Complaint Case No. CC/338/2017 | ( Date of Filing : 09 Aug 2017 ) |
| | 1. Shri Namdeo Vishwanath Lande | R/o. 249, Lakmanya Nagar, MIDC, Hingna, Dist. Nagpur | Nagpur | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Bajaj Allianze General Insurance Co.Ltd., Through Branch Manager | Shreeram Tower, Sadar, Nagpur | Nagpur | Maharashtra | 2. M/s. Ketan Motors Pvt. Ltd., Through Manager | Plot No. 7, N.H.6, Amravati Road, Nagpur | Nagpur | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | आदेश मा. अध्यक्ष, श्री. सचिन शिंपी यांच्या आदेशान्वये – - तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्यात नमूद केले की, तक्रारकर्त्याच्या मालकिचे वाहन MH 40 AR-820 या वाहनाचा विमा विरुध्द पक्ष 1 कडून दि. 26.11.2016 ते 25.11.2017 या कालावधीसाठी प्रिमियम रक्कम रुपये 28,115/- अदा करुन पॉलिसी काढली होती. सदर वाहनाचा वापर तक्रारकर्ता व त्यांचे मित्र वरुण बारापात्रे हे करीत होते.
- दि. 30.12.2016 रोजी तक्रारकर्त्याचे मित्र वरुण बारापात्रे हे नागभिड येथून येत असतांना एका नील गायीने अचानक वाहनावर उडी मारल्याने वाहनाचा अपघात झाला व त्यात वाहनाचे बरेच नुकसान झाले. तसेच घडलेल्या घटनेबाबत विरुध्द पक्ष 1 यांना देखील कळविण्यात आले. त्यानंतर सदरचे अपघातग्रस्त वाहन विरुध्द पक्ष 2 यांच्याकडे दुरुस्तीकरिता पाठविले व त्या ठिकाणी विरुध्द पक्ष क्रं. 1 यांचे सर्व्हेअर समीर देव सरकार यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी करुन वाहनाचे फोटोग्राफ देखील घेतले आणि विरुध्द पक्ष क्रं. 2 यांना वाहन दुरुस्ती करण्याबाबत सांगितले. त्यानंतर वाहन दुरुस्तीचे काम सुरु असतांना विरुध्द पक्ष क्रं. 2 यांना विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी वाहन दुरुस्तीचे काम थांबविण्यास सांगितल्याबाबत मेल द्वारे कळविले.
- विरुध्द पक्ष यांनी केलेल्या ई-मेल नुसार तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 1 यांच्या कार्यालयात जाऊन संपर्क केला असता वरुण बारापात्रे यांच्याकडे तक्रारकर्त्याचे वाहन कसे गेले याबाबत लेखी स्वरुपात विरुध्द पक्ष क्रं. 1 यांना कळविण्यात आले.
- तक्रारकर्त्याला वाहन दुरुस्तीसाठी येणा-या खर्चाची रक्कम देण्यास विरुध्द पक्ष क्रं.1 तयार नसल्यामुळे आणि तक्रारकर्त्यास वाहनाची आवश्यकता असल्याने तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 2 यांना दि. 14.02.2017 रोजी रुपये 50,000 व दि. 01.03.2017 रोजी रुपये 94,341/- धनादेशा द्वारे अदा केले. त्यानंतर विरुध्द पक्ष 2 यांनी वाहनाचा ताबा तक्रारकर्त्याला दिला.
- विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी वाहनाचा विमा दावा त्वरित न दिल्यामुळे, विरुध्द पक्ष क्रं. 2 यांच्याकडे वाहन दुरुस्तीसाठी दिलेले असतांना तक्रारकर्त्याला कृष्णा कार रेंटल यांच्याकडून रक्कम रुपये 1,08,000/- देऊन भाडयाने वाहन घेऊन वापरावे लागले. तसेच विरुध्द पक्ष क्रं. 1 यांना वाहनाच्या अपघाताच्या अनुषंगाने संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करुन देखील विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी तक्रारकर्त्याच्या वाहनाच्या आलेल्या खर्चाची रक्कम रुपये 1,44,341/- अदा केली नाही, सदरची बाब ही सेवेतील न्यूनता असल्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार आयोगात दाखल करुन विरुध्द पक्षाने वाहनाच्या दुरुस्ती करिता आलेल्या खर्चाची रक्कम रुपये 1,44,341/- व्याजासह देण्याचा, तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश द्यावा अशी विनंती केली आहे.
- विरुध्द पक्ष 1 ने आपल्या लेखी जबाबात नमूद केले की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 1 यांच्याकडून विमा पॉलिसी घेतली होती ही बाब विवादित नाही. तक्रारकर्त्याने विमा दावा दाखल केल्यानंतर त्याची सत्यता पडताळणीसाठी शेखर पराते यांची इन्व्हेस्टीगेटर म्हणून नियुक्ती केली असता त्यामध्ये तक्रारकर्ता हा महेंद्र अॅन्ड महेंद्र कंपनीत नौकरीस असून त्याचा कोणताही व्यवसाय नाही. तक्रारकर्त्याने त्याचे वाहन वर्तिका टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स यांच्या व्यवसायाकरिता वरुण बारापात्रे यांना विकले आहे. तसेच बॅंकेच्या कर्जाचे हप्ते देखील बारापात्रे हे भरीत होते. तक्रारकर्त्याने सदरचे वाहन विक्री केल्यामुळे तक्रारकर्त्याचा वाहनामध्ये इन्शुअरेबल इंट्रेस्ट नाही. अपघात झाल्यानंतर 2 दिवसाने विरुध्द पक्षाला कळविले आहे व वाहन अपघात स्थळावरुन आणण्यात आले होते. तक्रारकर्त्याने पॉलिसीच्या अटी शर्तीचा भंग केला आहे. आय.आर.डी.ए. मार्फत मान्य प्राप्त निरीक्षकानी केलेल्या अहवालानुसार तक्रारकर्त्याच्या वाहनाचे केवळ रुपये 1,06,000/- एवढे नुकसान झाल्याचे स्पष्ट असल्यामुळे त्या पेक्षा जास्त रक्कमेसाठी विरुध्द पक्षाला जबाबदार ठरविण्यात येऊ नये. विरुध्द पक्षाने कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
- विरुध्द पक्ष क्रं. 2 ला आयोगा मार्फत पाठविण्यात आलेली नोटीस प्राप्त होऊन देखील विरुध्द पक्ष 2 आयोगा समक्ष हजर न झाल्यामुळे त्यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दि. 07.06.2018 रोजी पारित करण्यात आला.
- उभय पक्षांनी दाखल केलेले दस्तावेजाचे अवलोकन केले व त्यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यावर खालील मुद्दे विचारार्थ घेतले.
- तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
- मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत –. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 1 कडून पॉलिसी काढली होती ही बाब विवादीत नाही. यावरुन तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे स्पष्ट होते.
- तक्रारकर्त्याच्या वकिलाचा असा युक्तिवाद आहे की, पॉलिसी कालावधी मध्ये तक्रारकर्त्याच्या वाहनाचा अपघात झालेला असतांना तसेच तक्रारकर्त्याचे वाहन व विमा पॉलिसी ही त्यांच्याच नांवावर असतांना देखील विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचा कायदेशीररित्या देय असलेला विमा दावा नाकारला आहे.
- विरुध्द पक्षाच्या वकिलांचा असा युक्तिवाद आहे की, तक्रारकर्त्याने विमा दावा दाखल केल्यानंतर त्याची सत्यता पडताळणीसाठी शेखर पराते यांची इन्व्हेस्टीगेटर म्हणून नियुक्ती केली असता तक्रारकर्त्याने त्याचे वाहन वर्तिका टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स यांच्या व्यवसायाकरिता वरुण बारापात्रे यांना विकले आहे. तसेच बॅंकेच्या कर्जाचे हप्ते देखील बारापात्रे हे भरीत होते. तक्रारकर्त्याने सदरचे वाहन विक्री केल्यामुळे तक्रारकर्त्याचा वाहनामध्ये इन्शुअरेबल इंट्रेस्ट नसल्यामुळे तसेच पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे तक्रारकर्त्याचा विमा दावा योग्य त्या कारणाने नाकारण्यात आला आहे.
- उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, विरुध्द पक्षाने त्यांच्या जबाब व युक्तिवादा मध्ये तक्रारकर्त्याने त्याचे वाहन वरुण बारापात्रे यांना विकल्याचा आक्षेप घेतला असला तरी ही विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी त्यांचे साक्षीदार शेखर पराते यांच्या शपथपत्रा सोबत तक्रारकर्त्याच्या वाहनाचे आर.टी.ओ. विभागाकडून काढलेले व्हेइकल पर्टीक्युलर्स दाखल केले असून त्यामध्ये तक्रारकर्ता विश्वनाथ लेंडे यांचेच नाव वाहनाचे मालक म्हणून नमूद आहे. परिणामी सदरचे वाहन वरुण बारापात्रे यांना विकल्याचा आक्षेप ग्राहय धरता येत नाही. ज्या वेळेस अपघात झाला त्यावेळेस तक्रारकर्त्याच्या नांवेच वाहन व विमा पॉलिसी असल्याचे व्हेइकल पर्टीक्युलर्सवरुन स्पष्ट होत असल्यामुळे तक्रारकर्त्याचा वाहनामध्ये इन्शुअरेबल इंट्रेस्ट असल्याचे स्पष्ट होते.
- परिणामी तक्रारकर्त्याने वरुण बारापात्रे हे त्यांचे मित्र असल्यामुळे त्यांना वाहन वापरण्याकरिता दिले होते ही बाब तक्रारकर्त्याने शपथपत्रावर नमूद केली आहे. वरुण बारापात्रे यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असल्याबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा विरुध्द पक्षाने अभिलेखावर दाखल केलेला नसतांना तसेच वाहन हस्तांतरीत केल्याचा पुरावा नसतांना तक्रारकर्त्याचा कायदेशीररित्या देय असलेला विमा दावा नाकारणे ही विरुध्द पक्ष क्रं. 1 ची कृती अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करणारी असून दोषपूर्ण सेवा दर्शविते असे आयोगाचे मत आहे. यास्तव मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
- तक्रारकर्त्याची विरुध्द पक्ष 2 कडून कोणती मागणी नसल्यामुळे विरुध्द पक्ष 2 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- मुद्दा क्रमांक 3 बाबत – तक्रारकर्त्यास विरुध्द पक्षाने वर नमूद केल्याप्रमाणे सेवा देण्यात कमतरता केली आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 1 कडून वाहनाच्या दुरुस्ती खर्चाकरिता आलेली रक्कम रुपये 1,44,341/- ची मागणी केली आहे आणि सदरची रक्कम ही विमामुल्य रक्कमेपेक्षा कमी आहे. तक्रारकर्त्याने वाहनाच्या दुरुस्तीकरिता ती रक्कम विरुध्द पक्ष क्रं. 2 यांना धनादेशा द्वारे अदा केली असल्याचे नि.क्रं. 2 वर दाखल दस्तावेजावरुन स्पष्ट होते. विरुध्द पक्षाने त्यांच्या जबाबात सर्व्हे रिपोर्ट प्रमाणे तक्रारकर्त्याची वाहनाचे केवळ रक्कम रुपये 1,08,000/- इतके नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी मान्य केले असले तरी ही मा. राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या न्यायनिर्णयानुसार सर्वे रिपोर्ट मध्ये जरी खर्चाची रक्कम नमूद असली तरी ही विमाधारकाला प्रत्यक्षात आलेल्या खर्चाची रक्कम देण्याची जबाबदारी ही विमा कंपनीची असल्याचे स्पष्ट केले आहे. तक्रारकर्त्यास प्रत्यक्षात वाहनाच्या दुरुस्तीकरिता रक्कम रुपये 1,44,341/- इतका खर्च आल्याचे व ती रक्कम तक्रारकर्त्याने स्वतः विरुध्द पक्ष क्रं. 2 ला दिल्याचे नि.क्रं. 2 वर दाखल दि. 14.02.2017 व 01.03.2017 या तारखांच्या धनादेशावरुन स्पष्ट होत असल्यामुळे तक्रारकर्ता विरुध्द पक्ष 1 कडून रक्कम रुपये 1,44,341/- व त्यावर दि. 01.03.2017 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजासह रक्कम मिळण्यास, तसेच शारीरिक मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च 10,000/-, मिळण्यास पात्र आहे असे आयोगाचे मत आहे.
सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्ष क्रं. 1 ने तक्रारकर्त्याला वाहनाच्या खर्चापोटी आलेली खर्चाची रक्कम रुपये 1,44,341/- व त्यावर दि. 01.03.2017 पासून ते प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजासह रक्कम तक्रारकर्त्याला अदा करावी.
- विरुध्द पक्ष 1 ने तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावे.
- विरुध्द पक्ष क्रं. 2 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- विरुध्द पक्षाने उपरोक्त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 45 दिवसाच्या आंत करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
| |