(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 17/02/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्यानी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 18.09.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याने दोन चाकी (वेव) वाहन क्र. एमएच-31/बीझेड-592 मे. पाटनी ऑटोमोबाईल्स, मोहन नगर, नागपूर येथून दि.23.08.2006 रोजी खरेदी केले. सदर वाहनाची अर्धी रक्कम गैरअर्जदारांकडून कर्ज म्हणून घेतली. तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचेमध्ये कर्ज करार दि.22.08.2006 रोजी झाला त्यानुसार मासिक किस्तीने कर्जाची परतफेड करावयाची होती. त्यानुसार तक्रारकर्त्याने कर्जाची पूर्ण परतफेड जानेवारी-2008 मधे केली. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, गैरअर्जदारांनी कर्ज देते वेळेस वाहनाचे मुळ आरसी बुक, एक रकमी टॅक्स भरल्याची पावती, एक चाबी स्वतःकडे ठेवली होती. संपूर्ण कर्जाची परतफेड होऊन सुध्दा गैरअर्जदारांनी दस्तावेज व चाबी परत केली नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याने वकीलामार्फत दोन नोटीसेस दि.24.12.2008 व 02.09.2010 रोजी गैरअर्जदारांना पाठविल्या. दोन्ही नोटीस गैरअर्जदारांना प्राप्त होऊनही तक्रारकर्त्यास वाहनाचे मुळ दस्तावेज परत न केल्यामुळे, तक्रारकर्त्यास वाहन विकता आले नाही व पोलिसांकडून सुध्दा वाहन अनेक वेळा चालान करण्यांत आले. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, त्याने 2008 मध्ये वाहन विकले असते तर त्याला अंदाजे रु.7,000/- एवढी जास्त रक्कम मिळाली असती. परंतु गैरअर्जदार क्र.2 ने तक्रारकर्त्यास वाहनाचे मुळ दस्तावेज न दिल्यामुळे त्यास आर्थीक नुकसान झाले. तसेच त्याला शारीरिक व मानसिक त्रास झाला व गैरअर्जदारांनी सेवेत त्रुटी देऊन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला असल्यामुळे प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केली असुन ती व्दारे मागणी केली आहे की, सदर वाहनाचे दस्तावेज व चाबी तक्रारकर्त्यास देण्यांत यावी. मानसिक व शारीरिक त्रासाकरीता रु.2,00,000/-, वाहनाचे किमतीत उतार झाल्यामुळे रु.7,000/-, वाहनाचे कागदपत्रे नसल्यामुळे चालान व दंड झाल्यामुळे रु.2,000/-, नोटीसचा खर्च रु.4,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. 3. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना बजावण्यांत आली असता गैरअर्जदारांनी सदर तक्रारीला खालिल प्रमाणे आपले उत्तर दाखल केलेले आहे. गैरअर्जदारांनी मान्य केले आहे की, तक्रारकर्त्याने त्यांचेकडून दोन चाकी (वेव) वाहन क्र. एमएच-31/बीझेड-592 खरेदी करण्याकरता कर्ज घेतले होते व त्यासंबंधीचा करार झाला होता. तसेच जानेवारी-2008 मध्ये तक्रारकर्त्याने शेवटच्या किस्तीचा भरणा केला होता. त्यांनी मान्य केले आहे की, तक्रारकर्त्याने वाहनाच्या कर्जाची परतफेड पूर्ण केलेली आहे. तक्रारकर्त्यास कागदपत्रे घेऊन जाण्यांस बोलावण्यांत आले, परंतु त्याने दुर्लक्ष केले व दि.24.12.2008 रोजी वकीला मार्फत नोटीस पाठविली. सदर नोटीसला गैरअर्जदारांनी दि.09.01.2009 रोजी उत्तर दिले व त्या व्दारे दस्तावेज व डूप्लीकेट चाबी घेऊन जाण्यांस सांगण्यांत आले होते. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांसोबत कधीही संपर्क साधला नसुन त्यांनी कोणतीही सेवेत त्रुटी दिलेली नाही. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचे इतर सर्व म्हणणे नाकारले असुन सदर तक्रार खारिज करण्याची मंचास विनंती केलेली आहे. 4. सदर तक्रार मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.07.02.2011 रोजी आली असता मंचाने तक्रारकर्त्याचा युक्तिवाद ऐकला, युक्तिवादाचे वेळी गैरअर्जदार गैरहजर, संधी देऊनही त्यांनी युक्तिवाद केला नाही. त्यामुळे प्रकरण गुणवत्तेवरील निकालाकरीता ठेवण्यांत आले. तक्रारीत दाखल दस्तावेज व तक्रारकर्त्याचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 5. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडून. दोन चाकी (वेव) वाहन क्र. एमएच-31/बीझेड-592 खरेदी करण्याकरीता कर्ज घेतले होते ही बाब उभय पक्षांना मान्य असल्यामुळे तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेजांवरुन स्पष्ट होत असल्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ‘ग्राहक’ ठरतो असे मंचाचे मत आहे. 6. तक्रारकर्त्याने वाहनाच्या रकमेची संपूर्ण परतफेड केल्याचे तक्रारकर्त्याचे कथन गैरअर्जदारांनी सुध्दा आपल्या उत्तरात मान्य केलेले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने वाहनाची संपूर्ण रक्कम दिल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने वाहनाची संपूर्ण रक्कम दिल्यानंतर गैरअर्जदारांनी त्याला दस्तावेज व चाबी द्यावयास पाहिजे होते किंवा कर्जाच्या संपूर्ण रकमेची परतफेड झाल्यानंतर गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास पत्र पाठवुन दस्तावेज व चाबी घेऊन जाण्यांस सुचित करावयास पाहिजे होते. या उलट गैरअर्जदारांनी तक्रारकर्ता चाबी व दस्तावेज घेण्यांस आला नाही, असे नमुद केलेले आहे. सदर बाब मान्य करणे शक्य नाही, कारण कोणत्याही कर्जाची संपूर्ण परतफेड केल्यानंतर वाहनाचे दस्तावेज व चाबी घेण्यांस येणार नाही, ही बाब पटण्याजोगी नाही. 7. गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, त्यांनी तक्रारकर्त्याला वाहनाचे दस्तावेज व चाबी घेण्यांस जाण्याबद्दल सुचविले होते. परंतु तसा कोणताही दस्तावेज दाखल केलेला नाही. तकारकर्त्याने वाहनाच्या कर्जाची रक्कम परतफेड ही जानेवारी-2008 मध्ये केलेली होती व त्यानंतर त्याने गैरअर्जदारांना दि.24.12.2008 ला नोटीस पाठविला तो पर्यंत गैरअर्जदारांनी कोणतेही पत्र तक्रारकर्त्यास पाठविले नव्हते. दि.09.01.2009 रोजी तकारकर्त्याचे वकीलांना गैरअर्जदारांना नोटीसच्या उत्तराचे संबंधात कळविले की ना हरकत प्रमाणपत्र, आर.सी.बुक, डुप्लीकेट चाबी घेऊन जावे, परंतु दस्तावेज व चाबी देण्याबद्दल कोणतीही तत्परता दर्शविली नाही ही गैरअर्जदारांचे सेवेतील अनुचित व्यापारी पध्दत दर्शविते. गैरअर्जदारांचे कथनावरुन व दिलेल्या पत्रावरुन ही बाब स्पष्ट होते की, तो तकारकर्त्यास आर.सी. बुक, चाबी तसेच वाहना संबंधीची दस्तावेज देण्यांस तयार आहे, ते त्याने तक्रारकर्त्यास द्यावे. 8. सदर प्रकरणामध्ये दोन वर्षांपर्यंत दस्तावेज व चाबी स्वतःकडे गैरअर्जदारांनी ठेवणे ही मुळातच सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापार पध्दती आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने तक्रारीत केलेल्या मागण्या या अवास्तव आहेत, करीता न्यायोचितदृष्टया मानसिक त्रास, वाहनाचे किमतीतील उतार याकरीता तक्रारकर्ता हा रु.5,000/- मिळण्यांस पात्र ठरतो, असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारीचा खर्च रु.1,000/- मिळण्यांस पात्र ठरतो. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता वरील परिस्थितीचा विचार करुन आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास सेवेत त्रुटी दिल्याचे घोषीत करण्यांत येते. 3. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तकारकर्त्यास आर.सी. बुक, चाबी तसेच वाहना संबंधीची दस्तावेज परत करावी. 4. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला मानसिक त्रास, वाहनाचे किमतीतील उतार याकरीता रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/- अदा करावे. 5. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |