-- आदेश --
(पारित दि. 22-11-2007)
द्वारा- श्रीमती प्रतिभा बाळकृष्ण. पोटदुखे, अध्यक्षा -
तक्रारकर्ता श्रीमती एकता अशोक तोलानी यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,...........
1. तक्रारकर्ता हया मय्यत श्री. अशोक तोलानी यांच्या विधवा आहेत. मय्यत श्री.अशोक तोलानी यांनी वि.प.यांच्याकडून पॉलिसी क्रं. 0010916348 ही घेतलेली होती. त्याची विमीत तारीख ही दि. 15-05-05होती तर विमीत रक्कम ही रुपये.2,50,000/- अशी होती.
2. श्री. अशोक तोलानी हे बुटीबोरी येथे कारखान्यात जात असतांना एका सायकलस्वारास वाचवित असतांना मोटर सायकल स्लिप झाल्यामुळे पडले व त्यांच्या डोक्याला मार लागला . त्यांना सोनी हॉस्पीटल, गांधीबाग, नागपूर येथे भरती करण्यात आले. दि. 26-01-07 रोजी श्री. अशोक तोलानी यांना गेटवेल हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले होते. औषधोपचार चालू असतांना दि. 19-02-07 रोजी त.क.यांचे पती श्री.अशोक तोलानी यांचा मृत्यु झाला. हा मृत्यु दि.23-12-2006 रोजी त्यांना झालेल्या अपघाताचा परिणाम होता.
3. त.क.यांनी त्या नॉमिनी असल्यामुळे वि.प.यांच्याकडे विमा दावा सर्व कागदपत्रासह दाखल केला. परंतु दि. 14-06-07 रोजी वि.प.यांनी विमा दावा नाकारला.
3.
4. त.क. यांनी मागणी केली आहे की, वि.प.यांच्या सेवेत न्यूनता आहे असे घोषित करण्यात यावे, वि.प.यांनी विमा दाव्याची रक्कम रुपये 2,50,000/- अधिक अपघातात मृत्यु झाल्यामुळे रुपये 2,50,000/- चा फायदा असे एकूण रुपये5,00,000/-फिर्याद दाखल झालेल्या तारखेपासून 12% व्याजासह त.क. यांना देण्याचा आदेश व्हावा, तसेच त.क.यांना शारीरिक व मानसिक त्रासासाठी म्हणून रु.20,000/-वि.प.यांच्याकडून मिळावे.
5. सदर ग्राहक तक्रारीत वि.प.क्रं. 1 व 2 यांना अ.क्रं. दि. 20-09-2007 व दि. 23-10-2007 रोजी विद्यमान न्यायमंचाचा नोटीस मिळाला परंतु ते हजर झाले नाही व ग्राहक तक्रारीचे उत्तर सुध्दा त्यांनी पाठविले नाही. म्हणून त्यांच्या विरोधात दि. 20-11-2007 रोजी प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
6. त.क.यांनी दाखल केलेली कागदपत्रे , शपथपत्र व केलेला युक्तिवाद यावरुन असे दिसून येते की, मृतक श्री. अशोक तोलानी यांचा अपघातामुळे मृत्यु झालेला आहे. डॉ. सुधीर सोनी यांनी दि. 10-01-07 रोजी दिलेल्या प्रमाणपत्रात सुध्दा दि. 23-12-2006 रोजी झालेल्या अपघातामुळे अशोक तोलानी यांना दोन महिने दवाखान्यात राहावे लागेल असा उल्लेख आहे. या अपघातामुळेच पुढे दि. 19-02-2007 रोजी अशोक तोलानी यांचा गेटवेल हॉस्पीटल येथे मृत्यु झालेला आहे.
7. मृतक श्री.अशोक तोलानी यांनी वि.प.यांच्याकडून घेतलेल्या जीवन विमा पॉलिसीवरुन असे दिसते की, पॉलिसी ही रुपये 2,50,000/- ची होती तर Accidental Death Benefit Rider रुपये 2,50,000/- चे दिलेले आहे. मृतक श्री. अशोक तोलानी यांचा मृत्यु हा पॉलिसी कालावधीत झाल्याचे दिसून येते.
8. वि.प.यांनी सदर पॉलिसी ही दि. 14 जुन 2007 रोजी मृतक श्री. अशोक तोलानी यांना डायबिटीज होते या कारणास्तव नाकारलेली आहे. अशोक तोलानी यांचा मृत्यु हा डायबिटीजमुळे नव्हे तर अपघातामुळे झालेला आहे. त्यामुळे डायबिटीज होते ही बाब लपवून ठेवली या कारणावरुन विमा दावा नाकारणे ही वि.प.यांच्या सेवेतील न्यूनता आहे.
असे तथ्य व परिस्थिती असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
- वि.प.यांनी तक्रारकर्ता यांना पॉलिसी रक्कम रुपये 2,50,000/- अधिक Accidental Death Benefit Rider चे रुपये 2,50,000/- असे एकूण रुपये 5,00,000/- हे विमा दावा नाकारल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि. 14 जुन 2007 पासून 9% व्याजासह द्यावे.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासासाठी रु.5000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रु.1000/- द्यावेत.
- विरुध्द पक्ष यांनी आदेशाचे पालन आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत करावे अन्यथा ते ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम-27 प्रमाणे दंडाहर्य कारवाईस पात्र असतील.