श्री. मिलींद केदार, सदस्य यांचे आदेशांन्वये. - आ दे श - (पारित दिनांक : 22/11/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्याने गैरअर्जदाराकडे रु.4951/- भरुन दि.25.02.2006 रोजी हेल्थ केयर नावाची वैद्यकीय विमा पॉलिसी (मेडीक्लेम) क्र.0016833693 काढली. पुढे याच पॉलिसीचे नुतनीकरण करुन दि.26.02.2007 पावती क्र.0060456810 व नंतर दि.17.04.2008 रोजी पावती क्र.0143909352 पॉलिसी घेतली. तक्रारकर्ता हा मुलाकडे हैद्राबाद येथे नोव्हेंबर 2008 ला गेला असता तेथे त्याला ह्दयविकाराचा झटका आला व दि.02.12.2008 रोजी हैद्राबाद येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करावे लागले. तक्रारकर्त्याची एंजियोग्राफी करुन 09.12.2008 रोजी एंजीयोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. सदर उपचाराची संपूर्ण कागदपत्रे तक्रारकर्त्याने तयार करुन 10.03.2009 रोजी गैरअर्जदाराला सदर बाबीची माहिती देऊन त्यांच्या सुचनेनुसार काही फॉर्मस् भरुन घेतले. परंतू तक्रारकर्त्याचा विमा दावा निकाली काढून रक्कम देण्यात आली नाही. तक्रारकर्त्याने दि.14.11.2009 रोजी पत्र पाठवून परत विचारणा केली असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन विमा पॉलिसीप्रमाणे देयकाची रक्कम रु.90,372/-, मानसिक व शारिरीक त्रासाबाबत रु.50,000/- व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. 2. सदर तक्रार मंचासमोर दाखल झाल्यावर मंचाने गैरअर्जदारावर नोटीस बजावला. गैरअर्जदाराला नोटीस प्राप्त होऊन त्यांनी लेखी उत्तर दाखल केले. 3. गैरअर्जदाराने आपल्या उत्तरामध्ये त्यांनी तक्रारकर्त्याला दि.23.07.2009 च्या पत्रांन्वये दावा निकाली काढण्याकरीता 6 इन 1 दावा फार्म, विस्तृत पी.टी.सी.ए.चा ब्रेक-अप चार्ज रु.50,000/- करीता आणि मुळ छापील नंबर आगाऊ पैशाची रसिद रु.1,00,000/- करीता असे तीन मुळ कागदपत्राची मागणी याद्वारे करण्यात आली होती. कारण सदर कागदपत्राच्या अभावी दावा निकाली काढणे शक्य नव्हते. तक्रारकर्त्याला मागणी करुन सदर कागदपत्रे न दिल्याने दावा निकाली काढता आला नाही. तक्रारकर्त्याने सदर कागदपत्रे दाखल केली तर दावा निकाली काढणे शक्य होईल असे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे. इतर तक्रारीतील सर्व कथने गैरअर्जदाराने नाकारली आहेत. 4 सदर प्रकरण युक्तीवादाकरीता मंचासमोर आले असता उभय पक्षांनी आपला युक्तीवाद केला. मंचाने सदर प्रकरणी दाखल कथनांचे, निवाडयांचे व कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 5. उभय पक्षांनी दाखल केलेले शपथपत्रावरील कथन व दस्तऐवज यांचे अवलोकन करता तक्रारकर्ता हा पॉलिसीधारक असल्याने गैरअर्जदाराचा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे. 6. मंचाने गैरअर्जदाराने दाखल केलेले उत्तर व लेखी युक्तीवादाचे अवलोकन केले असता त्यांनी वारंवार तक्रारकर्त्याने 6 इन 1 दावा फार्म, विस्तृत पी.टी.सी.ए.चा ब्रेक-अप चार्ज रु.50,000/- करीता आणि मुळ छापील नंबर आगाऊ पैशाची रसिद रु.1,00,000/- करीता असे तीन मुळ कागदपत्राची मागणी केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या प्रतिउत्तराप्रमाणे त्याने सदर दस्तऐवज आधीच गैरअर्जदाराला दिलेले आहे. तक्रारकर्त्याच्या मते त्यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांच्या आधारे सदर माहिती गैरअर्जदाराला मिळू शकते. परंतू एकूण दावा निकाली काढण्याच्या दृष्टीने विचार करता गैरअर्जदाराला जर तक्रारकर्त्याने सदर दस्तऐवज पुरविले तर दावा हा त्वरित निकाली निघू शकतो. म्हणजे वादाचा मुद्दा कागदपत्रांची पूर्तता करणे हा आहे. गैरअर्जदाराने दाखल केलेले दस्तऐवज क्र. 2 दि.23.07.2009 वरुन गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याकडे उपरोक्त नमूद तीन दस्तऐवजांची मागणी केल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्त्यानेही सदर दस्तऐवजाची प्रत दाखल केलेली आहे. यावरुन तक्रारकर्त्याला सदर पत्र मिळाले होते हे निदर्शनास येते. तक्रारकर्त्याने मागणी केल्यानुसार सदर दस्तऐवज गैरअर्जदाराला द्यावे. जेणेकरुन त्याचा प्रलंबित दावा निकाली काढण्यास गैरअर्जदाराला मदत होईल. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याकडून दस्तऐवज प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आत तक्रारकर्त्याचा विमा दावा निकाली काढावा. सदर निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याने दाखल केलेले दि.23.07.2009 रोजीचे पत्र दस्तऐवज क्र. 6 नुसार तक्रारकर्त्याने 6 इन 1 दावा फार्म, विस्तृत पी.टी.सी.ए.चा ब्रेक-अप चार्ज रु.50,000/- करीता आणि मुळ छापील नंबर आगाऊ पैशाची रसिद रु.1,00,000/- करीता असे तीन मुळ दस्तऐवज गैरअर्जदाराला द्यावे व गैरअर्जदाराने सदर दस्तऐवज प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आत तक्रारकर्त्याचा दावा निकाली काढावा. सदर आदेशांन्वये तक्रारकर्त्याची तक्रार निकाली काढण्यात येते. 2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च सोसावा.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |