तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे आहे. - तक्रारकर्ता हा खापरी, ता. कारंजा (घाडगे) जि. वर्धा येथील
रहिवासी असून त्याचा फोटोग्राफीचा व्यवसाय असल्याचे त्याने तक्रारीत नमूद केले आहे. सदर व्यवसाय हा लोहारी सावंगा, ता. नरखेड, जि. नागपूर तसेच वर्धा जिल्हयातील शेजारील गावात करतो व परिवाराचा उदरनिर्वाह चालवितो असे त्याने तक्रारीत नमूद केले आहे. विरुध्द पक्ष क्रं. 1 ही वित्तीय सहाय्य पुरविणारी कंपनी असून त्याचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. तसेच विरुध्द पक्ष क्रं.2 श्रीनिवास मोटर्स हे प्रतिष्ठान बजाज कंपनीचे दु-चाकी वाहनाचे अधिकृत विक्रेते आहे. विरुध्द पक्ष क्रं. 3 हे विरुध्द पक्ष क्रं. 1 यांचे नागपूर कार्यालय आहे असे तक्रारकर्ता यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारकर्ता यांनी बजाज प्लॅटिनम दु-चाकी वाहन खरेदी करण्याकरिता विरुध्द पक्ष क्रं. 2 यांच्याकडे गेला असता वि.प. 2 चे विक्री अधिकारी यांनी वित्त सहाय्य वि.प. क्रं. 1 मार्फत पुरविण्यात येईल व वि.प. क्रं. 1 चे शाखा कार्यालय हे वि.प.क्रं. 2 यांच्या प्रतिष्ठानात असल्याचे सांगितले. - त.क.यांनी विरुध्द पक्ष क्रं.2 यांच्याकडे रुपये 10,000/- Down Payment म्हणून दिले व रुपये 31,000/- वित्तीय सहाय्य वि.प.क्रं.1 यांच्याकडून घेतले व त्याकरिता स्टेट बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेचे 36 पोस्टे डेटेड धनादेश दिले. तसेच वि.प.क्रं.2 यांच्या व्यवस्थापकाने त.क.चे 70-80 सहया को-या फॉर्मवर घेतल्या होत्या. सदर फॉर्मवरील मजकूर हा इंग्रजी भाषेत असून तो समजून सांगितला नाही असे तक्रारीत नमूद केले आहे.
- कर्जाची मासिक किस्त रुपये 1,256/- ठरली होती व त्याकरिता 36 धनादेश दिले होते. त.क. यांनी प्रत्येक महिन्याच्या 11 तारखेपर्यंत पर्याप्त राशी आपल्या खात्यात ठेवली होती, जेणेकरुन धनादेश अनादरित होणार नाही. सदर वाहनाचा आर.टी.ओ. क्रं. एमएच-32/एल6817 असा होता.
- त.क. यांनी पुढे नमूद केले की, त्यांनी दिलेल्या 36 धनादेशा पैकी 26 धनादेश वटविण्यात आले. तसेच एका महिन्यामध्ये दोन धनादेश वटविण्याकरिता टाकले. त्यामुळे त्याचे 8 धनादेश अनादरित झाले. त.क. यांनी पुढे नमूद केले की, वि.प.यांनी 36 धनादेशा पैकी 34 धनादेश वटविण्याकरिता बॅंकेत टाकले व उर्वरित धनादेश वटविण्याकरिता टाकले नाही व त्याचा योग्य हिशोब सुध्दा तक्रारकर्त्याला दिला नाही.
- दि. 09.07.2011 रोजी त.क. लग्न कार्यात फोटो काढण्याकरिता जात असतांना, दोन अज्ञात व्यक्ती जे स्वतःला वि.प.च्या कंपनीचे प्रतिनिधी म्हणून सांगत होते त्यांनी गाडीचा ताबा घेतला व किस्त भरली नाही असे कारण सांगितले. त.क. यांनी तक्रारीत नमूद केले की, जर कोणतीही रक्कम शिल्लक असेल तर ती रक्कम भरण्यास त.क. तयार आहे असे त्यांनी सदर व्यक्तिला सांगितले. परंतु त्यांनी तक्रारकर्त्याचे काहीही ऐकले नाही व त.क. चे वाहन जबरदस्तीने ताब्यात घेतले.
- सदर घटने बाबत तक्रारकर्ता यांनी वर्धा येथील वि.प.यांचे कार्यालयात संपर्क साधला असता, त्यांना नागपूर कार्यालयाशी संपर्क साधावा असे सांगितले. त.क. यांना रुपये28,000/- थकित आहे असे सांगितले परंतु विस्तृत हिशोब देण्याबाबत टाळाटाळ केली.त.क. यांनी पुढे नमूद केले की, रु.28,000/- पैकी रु.14,000/- ही रक्कम आपसी तडजोडीने भरली जाऊ शकते असे सुध्दा वि.प. यांनी त.क. यांना सांगितले. त.क. यांनी हिशोबाची मागणी केल्यानंतर दि.11.07.2011 रोजी खाते उता-याची प्रत दिली. त्यामध्ये रु.34,000/- कर्ज स्वरुपात दर्शविले असून त.क. यांनी एकूण रु.40,192/- जमा केले होते व त्यापैकी रुपये30,222.01/- हे मुळ मद्दल खात्यात जमा केले होते व व्याजापोटी रु.9,969.92/- हे जमा करण्यात आले होते असे सदर खाते उता-यात दर्शविले होते. त्याचप्रमाणे सदर खाते उता-यात त.क. कडून एकूण रु.19,972/- (Over Due) थकित रक्कम दर्शविली. त्याचप्रमाणे 24,996/- सुध्दा येणे बाकी दर्शविले. सदर रक्कम जास्त स्वरुपाची असल्याचे त.क. चे म्हणणे आहे. दि. 11.07.2011 रोजी थकित किस्त रुपये 5,024/- व रु.19,972/-, रु.24,996/-या रक्कमेची एकाच वेळेस मागणी केली व सदर रक्कम दिल्यानंतरच गाडीचा ताबा देण्यात येईल असे तक्रारकर्त्यास सांगितले. त.क. नुसार सदर खाते उता-याचे अवलोकन केले असता रुपये5,024/- ही किस्त थकित झालेली आहे. वि.प. यांच्याकडे त.क. यांनी दिलेले धनादेश असतांना सुध्दा त्यांनी धनादेश वटविण्याकरिता टाकले नाही असे त.क.यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त.क. यांनी पुढे नमूद केले की, त्यांनी एकूण रु.40,192/- चे भुगतान केले आहे. वि.प. यांच्या चुकिमुळे धनादेश अनादरित झाले आहे ही बाब सुध्दा त्यांनी तक्रारीत नमूद केली आहे. त.क. यांनी रु.31,000/- चे कर्ज घेतले होते परंतु खाते उता-यात रु.34,000/-चे कर्ज दर्शविण्यात आले. यानुसार जर खाते उतारा बघितला तर तक्रारकर्त्याने भरलेले रु.40,192/- ,over due रु.19,972/- व अतिरिक्त येणे बाकी रक्कम रु.24,996/- यांची बेरीज केली असता रु.85,160/- ही रक्कम कर्ज रक्कमे पेक्षा दुप्पट आहे . वि.प. हे अवास्तव रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करीत आहे असे त.क. यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
- त.क. यांनी पुढे नमूद केले की, वि.प. यांनी कोणत्याही प्रकारची सूचना किंवा नोटीस न देता तक्रारकर्त्याची गाडी गैरकायदेशीरपणे ताब्यात घेणे हे विरुध्द पक्ष यांचे कृत्य सेवेतील गंभीर स्वरुपाची त्रृटी दर्शविते. त.क.यांनी दि. 22.07.2011 रोजी वकिला मार्फत पंजीबध्द डाक द्वारे वि.प. यांना नोटीस पाठविली. वि.प. 2 यांनी जाणूनबुजून नोटीस स्विकारली नाही व इतर वि.प. यांना नोटीस प्राप्त होऊन ही उत्तर न दिल्यामुळे त.क. यांनी सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
- तक्रारकर्ता यांनी सदर प्रकरणात आपल्या गाडीचा ताबा मागितला असून गाडीचे संपूर्ण मुळ दस्ताऐवजांची मागणी केलेली आहे. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.5,000/-ची मागणी केली आहे.
- सदर तक्रारीची नोटीस विरुध्द पक्ष यांना बजाविण्यात आली. विरुध्द पक्ष क्रं.1 यांनी सदर तक्रारीला खालीलप्रमाणे उत्तर दाखल केले.
- विरुध्द पक्ष क्रं.1 यांनी आपल्या उत्तरात नमूद केले की, त.क. यांचा करारनामा क्रं. 472005276, हा दि. 04.04.2007रोजी झाल्याचे नमूद आहे. तसेच त.क. यांच्या विनंतीवरुन त्याला रु.45,216/-चे कर्ज दिल्याचे नमूद आहे. त्यामध्ये ऋण शुल्क (Financial Charges)11,216/-रुपये हे अंतर्गत असल्याचे नमूद आहे. वि.प. यांनी मान्य केले की, गाडीची मासिक किस्त ही रुपये 1,256/- असून 36 महिन्याकरिता होती . सदर वाहन त्याच्याकडे कर्जाची पूर्ण रक्कम अदा होईपर्यंत (hypothecated ) तारण राहील ही बाब सुध्दा नमूद होती. त्यांनी त.क. च्या 70-80 स्वाक्षरी घेतल्या ही बाब अमान्य केली असून त.क.यांना संपूर्ण अटी व शर्ती समजून सांगितल्या होत्या असे नमूद केले.
- वि.प. यांनी आपल्या उत्तरात नमूद केले की,(Essence of contract) करारातील अत्यावश्यक अट ही वेळेत मासिक किस्त देणे ही होती, जर अशी किस्त वेळेत दिली नाही व उशीर झाला तर 350/-रुपये Delayed payment, Default म्हणून 150/- असे शुल्क आकारण्याचे प्रावधान आहे.
- वि.प. यांनी उत्तरात नमूद केले की, त.क.यांनी दिलेले 22 धनादेश हे वटविल्या गेले व इतर धनादेश अनादरित झाले. दि. 09.07.2011 पर्यंत त.क. यांच्याकडे 26,796/-रुपये बाकी होते. त्यामधून 5024/- किस्तीचे व 21,050/-रुपये Over due व 722/-रुपये विम्याचे थकित होते. वि.प. यांनी आपल्या सेवेत कोणतीही त्रृटी केलेली नसून त.क. यांनी अटी व शर्तीचे पालन केले नाही असे नमूद केले. त्यांनी पुढे नमूद केले की, त.क. यांनी दि. 09.07.2011 रोजी वि.प. यांच्याकडे वाहन (surrender) समर्पित केले व तशी पावती दिली. वि.प. यांनी पुढे नमूद केले की, त.क. हे कराराप्रमाणे पूर्ण रक्कम देण्यास असमर्थ असल्याचे त.क. ने स्वतः सांगितले व त.क. च्या संमतीने वि.प. यांनी दि. 31.07.2011 रोजी सदर वाहन 13,000/-रुपयात विकले व सदर रक्कम त.क. यांच्या थकित (Outstanding amount) रक्कमे मध्ये जमा केली. त्यांनी आपल्या उत्तरात नमूद केले की, त.क. चे आक्षेप निरर्थक व खोटे आहे. वि.प. यांची देणे असलेली रक्कमेपासून स्वतःचा बचाव करण्याकरिता सदर तक्रार दाखल केलेली आहे. वि.प. यांनी त.क.चे इतर सर्व म्हणणे नाकारले असून सदर प्रकरण खारीज करण्याची विनंती केली.
- सदर प्रकरणामध्ये वि.प. 2 व 3 यांना नोटीस प्राप्त होऊनही त्यांनी लेखी उत्तर दाखल केले नाही व हजर झाले नाही. त्यामुळे दि. 25.11.2011 रोजी नि.क्रं. 1 वर विना लेखी जबाब प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारित केला.
- सदर प्रकरणामध्ये मंचासमक्ष त.क. व वि.प.क्रं.1 यांनी दाखल केलेले दस्ताऐवज कथन, शपथपत्र, लेखी युक्तिवाद व युक्तिवाद इत्यादीचे मंचाने अवलोकन केले असता, खालील बाबी विचारार्थ उपस्थित झाल्या.
कारणे व निष्कर्ष - तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्रं. 2यांच्याकडून बजाज कंपनीचे दुचाकी वाहन खरेदी केले व त्याकरिता वि.प. क्रं. 1 व 3 यांनी वित्तीय पुरवठा केला व सदर वित्तीय पुरवठा हा वि.प. क्रं.2 यांच्या कार्यालया मार्फत करण्यात आला ही बाब दस्ताऐवजावरुन स्पष्ट होते. तसेच सदर वित्तीय पुरवठा हा वि.प.क्रं. 2 यांच्या कार्यालयामार्फतच करण्यात आला हे त.क. चे म्हणणे ग्राहय धरण्यात येते. कारण त.क.चे सदर कथन वि.प.क्रं. 2 यांनी मंचाची नोटीस प्राप्त होऊन ही खोडून काढलेले नाही. त्यामुळे त.क. हा सर्व वि.प. यांचा ग्राहक ठरतो. कारण वि.प.क्रं. 1 व 3 हे वित्तीय पुरवठा करणारी कंपनी असून वि.प.क्रं. 2 यांच्या मार्फत वाहन खरेदी केले व त्यांच्या कार्यालयातूनच वित्तीय पुरवठा करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने वि.प.क्रं. 2 यांच्याकडून 41,000/-रुपयात दुचाकी वाहन खरेदी केले होते व त्याकरिता Down Payment म्हणून 10,000/-रुपये वि.प.क्रं. 2 यांच्याकडे जमा केले होते असे त.क. यांनी तक्रारीत नमूद केले आहे व सदर तक्रार शपथपत्रावरच आहे. सदर बाब वि.प.क्रं. 2 यांनी नोटीस प्राप्त होऊनही त्याला उत्तर दिले नाही व खोडून काढले नाही. त्यामुळे त.क. यांनी वि.प.क्रं.2 यांच्याकडे Down Payment म्हणून 10,000/-रुपये भरले ही बाब ग्राहय धरण्यात येते. तसेच वाहनाची किंमत 41,000/-रुपये होती याबाबत त.क. ने तक्रारीत शपथपत्रेवर कथन केले आहे. ते वि.प.क्रं. 2 यांनी खोडून काढले नाही व सदर तक्रार दाखल करण्यापूर्वी तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्रं.2 यांना नोटीस पाठविली. त्यामध्ये सुध्दा सदर बाब नमूद आहे. त्याला सुध्दा वि.प.क्रं.2 यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे बजाज प्लटिनम या दुचाकी वाहन ज्याचा क्रं. एमएच -32/एल-6817 होता. त्याची किंमत 41,000/-रुपये होती ही बाब सुध्दा ग्राहय धरण्यात येते.
- सदर दुचाकी वाहनाची किंमत 41,000/-रुपये होती व त.क. यांनी Down Payment म्हणून 10,000/-रुपये भरले होते. त्यामुळे साहजिकच 31,000/-रुपयाच्या कर्जाची गरज त.क. यांना होती. परंतु वि.प.क्रं. 1 यांनी आपल्या उत्तरात त.क. यांना 45,216/-रुपये इतके कर्ज दिल्याचे नमूद केले असून त्यामध्ये (Financial Charges) 11,216/-रुपये अंतर्भूत असल्याचे नमूद केले आहे. 11,216/-रुपये जर 45,216/-रुपयातून वजा केले असता 34,000/-रुपयाचे कर्ज वि.प.क्रं.1 यांनी त.क.यांना दिल्याचे वि.प.चे म्हणणे आहे. परंतु त.क. यांनी किती कर्जाची मागणी केली ही बाब दर्शविणारी कोणते ही पुरावे अथवा दस्ताऐवज प्रकरणात दाखल नाही. परंतु प्रत्यक्ष वाहन खरेदी करण्याकरिता 31,000/-रुपये कर्जाची गरज होती. त.क. यांनी 36 धनादेश वाहनाच्या किस्तीच्या संदर्भात वि.प. यांनी दिले होते, ही बाब सुध्दा त.क. व वि.प.क्रं. 1 च्या उत्तरावरुन स्पष्ट होते. त.क. यांचे धनादेश ज्या महिन्यात वटविल्या गेले त्यानंतर वि.प. यांनी त.क. यांना कर्जाची रक्कम व बाकी रक्कम याबाबतचे विवरण स्वतः पाठविणे आवश्यक होते. कारण कर्ज शुल्क म्हणून वि.प.क्रं. 1 यांच्यानुसार त्यांनी 11,216/-रुपये घेतले आहे असे असतांना ग्राहकाला त्याच्याकडे किती कर्ज बाकी आहे, याबाबतची माहिती पुरविण्याची गरज होती. तशी माहिती त.क. यांना पुरविल्याबाबतचे कोणतेही दस्ताऐवज वि.प.क्रं. 1 यांनी मंचासमक्ष दाखल केले नाही ही वि.प. यांची सेवेतील त्रृटी आहे.
- वि.प.क्रं. 1 यांनी आपल्या उत्तरामध्ये कर्जाच्या करारावरती भर दिला आहे. सदर कराराचे अवलोकन केले असता त्यामध्ये कर्ज घेणा-याने किती रुपयाच्या कर्जाची मागणी केली याबाबतचा उल्लेख नाही. त्यामुळे त.क. यांनी किती कर्जाची मागणी केली होती ही बाब सिध्द करण्याची जबाबदार वि.प.ची होती. तसे कोणतेही दस्ताऐवज वि.प.क्रं. 1 यांनी दाखल केलेले नाही. यावरुन असा निष्कर्ष निघतो की, वि.प.क्रं. 1 यांनी 34,000/-चे कर्ज वितरीत केले, जेव्हा की, वाहन खरेदी करण्याकरिता त.क. यांना 31,000/-रुपयाची गरज होती. कर्ज वितरित करण्यापूर्वी कर्ज वितरण शुल्क 11,216/-रुपये लागेल ही बाब सुध्दा त.क. यांना कर्ज वितरणापूर्वी कळविले होते कां ? हा सुध्दा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. मंचासमक्ष दाखल केलेले दस्ताऐवज वि.प. यांनी कराराच्या अटी व शर्तीची मुळ प्रत पान क्रं. 59 वर दाखल केलेली आहे. त्यामध्ये कुठेही कर्ज शुल्क किती लावले याचा उल्लेख नाही. फक्त Delayed payment बाबत 350/-रुपये व Default च्या संदर्भात 150/-रुपये याचा उल्लेख आहे. त्यामुळे कर्ज शुल्क आकारीत असतांना सुध्दा वि.प. यांनी कोणतीही बाब त.क. यांना सांगितली होती हे स्पष्ट होत नाही. सदर बाब अनुचित व्यापार असल्याचे मंचाचे मत आहे.
- वि.प. यांनी त.क. यांच्याकडून कर्जाची आकारणी करीत असतांना वि.प. यांनी त.क. यांना दिलेले कर्ज 34,000/-रुपये व कर्ज शुल्क 11,216/-रुपये यावर व्याज आकारल्याचे वि.प. यांच्या विवरणावरुन स्पष्ट होते. कर्ज शुल्काला व्याजा आकारता येईल किंवा आकारले जाईल ही बाब त्यांनी कर्ज वितरीत करण्यापूर्वी त.क. ला सांगितले होते काय ? हा सुध्दा प्रश्न उपस्थित होतो. वि.प. यांनी दाखल केलेले पान क्रं. 59 मध्ये अटी व शर्तीमध्ये किती कर्ज शुल्कावर व्याज आकारले याचा उल्लेख नाही. अटी व शर्ती मध्ये त्याचा उल्लेख नसतांना सुध्दा त.क. यांच्याकडून कर्ज शुल्कावर (Financial Charges) व्याज आकारणे हे अनुचित व्यापार पध्दती असल्याचे मंचाचे मत आहे.
- वि.प. यांनी आपल्या उत्तरात त.क. यांच्याकडे कर्जाची रक्कम थकित होती असे कथन केलेले आहे. परंतु थकित रक्कमेबाबत व किती रक्कम थकित आहे याबाबत विरुध्द पक्षाने तक्रारकर्ता यांना दस्ताऐवजा द्वारे मागणी केल्याचे सिध्द होत नाही. त.क. यांनी तक्रारीत नमूद केले की, त्याचे काही धनादेश अनादरित झाले आहे. यावरुन त.क. हा स्वच्छ मनाने मंचासमक्ष उपस्थित झाला आहे ही बाब स्पष्ट होते. वि.प.यांनी त.क.यांच्याकडे थकित रक्कमेबाबत आपल्या लेखी उत्तरात नमूद केलेली रक्कम 26,796/-रुपये व इतर रक्कमेबाबत कोणतीही मागणी केल्याचे किंवा त्याबाबत स्पष्टीकरण त.क. यांना दिल्याचे स्पष्ट होत नाही, ही बाब सेवेतील त्रृटी आहे.
- तक्रारकर्त्याचे वाहन दि. 09.07.2011 रोजी वि.प. यांनी आपल्या ताब्यात घेतले असे त.क. चे म्हणणे आहे. या उलट त.क. यांनी स्वतः वाहनाचा ताबा वि.प.क्रं.1 यांच्याकडे सुपूर्द केल्याचे वि.प.क्रं.1 यांचे म्हणणे आहे. वि.प.क्रं. 1 यांनी मंचासमक्ष सदर वाहन त.क. यांनी स्वतःहून सुपूर्द केल्या संबंधी बाब दर्शविणारे दस्ताऐवज पान क्रं. 60 वरती surrender पत्र दाखल केले आहे. सदर पत्रावर त.क.ची स्वाक्षरी असल्याची बाब त.क. यांनी आपल्या प्रतिज्ञालेखात नाकारली असून त.क. यांनी महेश उत्तमराव शिवणे, वय – 23 वर्ष, राह. खापरी, तह. कारंजा (घाडगे), जि. वर्धा यांचे शपथपत्र दाखल केले. सदर शपथपत्रामध्ये महेश उत्तमराव शिवणे यांनी कथन केले की, दि. 09.07.2011 रोजी 2 अज्ञात व्यक्तीने सदर वाहन बळजबरीने ताब्यात घेतले व आम्ही बजाज कंपनीचे व्यक्ती आहोत असे सांगितले. सदर शपथपत्र दाखल केल्यानंतर वि.प.यांनी महेश उत्तमराव शिवणे यांची उलट तपासणी घेणे गरजेचे होते. तसे त्यांनी याप्रकरणी केले नाही व तसा कोणताही अर्ज केला नाही. या उलट वि.प. यांनी त.क. यांना स्वतः वाहन त्यांच्या सुर्पूद केले असे म्हटले आहे परंतु सदर वाहन कोणी ताब्यात घेतले, कोणत्या कर्मचा-याच्या ताब्यात दिले याबाबतचा कोणताही उल्लेख त्या पत्रात नाही. सदर पत्रातील रिकाम्या जागेतील मजकूर वेगळया शाईने भरला असून त.क. याची सही ही वेगळया शाईची आहे. सदर पत्र हे प्रथम दर्शनी बनावट स्वरुपाचे वाटते.
मंचाच्या मते सदर पत्र विरुध्द पक्ष यांनी स्वतः तयार केलेले आहे. कारण त.क. यांनी सदर पत्रावरील आपली स्वाक्षरी सुध्दा नाकारली. त्यामुळे वि.प. यांनी सदर पत्रावरील स्वाक्षरी पडताळणीकरिता तज्ञाकडे सदर पत्र पाठवून ते सिध्द करणे आवश्यक होते. तसे वि.प. यांनी याप्रकरणात केले नाही. त्यामुळे वि.प. यांनी दाखल केलेले पान क्रं. 60 वरील सदर पत्र ग्राहय धरण्यात येत नाही. - सदर प्रकरणात वि.प. यांनी वाहन ताब्यात घेऊन ते विकून टाकले व त्याची रक्कम 13,000/-रुपये त.क. यांच्या कर्ज खात्यात जमा केली, याबाबत सुध्दा त.क. यांना कोणतीही सूचना दिली नाही असे दिसून येते. मंचाने मा. राष्ट्रीय आयोगाने दिलेला न्याय निवाडा टाटा फायनान्स लि. विरुध्द फान्सीस सोईरो ( Vol. III (2008) CPJ page 65 (NC) ) तसेच एचडीएफसी बॅंक लि. विरुध्द बलविंदरसींग (III (2009)CPJ page No. 40 (N.C.)) या न्याय निवाडयातील निष्कर्षानुसार बळजबरीने वाहन ताब्यात घेऊन, कोणतीही पूर्व सूचना न देता विकणे व वाहन विकण्याकरिता कोणतीही कायदेशीर पध्दतीचा अवलंब न करणे या बाबींचा उल्लेख करुन सदर बाब ही सेवेतील त्रृटी असल्याचे नमूद केले.
- सदर प्रकरणात सुध्दा वि.प. यांनी त.क.चे वाहन 13,000/-रुपयात विकून टाकले हे त्यांनी स्वतः आपल्या उत्तरात नमूद केले आहे. सदर वाहन विकण्याकरिता कोणत्या प्रक्रियेचा अवलंब केला किंवा निविदा केल्या होत्या काय ? याचा कोणताही उल्लेख वि.प. यांच्या उत्तरात नाही व त्याबाबत कोणतेही दस्ताऐवज दाखल केले नाही.
- सदर प्रकरणामध्ये वि.प. यांनी संपूर्ण कारवाई एकतर्फी केली असून, त.क. यांना त्यांची बाजू मांडण्याकरिता वेळ दिला नाही. त.क. यांना त्यांच्याकडे किती रक्कम थकित आहे याबाबतची कोणतीही पूर्व सूचना दिली नाही ही बाब स्पष्ट होते. वि.प. यांनी सदर प्रकरणी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला असून सर्व बाबी गैरकायदेशीर पध्दतीने हाताळल्याचे स्पष्ट होते.
- मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याने सदर वाहन त्याच्या
उदरनिर्वाह करण्याकरिताचे व्यवसायाकरिता घेतले होते व ते वाहन विरुध्द पक्षाने गैरकायदेशीर पध्दतीने ताब्यात घेतले. त.क. ने सदर वाहन परत करण्यात यावे अशी विनंती केली आहे. परंतु वि.प. यांनी सदर वाहन विकले हे आपल्या उत्तरात नमूद आहे. सदर वाहन विकल्याचा कोणताही पुरावा दाखल केला नाही. सदर वाहनाची आजची स्थिती स्पष्ट करणारा कोणताही दस्ताऐवज नसल्यामुळे वि.प. यांनीच त्यांच्या उत्तरात नमूद केल्यानुसार सदर वाहन 13,000/-रुपयात विकले असे म्हटले व ती रक्कम त.क.च्या कर्ज खात्यात वळती केल्याचे नमूद केले, ही बाब ग्राहय धरण्यात येते. विरुध्द पक्ष यांची कर्ज वसूल करण्याची सदर पध्दती अत्यंत चुकिची व गैरकायदेशीर असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे त.क. यांनी वि.प. यांच्याकडे जमा केलेले Down payment स्वरुपाचे 10,000/-रुपये व कर्ज खात्यात जमा केलेली रक्कम 40,192/-ही वि.प.क्रं. 1 यांनी दिलेल्या खाते उता-यावरुन स्पष्ट होते. ही संपूर्ण रक्कम रु.40,192 + 10,000/-रुपये असे एकूण 50,192/-रुपये मिळण्यास तक्रारकर्ता पात्र ठरतो .कारण तक्रारकर्ता यांनी ज्या कारणाकरिता वाहन घेतले होते त्याचा उपभोग त्यांना घेता आला नाही व सदर वाहन गैरकायदेशीरपणे वि.प. यांनी आपल्या ताब्यात घेऊन विकले. 13,000/-रुपये तसे वि.प.यांना वाहन विकून प्राप्त झालेले आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष क्रं.1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्तायांना आदेश पारित झाल्यापासून 30 दिवसात रुपये 50,192/- द्यावे. अन्यथा सदर रक्कमेवर द.सा.द.शे.6% दराने व्याज देय राहील असे मंचाचे मत आहे. - सदर प्रकरणामध्ये तक्रारकर्ता यांनी शारीरिक, मानसिक
त्रासाबद्दल नुकसान भरपाईकरिता रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.5,000/-ची मागणी केलेली आहे. सदर मागणी अवास्तव आहे. परंतु तक्रारकर्त्याला विरुध्द पक्ष यांच्या गैरवर्तणूक व बेकायदेशीर कृत्यामुळे जो शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला त्याकरिता रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.1,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे असे मंचाचे मत आहे. वरील निष्कर्षाच्या आधारे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. आदेश 1) तक्रारकर्ता यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना दोषपूर्ण सेवा दिली असून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे घोषित करण्यात येते. 3) विरुध्द पक्ष यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्ता यांना रुपये 50,192/- आदेश पारित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत द्यावे अन्यथा सदर रक्कम प्रत्यक्ष अदा होईपर्यंत 6% दराने व्याजसह देय राहील. 4) विरुध्द पक्ष यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.1000/- द्यावे. 5) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात. 6) निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यात. | |