मंचाचे निर्णयान्वये - श्री. विजयसिंह राणे, अध्यक्ष. //- आदेश -// (पारित दिनांक – 03/03/2011) 1. तक्रारकर्ता ही एक खाजगी मर्यादित कंपनी असून त्यांनी सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून त्यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांनी गैरअर्जदारांकडून त्यांचे कंपनीचे व्यवहाराकरीता अडत सेवा घेतली होती. परंतू त्यांना नंतर असे कळले की, गैरअर्जदारांनी त्यांचा अडत सेवा विभाग बंद केला आहे. परंतू त्यादाखल शुल्क मात्र गैरअर्जदाराने स्विकारले. परंतू सेवा न दिल्याने तक्रारकर्ता कंपनीचे नुकसान झाले, त्याकरीता त्यांनी सदर तक्रार दाखल केलेली आहे. 2. सदर तक्रारीला गैरअर्जदारांनी उत्तर दाखल केले आणि तक्रार गैरकायदेशीर व चुकीची असल्याचा उजर घेतला. मंचाने सदर प्रकरणी उभय पक्षकांराचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांमार्फत ऐकला. तसेच सदर प्रकरणी दाखल दस्तऐवज व शपथपत्रावरील लेखी कथनाचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 3. मंचाने सदर प्रकरणी तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या कराराचे अवलोकन केले असता सदर करार हा तक्रारकर्ता कंपनीने गैरअर्जदारासोबत केला असल्याचे स्पष्ट होत असून सदर करारांन्वये गैरअर्जदाराची अडत सेवा तो घेणार होता. तक्रारकर्ता कंपनीने नंतर तक्रारीत दुरुस्ती करुन उपजिविकेकरीता व्यवसाय करीत असल्याची बाब नमूद केली. परंतू तक्रारीतील तक्रारकर्ता कंपनी आहे, मुंबईमध्येही त्यांची शाखा आहे व दस्तऐवजांवरुन कंपनी ही आपली उपजिविका चालवित नाही तर व्यवसाय चालवित आहे आणि सदर व्यवसायाकरीता गैरअर्जदाराची सेवा घेतल्याचे सकृतदर्शनी उपलब्ध कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. गैरअर्जदारांनीही आपल्या उत्तरामध्ये तक्रारकर्ता कंपनीने, त्यांच्या व्यवसायाकरीता फॅक्टरींग सर्व्हीसेस पुरविण्याकरीता व्यवहार केल्याचे म्हटले आहे. मुळात तक्रार ज्या सेवा गैरअर्जदाराने न पुरविल्याकरीता दाखल केलेली आहे, त्या सेवा तक्रारकर्ता कंपनी ही वाणिज्यीक प्रयोजनाकरीता घेत होती, म्हणून तक्रारकर्त्याची सदर तक्रार व्यापारीक कारणास्तव असल्याने ती खारीज होण्यायोग्य आहे असे मंचाचे मत आहे. वाणिज्यीक प्रयोजनाकरीता सेवा घेतल्याने मालक हा ग्राहक म्हणून लाभधारक ठरु शकत नाही असे मंचाचे मत आहे. सकृतदर्शनी तक्रारकर्ता हा ग्राहक असल्याचे स्पष्ट होत नसल्याने तक्रारकर्त्याची तक्रार मंचासमक्ष चालविण्यायोग्य नसल्याचे मंचाचे मत आहे. मा. राज्य आयोगाचे IV (2010) CPJ 19, RAHUL PARIKH VS. SHELTER MAKERS (I) PVT. LTD. निवाडयावरुन व्यावसायिक उपयोगातून अधिकतम लाभांश मिळवितांना झालेल्या विवादाबाबतची तक्रार चालविण्याचे अधिकार मंचाला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचा सदर वाद हा मंचासमक्ष चालविण्यायोग्य नसल्याचे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याचा सेवा घेण्याचा मुळ हेतू हा व्यापारिक असल्याने तक्रारकर्त्याची तक्रार मंचाचे मते खारिज होण्यायोग्य आहे, म्हणून मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते. तक्रारकर्ते आपला वाद सोडविण्यास अन्य न्यायालयात जाण्यास मुक्त आहे. 2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च स्वतः सोसावा.
| [HONABLE MR. Mr. Milind R. Kedar] PRESIDING MEMBER | |