सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.97/2009
तक्रार दाखल झाल्याचा दि. 13/11/2009
तक्रार निकाल झाल्याचा दि.24/12/2010
श्री योगेश तात्या पवार
वय – 24 वर्षे, धंदा – व्यापार,
रा.तेर्सेबांबर्डे, ता.कुडाळ,
जिल्हा सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) बजाज अलियान्स (पॉलिसी अधिकारी)
3 सी – डी सेसा घोर
20 पाटटो प्लाझा, पणजी,
गोवा 403 001
2) बजाज अलियान्स जनरल इन्शुरंस कंपनी लिमिटेड
जी.ई, प्लाझा, एअरपोर्ट रोड, येरवडा,
पुणे नं.411 006. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री अनिल निरवडेकर
विरुद्धपक्षातर्फे- विधिज्ञ श्री के.पी. परब.
(मंचाच्या निर्णयाद्वारे सौ.वफा जमशीद खान, सदस्या)
निकालपत्र
(दि.24/12/2010)
1) तक्रारदार यांचे मालकीचा डंपर (क्र.MH07/1885) चा असून डंपरचा वापर ते आपल्या वैयक्तिक वापराकरीता व स्वतःच्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहाकरीता करतात. तसेच तक्रारदार सदरचा डंपर स्वतः चालवितात. सदर डंपरचा विमा तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 च्या विमा कंपनीकडे दि.27/2/2009 रोजी उतरला असून तो डंपर श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनांस यांचेकडून कर्ज घेऊन विकत घेतलेला आहे. सदर डंपरला ता.18/6/2009 रोजी अपघात झाला; त्यावेळी देखील डंपरचा विमा सामनेवाला 1 व 2 या कंपनीकडे उतरविलेला होता. सदर अपघातात डंपरला झालेल्या नुकसानीबाबत रीतसर सर्व्हे केलेला असून सर्व्हेमध्ये रक्कम रु.3,95,832/- (रुपये तीन लाख पंच्याण्णव हजार आठशे बत्तीस मात्र) एवढे नुकसान झाल्याचे सामनेवाला नं.1 ला तक्रारदाराने कळविले, पण ते रक्कम देण्यास टाळाटाळ करु लागले म्हणून दि.15/9/2009 रोजी नोटीस दिली; तरीही सामनेवाला नं.1 व 2 यांनी पैसे देण्याची व्यवस्था केली नाही किंवा उत्तर देखील दिले नाही. दि.18/6/2009 ला अपघात झाल्यापासून गाडी बंद स्थितीत राहिल्यामुळे व तक्रारदार यांना श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनांसचा दरमहा रक्कम रु.22,500/- चा हप्ता भरावा लागत असल्यामुळे झालेली नुकसान भरपाई मिळणेसाठी व झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसानी मिळणेसाठी तक्रारदाराने सदरचा ग्राहक तक्रार अर्ज दाखल केला आहे.
2) सदर तक्रारीची नोटीस विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना पाठवण्यात आले. विरुध्द पक्ष क्र.2 आपले वकील प्रतिनिधी मार्फत सदर प्रकरणात हजर होऊन त्यांनी आपले लेखी म्हणणे नि.15 वर दाखल केले असून; त्यात तक्रारदार यांनी विरुध्द पक्षकार यांची फसवणूक केलेली असून स्वतःच्या नुकसानीची रक्कम विरुध्दपक्ष यांचेकडून मिळवणेकरीता अप्रामाणिक हेतूने बनावट वाहन चालवण्याचा परवाना (Driving Licence) तयार करुन दाखल केलेला असल्याने तक्रारदार यांची तक्रार खारीज करावी असे म्हणणे मांडले. विरुध्द पक्ष क्र.1 हे नोटीस बजावणी होऊनही गैरहजर राहिल्यामुळे त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फी चालवण्याबाबत आदेश दि.15/1/2010 रोजी पारीत करण्यात आले व विरुध्द पक्ष क्र.1 हे दि.1/2/2010 रोजी मंचासमोर हजर होऊन त्यांनी त्यांचे विरुध्द झालेला एकतर्फी आदेश रद्द करुन म्हणणे मांडणेची संधी मिळावी असा विनंती अर्ज दाखल केला. सदर अर्ज रक्कम रु.500/- च्या कॉस्टवर मंचाने मंजूर केला. विरुध्द पक्ष क्र.1 ने विरुध्द पक्ष क्र.2 यांनी दिलेले म्हणणे स्वीकृत केल्याबाबतची पुरसीस नि.21 वर आहे.
3) तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ कागदपत्रे दाखल केली. तक्रारदाराने आपले शपथपत्र नि.16 वर दाखल केले व प्रतिउत्तराचे शपथपत्र नि.22 वर दाखल केले. विरुध्द पक्षाने तक्रारदार यांना विचारलेली प्रश्नावली नि.23 वर असून तक्रारदाराने त्याची शपथेवर दिलेली उत्तरे नि.24 वर आहे. विरुध्द पक्षातर्फे पुराव्याचे शपथपत्र दाखल करणेत आले. ते नि.26 वर आहे. सदर शपथपत्राचे अनुषंगाने तक्रारदाराने विचारलेली प्रश्नावली नि.29 वर असून विरुध्द पक्षातर्फे देण्यात आलेली शपथेवरील उत्तरावली नि.30 वर आहे. दरम्यान विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी नि.32 वर अर्ज दाखल करुन D.T.O. हजारीबाग यांना तक्रारदाराच्या गाडीवरील ड्रायव्हरचे संबंधाने ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भातील रेकॉर्ड घेऊन हजर राहणेसाठी साक्षीसमन्स काढणेसाठी विनंती केली व नि.34 च्या अर्जान्वये तक्रारदाराने ड्रायव्हरचे ओरिजनल ड्रायव्हिंग लायसन्स हजर करणेबाबतचे आदेश पारीत व्हावेत अशी विनंती केली. तक्रारदाराने सदर ड्रायव्हिंग लायसन्स पेडणे गोवा पोलीसाकडे जमा केले असल्यामुळे ते हजर करण्यासाठी मुदती मागून घेतल्या व दि.16/7/2010 रोजी नि.52/1 वर ड्रायव्हिंग लायसन्सची मूळ प्रत हजर केली. त्यानंतर म्हणजेच दि.15/11/2010 रोजी D.T.O. हजारीबाग यांनी आपला अहवाल व त्यासोबत D.L. रजिस्टर नं.563/06 प्रो.नामे महंमह मुख्तार इब्राहिम मियॉं चा उतारा पाठविला; तो नि.63/1 वर आहे. तक्रारदाराने पुरावा संपल्याची पुरसीस नि.25 वर दिलेली आहे. तर विरुध्द पक्ष यांनी पुरावा संपल्याचे पुरसीस नि.65 वर दिलेले आहे. तक्रारदार यांनी सादर केलेला लेखी युक्तीवाद नि.66 वर असून विरुध्द पक्ष यांनी सादर केलेला लेखी युक्तीवाद नि.67 वर आहे. उभय पक्षकारांच्या वकील प्रतिनिधींनी विस्तृत स्वरुपात केलेला तोंडी युक्तीवाद ऐकला.
4) तक्रारदाराची तक्रार, दाखल केलेले पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे तसेच विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे, पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे आणि उभय पक्षकांराचा युक्तीवाद विचारात घेता खालील मुद्दे निष्कर्षासाठी निघतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी ग्राहकाला (तक्रारदाराला) देण्यात येणा-या सेवेमध्ये त्रुटी ठेवली आहे काय ? | नाही |
2 | तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेस पात्र आहे काय ? | नाही |
-कारणमिमांसा-
5) मुद्दा क्रमांक 1 - i) तक्रारदाराने या मंचासमोर तक्रार दाखल करतांना तक्रारीसोबत सर्व्हेअरच्या रिपोर्टची प्रत, मोटर वाहन अपघाताच्या पंचनाम्याची प्रत, विरुध्द पक्षास पाठविलेल्या नोटीशीची नक्कल, विमा पॉलिसी व आर.सी. बुकची प्रत (अनुक्रमे नि.3/1 ते नि.3/5) असे कागदपत्र दाखल केलेले आहेत. तक्रारदाराने तक्रारीमध्ये आपण स्वतः डंपर चालवितात असा उल्लेख केलेला आहे. तक्रारदाराने विरुध्द पक्ष यांच्या कंपनीकडे दाखल केलेल्या विमा क्लेम मागणीपत्राची प्रत दाखल केलेली नाही; परंतु विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांसोबत नि.11/1 वर तक्रारदाराने दाखल केलेला क्लेम फॉर्म असून, तक्रारदाराला पाठवलेले दि.3/11/2009 चे पत्र नि.11/2 वर असून तक्रारदाराला पत्र पाठवल्याची स्पीड पोस्टची पोच पावती नि.11/2 (अ) वर आहे. तसेच सदर पत्रास तक्रारदाराने पाठवलेले दि.13/11/2009 चे पत्राची झेरॉक्स प्रत नि.11/3 वर आहे. नि.11/1 मोटर इंश्युरंस क्लेम फॉर्मचे अवलोकन करता अनुच्छेद क्र.7 ‘ड्रायव्हर डिटेल्स’ मध्ये तक्रारदाराने ‘महंमद एम्. मुख्तार, ड्रायव्हर ड्रायव्हिंग लायसन्स नं.563/2K6/Prof, जन्मतारीख 18/02/1984 असा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर बजाज अलियान्स विमा कंपनीने म्हणजेच विरुध्द पक्ष यांनी दि.3/11/2009 च्या पत्रान्वये सदर ड्रायव्हिंग लायसन्सबाबत रेकॉर्ड झारखंड आर.टी.ओ. यांचेकडे उपलब्ध नसल्याने ते लायसन्स बनावट असल्याने क्लेम का नाकारण्यात येऊ नये, या बाबत 7 दिवसांच्या आत उत्तर दयावे असे तक्रारदारला कळविले होते. त्या पत्राला तक्रारदाराने दि.13/11/2009 रोजी उत्तर दिले असून दिलेले लायसन्स हे बरोबर असल्याने क्लेम मंजूर करण्याची विनंती केली आणि गरज भासल्यास आर.टी.ओ. झारखंडचा आणखी पुरावा देण्यास आम्ही तयार आहोत असे म्हणणे मांडले. तक्रारदाराने हे दि.13/11/2009 चे पत्र (नि.11/3) विरुध्द पक्षाच्या विमा कंपनीला पाठवले, त्यापूर्वीच तक्रारदार यांनी या ग्राहक मंचात तक्रार दाखल केल्याचे रेकॉर्डवरुन दिसून येते.
ii) कोणताही क्लेम मंजूर करणेसाठी जी आवश्यक कागदपत्रे असतात ती क्लेम सादर करणा-या व्यक्तीने पुरवणे आवश्यक असते. तक्रारदारने स्वतःच्या गाडीच्या अपघाताच्या संबंधाने विमा रक्कम मिळणेकरीता अर्ज केला असल्याने मागणीची सत्यता पडताळून पाहणेसाठी विमा कंपनीकडे तक्रारदाराने लायसन्ससंबंधी पुरावा देणे आवश्यक होते; परंतु तसे न करता तक्रारदार यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे सदर प्रकरणात विरुध्दपक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी ठेवल्याचे दिसून येत नसल्याने आम्ही सदर मुद्याचे उत्तर नकारार्थी देत आहोत.
iii) मा.सर्वोच्च न्यायालयाने Ravneet Singh Bagga V/s M/s KLM Royal Dutch Airlines & Anr. Civil Appeal No. 8701 of 1997 , Decided on 02/11/1999 या प्रकरणात निर्वाळा देतांना खालील मुद्दा स्पष्ट केलेला आहे.
“Consumer- Deficiency in service- Sec 2 (1) of Consumer Protection Act 1986 – Whether delay due to verification of vissa papers constitutes deficiency in service on part of airline- bonafied action taken by staff of airlines cannot be held deficiency in service.”
6) मुद्दा क्रमांक 2 - i) तक्रारदाराने विरुध्द पक्ष यांच्या विमा कंपनीकडे दाखल केलेला क्लेम हा डंपर अपघातात झालेल्या नुकसानीसंबंधाने विमा रक्कम मिळणेसाठी आहे. तक्रारदाराने विमा कपंनीकडे सादर केलेल्या क्लेमसोबत ड्रायव्हर महंमद एम मुख्तार याच्या ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत दाखल केली होती. तक्रारदाराने आपल्या तक्रार अर्जात सदर डंपर अपघात घडला तेव्हा महंमद एम्. मुख्तार वाहन चालवित होता याचा उल्लेख केलेला नाही, तसेच त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स देखील तक्रार अर्जासोबत हजर केलेले नाही. विरुध्द पक्ष यांनी नि.34 चे अर्जान्वये मागणी केल्यावरुन तक्रारदाराने ड्रायव्हर महंमद एम्. मुख्तार यांचे मूळ ड्रायव्हिंग लायसन्स नं.563/2K6 /Prof हे नि.52/1 वर दाखल केले आहे. सदर प्रकरणी विरुध्द पक्ष यांनी D.T.O. हजारीबाग यांना साक्षीसमन्स काढणेकरीता अर्ज दिला. D.T.O. हजारीबाग यांनी ड्रायव्हिंग लायसन्स नं.563/2K6 /Prof नामे Md. Mokhtar S/o Ibrahim Mian चे रजिस्टर उता-याची सहीसूद नक्कल पाठवली ती अनुक्रमे नि.50 व नि.63/1 वर असून त्याच्याशी मूळ ड्रायव्हिंग लायसन्स नि.52/1 ची तुलना करता तारखांमध्ये तफावत आढळून येते. D.T.O. हजारीबाग यांनी पाठवलेल्या रजिस्टरच्या उता-यामध्ये परवान्याचा कालावधी हा दि.15/4/2006 ते 14/4/2009 असा असून नुतनीकरणाचा कालावधी दि.5/12/2009 ते 04/12/2012 असा दिसून येतो. तर मूळ लायसन्समध्ये दि.15/4/2006 ते 14/4/2009 परवाना मुदत असून दि.17/1/2009 पासून परवान्याचे नुतनीकरण केल्याचे दिसते व त्याची मुदत दि.16/1/2012 पर्यंत असल्याचे दिसून येते. या सर्व बाबी संशयास्पद वाटतात. तक्रारदाराचे डंपरचा अपघात दि.18/6/2009 रोजी घडलेला आहे; परंतु D.T.O. हजारीबाग यांनी ड्रायव्हरच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या संबंधाने पाठविलेल्या रजिस्टरच्या उता-यामध्ये सदरचा कालावधी समाविष्ट होत नाही. त्यामुळे सदर अपघात झालेल्या मुदतीमध्ये तकारदाराच्या डंपरमधील ड्रायव्हर महंमद एम्. मुख्तार याचेकडे गाडी चालवण्याचा परवानाच नव्हता हे सिध्द होते. लायसन्सवरील फोटो व सहीसुद रजिस्टर उता-यावरील फोटो यामध्ये देखील तफावत आढळते. सदर प्रकरणात तक्रारदारने ड्रायव्हर महंमद एम मुख्तार यांस साक्षीदार म्हणून तपासलेले नाही. त्यामुळे मंचासमोर ड्रायव्हरच्या चेह-याबाबतची सत्यता प्रत्यक्षपणे पडताळून पाहता आली नाही. विरुध्द पक्षाने तक्रारदार यांस नि.23 वर दिलेल्या प्रश्नावलीमध्ये ड्रायव्हरला साक्षीदार म्हणून तपासणेबाबत प्रश्न केला होता; त्याचे उत्तर तक्रारदारने ‘नाही’ असेच दिलेले आहे. या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदाराने नि.52/1 वर दाखल केलेले मूळ लायसन्स व D.T.O. हजारीबाग यांचेकडून प्राप्त झालेला अनुक्रमे नि.50 व नि.63/1 वर दाखल असलेल्या लायसन्सबाबतचा रजिस्टर उतारा यामध्ये तफावत आढळत असल्याने तक्रारदाराने दाखल केलेले मूळ लायसन्स हे कायदेशीर पुरावा म्हणून ग्राहय धरता येणारे नाही.
ii) मा.सर्वोच्च न्यायालयाने Oriental Insurance Co. Ltd. V/s Prithvi Raj – Civil Appeal No. 648 of 2008 (Arising out of S.L.P. (C) No. 12607 of 2005) decided on 24/01/2008 या प्रकरणात निर्वाळा देतांना खालील मुद्दा स्पष्ट केलेला आहे.
“Motor vehicle- Insurance claim –fake licence –liability of insurance company – Held even though the Motor Vehicle Act is beneficial qua the third party , the same benefit cannot be extended to the owner of the offending vehicle having a fake licence – Once the licence is fake one the renewal cannot take away the effect of fake licence – No liability for Insurance company- insurance company has no liability where the driver did not have a valid licence.”
7) वरील मुद्दा क्र.1 व 2 मध्ये केलेल्या विवेचनानुसार विरुध्द पक्ष यांनी सेवेमध्ये कोणतीही त्रुटी ठेवल्याचे सिध्द झाले नसल्यामुळे आम्ही तक्रारदाराची तक्रार खारीज करण्याच्या दृष्टीकोनातून खालील आदेश पारीत करीत आहोत.
अंतिम आदेश
1) तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
2) खर्चाबाबत काही हुकूम नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 24/12/2010
सही/- सही/- सही/-
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.
Ars/-